दुर्दैवी 38
''एके दिवशी मला एक चिठी आली. अमक्या वाजता अमक्या ठिकाणी या, अशी चिठी होती. खाली सही नाही. काही नाही. तरी मी तेथे गेले. आणि थोडया वेळाने हेमंतही तेथे आले. त्यांनाही तशीच चिठी. त्या एकाच जागी, एकाच वेळेस आम्हांस कोणी तरी बोलावले आणि आम्ही दोघे तेथे गेलो. आणि तिसरे तेथे कोणी नव्हते. आम्हांला प्रथम गोंधळल्यासारखे झाले. परंतु मग मोकळेपणाने आम्ही बोललो.''
''कोणी पाठवली असेल ती चिठी?''
''आई, त्या दोन्ही चिठयांतील अक्षर सारखे होते. आमची कोणाला तरी फजिती करायची होती.''
''किंवा तुम्हा दोघांचे कोणाला तरी मंगल करायचे होते. तुमची दोघांची भेट व्हावी असाही हेतू चिठी पाठविणार्याचा असेल. हेमा जगाकडे संशयाने पाहण्याऐवजी आपण चांगल्या दृष्टीनेच बघावे.''
''आई, भोळेपणाने जगात नुकसानही होते, असे भाऊ कधी कधी म्हणतात. आई, मी का भोळी होऊ?''
''जगाचा पदोपदी संशय घेण्यापेक्षा जगावर विश्वास टाकणे अधिक चांगले. मग त्याला भोळेपणा म्हणा की काही म्हणा.''
असे दिवस जात होते. रंगराव, हेमा, माया, हेमंत, सारी समाधानी होती. त्यातल्या त्यांत एकच जरा दु:ख होते, की माया अद्याप सुधारत नव्हती. एके दिवशी रात्री रंगराव नि माया गच्चीत होती.
''तुमची माझी पुन्हा भेट झाली हीच माझी पुण्याई. त्यांनी मला विकत घेतले, मी त्यांची झाले, असे मला वाटे. परंतु ज्या दिवशी एका धर्मपुरुषाने मला सांगितले की बाई, तुम्ही चुकल्यात. अशा कशा निघून आलात? दारूतील व्यवहार का कायदेशीर असतात? आणि त्या दिवसापासून जयंताजवळ एक दिवसही राहणे म्हणजे मला पाप वाटे. परंतु त्याला सोडून येणार तरी कशी? तो मला प्राणापलीकडे जपे. परंतु माझे दु:ख एके दिवशी त्याच्याजवळ मी बोलले. तो गंभीर झाला. आणि पुढे थोडयाच दिवसांनी तो आम्हांला सोडून गेला. वादळांत तो सापडला. आणि मी तुमच्याकडे आले. तुमची धर्मपत्नी म्हणून पुन्हा आले. मला हल्ली बरे नसते. परंतु तुमच्या मांडीवर मरण येईल. मी सुखाने मरेन. हेमाला आता तुम्ही आहात.''