दुर्दैवी 17
कुंज द्वारी होता उभा
समोर उभी राधा शुभा...
असे चरण गुणगुणत तो येत होता. हेमा चमकली! त्याने जरा तिच्याकडे पाहिले. परंतु तो आपल्या खोलीत गेला. हेमा आईजवळ येऊन पडली.
थोडा वेळ गेला. तो त्या खानावळीच्या दारात रंगराव आले. मालक उठून उभा राहिला.
''काय काम, साहेब?'' त्याने विचारले.
''तो आलेला परप्रांतीय पाहुणा कुठे आहे? तो झोपला का? बघा बरे; माझे काम आहे.'' रंगराव म्हणाले.
''आताच ते वरती गेले. झोपले नसतील. या माझ्याबरोबर. त्यांच्या खोलीत दिवा आहे अजून. या.'' रंगरावांना बरोबर घेऊन मालक वर आला.
''अहो पाहुणे, हे नगरपालिकेचे अध्यक्ष तुमच्याकडे आले आहेत. त्यांचे काम आहे. अजून झोपलात नाही, बरे झाले.'' मालक म्हणाले.
रंगराव नि तो पाहुणा बोलत बसले. आणि शेजारच्या खोलीत माया अंथरुणावर उठून बसली.
''आई, ते रंगराव आले. त्यांनी का आपल्याला पाहिले? तुला पाहिले?'' हेमाने विचारले.
''बोलू नको, बाळ; पडून राहा.'' ती म्हणाली.
''आई, आपण येथे मजुरी केली असे त्यांना कळले तर? त्यांना अपमान वाटेल का? बाकी, मोलमजुरी करण्यात कमीपणा थोडाच आहे? मी दोर-दोरखंडे नसे का तयार करीत?''
''त्यांना कळले तर त्यांना आवडणार नाही.''