दुर्दैवी 35
हेमंत आता एका निराळया घरात राही. खानावळीत जेवायला जाई. मधून मधून रंगरावांच्या घरी येई. चहा पिई. कधी जेवायलाही तो येई. परंतु कचेरीतील काम पाहणे हे त्याचे मुख्य कर्तव्य होते. एके दिवशी एक गंमतच झाली. हेमाला कोणी तरी एक चिठी आणून दिली.
''प्रिय हेमा,
सायंकाळी सहा वाजता कचेरीच्या वरच्या मजल्यावर ये. महत्त्वाचे काम आहे.''
पत्राखाली सही नव्हती. काही नाही. सायंकाळी सहा वाजता हेमा कचेरीच्या वरच्या मजल्यावर गेली. तेथे कोणी नव्हते. काय आहे भानगड, तिला समजेना. तेथे खर्ुच्या होत्या. एका खुर्चीवर ती बसली. इतक्यात हेमंत वर आला. हेमाला तेथे पाहून तो लाजला, संकोचला.
''तुम्ही का चिठी पाठवली होतीत?'' त्याने विनयाने विचारले.
''कोणती चिठी?''
''सहा वाजता येथे या, अशी चिठी होती.''
''मलाही अशीच कोणी चिठी दिली म्हणून मी आले.''
''कोणी तरी आपली फजिती केली. तुमच्याजवळची चिठी पाहू दे.''
''ही घ्या.''
त्याने ती चिठी पाहिली. दोन्ही चिठयांतील हस्ताक्षर सारखे होते. दोघांना आश्चर्य वाटले.
''चिठी लिहाणार्याचा काय बरे हेतू असावा?''
''आपली फजिती करण्याचा.''
''फजिती कसली? आपण भेटलो. चांगले झाले.''
''मी आता जाते.''