दुर्दैवी 57
''ते माझे काम. मी आता जातो. ठरले सारे?''
''ठरले.''
सोमा निघून गेला.
आणि बाजारपेठेत हेमंतशी सोमा स्पर्धा करू लागला. हेमंत स्पर्धेपासून दूर राही. तोही महत्त्वाकांक्षी होता. परंतु मुद्दाम अटीतटीला पेटणारा नव्हता. ज्या गाडया सोम्या घ्यायला जाई, तिकडे हेमंत नसे. तो भांडण टाळी.
पावसाळा आला. काही ठिकाणी पाऊस पडला. काही ठिकाणी नाही. रंगरावांनी सारे धान्य खरीदण्याचे ठरविले.
''पुढे नक्की भाव वाढेल. माझ्यावर विश्वास ठेवा.''
''मलाही तसेच वाटत आहे. आणि रब्बीची पिक बुडाली तर दर खूपच वाढतील. लाखो रुपये नफा होईल. सार्या गाडया खरीदा.''
वाटेल तो भाव देऊन रंगराव धान्य खरीदू लागला. हेमंताने धान्य विकत न घेण्याचेच ठरविले. तो धान्यबाजारात दिसेना.
''पळाला धान्यबाजारातून बेटा!'' सोमा म्हणाला.
''आता सारंगगावातून हाकलू. टुरटुर करीत होता. बेडकाची टुरटुर.'' रंगराव म्हणाले.
''किती झाले तरी बेडूक तो बेडूक. त्याची टुरटुर समुद्राच्या गर्जनेसमोर का टिकेल, मेघगर्जनेसमोर का टिकेल?'' सोमा मिशीवर पीळ देत म्हणाला.