दुर्दैवी 46
अलीकडे मायेची प्रकृतीही अधिकाअधिक खालावत चालली होती. रंगराव सारे उपाय करीत होते. डॉक्टर येत होते. परंतु गुण पडेना. हेमा आईजवळ असे. सेवा करी. एके दिवशी मायलेकी बोलत होत्या.
''हेमा, मी जगेन असे मला वाटत नाही. तू जपून रहा. भाऊ लहरी आहेत. वळले तर सूत, नाही तर भूत. तुझी काळजी ते घेतलीच. परंतु त्यांची मर्जी सांभाळून वाग. आणि तुला नि हेमंतला मागे कोणी तरी चिठी दिली होती ते आठवते का?''
''हो, एकाच हस्ताक्षरांतील त्या दोन्ही चिठ्ठया होत्या.''
''हेमा, त्या चिठ्ठया मीच लिहिल्या होत्या.''
''परंतु तुझे अक्षर तर मी ओळखते.''
''मी मुद्दाम जरा तिरपे अक्षर काढले होते. हेमा, तुझी नि हेमंतची गाठ पडावी असा माझा हेतू होता. तो सिध्दीस गेला. तुम्ही एकमेकांशी बोललात, हसलात, लाजलात. परंतु पुढे तुमचा परिचय वाढला. कधी बरोबर फिरायलाही जाता. त्याने परवा तुला फुले दिली. तुमचे एकमेकांवर प्रेम आहे की नाही, मला माहीत नाही. परंतु तुम्ही दोघे एकमेकांस शोभता असे मला वाटते. देवाची इच्छा असेल तसे होईल. तू निराधार नाहीस हे मला मरताना सुख आहे. भाऊ कसेही असले, तरी तुझा सांभाळ करतील. तू जणू त्यांची मुलगीच आहेस. तुझी हौस ते पुरवतात. खरे ना?''
''आई, तू कशाची काळजी करू नकोस, तुझे आशीर्वाद मला तारतील; तू पडून राहा. फार बोलू नकोस, तुला थकवा बघ किती आला.''
''अग, शेवटचे बोलून घ्यावे.''
दोघींचे असे बोलणे चालले होते तो रंगराव आले.
''हेमा, कसे आहे आईचे?''
''थकल्यासारखी दिसते आई.''
''आता मी बसतो येथे. तू जा बाहेर. तुझ्या कोवळया मनावर फार ताण नको. जा बाळ.''
हेमा गेली. रंगराव मायेजवळ बसले.