तरवारीचें व फांसाचें थैमान 48
प्रकरण ८ वW
तत्त्वज्ञानी सम्राट् मार्कस ऑरेलियस
- १ -
रोमच्या पहिल्या आठ सम्राटांपैकीं पांचांचे खून झाले ! या आठानंतरच्या सम्राटांपैकीं पुष्कळसे मारेकर्यांकडून मारले गेले ! खरोखर रोमन साम्राज्याचा साराच इतिहास कट, कारस्थानें, खून, लुटालुटी, आक्रमणें, डाकूगिर्या, लंपटता व विश्वासघात यांनीं भरलेला आहे. आक्रमण करीत जाण्याचें रोमनांना जणूं काय बाळकडूच मिळत असे. 'स्वार्थ व आपण' यांची शिकवण त्यांना जणूं आईच्या दुधाबरोबरच मिळे. 'प्रत्येक जण स्वत:साठीं, जो मागें रेंगाळेल त्याला सैतान धरील' ही म्हणच जणूं त्यांच्या धर्माची शिकवण होती ! रोमन राजसत्ता तद्वतच प्रत्येक रोमन व्यक्तिहि आपल्या बंधूंना धूळ चारून, त्यांच्या आशा, त्यांचे मनोरथ किंबहुना त्यांचे देहहि धुळीस मिळवून स्वत: पुढें येण्याची खटपट करीत असे. रोम इतर देशांना त्याप्रमाणेंच रोमन माणूस इतरांना—स्वकीयांनाहि—लुटूनच पुढें आला पाहिजे, असा जणूं नियमच होता ! प्रत्येक जण पुढारी होण्याची खटपट करी. अशा विषारी व मारक वातावरणांत वाढणारे सम्राट् पुढें भलेंबुरें करण्याची सर्व सत्ता हातीं येताच साधी माणुसकीहि गमावून बसत यांत काय आश्चर्य ? ते रानटी पशूंप्रमाणें वा दैत्यांप्रमाणें वागत यांत काय नवल ?
फारच थोड्या सम्राटांनीं शांततेचें व विवेकाचें जीवन जगण्याचा यत्न केला. पण आक्रमक पिसाटांच्या दुनियेंत त्याचेंहि कांही चालत नसे. अशा विवेकी सम्राटांविरुध्द महत्त्वाकांक्षेनें वेडे झालेले सारे माथेफिरू उभे राहत व मूर्खपणाचें राष्ट्रीय धोरण चालविल्यामुळें भोगावीं लागणारीं फळें मग अशा चांगल्या राजांच्याहि वांट्यांस येत. गादीवर येतांच त्यांना सर्वत्र कटाचें व कारस्थानांचें दूषित वातावरणच दिसे. सर्वत्र संशय व धोका ! आपल्या पूर्वीच्या सम्राटांनीं सुरू केलेल्या पण त्यांच्या हयातींत न संपलेल्या युध्दांना या विवेकी सम्राटांनाहि तोंड द्यावें लागे. पूर्वीच्या सम्राटांनीं उत्पन्न केलेलीं भाडणें व युध्दें यांतून शांति व सलोखा निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडे, तीं युध्दें यशस्वी करावीं लागत, तीं भांडणें निभावून न्यावीं लागत. सम्राट् म्हणून त्यांच्या नांवानें नवी द्वाही फिरतांच पूर्वजांच्या मूर्खपणाशीं व अपराधांशींहि ते बांधले जात. त्या अपराधी व सदोष धोरणाच्या शृंखला त्यांनाहि जखडून टाकीत. 'सुखी' म्हणून संबोधिले जाणारे रोमचे सम्राट् रोमन गुलामांपेक्षांहि अधिक दु:खी असत. अशा या रोमन सम्राटांपैकींच शहाणा पण अति दु:खी सम्राट् म्हणजे मार्कस ऑरेलियस.
- २ -
मार्कस ऑरेलियस हा सम्राट् अॅन्टोनिनसचा मानलेला दत्तक मुलगा. तो वयाच्या अकराव्या वर्षापासूनच स्टोइक पंथाच्या सहनशील तत्त्वज्ञानाकडे ओढला गेला. स्टोइक यतिधर्मी होते. ते दु:ख दैवी मानून त्याची पूजा करीत. दु:ख भोगावें लागलें तरच ते स्वत:ला सुखी व भाग्यवान् समजत. आत्मा बलवान् व्हावा, मन खंबीर व्हावें म्हणून ते कठिण फळ्यांवर झोंपत, खालीं कांही अंथरीतहि नसत. ते एक जाडेंभरडें वस्त्र अंगावर घेत, तें अंगाला खुपे. तरुण मार्कस ऑरेलियसहि अशा हटयोगाचें आचरण करूं लागला. पुढें जेव्हां मन व बुध्दि हीं परिपक्व झालीं तेव्हां त्यानें या मूर्खपणाच्या बाह्य गोष्टींचा व देखाव्यांचा त्याग केला. पण त्या पंथाच्या तत्त्वज्ञानांतील मुख्य गाभा मात्र त्यानें कधींहि सोडला नाहीं.