दुर्दैवी 6
''आणि तो विकत घेणारा सौम्य दिसत होता. आपण दारू पीत होतो. त्याने फक्त कॉफी घेतली. तो हिला सुख देईल. थोडक्यात बिचार्याला बायको मिळाली. आणि अगदी काही वाईट बायको नाही. बरी आहे. तरुण आहे.'' चौथा म्हणाला.
''तो खलाशी दिसत होता. परप्रांतातील असावा. आपले रत्न घेऊन जाईल. साता समुद्रापलीकडे जाऊन तेथे बंगला बांधून राजा-राणी राहतील.'' पाचवा म्हणाला.
''एखाद्या कादंबरीत वाचावे तसे झाले.'' सहावा म्हणाला.
हळूहळू ती मंडळी निघून गेली. त्या बाईने दुकानाची आवराआवर केली. तीही एका खाटेवर पडली.
आता उजाडले. पाखरे किलबिल करीत होती. आकाशात सुंदर सोनेरी रंग पसरला होता. त्यात लाल रंगाची छटा होती. सारी सृष्टी प्रसन्न दिसत होती. शांत दिसत होती. जणू या प्रसन्न मंगल सृष्टीला मनुष्यप्राणी म्हणजे काळे फासणारा वाटत होता. परंतु आकाशात वर शांत दिसणारी ही सृष्टी, ही रुपेरी सोनेरी सृष्टी, हीही कधी भेसूर नाही का होत? मनुष्याचा संसार ती उद्ध्वस्त नाही का करीत? प्रचंड वादळे येतात. उत्पात होतात. मुसळधार पाऊस येतो. गावे वाहून जातात. शेतीभाती बुडते. सृष्टी का सदैव पवित्र, सुंदरच असते?
तो तरुण उठला. डोळे चोळीत तेथे बसला. त्याच्या खिशात पंचवीस रुपये होते. ते रुपये हाताला लागताच त्याला आदल्या रात्रीची सारी आठवण आली. तो आजूबाजूस पाहू लागला. तेथे कोणी नव्हते. ती दुकान चालविणारी बाई तेथे होती.
''माझी बायको कोठे आहे? मुलगी कोठे आहे?'' त्याने विचारले.
''ज्याला विकलीस तो घेऊन गेला.'' ती म्हणाली.
''ती का त्याच्याबरोबर गेली?''
''हो.''
''अशी कशी गेली? मी आजपर्यंत शंभरदा असे तिला घरी म्हणालो असेन. मी थट्टेत बोलतो. ती का खरेच गेली?''
''तिने तुला पुन्हा पुन्हा विचारले. 'तुला विकून टाकले आहे, तू म्हणालास. शेवटी बिचारी गेली.''
''परंतु मुलीवर तिचा काय हक्क?''
''मुलीशिवाय आई कशी जाईल?''