दुर्दैवी 13
''माझी चिठ्ठी तरी त्यांना द्याल?''
''देऊ''
त्या अपरिचित मनुष्याने एका कागदावर काही लिहिले आणि तो म्हणाला, 'कागद अध्यक्षांजवळ द्या.''
हळूहळू गर्दी कमी होऊ लागली. दिवाणखान्यांतील भाषणे संपली. गाणे सुरू झाले.
''आई, रात्री आपण कुठे झोपायचे? त्या रंगरावांना तू का नाही भेटत? मी जाऊन भेटू? हेच ना ते? तू ओळखलेस? तू म्हणालीस, ते कदाचित तुरुंगांत असतील. ते तर नगरपालिकेचे अध्यक्ष आहेत. ते श्रीमंत आहेत. ते आधार देतील. मी जाऊ त्यांच्याकडे? सांगू त्यांना?''
''आज नको. उद्या तुझ्याजवळ मी एक चिठ्ठी लिहून देईन. ती तू त्यांना नेऊन दे. आजची रात्र आपण एखाद्या गरीब खानावळीत काढू चल, एखादी खानावळ बघू.''
''कुठे असेल खानावळ? कुणाला तरी विचारू का?''
''विचार.''
हेमाने चौकशी केली. एक गृहस्थ म्हणाला;
''आता खानावळी बंद झाल्या असतील. उशीर झाला. परंतु पलीकडच्या रस्त्याच्या टोकाला मोठी खानावळ आहे. ती अद्याप उघडी असेल. तेथे दर अधिक असतो. बघा जाऊन.''
मायलेकी दोघी गेल्या. खानावळ अजून उघडी होती. कोणी प्रवासी जेवून पानसुपारी खात बसले होते. गप्पा चालल्या होत्या.