दुर्दैवी 39
''परंतु तू मरणाच्या गोष्टी कशाला काढतेस? तू बरी होशील. हेमाचे लग्न करू. तिचा संसार तू मांडून दे. मरणाचे विचार नको करीत जाऊस. हेमाकडे बघ आणि बरीच वर्षे जग.''
''हेमाच्या लग्नाची मला काळजी नाही.''
''ठरवले आहे की काय?''
''हेमा नि हेमंत एकमेकांस नाही का शोभणार?''
''माझ्या मनात हा विचार कधी आलाच नव्हता.''
''आईचे हृदय अधिक जाणते; खरे ना?''
इतक्यांत गाणे गुणगुणत हेमा आली. तिच्या हातात फुलाचा सुंदर गुच्छ होता.
''ये, हेमा. शंभर वर्षे तुला आयुष्य आहे.''
''आई, माझ्या आयुष्यातील तू घे ना. आणि ही फुले बघ.''
''कोठून ग आणलीस!''
''ओळखा; भाऊ, ओळखा!''
''हेमंताने दिली असतील.''
''आई सारे ओळखते! हो, त्यांनीच दिली. ते मला वाटेत भेटले व म्हणाले, घे. मग काय करणार? मी त्यांना म्हटले की आईजवळ ठेवीन.''
''मग ते काय म्हणाले?''
''ते हसले, दुसरे काय करणार? आणि गाणे गुणगुणतच निघून गेले.''