दुर्दैवी 10
''काही वर्षांपूर्वी एकदा तो इथे आला होता व मला म्हणाला, 'जर माझा कोणी शोध करीत आले, तर मी सारंगगावला राहतो असे सांगा. परंतु त्या गोष्टीलाही किती तरी वर्षे झाली. तो जिवंत तरी असेल की नाही हरी जाणे. दारू पिऊन गटारात पडला असेल. नाही तर चोरीमारी करून तुरुंगात खितपत पडला असेल. दारुडयांचा नेम नाही.''
''आजीबाई, तुम्ही असे दुकान कशाला ठेवता?''
''पोटासाठी. अग, हे लोक बेताची पितील तर काही वाईट नाही. परंतु एकदा पिऊ लागले म्हणजे त्यांना ताळतंत्र राहात नाही.''
''परंतु तुम्ही अधिक देताच का?''
''जा आता तू. भारीच फाजील दिसतेस. माहिती विचारायला आलीस की उपदेश करायला? तू तरी का चांगली आहेस? कुणाची ती मुलगी, कुठे आहे तुझा नवरा? कुठे आहे तुझे घर? हो चालती. लागली उपदेश करायला. नीघ.'' माया खाली मान घालून तेथून निघाली. ती हेमाजवळ आली.
''चल हेमा.'' ती म्हणाली.
''मिळाली का माहिती? ती म्हातारी रागारागाने बोलत होती. जाऊ नकोस म्हणून सांगत होते तुला. वाईट चालीची असावी ती बाई. मिळला का पत्ता? कुठे जायचे आता?''
''आपल्याला लांब जायचे आहे. ते गृहस्थ सारंगगावला राहतात. असले जिवंत तर भेटतील, नाही तर तुरुंगातही असायचे.''
''तुरुंगात?''
आपण पटकन् काही तरी बोलून गेलो असे मायेच्या ध्यानात आले.
''हेमा, आपण जरी चांगले असलो, तरी जग काही चांगले नसते. रंगराव स्वभावाने चांगले आहेत. परंतु लोक त्यांच्या वाईटावर असत. त्यांच्यावर नाना तर्हेच्या तोहमती आणीत. म्हणून म्हटले की तुरुंगातही असायचे. आपण जाऊन तर पाहू. ते भेटले तर सारे छान होईल.''
''आई, हे रंगराव बाबांचे कोण?''
''दूरचे वाटते कोणी नातलग होते. मलाही नीटसे माहीत नाही. बुडत्याला काडीचा आधार, त्याप्रमाणे तुला घेऊन मी जात आहे. त्यांची सुस्थिती असली आणि त्यांना दया आली, तर ते आपणास कमी पडू देणार नाहीत अशी वेडी आशा मनात आहे. आज या गावातच कोठे मुक्काम करू. उद्या भाडयाची गाडी वगैरे बघू.''