दुर्दैवी 15
हेमा ताट घेऊन वर गेली. तिने ते तेथे ठेवले. हातपाय धुऊन तो गृहस्थ जेवू लागला. हेमा जे जे लागेल ते आणून वाढीत होती. त्याचे तिच्याकडे फारसे लक्ष नव्हते. जेवण आटोपून तो खाली गेला. हेमा ताट घेऊन खाली आली. पुन्हा तो कशाला तरी वर गेला नि तो खाली येत होता. हेमा आईला पाणी घेऊन वर जात होती. दोघांची जिन्यात गाठ पडली. तो गाणे गुणगुणत होता. ती जरा थबकली. परंतु त्याचे लक्ष नव्हते. तो तडक खाली गेला. आपल्याकडे त्याचे लक्ष नाही, याचे का तिला वाईट वाटले? आपण का कोणाचे मन ओढून घेणार नाही, असे का तिच्या मनात आले? तिच्या मनातील विचार तिला माहीत. सारे काम आटोपून ती आईजवळ येऊन अंथरुणावर पडली. परंतु दोघींनाही झोप येईना. हेमाच्या मनात विचार, नाना स्वप्ने यांची गर्दी उडाली होती. तिला आतापर्यंतचे स्वत:चे जीवन आठवले. एका खलाशाची ती मुलगी होती. ती त्या जीवनात वाढली. परंतु तिला त्यात समाधान नव्हते. ज्ञानासाठी ती अधीर होती. नवीन संस्कृतीस ती अधीर होती. तिचा आत्मा विकासासाठी धडपड करू इच्छित होता. आजपर्यंत तिला संधी मिळाली नाही. हे नवे नातलग देतील का आपणास आधार? करतील का आपणावर प्रेम? देतील का पुस्तके? ठेवतील का शिक्षक एखादा, आपल्याला शिकवायला? मी वाचीन, कला अभ्यासीन. परंतु हे रंगराव कोण? बाबांचे नि यांचे काय नाते? जवळचे की दूरचे? अशा विचारांत हेमा होती. आणि माया? ती काय करत होती विचार? रंगराव श्रीमंत आहेत. लक्षाधीश आहेत. अधिकारी आहेत. ते जुनी ओळख ठेवतील का? का ते घालावून देतील? चिठीत लिहू तरी काय? अशा चिंतेत ती होती.
आणि खाली संगीतला पूर आला होता. तो आलेला पाहुणा सुंदर गाणी गात होता. तो परप्रांतातून आला होता. आपल्या जन्मभूमीच्या त्याला आठवणी येत होत्या. जन्मभूमीचे एक गाणे त्याने म्हटले. जणू त्या गाण्यांत त्याच्या हृदयाची तगमग होती.
माझे घर माझे घर कोठे माझे घर?
घराविण शून्य सारे झुरे मदंतर॥
घरी जाया किती तरी झालो मी अधीर
डोळयांतून माझ्या वाहे घळघळ नीर
माझे घर माझे घर कोठे माझे घर?
आणि माझी जन्मभूमी नितान्त सुंदर॥
माझ्यासाठी तेथे असतिल डोळे रडणारे
मला पाहून तेथे असतील चेहरे फुलणारे
जाईन जेव्हा पुन्हा खाडया ओलांडून
भावंडे भेटून येईल हृदय ओसंडून
माझे घर माझे घर कोठे माझे घर?
आणि माझी जन्मभूमी नितान्त सुंदर॥