दुर्दैवी 49
हेमंत नि रंगराव यांचे शेवटी इतके बिनसले की, त्यांची फारकत झाली. हेमंत रंगरावांकडून निघाला. रंगरावांना वाटले होते की तो सारंगगाव सोडून जाईल. परंतु हेमंत गेला नाही. त्याच गावात राहून स्वतंत्र उद्योग करण्याचे त्याने ठरविले. शेकडो शेतकर्यांशी त्याच्या ओळखी झाल्या होत्या. त्याच्याबद्दल सर्वांनाच आदर वाटे. बाजारपेठेत त्याला मान होता. धान्याचा स्वत:च व्यापार करण्याचे त्याने निश्चित केले. आणि एके दिवशी धान्यबाजारात त्याच्या नावाची पाटी झळकली. स्वतंत्रपणे इतर व्यापार्यांबरोबर तो देवघेवी करू लागला. स्वतंत्रपणे तो धान्याची खरेदी करू लागला. हेमंत लवकरच व्यापारात पुढे येणार असे दिसू लागले.
रंगरावांशी तो आदराने वागे. बाजारपेठेत ते दिसले तर तो त्यांना आदराने प्रणाम करी. परंतु रंगराव त्या प्रणामाचा स्वीकार करीत नसत. रंगराव जेथे भाव ठरवीत असत तेथे हेमंत जात नसे. रंगरावांना धान्य मिळूच द्यायचे नाही; सारे आपणच खरेदी करायचे, असे त्याच्या मनात कधीही आले नाही. किती झाले तरी या रंगरावांनी एके काळी आपणावर अपार प्रेम केले आहे, ही गोष्ट हेमंत विसरू इच्छीत नव्हता.
सारंग गावात शिमग्याच्या दिवसांत निरनिराळे लोक सुंदर खेळ करीत असत. काही मंडळी हेमंताकडे आली. त्यांचे नि हेमंताचे बोलणे झाले.
''या वर्षी आमचे खेळ तुमच्या अध्यक्षतेखाली व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. आमच्या खेळांची सारी व्यवस्था करा. जागा वगैरे ठरवा. तुम्हांला खेळाची आवड आहे. आम्हांला नाही म्हणू नका.'' त्या मंडळीपैकी एक जण म्हणाला.
''तुम्ही खेळ उघडयावर करता; परंतु अलीकडे वादळाची चिन्हे आहेत. एखादे वेळेस पाऊसही यायचा. आपण नीट मांडव घालावा. चांगले थिएटरच बांधावे. पाऊस आला, वारा आला, तरी फजिती नये होता कामा. तुमचे काय मत आहे?'' हेमंतने विचारले.
''आम्हांलाही पावसाचे भय वाटते. आजूबाजूला पाऊस पडला तर गार वारेही सुटतात. पत्र्याचे थिएटर बांधावे. आम्ही सारे तुमच्यावर सोपवितो.''
''आणि नावाला एक आणा दर ठेवावा. खर्चही बाहेर पडेल. आणि बेसुमार गर्दीही व्हायची नाही.'' हेमंत म्हणाला.
''वाटले तर मोफत खेळ पुन्हा करावा. ही वादळी हवा संपल्यावर.'' एकाने सुचविले.
''पुढचे पुढे पाहू. या वेळचा तर समारंभ पार पडू दे.'' दुसरा म्हणाला.