मध्ययुगांतील रानटीपणा 26
अशक्त, हाडकुळा, आजारी हस येथें जातांच वचन मोडून त्याला पकडण्यांत आलें व नास्तिक म्हणून जिवंत जाळण्यांत आलें ! हें दुष्ट कृत्य केल्यानंतर जमलेल्या कौन्सिलनें जॉन बुइक्लिफची हाडें उकरून काढून जाहीररीत्या जाळून टाकलीं ! वेल्स लिहितो, ''हें पापी, नीच कृत्य एकाद्या विक्षिप्त धर्मवेड्या पीरानें केलें नव्हतें तर अधिकृतरीत्या चर्चनें केलें होते.''
हसच्या मरणानंतर पांच वर्षांनीं पोप पांचवा मार्टिन यानें वटहुकूम काढला कीं, सारे हसवाले, वुइक्लिफवाले व बोहेमियांतील नास्तिक नष्ट केले जावे. क्रूसेड्सवरून परत आलेल्यांनीं पोपचें हें फर्मान वाचतांच ठिकठिकाणीं त्याची अमलबजावणी केली. सर्वांच्या कत्तली झाल्या; पण हसचे विचार मारले गेले नाहींत.
- ४ -
पेट्रार्क हा नवयुगांतील साहित्यिक जागृतीचा प्रतिनिधी होता, जोहान्स हस हा धार्मिक जागृतीचा प्रतिनिधी होता व जॉन बॉल हा सामाजिक जागृतीचा प्रतिनिधी होता. मध्ययुगाच्या अंतीं ही सारी पृथ्वी ओसाड झाली होती. सर्वत्र विध्वंस व विनाश दिसून येत होते. क्रूसेड्सच्या युध्दांतून दुष्काळ व साथी यांचा उद्भव झाला. युध्दांतून शेवटीं सर्वत्रच रोग फैलावतात. मागील महायुध्दांतहि ही गोष्ट अनुभवास आली होती. क्रूसेड्समधून काळा मृत्यु म्हणून एक भयंकर रोग सर्वत्र फैलावला. एका युरोपातच या रोगानें जवळजवळ दीड कोटि लोकांचा बळी घेतला ! सर्वच मानवजातीचें उच्चाटन होणारसें दिसूं लागलें. या मरणान्तिक साथीनें लोकांचे डोळे उघडले व ते जीवनाच्या मूल्यांचा फेरविचार करूं लागले. आपण ज्या मार्गानीं जात आहों ते भले आहेत कीं बुरे आहेत, याची चिकित्सा ते करूं लागले. मागील महायुध्दानंतर आपणहि अशाच प्रकारें विचार करूं लागलों होतों. आपले पुढारी, आपले राजेमहाराजे वगैरे ज्या रीतीनें जात आहेत तींत कितपत अर्थ आहे याची परीक्षा लोक करूं लागले. युध्दें व साथी यांमुळें सर्वांहून अधिक धक्का जर कोणास बसला असेल तर तो शेतकर्यांना. हे शेतकरी ठायीं ठायीं बंड करून उठले—ज्यांनीं त्यांना निव्वळ पशुसम स्थितींत डांबून ठेवलें होतें त्यांच्या सत्तेविरुध्द ते बंड करून उठले. त्या काळ्या आजारानें लाखों लोकांचे बळी घेतल्यामुळें मजूर भरपूर मिळेनासे झाले. अॅबट, बिशप व इतर जमीनदार यांचे अर्थशास्त्रविषयक अज्ञान जसें अपरंपार होतें, तसाच त्यांचा स्वार्थहि अपरंपार होता. शेतकर्यांनीं आणि कामगारांनीं दुप्पट काम करावें असे जुलुमी कायदे या प्रतिष्ठित वर्गांनीं केले. काम वाढलें, पण मजुरींत मात्र वाढ झाली नाहीं ! आणि दु:खावर डागणी म्हणूनच कीं काय कामगारांनीं वा मजुरांनीं स्वसंरक्षणार्थ संघटना करतां कामा नये असेहि कायदे केले गेले. चांगली नोकरी शोधण्यासाठीं दुसरीकडे जाण्यासहि त्यांना कायद्यानें बंदी करण्यांत आली. हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता. या सर्व जुलुमामुळें शेतकरी व कामकरी साहजिकच बंडास प्रवृत्त झाले. ही इतिहासांतील एक नवीनच गोष्ट होती. समाजांतील जे अन्याय व ज्या विषमता दैवायत्त व देवेच्छित म्हणून अनिर्बंध चालत आल्या होत्या, ज्यांविरुध्द कोणी ब्रहि काढीत नसे, त्यांविरुध्द सारी पददलित जनता गर्जना करून उठली. दारिद्र्य, दैन्य, दुष्काळ, रोग, उपासमार, मरण, शक्तिबाहेर काम, या सर्वांविरुध्द श्रमजीवी जनता निर्भयपणें गर्जना करून भिंतीत पाठ लावून उभी राहिली. वस्तुत: हें नवदर्शन होतें. पण सनातनी वृत्तीचा फ्रॉइसार्ट राजामहाराजांची व पोपबिशपांची बाजू घेऊन लिहितो कीं, जनता बंड करून उठली ती ती सुखवस्तु होती म्हणून ! भरपूर खावयाला प्यावयाला मिळत होतें म्हणून ही बंडांची शक्ति !