मध्ययुगांतील रानटीपणा 19
- ३ -
मध्ययुगांत चीन संस्कृतीच्या शिखरावर होतें. तेराव्या शतकांत त्याची थोडा वेळ जराशी पीछेहाट झाली खरी; पण तीहि क्षणभरच. या सुमारास मध्य आशियांतील डोंगरपठारावर राहणारे भटक्ये मोंगोलियन चीनवर स्वार्या करूं लागले. त्यांचे हूण व तुर्क यांच्याशीं थोडेफार संबंध होते. या मोंगोलियनांनीं अल्पावधींत पॅसिफिक महासागरापासून रशियांतील नीपर नदीपर्यंतचा प्रदेश व्यापून टाकला ! चेंगीझखान हा त्यांचा अत्यंत प्रबळ असा पुढारी होता. त्याच्या विद्युन्मय नेतृत्वाखालीं थोड्याशाच अवधींत मोंगोलियनांनीं येवढें मोठें साम्राज्य मिळविलें कीं, त्याच्यासमोर अलेक्झांडरचें साम्राज्यहि मुलाचें खेळणें वाटावें, पोरखेळ वाटावा. अलेक्झांडरची बेडर निर्भयता, हॅनिबॉलची सहनशीलता, आशियांतील प्राचीन विजेत्यांची अल्लड वृत्ति तसाच त्यांचा साधेपणा हे सारे गुण चेंगीझच्या ठायीं होते. त्याचा आहार म्हणजे घोडीचें मांस असे, त्याचा प्रासाद म्हणजे तंबू असे, त्याचें सिंहासन म्हणजे घोड्याचें जीन असे. राज्य चालविण्यापेक्षां जिंकून घेणें त्याला आवडें; पण इतर जगज्जेत्यांप्रमाणें त्याच्या ठायीं सूडबुध्दि नव्हती, रानवटपणा नव्हता. वेल्स लिहितो, ''चेंगीझखानाच्या कारकीर्दीत, त्याच्या साम्राज्यांत, सर्व आशियावर संपूर्ण धार्मिक सहिष्णुता होती.'' पराभूत राष्ट्रांवर आपला रानवटीपणा लादण्याऐंवजीं पराभूतांच्या श्रेष्ठ संस्कृतींतच तो स्वत: रंगला; त्या संस्कृतीनेंच त्याला जिंकलें, स्वत:मध्यें मिळवून घेतलें. त्यानें चीन देश भौगोलिकदृष्ट्या जिंकला; पण चीननें त्याला सांस्कृतिकदृष्ट्या जिंकलें. एकाद्या महासागरावर मेघांनीं वर्षाव करावा तद्वत् मोंगोलियन आले; पण ते चिनी जनतेच्या महासागरांत विलीन झाले व त्या सर्वांचें एक सुसंवादी राष्ट्र बनलें. ग्रीसची व रोमची संस्कृति व्हॅडॉल व गॉथ यांनीं नष्ट केली; पण मोंगोलियनांनीं तसें केलें नाहीं. त्यांनीं चिनी संस्कृति तर नष्ट नाहींच केली, पण उलट स्वत:च ती स्वीकारली. कुब्लाईखान हा चेंगीझचा नातू. कुब्लाई हा चीनच्या सांस्कृतिक, ज्ञानोपासक व कलोपासक परम्परेचा ॠणी आहे. स्वत:च्या रानटी पूर्वजांच्या चालीरीतींपासून त्याला कांहीहि मिळालें नाहीं. त्याचें मन व त्याची बुध्दि हीं चिनी संस्कृतीवरच पोसलीं गेलीं.
या कुब्लाईखानच्या दरबारांत राहिलेल्या मार्को पोलोच्याद्वारां आशियांतील आश्चर्यकारक संस्कृतीशीं युरोप परिचित झालें.
- ४ -
मार्को पोलो कुब्लाईकडे कां आला व राहिला ? त्याचें कार्य आर्थिक व धार्मिक असें द्विविध होतें. युरोप चीनशीं व्यापार सुरू करूं इच्छीत होतें आणि पोप चीनला ख्रिश्चन धर्मी करूं इच्छीत होता. मार्को पोलो हा व्हनिसचा रहिवासी. त्याचे वडील व चुलते चीनशीं व्यापार करीत. वडिलांचे नांव निकोलो पोलो व चुलत्यांचे मॅथ्यू किंवा मफ्फेओ पोला. चिनी सम्राट् कुब्लाईखान यानें या दोघां युरोपियन व्यापार्यांस आपल्या दरबारीं बोलावलें. त्यानें त्या वेळेपर्यंत युरोपियन ख्रिश्चन व्यापारी पाहिला नव्हता. ख्रिश्चन व्यापारी हा कसा काय प्राणी असतो हें त्याला पाहावयाचें होतें.