दुर्दैवी 53
रंगराव उशीरा घरी आले. ते आज जेवले नाहीत. हेमाच्या खोलीत त्यांनी डोकावून पाहिले. नंतर ते आपल्या खोलीत गेले. तेही अंथरुणावर पडले. त्यांच्या मनात किती तरी विचार येत होते उद्या हेमा काय सांगेल, का ती नाही म्हणेल? नाना कल्पना, शंका, आशा, निराशा मनांत उसळत होत्या. एकाएकी त्यांना एक आठवण झाली. कशाची बरे? मायाने मरायच्या आधी एक पत्र त्यांच्याजवळ दिले होते. हेमाच्या लग्नानंतर हे फोडा नि वाचा असे तिने सांगितले होते. काय बरे असेल त्या पत्रात? आज फोडले म्हणून काय झाले? कदाचित जी गोष्ट आज मी हेमाला सांगितली, ती त्यात हेमासाठी म्हणून असेल. तो उठला. हातात कंदील घेऊन तो वरती गेला. तेथील एका पेटीत ते पत्र होते. त्याने ते पत्र बाहेर काढले. फोडू की न फोडू? मृताची इच्छा भंगणे पाप आहे. परंतु फोडले म्हणून काय झाले? शेवटी त्याने ते पत्र फोडून वाचले. त्याची चर्या गंभीर झाली. पांढरी फटफटीत झाली. ते पत्र त्याच्या हातातून गळले. त्याच्या मुद्रेवर निराशा, तिरस्कार, दु:ख- किती तरी भावना प्रतिबिंबित होत होत्या. काय होते त्या पत्रात?
''प्रिया रंगा,
एक गोष्ट तुझ्यापासून मी लपवून ठेवली होती. सर्वांच्या हितासाठी म्हणूनच ती मी लपविली. तू मला क्षमा कर. रागावू नकोस. मी लिहू तरी कसे? परंतु लिहिले पाहिजे. आता हेमाचे लग्न लागले असेल. नवीन घर तिला मिळाले असेल. तू तिचे सारे चांगले केले असशील. परंतु रंगा, हेमा तुझी मुलगी नव्हे; तुझी मुलगी लहानपणीच तिकडे परदेशात देवाघरी गेली. आणि हेमा ही जयंताची मुलगी. मी पहिल्या मुलीचेच तिला नाव ठेवले. या मुलीचे सारे नीट व्हावे म्हणून ही गोष्ट तुझ्यापासून मी लपविली. तू मातेचे हृदय ओळख नि मला क्षमा कर. हेमावर पूर्वीप्रमाणे प्रेम कर, लोभ कर. तू माझ्या बाबतीत एके काळी अन्याय केलास, तो मी विसरले. मी तुला क्षमा केली. आता तू मला कर. मरणोन्मुख मातेची ही इच्छा आहे.
तुझी
माया.''
असे ते पत्र होते. रंगरावाने ते पत्र कुस्करले. त्याला काय करावे समजेना. मायेचा त्याला संताप आला. परंतु ती या जगात नव्हती. परंतु मायाचा काय अपराध? तो पुन्हा जरा शांत झाला. एकूण हेमा माझी नाही. ती मला माझी का बरे वाटली? तो तिचा चेहरा डोळयांसमोर आणू लागला. हेमा निमगोरी आहे; मी काळा सावळा आहे. माझ्या लक्षात हे मागेच आले पाहिजे होते. तो उठला. हातात कंदील घेऊन हेमाच्या खोलीत हळूच गेला. ती मुलगी शांतपणे झोपली होती. तिच्या तोंडावर कंदीलाचा मंद प्रकाश पडला. तिची मुद्रा तो बघत होता. नाही, हेमा माझी नाही. ही त्याचीच आहे. आणि हिला मी माझी म्हणून समजत आलो. आणि माझे नाव लाव म्हणून तिला सांगितले. शेवटी मला कोणी नाही. मी दुर्दैवी आहे. तो उठला. त्याने कंदील खाली ठेवला. तो घरातून बाहेर पडला. अंधारातून कोठे तरी जात होता. नदीच्या तीराकडे गेला. वेगवती वेगाने वहात होती. सारा सारंग गाव झोपला होता. परंतु नदी वाहात होती. माझे जीवनही असेच वाहात राहाणार. माया तर कायमची गेली. हेमा कालपर्यंत, आतापर्यंत माझी वाटत होती. तीही दूर गेली. तो हेमंत त्याला मी जवळ केले. परंतु आज आम्ही दोन ध्रुवांप्रमाणे दूर आहोत. सारी सृष्टी जणू माझ्याविरुध्द कट रचीत आहे; मला एकटे पाडीत आहे. नदीवरच्या पुलावर रंगराव जरा बसले. क्षणभर स्वत:चे जीवन संपवावे असे त्यांना वाटले. परंतु क्षणभरच. पुन्हा ते उठले नि घरी आले. तळमळत ते अंथरुणावर पडले. पहाटे त्यांचा जरा डोळा लागला.