Get it on Google Play
Download on the App Store

दुर्दैवी 8

कित्येक वर्षे झाली. आज त्या कळमसर गावाच्या रोखाने त्या पाहा, दोन बाया जात आहेत. कळमसर गाव जरी पूर्वीचाच होता, तरी पुष्कळ पडझड तेथे झाली होती. काही नवीन रस्ते झाले होते. काही नवीन घरे झाली होती. परंतु तरीही हा पूर्वीचाच गाव, असे कोणीही सांगितले असते.

पावसाळा संपलेला होता. आजूबाजूला अद्याप हिरवे दिसत होते. ओढे अद्याप वाहत होते. शेते तयार होत आली होती. पाखरांचे कळप शेतांवर बसत होते. चाहूल लागताच भर्रदिशी उडून जात होते. गायीगुरे धष्टपुष्ट दिसत होती. अशा त्या प्रसन्न शरद् ऋतूच्या वेळी त्या दोन स्त्रिया जात होत्या. एक प्रौढ होती, एक अगदी तरुण होती. ती जी प्रौढ होती, ती एके काळी सुंदर असावी. परंतु तिच्या शरीराचा रंग आता पूर्वीचा नव्हता. डोळे तितके निर्मळ नि प्रेमळ, अल्लड, खेळकर राहिले नव्हते. परंतु ती मुलगी? ती मनोहर दिसत होती. ती का मायलेकरे होती? त्या प्रौढ स्त्रीकडे जरा नीट बघा. तुम्हाला काही आठवते का? येते का काही ध्यानात? पंधरा वीस वर्षांपूर्वी जा. आणि बघा. त्या खलाशाला विकलेली तीच नव्हे का ही स्त्री? तीच ही, आणि त्या वेळची ती लहान मुलगी ती का ही? तीच असावी.

''आई, कुठे जायचे आपण?'' त्या मुलीने विचारले.

''या गावातच तुझ्या वडिलांची नि माझी प्रथम गाठ पडली. ते मला घेऊन गेले. तिकडे लांब आम्ही गेलो. आणि तू झालीस. तू आमचा आनंद होतीस. तुला ते खेळवीत बसत. होडीतून, गलबतातून तुला ते नेत. सारे खलाशी तुझ्यावर प्रेम करायचे. तू दोर्‍या विणायचीस, जाळी शिवायचीस, समुद्रात माशांप्रमाणे पोहायचीस. परंतु देवाला आपला सुखाचा छोटासा संसार बघवला नाही. तुझे वडील वादळात समुद्रात बुडाले. काय करायचे, बाळ? याच गावात त्यांची माझी पहिली भेट. आणि याच गावात ते दुसरे एक नातलग त्या वेळेस मला भेटले होते. त्यांच्याकडे आपण जात आहोत. त्यांनी आधार दिला तर बघायला आपण जात आहोत. भेटले तर बरे. त्यांचा पत्ता येथे कुठे मिळाला तर बघू.''

''आई, माझ्या बाबांचे व त्या गृहस्थांचे काय ग नाते? ते का वयाने मोठे होते? का तुझ्या माहेरचे होते? सांग ना कसे दिसत ते?''

दोघीजणी बोलत जात होत्या. जाता जाता त्यांना एक दुकान दिसले. एक म्हातारी बाई तेथे होती. त्या लहानशा दुकानाची ती मालकीण असावी.

''हेमा, तू इथेच उभी राहा. त्या म्हातार्‍या बाईला विचारून येते.'' माया म्हणाली.

''आई, नको जाऊ तिकडे. ती बाई चांगली नाही दिसत. खरेच. नको जाऊस.'' हेमा म्हणाली.

दुर्दैवी

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
दुर्दैवी 1 दुर्दैवी 2 दुर्दैवी 3 दुर्दैवी 4 दुर्दैवी 5 दुर्दैवी 6 दुर्दैवी 7 दुर्दैवी 8 दुर्दैवी 9 दुर्दैवी 10 दुर्दैवी 11 दुर्दैवी 12 दुर्दैवी 13 दुर्दैवी 14 दुर्दैवी 15 दुर्दैवी 16 दुर्दैवी 17 दुर्दैवी 18 दुर्दैवी 19 दुर्दैवी 20 दुर्दैवी 21 दुर्दैवी 22 दुर्दैवी 23 दुर्दैवी 24 दुर्दैवी 25 दुर्दैवी 26 दुर्दैवी 27 दुर्दैवी 28 दुर्दैवी 29 दुर्दैवी 30 दुर्दैवी 31 दुर्दैवी 32 दुर्दैवी 33 दुर्दैवी 34 दुर्दैवी 35 दुर्दैवी 36 दुर्दैवी 37 दुर्दैवी 38 दुर्दैवी 39 दुर्दैवी 40 दुर्दैवी 41 दुर्दैवी 42 दुर्दैवी 43 दुर्दैवी 44 दुर्दैवी 45 दुर्दैवी 46 दुर्दैवी 47 दुर्दैवी 48 दुर्दैवी 49 दुर्दैवी 50 दुर्दैवी 51 दुर्दैवी 52 दुर्दैवी 53 दुर्दैवी 54 दुर्दैवी 55 दुर्दैवी 56 दुर्दैवी 57 दुर्दैवी 58 दुर्दैवी 59 दुर्दैवी 60 दुर्दैवी 61 दुर्दैवी 62 दुर्दैवी 63 दुर्दैवी 64 दुर्दैवी 65 दुर्दैवी 66 दुर्दैवी 67 दुर्दैवी 68 दुर्दैवी 69 दुर्दैवी 70 दुर्दैवी 71 दुर्दैवी 72 दुर्दैवी 73 दुर्दैवी 74