मध्ययुगांतील रानटीपणा 16
डान्टे आपल्या शहरांतील राजकारणांत भाग घेत असे. तेराव्या शतकांत फ्लॉरेन्समध्यें पोपच्या व सम्राटाच्या अनुयायांमध्यें लढाया होत असत. डान्टे पोपच्या बाजूचा होता. कारण, त्याचा बापहि त्याच पक्षाचा होता. पण वयाने वाढल्यावर कांहीं पोपांचा अप्रामाणिकपणा तद्वतच त्यांची भीरुता पाहून तो विटला. त्यानें पोपचा पक्ष सोडून सम्राटाचा पक्ष धरला. तो राजकीय क्षेत्रांत भराभरा वर चढत चालला. तो वयाच्या पसतिसाव्या वर्षीच फ्लॉरेन्समधील प्रमुख न्यायाधिशांपैकीं एक निवडला गेला. पण पुढें दोनच वर्षांनीं त्याचा पराजय झाला. त्या प्रक्षुब्ध काळांत, बुध्दिहीन वासनाविकारांच्या व अंधळ्या भावनांच्या त्या काळांत पराभूत होणें म्हणजे हद्दपार होणें वा मरणेंच असे. मध्ययुगांतील द्वेष मध्यें थांबत नसे, द्वेष म्हणजे संपूर्ण द्वेष !—शेवटच्या टोंकाला जावयाचें. डान्टे फ्लॉरेन्समधून हद्दपार केला गेला. तो सांपडेल तेथें त्याला जिवंत जाळून टाकावें अशीहि शिक्षा दिली गेली !
डान्टेला आतां स्वत:चा देश राहिला नाहीं ! या ऐहिक जगानें त्याला दूर लोटलें. तो आपल्या धीरगंभीर व भीषण प्रतिभेच्या साह्यानें मृतांच्या जगांत-परलोकांत-वावरूं लागला. त्याला अपल्या इटलीमधल्या शत्रूंचा प्रत्यक्ष सूड घेतां येईना, तेव्हां त्यानें त्यांच्यासाठीं नरकांतील अनंत प्रकारचे काल्पनिक छळ शोधून काढले व त्यांना तेथें नेऊन टाकलें ! डान्टेला समाधान वाटावें व ईश्वराचें वैभव वाढावें म्हणून हे सारे शत्रू नरकांत लोटले जातात ! डान्टे आपल्या इन्फर्नोचीं चोवीस सर्कल्स करतो. त्या त्या विशिष्ट प्रकारच्या पापांसाठीं छळण्याचीं तीं तीं विशिष्ट यंत्रें या त्या विशिष्ट सर्कलमध्यें ठेवलेलीं असतात. डान्टेचें इन्फर्नोचें वर्णन अति दुष्ट व अति भव्य आहे. दूषित व विकृत झालेल्या अशा उदात्त प्रतिभेनें निर्मिलेलें हें नरकस्थान आहे. अमेरिकन तत्त्वज्ञानीं सन्टामना लिहितो, ''डान्टे पुष्कळ वेळां विकारवशतेनें लिहितो, शुध्द बुध्दीनें निर्णय घेऊन तो लिहीत नाहीं.'' पण आपण विसरतां कामा नये कीं, डान्टे मध्ययुगाचा नागरिक तद्वतच रोमन कॅथॉलिक चर्चचें अपत्य आहे. तो आपल्या शत्रूंचेच नरकांत हाल करतो असें नाहीं, तर त्याला जे जे चर्चचे शत्रू वाटतात, त्या सर्वांना तो तेथें नेतो व त्यांचा छळ मांडतो. जे जे कॅथॉलिक नाहींत ते ते सारे चर्चचे शत्रू असें डान्टे समजतो. ख्रिश्चन धर्मांत नसलेले असे प्राचीन काळांतले कोणीहि डान्टेच्या स्वर्गात जाऊं शकत नाहींत. मध्ययुगांतील चर्च किती असहिष्णु होतें हें यावरून दिसून येतें. त्या प्राचीनांना स्वर्ग कां नाहीं ? त्यांचें काय पाप ? ते बाप्तिस्मा मिळण्यापूर्वी कित्येक शतकें जन्मले हें ? ईश्वराची करुणा अनंत असली तरी तिची व्याप्ति फक्त कॅथॉलिकांपुरतीच आहे ! निदान डान्टे तरी असें म्हणतो. डान्टेला नरकांतील गुंगागुंतीचे मार्ग दाखविणारा थोर गुरु व्हर्जिल देखील स्वर्गाकडे येऊं शकत नाहीं ! त्यालाहि निराशेच्या चिरंतन आगींत रडत बसावें लागतें. त्यालाहि उध्दाराची आशा
नाहीं ! कारण, तो फार पूर्वी जन्मला. मग तो कसा ख्रिश्चन होणार ?
ही असहिष्णुता, जे जे चर्चच्या मताचे नाहींत त्या सर्वांना खुशाल नरकाग्नींत खितपत ठेवणें व मनाला कांहींहि न वाटतां त्यांचे हाल व छळ पाहणें याला काय म्हणावें ? किती संकुचित, स्वार्थी व असहिष्णु हें मन ? डान्टेच्या ''डिव्हाइन कॉमेडी'' या महाकाव्यांत ही असहिष्णुता सर्वत्र भरलेली आहे. मी दोनच उदाहरणें देतों, दोनच उतारे दाखवितों :— (१) इन्फर्नोच्या दुसर्या सर्गांत बिएट्रिस म्हणते, ''ईश्वराच्या कृपेनें मला नरकांत खितपत पडणार्यांना दु:खाचा स्पर्श होत नाहीं.'' ही बिएट्रिस स्वर्गांत शाश्वत आनंद उपभोगीत असते; तिला नरकाग्नींत जळणार्यांच्या दु:खाची कल्पनाहि येत नाहीं व याला ती ईश्वरी कृपा समजते. त्यांचें दु:ख तिला दु:ख असें वाटतच नाहीं. तिला त्यांच्या वेदना कळतील तेव्हां ना तिचे डोळे ओलावणार, तिचा आनंद अस्तास जाणार ? हें मध्ययुगांतील रानटीपणाचें द्योतक आहे, त्या कालच्या रानटी वृत्तीला धरून आहे. सेंट थॉमस अॅक्विनस हा मध्ययुगांतील अत्यंत धार्मिक व अति प्रतिभावान् लेखक होऊन गेला.