खर्या संस्कृतीचा प्रारंभ 52
१९१७ सालीं अमेरिकाहीं युध्दांत ओढली गेली. भीति, स्वार्थ व अभिमान यांच्या संमिश्र भावना अमेरिकेस युध्दांत खेंचत्या झाल्या. 'जर्मनांचा जय झाला तर ?' अशी भीति खरोखरच कांहीं अमेरिकनांना वाटे. विजयी कैसरचीहि त्यांना धास्ती वाटे. दोस्तांना दारूगोळा पाठविणार्या कांहीं कारखानदारांना जर्मनीच्या पाणबुड्यांचा त्रास होत होता. १९१५ सालच्या मे महिन्यांत जर्मन पाणबुड्यांनीं योग्य सूचना देऊन लुसिटानिया ही अमेरिकन बोट बुडविली. ही दोस्तांसाठीं तोफा नेत होती. कांहीं उतारूहि तिजवर होते. प्रेसिडेंट वुइल्सननें कैसरला एक कडक पत्र लिहिलें. पण आपल्या देशबांधवांना तो म्हणाला, ''मी क्षुद्रासारखें एकदम युध्द सुरू करणार नाहीं.'' १९१६ सालीं वुइल्सनच पुन: प्रेसिडेंट निवडला गेला. त्याच्या निवडणुकीचें घोषवाक्य 'मी अमेरिकेला युध्दापासून अलिप्त ठेवलें' हें होतें. प्रत्येकाच्या ओठांवर 'मी माझा मुलगा लढाईत मारण्यासाठीं नाहीं वाढविला !' हें गाणें होतें. अमेरिकेंतील बहुजनसमाजाचेयं मत या गीतांत होतें. पण प्रेसिडेन्ट निवडून आल्यावर दोनच महिन्यांत वुल्सनला जर्मनीविरुध्द युध्द पुकारावें लागलें. 'अमेरिकेच्या गलबतांस धक्का लावूं नका' असें त्यानें कैसरला बजावलें, तेव्हां कैसरनें जबात दिला कीं, 'आमच्याविरुध्द असणार्या दोस्त-राष्ट्रांना दारूगोळा पुरविणें बंद करा.' वुइल्सनसमोर दोनच मार्ग होते : एक तर दारूगोळा पाठविणें बंद करणें किंवा जर्मनीबरोबर युध्द पुकारणें. त्यानें पहिला मार्ग पत्करला असता तर शस्त्रास्त्रें व दारूगोळा तयार करणार्या कारखानदारांचें नुकसान झालें असतें, पण अमेरिकेंत शांतता राहिली असती. वुइल्सननें दुसरा मार्ग पसंत केला. तो शाळा-मास्तराच्या वृत्तीचा होता. दुसर्यांसाठीं तो कायदा करी, पण स्वत: कधीं कोणाचा सल्ला घेत नसे. कैसरनें वुइल्सनचें मानण्याचें नाकारलें. तेव्हां त्याला धडा शिकविण्यासाठीं त्यानें अमेरिकन मुलांना युरोपांत पाठविण्याचें ठरविलें. प्रथम युध्द न करण्याची स्वाभिमानता वुइल्सनजवळ होती; पण आतां युध्दांपासून दूर राहणें त्याच्या गर्वांस व अभिमानास पटेना.
कैसर गमावली जाणारी लढाई लढत होता, म्हणून तर त्यानें निकरावर येऊन निर्दयपणें आणि हट्टानें पाणबुड्यांची लढाई सुरू केली होती. त्यानें शेवटचा पत्ता टाकला होता. अमेरिका युध्दांत ओढली गेली. कैसरचें लष्करी यंत्र कोलमडण्याला आतां केवळ कांहीं महिनेच अवकाश होता. तें १९१८ सालच्या उन्हाळ्यांत गडगडलें. जर्मन सैन्याचा धुव्वा उडला ! तें पळत सुटलें ! कैसर गलबतांत बसून पळून गेला. भेदरलेल्या सशाप्रमाणें तो हॉलंडांत गेला. त्यानें लाखों लोकांना युध्दाच्या खाईंत लोटलें; पण तें मरणसंगीत स्वत: ऐकण्याचें धैर्य मात्र त्याला नव्हतें. हॉलंडमध्यें डॉर्न येथें तो हद्पारींत राहिला. त्याच्या जीवनांतील आवाज आतां बंद पडला, मंद झाला. आंता गडबड नव्हती, गर्जना नव्हती; सारें शांत होतें. लष्करी आक्रमणकाळांत तो जितका सुखी होता, त्यापेक्षां अधिक सुखी तो हॉलंडमध्यें असेल अशी आशा करूं या. त्याच्या अडदांड कारकीर्दीनें जगाला दोन गोष्टी पटविल्या : (१) अनियंत्रित राजशाही ही आतां एक जुनाट गोष्ट झाली होती; (२) यापुढें आंतरराष्ट्रीय स्पर्धेंच्या जागीं आंतरराष्ट्रीय सहकार्य आलें पाहिजे, तरच मानवजात वांचण्याचा सींाव आहे. १९१४ सालच्या युध्दासारखी जगड्व्याळ आपत्ति पुन: जगावर येतां कामा नये.
(पान नं. ४५४ व ४५५ नाही आहे)