दुर्दैवी 37
''हेमा, कुठे गेली होतीस आज? उशीरसा झाला यायला?' आणि नवे पातळ नेसून गेली होतीस वाटते!''
''आई, हे पातळ मला खुलून दिसते; नाही?''
''तुला सारे चांगलेच दिसते, बाळ. परंतु फार उधळपट्टी नको करीत जाऊस. फार नट्टापट्टा कुलीन माणसांना शोभत नाही. समजलीस ना? परंतु कुठे गेली होतीस ते सांग ना.''
''गेले होते फिरायला अमराईच्या रस्त्याला.''
''एकटीच गेली होतीस?''
''प्रथम एकटी होते.''
''मागून कोण आले?''
''आई, हेमंत भेटले. किती चांगले आहेत नाही ते? कितीतरी गोष्टी आम्ही बोललो. त्यांच्या संगतीत आनंद वाटतो. त्यांना सारी माणसे देवमाणूस म्हणतात. न्यायी म्हणून त्यांची ख्याती आहे. कोणी रस्त्यांत भेटले, तर त्यांना प्रेमाने नमस्कार करी.''
''आणि त्यांच्याबरोबर तू आहेस असे पाहून लोकांना काय वाटे?''
''लोक जरा स्मित करीत. परंतु हेमंतविषयी कोणी वेडेवाकडे थोडेच बोलेल? थोडीच कोणी काही शंका घेईल? त्यांच्या संगतीत संरक्षण असते, मोकळेपणाही असतो. आई, तुला एक गंमत सांगू का?''
''कसली ग?''
''तू हासशील; सांगू?''
''सांग ना.''