दुर्दैवी 34
एके दिवशी तिने रंगरावांस पत्र लिहिले;
कृ. प्रणाम.
आपल्या पत्राबद्दल आभारी आहे. पैसे मिळाले. तुम्ही मला अशी तुच्छ समजत नाही हे काय कमी आहे? माझ्या प्रेमाची चार दिडक्या तरी किंमत केलीत. हाच त्यातल्या त्यांत आनंद. माझी एकच विनंती आहे, की आपल्याला मी जी पत्रे पाठविली, ती कृपा करून आता परत करा. मी गुरुवारी तुमच्या गावावरून जाणार आहे. तरी तिठ्ठयावर पत्रांचे पुडके घेऊन या. त्या पत्रांची उद्या पायमल्ली नको.
सुलभा.''
गुरुवारच्या दिवशी रंगराव स्टॅण्डवर पत्रांचे पुडके घेऊन आले. परंतु त्यांना यायला उशीर झाला. त्यांची वाट पाहून सुलभा निघून गेली होती. ते घरी आले. त्यांनी ते पुडके कुठे तरी नीट बंदोबस्तात ठेवले. प्रकरण पटकन् मिटले असे त्यांना वाटले.
माया नि रंगराव यांची ओळख होऊ लागली. बागेत भेटत, बोलत. कधी कधी रंगराव तिच्या घरी जात. कधी ती त्यांच्या बंगल्यात येई. कधी दोघे फिरायला जात. लोकांना आश्चर्य वाटे.
''इतके दिवस बिचारा एकटा होता. बरे होईल लग्न झाले तर!'' कोणी म्हणत.
''परंतु मोठयामोठयांच्या सुंदर मुली पूर्वी त्याला सांगून येत. आता ती बुढ्ढी का याच्या गळयांत पडणार?'' दुसरे म्हणत.
''ती काही बुढ्ढी नाही. अजून केस काळे आहेत. जरा डोळे खोल गेले आहेत. गाल जरा सुरकुतले आहेत, एवढेच.''
''अहो, तिची ती पहिली मुलगीच अठरावीस वर्षांची असेल. म्हणजे हिचे वय चाळिशीच्या घरात असणार. बुढ्ढी नाही तर काय?''
''तो तरी काय तरुण आहे? दोघे एकमेकांस शोभेशी आहेत.''
अशी गावात बोलणी चालत. आणि एके दिवशी रंगराव नि माया यांचा विवाह झाला. मोठा समारंभ नव्हता. सारे सुटसुटीत काम होते. माया नि हेमा बंगल्यात राहायला आली. माया आनंदली होती. तिच्या आशा आज सफल झाल्या होत्या. हेमाचे कसे होईल ही तिला चिंता होती. परंतु ती चिंता आज नाहीशी झाली. आता आपले डोळे मिटले तरी चालतील असे ती मनात म्हणाली. आता प्रेमाचा उन्माद तिच्याजवळ नव्हता. ती थकली होती. तिची प्रकृतीही बरी नव्हती; परंतु मनात तिला आता समाधान होते.