दुर्दैवी 59
''बाबा, काय हे बोलता? का मला छळता असे?''
''काय तुला छळले? का जेवायला मिळत नाही?''
''त्या दिवसापासून मी तुमचे नाव घेतले. मला माझे खरे बाबा मिळाले म्हणून आनंदले; परंतु त्या दिवसापासून तुम्ही परक्यांप्रमाणे वागू लागलेत. पूर्वी तुम्ही प्रेम करीत असा. त्याच्याहून अधिक करायच्याऐवजी तुम्ही माझा तिरस्कार करू लागलेत. मला दूर लोटण्यासाठी का जवळ घेतलेत?'' हेमा रडू लागली. रंगराव तेथून निघून गेले.
हेमा खूप अभ्यास करू लागली. तिच्या खोलीत आता व्याकरणाची, भाषेची पुस्तके असत. ती शब्द पाठ करीत बसे. मोठमोठे शब्द. पांढरपेशी, संस्कृतप्रचुर शब्द. बाबांना माझ्यामुळे कमीपणा नको वाटायला, असे ती मनात म्हणे. ती वह्याच्या वह्या लिहून काढू लागली, भाषा नीट बसावी म्हणून. ती बाहेर जात नसे. खोलीतच बसून असे. तिचा नट्टापट्टा कमी झाला. साधी पातळे ती नेसू लागली. स्वत: कामही करू लागली. स्वत:ची खोली ती स्वत: झाडी. भांडी घाशी.
एके दिवशी दोनप्रहरी गडयांना ती वाढीत होती. इतक्यात रंगराव तेथे आले.
''तू का त्यांना वाढतेस? तुला लाज कशी नाही वाटत? अग, नगरपालिकेच्या अध्यक्षांची तू मुलगी आहेस. मी मिळवलेले नाव तू घालवणार एकूण!'' रंगराव संतापाने म्हणाले.
''हेमाताईंनी खानावळीत सुध्दा वाढले आहे.'' गडयांपैकी एकजण म्हणाला.
''वाटेल ते बोलू नकोस. ती का खानावळीत वाढील? ती काही भिकारी नाही. आणि कधी तिने वाढले असेलच तर कोणावर उपकार म्हणून वाढले असेल. कोणाच्या मदतीस ती गेली असेल.''
''अहो, नाही. त्या खानावळीत त्या वेळेस मी भांडी घासायला होतो. तिची आई नि ही तेथे उतरली होती. त्यांच्याजवळ पैसे नव्हते. हेमाताई तेथे काम करीत. ताटे वाढीत, ताटे काढीत. मी स्वत: पाहिले आहे. आणि त्यांत वाईट काय आहे? काम करणे का वाईट?''
''हेमा, हा म्हणतो ते का खरे आहे? तू का खानावळीत वाढीत होतीस?''
''होय, बाबा. दोन दिवस ते काम करावे लागले आणि तुम्हीच परवा म्हणालेत की नट्टापट्टा किती करतेस. म्हणून मी काम करू लागले. तर तिकडूनही बोलता. मी वागू तरी कशी?''