२५ सप्टेंबर जागतिक फार्मसिस्ट दिन
तुम्हा सर्वांना जागतिक फार्मसिस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जागतिक फार्मसिस्ट दिनाचा इतिहास
२५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक फार्मसिस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय औषध संघराज्य (International Pharmaceutical Federation)ची स्थापना २५ सप्टेंबर १९१२ साली झाली आणि त्यांच्या २००९ साली तुर्की येथे झालेल्या परिषदेनुसार हा स्थापना दिवस जागतिक फार्मसिस्ट दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव झाला आणि २०१० पासून २५ सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मसिस्ट दिन म्हणून जगभरात साजरा केला जाऊ लागला.
फार्मसिस्ट आरोग्य यंत्रणेतील एक महत्वपूर्ण घटक
बऱ्याच जणांना फार्मसिस्ट कोण व त्याची त्यांच्या आरोग्यासंदर्भात काय भूमिका आहे याबद्दल फरशी माहिती नसते. कित्येक लोकांना तर फार्मसिस्ट म्हणजे मेडिकलवला इतकंच माहिती आहे परंतु ही वास्तविकता नाही फार्मसिस्ट हा आरोग्ययंत्रणेतील एक महत्वपूर्ण घटक आहे व औषध निर्मितीपासून ते औषधाचे वितरण, औषध वापराबाबत रुग्णांना योग्य मार्गदर्शन, रुग्ण समुपदेशन, रुग्ण इतिहासाची नोंद करणे अशा महत्वपूर्ण जबाबदाऱ्या तो पार पाडत असतो.
फार्मसिस्ट तुमचा आरोग्य सोबती
फार्मसिस्ट हा आरोग्य यंत्रणेतील एक महत्वाचा भाग असून त्याच्याशिवाय आरोग्य यंत्रणा ही अपूर्णच आहे. केवळ डॉक्टरांनी दिलेल्या औषधयोजनेनुसार औषध वितरण करणे इतकिच त्याची मर्यादित भूमिका नसून रुग्णांच्या आरोग्यासंदर्भात त्याची भूमिका ही अत्यंत महत्वाची असते.
तुम्हाला माहित आहे का ?
तुमचा फार्मसिस्ट तुम्ही व तुमचे डॉक्टर यामधील एक महत्वपूर्ण दुवा आहे.
तुमच्या फार्मसिस्ट ची भूमिका ही केवळ औषध वितरणाइतपत मर्यादित नसून इतर महत्वपूर्ण आरोग्य सेवांमध्ये त्याची भूमिका महत्वाची असते.
तुमचा फार्मसिस्ट हा एक शैक्षणिक व व्यावसायिक दृष्ट्या पात्र व सक्षम व्यक्ती आहे जी औषधांशिवाय इतर अनेक आरोग्य विषयक सेवा पुरवतो.
आपला भारत देश हा औषध वितरणात संपूर्ण जगभरात तिसऱ्या क्रमांकावर आहे व २०२० पर्यंत आपण औषध निर्यातीत प्रथम क्रमांकावर असू व एक प्रमुख व महत्वपूर्ण औषध निर्यातदार देश म्हणून आपल्याकडे पाहिप जाईल मात्र दुसऱ्या बाजूला फार्मसिस्ट आरोग्ययंत्रणेतील एक महत्त्वाचा घटक या बाबतीत मात्र जितकी जनजागृती व्हायला हवी तितकी झालेली नाही.
ही सर्व माहिती पाहिल्यावर आपल्याला साहजिकच प्रश्न पडेल की आपल्या इथे मात्र असा विरोधाभास का?
या सर्व परिस्थितीला जितकी आपल्या इथली आरोग्य यंत्रणा, शिक्षण प्रणाली, कायदे या गोष्टी जबाबदार आहेत तितकाच फार्मसिस्ट आणि रुग्ण देखील जबाबदार आहेत....
कायदे,आरोग्य यंत्रणा, शिक्षण प्रणाली या सर्व गोष्टी सहजासहजी बदलू शकणार नाहीत परंतु फार्मसिस्ट, रुग्ण व आरोग्ययंत्रणेतील इतर घटक यांनी पुढे येऊन एकमेकांना सहकार्य केलं तर निश्चितच आपल्या इथली परस्थिती बदलेल...
फार्मसिस्टची भूमिका...
योग्य औषध, योग्य वेळी योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीला परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे हे फार्मसिस्टचे कर्तव्य आहे.
केवळ डॉक्टरांनी लिहून दिलेले औषधयोजनेनुसार औषधांचे वितरण करणे इथपर्यंतच आपली भूमिका मर्यादित न ठेवता फार्मसिस्टने औषधवितरणाबरोबरच रुग्ण समुपदेशन, औषध वापराबाबत मार्गदर्शन या सर्व भूमिका पार पाडणे आवश्यक आहे.
केवळ औषधयोजनेनेच मिळणारी औषधे ही अधिकृत औषध योजनेशिवाय वितरित करू नयेत. तसेच जेंव्हा रुग्ण औषधयोजनेशिवाय मिळणारी औषधे (ओ.टी.सी.ड्रग) खरेदी करत असतील तेंव्हा योग्य औषध निवड व त्याचा योग्य वापर याबाबत मार्गदर्शन करणे.
आपल्या इथे असलेली ही विरुद्ध स्थिती सुधारण्यासाठी फार्मसिस्टनी आपली जबाबदारी योग्य रित्या पार पाडणे गरजेचे आहे शिवाय रुग्ण व आरोग्य यंत्रणेतील इतर घटकांनीही यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे.
रुग्णांची भूमिका
एक सक्षम आरोग्य यंत्रणा निर्माण होण्यासाठी रुग्णांची भूमिका देखील तितकीच महत्वपूर्ण आहे.
रुग्णांनी औषधे ही केवळ अधिकृत औषध योजनेद्वारे व नोंदणीकृत फार्मसिस्ट कडूनच खरेदी करायला हवी तसेच औषध वापराबाबत काही शंका असल्यास त्याबाबत फार्मसिस्ट तसेच डॉक्टर यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे.
सारख्याच लक्षणांसाठी इतर रुग्णांना दिलेली औषधे वापरणे किंवा स्वतःहुन अथवा इतर कोणाच्या तरी सल्ल्याने औषधे वापरणे आशा गोष्टी टाळाव्यात.
तसेच डॉक्टरांनी दिलेली पूर्ण औषध योजना नमूद केलेल्या मात्रा (डोस)नुसार पूर्ण करावी. लक्षणे कमी झाल्यावर औषधांचा वापर थांबवणे अथवा काही इतर कारणामुळे अर्धवट औषधयोजना खरेदी करणे असे प्रकार टाळावेत.
डॉक्टरांची भूमिका
आपल्या देशात असणारी डॉक्टरांची कमी संख्या यामुळे ते हवा तितका वेळ रुग्णांना देऊ शकत नाहीत. या आधी नमूद केल्याप्रमाणे फार्मसिस्ट हा डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील एक महत्वपूर्ण दुवा आहे. मात्र आपल्या आरोग्य यंत्रणेत हा दुवा कुठे तरी तितका मजबूत जाणवत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी डॉक्टर आणि फार्मसिस्ट यांनी पुढे येऊन परस्परांच्या संगम मताने एकमेकांमध्ये सहकार्याची भूमिका प्रस्थापित करून एक प्रभावी व सक्षम आरोग्ययंत्रणा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
फार्मसिस्ट व त्याची तुमच्या आरोग्यासंदर्भातील भूमिका याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाचा फार्मसिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...
बुकस्ट्रक संकेतस्थळावर उपलब्ध शिवाय हे सर्व लेख आता गुगल प्लेस्टोरवर Pharmacy and Your Health या नावाने Application च्या स्वरूपात देखील उपलब्ध आहेत.
फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...
WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!
आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)
ashishkarle101@gmail.com
९७६५२६२९२६