दुर्दैवी 28
''मी आता जाते. द्या चिठी.''
त्याने चिठी दिली. ती उभी राहिली. त्याने तिचा हात हातांत घेतला. त्याचे डोळे भरून आले होते.
''आपली लौकरच ओळख होईल, हो बाळ; तू सुखी होशील. आनंदी रहा. मी धीर देईन, आधार देईन. सारे चांगले होईल.''
असे म्हणून त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरविला. तिला क्षणभर जणू पित्याचा हात वाटला.
''बाबा समुद्रावरून घरी आले म्हणजे असाच हात फिरवीत.'' ती म्हणाली.
''जा आता; उशीर होईल.'' तो म्हणाला.
ती लगबगीने घरी आली.
''कोठे गेली होतीस?'' खानावळवाल्याने विचारले.
''कामाला.'' असे म्हणून ती पटकन् आईकडे गेली. तिने ती चिठी आईजवळ दिली. आईने विचारले.
''काय आहे आई त्या चिठीत?''
''रात्री त्यांनी भेटायला बोलावले आहे.''
''घरी?''
''नाही. गावाबाहेरच्या डोंगराजवळ.''
''तू एकटी जाशील?''
''त्यांना भेटायला कुठेही जाईन.''