दुर्दैवी 21
तो पाहुणा गात जात होता. शीळ घालीत जात होता. पाखरांप्रमाणे तो आनंदी होता. चिंता जणू त्याला कधी शिवली नव्हती. त्याच्या पाठीवर फारसे ओझे नव्हते, त्याप्रमाणे त्याच्या मनावरही काळजीचा बोजा नव्हता. पाखरे पाहून तो मध्येच टाळी वाजवी. ती सोडून गेली म्हणजे त्यांच्याकडे बघत उभा राही. आणि पाठीमागून घोडयांच्या टापांचा आवाज आला. त्याने मागे वळून पाहिले. त्याने घोडयावरच्या माणसाला ओळखले. याला कसे टाळावे त्याला समजेना. बाजूला शेते होती. त्यांत घुसावे, लपावे, असे त्याला वाटले. तो असे करणार, इतक्यात घोडा येऊन थबकला. रंगराव खाली उतरले.
''तिकडे रस्ता नाही. तिकडे कोठे जाता?''
''तुमचा रस्ता मोकळा करण्यासाठी बाजूला शेतात जात होतो.''
''रस्ता तर केवढा आहे! तिकडे शेतात नको होते जायला.''
''तुम्ही उजाडत कोठे निघालात घोडयावरून?''
''ठेवा शोधायला!''
''कोणी चोरला?''
''तुम्ही. तुम्ही चोर आहांत. आणि साळसूदपणे गाणे गात निघून जात होता! चला, माझ्याबरोबर चला.''
''कोठे येऊ? तुम्ही कोणे नेणार? मला का कैद करणार? तुरुंगांत ठेवणार?''
''होय. तुम्ही माझे कैदी आहात. तुम्हांला मी जाऊ देणार नाही. तुम्हांला मी तुरुंगांत ठेवीन.''
''कोठे आहे तुरुंग?''
''माझा बंगला हा तुमचा तुरुंग. माझे प्रेम हे तुम्हांला बंधन. माझ्या प्रेमाचा ठेवा तुम्ही चोरलात. आजपर्यंत माझे प्रेम माझ्या हृदयाच्या पेटीत होते. परंतु तुम्ही कोठून काल आलेत आणि माझ्या हृदयावर घाव घातलात. आणि आता पळून जाता, होय? निघा, माघारे निघा. तुम्ही जाल तर मी जिवंत राहू शकणार नाही.''