Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय ५६

श्रीगणेशाय नमः ॥ ॥ श्रीदीननाथाय नमः ॥
जय वैकुंठवासी मनमोहना ॥ क्षीराब्धितनयेच्या प्राणजीवना ॥ अविनाशा कल्पद्रुमा पुरुषोत्तमा पांडुरंगा ॥१॥
कृष्ण विष्णु सदाशिवा ॥ सकळ जीवांचा तूं विसांवा ॥ करुणाकरा देवाधिदेवा ॥ निजसौख्यठेवा तूं एक ॥ २॥
तूं निराधारियांसी आधार ॥ प्राक्तनहीनांसी अति उदार ॥ भक्तांस छळितां दुराचार ॥ निजांगें कैवार तूं घेसी ॥३॥
तूं निःसंगाचा अससी संग ॥ निरपेक्षाच्या लागसी मागें ॥ भजनीं प्रेम देऊनि अभंग ॥ करिसी भवभंग दासांचा ॥४॥
तूं अनाथनाथ दीनांचा पाहुणा ॥ निर्बळास देसेसे अभयदाना ॥ मूढमति मी जगज्जीवना ॥ तरी ग्रंथरचना बोलवीं ॥५॥
मागील अध्यायाचे अंतीं ॥ लतिबशाहासी छळितां नृपती ॥ चित्रींचीं लेपें सजीव होती ॥ सप्रेमभक्ति देखोनि ॥६॥
आतां वैष्णवांमाजी निधडा वीर ॥ जो वैराग्यमंडपाचा स्तंभ थोर ॥ तो निजभक्त संतोबा पवार ॥ चरित्र सादर परिसा त्याचें ॥७॥
घरीं अश्व गज धन संपदा ॥ रायापासीं असे मान्यता ॥ एक तुकयाचें कीर्तन ऐकतां ॥ अनुताप चित्ता जाहला ॥८॥
म्हणे मिथ्या संसार मायाभ्रांत ॥ नरदेह तोही नाशवंत ॥ आतां आपण कासया व्यर्थ ॥ आयुष्य वायां दवडावें ॥९॥
संगतीस सेना होती कांहीं ॥ ते जवळ बोलावूनि लवलाहीं ॥ शिबंदी वारून टाकिली पाहीं ॥ म्हणे आपुलाले ठायीं तुम्हीं जावें ॥१०॥
मग बोलावूनि द्विजांप्रती ॥ जवळील सर्व लुटविली संपत्ती ॥ अश्व गज रथ ब्राह्मणांप्रती ॥ वांटोनियां टाकिलें ॥११॥
चार हात वस्त्र फाटकें जीर्ण ॥ तें आपण केलें परिधान ॥ उपाधिरहित होऊन ॥ नामस्मरण करीतसे ॥१२॥
रांजणगांव सांडसांचें ॥ तेथें अधिष्ठान होतें त्याचें ॥ वैराग्य ठसावतांच साचें ॥ निर्लज्ज नाचे कीर्तनीं ॥१३॥
भीमरथी मुळामुठेचे संगमाला ॥ त्या अरण्यांत बेटावरी जाऊन बैसला ॥ जैसा पिंजर्‍यांतूनि शुक निघाला ॥ जाऊनि बैसला वृक्षावरी ॥१४॥
जैसा भ्रमर लोभें भुलत ॥ गुंतला होतां कमळिणी आंत ॥ कठिण मन करूनि निश्चित ॥ बाहेर निघत अनुतापें ॥१५॥
कां बहुतां गांवांत दिवसांचा भुजंग असे ॥ तो कांत टाकितां सतेज दिसे ॥ प्रपंचमाया त्यजितां तैसें ॥ संतोबाबावास वाटालें ॥१६॥
हा वृत्तांत गांवांत जाहला श्रुत ॥ ऐकोनि लोक आश्चर्य करित ॥ माता लोभें आक्रंदत ॥ म्हणे कैसें विपरीत जाहलें ॥१७॥
सेना संपत्ति लुटवूनि पाहीं ॥ पुत्र तों जाहला विदेही ॥ वडिलांचा नांव लौकिक पाहीं ॥ आतां पिशुन तेही हांसतील ॥१८॥
सुनेस मग शिबिकेंत बैसवून ॥ लेवविलीं अलंकारभूषणें ॥ म्हणे तरुण स्त्रीस दृष्टीं देखोन ॥ येईल परतोन प्रपंचीं ॥१९॥
बेटावरी त्या शिवालयांत ॥ संताजी एकांतीं स्मरण करित ॥ तंव कांता बैसोन शिबिकेंत ॥ आली अकस्मात त्या ठायीं ॥२०॥
नेत्र उघडोनि कांतेस बोलत ॥ म्हणे तूं कासया आलीस येथ ॥ आतां परतोनि जाईं त्वरित ॥ उत्तर बहुत न बोलतां ॥२१॥
पत्नी म्हणे ते अवसरीं ॥ मी तुम्हांपासूनि नव्हेंचि दूरी ॥ जळचरांहीं उदधीस सांडिलें जरी ॥ तरी मग गति दुसरी त्यां नाहीं ॥२२॥
वृक्षाचें मूळीं साल जडली ॥ कीं सुवर्णाअंगीं कांति लागली ॥ ते करीन म्हणतां वेगळाली ॥ वायांच बोली असत्य ॥२३॥
तेवीं पतिव्रता भर्त्याकारण ॥ टाकोनि जातां गति कोण ॥ ऐकूनि कांतेचें वचन ॥ संतोबा प्रतिवचन देतसें ॥२४॥
माझी तों ऐसी उदासवृत्ती ॥ तुज वस्त्रें अलंकार बहुत असती ॥ कांता म्हणतां तुजप्रती ॥ लाज चित्तीं वाटेल ॥२५॥
जरी मन करणें असेल कठीण ॥ तरी याचकां देईं वस्त्रभूषण ॥ नाहीं तरी सत्वर उठोन ॥ आटोपीं सदन आपुलें ॥२६॥
ऐसी ऐकोनि वचनोक्ती ॥ अनुताप जाहला कांतेप्रती ॥ मग अलंकार सकळ आपुले हातीं ॥ काढोनियां टाकिले ॥२७॥
दिव्य वस्त्रें परिधान होतीं ॥ तीं फेडूनि टाकिलीं झाडावरती ॥ तेणें चिंध्यादेवीप्रती ॥ संतोष चित्तीं वाटला ॥२८॥
संताजीपासीं धोतर होतें ॥ तें अर्ध फाडोनि दिधलें तीतें ॥ उभयतां उदास होऊनि तेथें ॥ स्मरण करीत बैसलीं ॥२९॥
तों प्रदीप्त जाहला जठराग्न ॥ क्षुधेनें व्याकुळ जाहला प्राण ॥ मग कांतेप्रति बोले वचन ॥ भिक्षेसी जाणें नगरांत ॥३०॥
सालोमालोच्या पारगांवांत ॥ सोयरे मित्र इष्ट बहुत ॥ तरी आतां निर्लज्ज होऊनि तेथ ॥ जावें त्वरित त्या ठायीं ॥३१॥
ममता लावूनि बोलती जन ॥ तयांसी न देईं प्रतिवचन ॥ आणि सगळी भाकर देईल कोण ॥ तरी पदरीं न घेणें सर्वथा ॥३२॥
अवश्य म्हणोनि प्राणनाथा ॥ सत्वर निघाली पतिव्रता ॥ सांडोनि लौकिकलज्जा ममता ॥ पारगांवांत प्रवेशली ॥३३॥
भिक्षा मागतां घरोघरीं ॥ काय बोलती नरनारी ॥ सुकृत केलें जन्मांतरीं ॥ तैं वैराग्य अंतरीं ठसावलें ॥३४॥
घरोघरीं जाऊनि त्वरित ॥ हरि विठ्ठल शब्द बोलत ॥ न येचि भिक्षा इतुक्यांत ॥ तरी जात पुढें लगबगें ॥३५॥
तों आपुलें नणंदेचें घरीं ॥ अकस्मात गेली ते अवसरीं ॥ हरि विठ्ठल म्हणोनि द्वारीं ॥ साद घातली तेधवां ॥३६॥
तों संताजीची बहीण साक्षात ॥ ते बाहेर धांवोनि आली त्वरित ॥ गळां मिठी घालोनि रडत ॥ काय बोलत निजमोहें ॥३७॥
म्हणे वहिनी तूं अति सुकुमार ॥ लागण्यगुणें अति गंभीर ॥ परी एकाएकींच ईश्वर ॥ कैसा क्षोभला कळेना ॥३८॥
बैसली होतीस शिबिकेंत ॥ आतां खडे रुतत असतील बहुत ॥ टाकूनि भूषणें लखलखित ॥ उदास वृत्ति धरिली कीं ॥३९॥
भरजरी वस्त्रें त्यजोनि जाण ॥ आतां नेसलीस फाटकें जीर्ण ॥ सांडूनि घराचीं पक्वान्नें ॥ मागतीस कोरान्न घरोघरीं ॥४०॥
मग दोन रोट्या आणूनि त्वरित ॥ त्यांमाजी घातलेंसे गूळ घृत ॥ आग्रह करूनि झोळींत ॥ तिनें अकस्मात टाकिल्या ॥४१॥
देखोनि संताजीची कांता ॥ म्हणे इतुकें अन्न कासया देतां ॥ वृत्तांत कळतां प्राणनाथा ॥ क्षोभतील तत्त्वतां मजवरी ॥४२॥
येरी सद्गदित होऊनी ॥ म्हणे मायेनें देतसे साजणी ॥ तरी आश्रमासी जाऊनी ॥ बैसा भोजनीं उभयतां ॥४३॥
तिनें आपुली शपथ घालितां ॥ परतली बंधूची निजकांता ॥ बेटांत येऊनि पतिव्रता ॥ म्हणे भोजन प्राणनाथा करावें ॥४४॥
भिक्षा मागोनि आणिली होती ॥ ते झोळी पुढें ठेविली निगुती ॥ तों सगळ्या रोट्या अवचितीं ॥ दृष्टीस पडल्या तेधवां ॥४५॥
हें देखोनि वैराग्यशीळ ॥ कांतेसी पुसे ते वेळ ॥ तिनें वृत्तांत सकळ ॥ सांगितला तयासी ॥४६॥
अनुतापें कांतेसी बोले कायी ॥ परतोनि पारगांवासी जाईं ॥ जेथोनि मिष्टान्न आणिलेंस पाहीं ॥ ज्याचें त्यास देईं परतोन ॥४७॥
हें नायकसी जरी वचन ॥ तरी सर्वथा मी न करीं भोजन ॥ देखोनि भ्रताराचें निर्वाण ॥ गेली परतोन त्या ठायीं ॥४८॥
नणंदेसी वृत्तांत सांगूनी ॥ भिंवरेपासीं आली परतोनी ॥ तों अस्तमाना गेला तरणी ॥ काहूर गगनीं दाटलें ॥४९॥
उगमीं पर्जन्य पडला फार ॥ तों अकस्मात सरितेसी आला पूर ॥ मनीं जाहली चिंतातुर ॥ म्हणे कैसा विचार करावा ॥५०॥
देव गुरु अथवा भ्रतार ॥ ते पैलतीरीं राहिले दूर ॥ इकडे अंतरला संसार ॥ कर्म दुस्तर बळवंत कीं ॥५१॥
पदरीं सुकृत नसतां देवा ॥ भ्रताराची न घडे सेवा ॥ आतां धांव पाव गा केशवा ॥ म्हणोनि धांवा करीतसे ॥५२॥
ऐसें संकट देखोनि तेथ ॥ तत्काळ पावले पंढरीनाथ ॥ तारूचे रूपें दीननाथ ॥ काय बोलत तियेसी ॥५३॥
म्हणे तूं बैसलीस चिंतातुर ॥ पैलतीरीं असे संतोबा पवार ॥ तेथेवर जाणें असेल जर ॥ तरी मी देतों उतार करूनि ॥५४॥
यावरी संतोबाची पत्नी ॥ काय बोले तारुवालागूनी ॥ मी तुझी धर्माची भगिनी ॥ तरी देईं उतरोनि सत्वर ॥५५॥
ऐसें ऐकूनि श्रीहरी ॥ तिजला बैसविलें खांद्यावरी ॥ निमिष न लागतां पैलतीरीं ॥ नेऊनियां ठेविलें ॥५६॥
दुरूनि दाखवी पंढरीनाथ ॥ पैल संतोबा दिसत ॥ ऐसें वदोनि रुक्मिणीकांत ॥ जाहले गुप्त ते ठायीं ॥५७॥
भ्रतारापासीं जातां त्वरित ॥ सांगितला सकळ वृत्तांत ॥ म्हणे तुज भेटला वैकुंठनाथ ॥ आणि माझा कां अंत पाहातसे ॥५८॥
तरी न होतां श्रीहरिदर्शन ॥ मी सर्वथा न सेवीं अन्न ॥ ऐसा निश्चयें केला पण ॥ सत्य जाण निजकांते ॥५९॥
दुसरे दिवशीं पारगांवांत ॥ एक वाणी होती भाविक भक्त ॥ तयासी स्वप्नीं पंढरीनाथ ॥ आज्ञा करीत ते ऐका ॥६०॥
आपुलें घरीं पक्वान्नें करून ॥ संतोबासी घाली भोजन ॥ तुझे पदरीं सुकृत जाण ॥ म्हणोनि दर्शन दिधलें म्यां ॥६१॥
चमत्कार देखोनि अद्भुत ॥ वाणी तत्काळ जाहला जागृत ॥ घरीं पक्वान्नें करूनि त्वरित ॥ घेऊन जात संतोबापासीं ॥६२॥
सांगितला सकळ वृत्तांत ॥ म्हणे मज आज्ञापी पंढरीनाथ ॥ भोजन करावें जी त्वरित ॥ म्हणोनि लागत चरणांसी ॥६३॥
यावरी संतोबा भक्त ॥ म्हणे तुज भेटला रुक्मिणीकांत ॥ आणि माझे पदरीं काय दुरित ॥ म्हणोनि अंत पाहातसे ॥६४॥
तरी न होतां श्रीहरीचें दर्शन ॥ मी न सेवीं कदापि अन्न ॥ ऐसा निश्चय देखोन ॥ वाणी परतोन चालिला ॥६५॥
कलियुगीं अन्नमय प्राण म्हणत ॥ परी त्याचा निश्चय अघटित ॥ अंतर जाणोनि रुक्मिणीकांत ॥ भेटले साक्षात येऊनि ॥६६॥
यावरी रांजणगांवांत ॥ संतोबा नित्य भिक्षेसी जात ॥ तेथें एक ब्राह्मण होता अभक्त ॥ तो अखंड भांडत कांतेर्सीं ॥६७॥
आपणचि काढूनि कुरापत ॥ कलह करीत नित्यनित्य ॥ कांता जरी कांहीं उत्तर देत ॥ तरी भय घालित तियेसी ॥६८॥
म्हणे संतोबा पवारा ऐसा ॥ मी वैरागी होईन तैसा ॥ तुझी होईल दुर्दशा ॥ मी संसार आशा टाकीन ॥६९॥
ऐसें बाह्यात्कारें बोलोनि दावित ॥ ब्राह्मणकांता उगीच राहात ॥ जैसा कोलाटी शस्त्र झाडित ॥ अंगीं शूरत्व नसतांचि ॥७०॥
कीं अंगीं नसतां गर्भच्छायां ॥ वंध्या डोहाळे सांगतसे वायां ॥ कीं पर्जन्याविणें मेघाची छाया ॥ गर्जना वायां आकाशीं ॥७१॥
कीं हृदयावरी नसतां कुचाकृती ॥ हिजडे स्त्रियांचा आकार दाविती ॥ नातरी छत्रसिंहासन नसतां हातीं ॥ बहुरूपी होती नृपवर ॥७२॥
तेवीं चित्तीं नसतां शांति विरक्ती ॥ जे वैराग्याच्या गोष्टी सांगती ॥ त्यांसी प्रपंचीं वा परमार्थीं ॥ नाहीं गति दोहींकडे ॥७३॥
असो आतां तो ब्राह्मण पाहें ॥ कांतेसी अखंड दाखवी भये ॥ येरी चिंताक्रांत होये ॥ उगीच राहे ते समयीं ॥७४॥
तों एके दिवसीं संतोबा भक्त ॥ अंगणीं भिक्षेसी आले त्वरित ॥ तिनें साकल्य वृत्तांत ॥ त्यांचेजवळी सांगितला ॥७५॥
म्हणे स्वामी घरधनी पिसा ॥ होईन म्हणे तुम्हांऐसा ॥ यासी उपाय करावा कैसा ॥ सांगाल तैसा ऐकेन मी ॥७६॥
विष्णुभक्त उत्तर एती तिसी ॥ तो जेव्हां भांडण करील तुजसीं ॥ मग टाकीं सांड देऊनि तयासी ॥ पाठवीं मजपासीं सत्वर ॥७७॥
मग कांहीं मंत्रोपदेश सांगोन ॥ करूनि देईन तुजस्वाधीन ॥ जैसा दरवेशी माकडाकारण ॥ हिंडे घेऊन घरोघरीं ॥७८॥
अवश्य म्हणोनि तयें क्षणीं ॥ ब्राह्मणकांता लागली चरणीं ॥ संतोबा भिक्षा घेऊनी ॥ गेले आश्रमीं आपुल्या ॥७९॥
तों निमेष न लोटतांचि सत्वर ॥ बाहेरूनि आला तिचा भ्रतार ॥ म्हणे स्वयंपाकासी कां लाविला उशीर ॥ क्षुधातुर मी जाहलों ॥८०॥
मी संसाराचा त्याग करितों ॥ संतोबा पवाराऐसा होतों ॥ मग चित्तासी येईल तेथें जातों ॥ वाद घालीत ऐशा रीतीं ॥८१॥
कांता देत प्रत्युत्तर ॥ आतां कासया करितां उशीर ॥ जैसा जाहला संतोबा पवार ॥ व्हा सत्वर तयाऐसे ॥८२॥
ऐकोनि पत्नीचें वचन ॥ विचारीं पडला तो ब्राह्मण ॥ म्हणे आतां कासया ठेवावें जिण ॥ सक्रोधमन जाहला ॥८३॥
धोतरें तांभ्या घेऊनि सत्वर ॥ लवलाहें गेला बेटावर ॥ संतोबासी बोले उत्तर ॥ टाकूनि संसार मी आलों ॥८४॥
मी तुम्हांऐसा जाहलों निश्चितीं ॥ आतां कदापि न सोडीं तुमची संगती ॥ अनुग्रह करूनि मजप्रती ॥ लावा पारमार्थीं आपुल्या ॥८५॥
अवश्य म्हणे विष्णुभक्त ॥ आम्हां अनायासें लाघली संगत ॥ तुजऐसा वैरागी विरक्त ॥ नाहीं दिसत त्रिभुवनीं ॥८६॥
आतां भोंपळा घेऊनि आपुल्या हातें ॥ उदक आणूनि देईं मातें ॥ वस्त्र पागोटें ठेवीं येथें ॥ तस्कर बहुत जपताती ॥८७॥
अवश्य म्हणोनि उठाउठीं ॥ ब्राह्मण गेला सरितेकांठीं ॥ क्षुधा बहुत लागली पोटीं ॥ म्हणोनि कष्टी होतसे ॥८८॥
तों मागें वस्त्रें फाडोनि सत्वरी ॥ चिंध्या घातल्या बोरांटीवरी ॥ तांब्या झोंकिला डोहाभीतरीं ॥ तों ब्राह्मण सत्वरी पातला ॥८९॥
संतोबा म्हणे त्याकारण ॥ परिधान करीं आडबंदकौपीन ॥ ब्राह्मणें संकोचमन होऊन ॥ धोतर फेडोन टाकिलें ॥९०॥
मग नेसोनियां लंगोटी ॥ विष्णुभक्तासी पुसे गोष्टी ॥ क्षुधा बहुत लागली पोटीं ॥ प्राण कंठीं धरिला म्यां ॥९१॥
मग नेपतीं तरटें तोडोनि त्वरित ॥ कांतेसह बैसले खात ॥ ब्राह्मण म्हणे हें कडू बहुत ॥ नाहीं भावत मजलागीं ॥९२॥
संतोबा उत्तर देत तया ॥ आतां रसनाविषय पाहिजे कासया ॥ तुवां सर्व त्याग करूनियां ॥ आलासी लवलाह्यां मजपासीं ॥९३॥
तरी कांहीं शीतळ देतों तुजकारण ॥ तेणेंच करीं क्षुधाहरण ॥ ऐकोनि संतोबाचे वचन ॥ संतोषयुक्त जाहला ॥९४॥
मग निंब तोडोनि आपुल्या हातें ॥ सुखें खात बैसला तेथें ॥ विप्र म्हणे माझें संचित ॥ बरवें दिसत नाहीं कीं ॥९५॥
खाऊन ओल्या कोरड्या भाकरी ॥ सुखें होतों आपुलें घरीं ॥ परी माझी बुद्धि अघोरी ॥ प्रपंच माघारीं टाकिला ॥९६॥
स्फुंदोनि हळूंच करी रुदन ॥ म्हणे आतां उपाय करावा कवण ॥ शीत लागे अंगासी दारुण ॥ पोटीं क्षुधेनें पीडिलें ॥९७॥
अंतरींची अवस्था जाणोनि ऐसी ॥ संतोबा पुसो लागले त्यासी ॥ तूं संसारीं होऊनि उदासी ॥ कशास्तव आलासी या ठायीं ॥९८॥
येरू म्हणे फुटलें प्राक्तन ॥ वायांचि कांतेसीं केलें भांडण ॥ मग उदास होऊनि मन ॥ तुम्हांपासीं पातलों ॥९९॥
तों तुमची संगत बहुत कठिण ॥ वस्त्रेंही टाकिली फाडोन ॥ आतां घरासी जावया परतोन ॥ तरी लज्जा मनीं वाटत ॥१००॥
तथापि रात्रीं गेलों पाहीं ॥ तरी कांता येऊं देणार नाहीं ॥ म्हणेल लंगोटबंद गोसावी ॥ कोण आला कळेना ॥१॥
ऐकोनि म्हणे विष्णुभक्त ॥ तूं कांतेसी अखंड म्हणत ॥ कीं संतोबासारिखा विरक्त ॥ होऊन अरण्यांत जाईन मी ॥२॥
ऐसें आजपासोनि म्हणसील जरी ॥ तरी शपथ वाहें ये अवसरीं ॥ मग तुजला नेऊन घालितों घरीं ॥ कोणासी बाहेरी न कळतां ॥३॥
येरू तत्काळ धरी चरण ॥ म्हणे जरी मी कांतेसीं करीन भांडण ॥ तरी माझी जिव्हा जाईल झडोन ॥ वाहातसें आण देवाची ॥४॥
मग रात्रीं उठोनि संतोबा भक्त ॥ द्विजाचें घरासी गेला त्वरित ॥ त्याचे कांतेसी वृत्तांत ॥ काय सांगत एकांतीं ॥५॥
आम्हीं मंत्रदीक्षा देऊन ॥ भ्रतार केला तुझे स्वाधीन ॥ आतांचि देतों पाठवून ॥ तरी तयासीं भांडण न करावें ॥६॥
लंगोटी नेसून येईल येथें ॥ तरी वस्त्र सत्वरीं देईं त्यातें ॥ ऐसी ऐकूनियां मात ॥ संतोषे चित्त तियेचें ॥७॥
इतुकें सांगोनि ते वेळां ॥ परतोनि आला आपुल्या स्थळा ॥ ब्राह्मणातें वृत्तांत सांगितला ॥ आतां जावें वहिला घरासी ॥८॥
जरी कांतेसीं कलह करशील कांहीं ॥ तरी मजऐसा वाईट नाहीं ॥ येरू मस्तक ठेवूनि पायीं ॥ निघे लवलाहीं सत्वर ॥९॥
गांवांत प्रवेशला अंधारांत ॥ म्हणे कोणी देखेल अकस्मात ॥ म्हणे ब्राह्मणांस कळतां वृत्तांत ॥ घालितील वाळीत मजलागीं ॥११०॥
यास्तव लगबगें भेणेंभेण ॥ प्रवेशला आपुलें सदन ॥ तैंपासोनि कांतेसीं भांडण ॥ न करी जाण सर्वथा ॥११॥
यावरी संतोबा आषाढमासीं ॥ पंढरीसी चालिला यात्रेसी ॥ जैसी कन्या जातां माहेरासी ॥ उल्हास मानसीं तियेच्या ॥१२॥
तैशा रीतीं वैष्णवभक्त ॥ सप्रेमभरीं गात नाचत ॥ समागमें यात्रा बहुत ॥ दोन सहस्र मिळाली ॥१३॥
आषाढशुद्ध दशमीस सत्वरा ॥ वारकरी आले नरसिंहपुरा ॥ जेथें एकवट नीरा भिंवरा ॥ संगम जाहला दोहींचा ॥१४॥
आषाढमास पर्जन्यकाळ ॥ नदीस पूर आला तुंबळ ॥ पात्र टाकूनि चालिलें जळ ॥ देखोनि सकळ चिंतावले ॥१५॥
म्हणती आजि न होतां नदीपार ॥ उदयीक नाटोपे पंढरपूर ॥ एकादशीस रुक्मिणीवर ॥ दर्शन नेदीच सर्वथा ॥१६॥
ऐसें म्हणोनि ते अवसरीं ॥ यात्रा सर्व आली ऐलतीरीं ॥ म्हणती एक नाव असती तरी ॥ उतरूनि जातों सत्वर ॥१७॥
हें देखोनि संटोबा भक्त ॥ आपुलें मनीं विचार करीत ॥ म्हणे देहाची आस्था धरितां निश्चित ॥ तरी कैसा भगवंत भेटेल ॥१८॥
तरी तारिता मारिता श्रीहरी ॥ ऐसा निश्चय करूनि अंतरीं ॥ उदकीं प्रवेशूनि सत्वरीं ॥ चरण चाली चालिले ॥१९॥
विष्णुभक्त भाविक प्रेमळ ॥ तयासी बुडवूं न शके जळ ॥ पोटर्‍य़ांइतुकेंचि केवळ ॥ उदक जाहलें तयासी ॥२०॥
वीणा घेऊनि ते अवसरीं ॥ संतोबा नामस्मरण करी ॥ सरितेवरूनि झडकरी ॥ जाते जाहले तेधवां ॥२१॥
हें नवल पाहातां ते समयीं ॥ सकळ यात्रेकरू बोलती कायी ॥ आम्हां सांडोनि येथें पाहीं ॥ जातां कैसे पैलतीरा ॥२२॥
आपण केवळ ईश्वरमूर्ती ॥ म्हणवोनि आलों तुमचे संगतीं ॥ परी प्राक्तनाची विचित्र गती ॥ नाहीं संचितीं आमुच्या ॥२३॥
अनुपम महिमा ऐकिला बरा ॥ म्हणवोनि चालिलों पंढरपुरा ॥ आतां परतोनि माघारां ॥ जातो आम्ही सकळिक ॥२४॥
ऐकोनि यात्रेकर्‍यांची मात ॥ उभे ठाकले जळाआंट ॥ मग उभारूनियां हात ॥ काय बोलत तें ऐका ॥२५॥
सकळ वर्णांचें नारीनर ॥ चतुष्पद आणि लहानथोर ॥ कांहींच न करितां विचार ॥ यावें सत्वर मजमागें ॥२६॥
भय न धरावें चित्तांत ॥ तुम्हांसी तारील पंढरीनाथ ॥ ऐसी ऐकोनियां मात ॥ संतोषे चित्त सकळांचें ॥२७॥
म्हणती संतोबा चालिले पंढरीसी ॥ घोंट्याइतुकेंचि उदक जाहलें त्यांसी ॥ आपण जाऊं तयासरसीं ॥ ऐसें म्हणती एकमेकां ॥२८॥
अश्वावरी ओझीं घालून ॥ यात्रा उठिली न लागतां क्षण ॥ एकापुढें एक करिती गमन ॥ सरितेजवळी पातले ॥२९॥
हे जाणूनि पंढरीनाथ ॥ विचार करी चित्तांत ॥ नदीसी पूर आला बहुत ॥ बुडतील समस्त जळामाजी ॥१३०॥
संतोबा तरला नामधारक ॥ तरी त्याजऐसे नाहींत सकळ लोक ॥ जेवीं काष्ठ म्हणोनि पाषाण देख ॥ उदकीं टाकितां बुडतील कीं ॥३१॥
आपण न करितां यांचें धांवण ॥ तरी भक्तांचें होईल असत्य वचन ॥ यात्रा जळांत बुडतां जाण ॥ तरी घेतील दर्शन कोण माझें ॥३२॥
आणि मागील संतांचें वचन ॥ असत्य मानितील विचक्षण ॥ ऐसें म्हणोनि जगज्जीवन ॥ काय करिते जाहले ॥३३॥
पाठीवरी यात्रा उतरावी सर्व ॥ म्हणोनि कांसव जाहले देवाधिदेव ॥ ज्याचेनि आधारें सकळ जीव ॥ ब्रह्मांडामाजी राहाटती ॥३४॥
नदीचें पात्र रुंद होतें ॥ तेवढे जाहले रुक्मिणीकांत ॥ निजदासांचे जगन्नाथ ॥ चुकवी आघात नानापरी ॥३५॥
ब्रह्मादिकां पूज्य जगजेठी ॥ ज्यासी अंतरीं जपतो धूर्जटी ॥ तेणें यात्रेकर्‍यांसी दिधली पाठी ॥ हे अपूर्व गोष्टी मज वाटे ॥३६॥
असो इकडे नारीनर ॥ अठरा वर्षांचे लहानथोर ॥ करीत हरिनामाचा गजर ॥ एकदांचि सत्वर चालिले ॥३७॥
अश्व वृषभ आणि खर ॥ ओझें घालोनि तयांवर ॥ वैष्णव करीत कीर्तनगजर ॥ उदकामाजी प्रवेशले ॥३८॥
तों घोंट्याइतुकेंचि लागलें पाणी ॥ सकळांसी आश्चर्य वाटलें मनीं ॥ म्हणती आपण उगेच कोंडोनी ॥ राहिलों होतों अलीकडे ॥३९॥
एक आनंदें टाळ्या पिटिती ॥ म्हणती धन्य संतांची संगती ॥ संतोष मानूनि ऐशा रीतीं ॥ पैलतीरीं उतरले ॥१४०॥
परी कूर्मरूप धरूनि तारिलें देवें ॥ हें न पडेचि कोणाप्रति ठावें ॥ विचित्र मायेनें सकळ जीव ॥ मोहभ्रमांत पाडिले ॥४१॥
मग यात्रेसहित वैष्णवभक्त ॥ पंढरपुरासी गेले त्वरित ॥ स्नान करूनि चंद्रभागेंत ॥ कीर्तन करीन सप्रेम ॥४२॥
महाद्वारासी जाऊन ॥ सकळ घालिती लोटांगण ॥ देवासी देऊनि आलिंगन ॥ वंदिले चरण सद्भावें ॥४३॥
संतोबा म्हणे गा श्रीहरी ॥ तूं भक्तां रक्षिसी नानापरी ॥ तुझी कीर्ति वर्णितां बरी ॥ शेषाची वैखरी शिणली कीं ॥४४॥
कांसवरूप धरूनि देवा ॥ पाठीवर तारिलें जडजीवां ॥ आतां मज चरणीं ठाव द्यावा ॥ ऐसें संतोबा विनवित ॥४५॥
ऐसें ऐकोनि दीनदयाळ ॥ हांसों लागले तयेवेळ ॥ म्हणे तूं माझा भक्त प्रेमळ ॥ राहें सर्वकाळ मजपासीं ॥४६॥
आणिक कथा रसाळ पुढती ॥ सादर ऐकिजे सभाग्य श्रोतीं ॥ निळोबाची देखोनि भक्ती ॥ पावले श्रीपति त्यालागीं ॥४७॥
ज्याच्या तुकाराम येऊनि स्वप्नीं ॥ उपदेश दिधला कृपा करूनी ॥ त्याचें चरित्र रसाळवाणी ॥ ऐका श्रवणीं भाविक हो ॥४८॥
नेणे मान दांभिकपण ॥ सद्भावें करी हरिकीर्तन ॥ पुरातन संतांचीं वचनें बोलून ॥ संटचरित्रें वर्णावीं ॥४९॥
मुलेंलेंकुरें सर्व असती ॥ परी मी माझीं हें नाठवे चित्तीं ॥ सहज मिळेल जें अयाचित्तवृत्तीं ॥ त्यांतही अतिथि पूजावा ॥१५०॥
तंव कोणे एके दिवसीं जाण ॥ घरीं मांडिलें कन्येचें लग्न ॥ सोयरे दांभिक अभक्त पूर्ण ॥ घरीं सामग्री नसे किंचित ॥५१॥
कांता म्हणे तयाप्रती ॥ तुमची ऐसी उदास वृत्ती ॥ शेवटीं पिशुनांत होईल फजिती ॥ ऐसें मजप्रति भासतसे ॥५२॥
ऐसें जाणोनियां जगज्जीवन ॥ आपण जाहले वृद्ध ब्राह्मण ॥ वस्त्र फाटकें नेसोनि जीर्ण ॥ आले सत्वर त्या ठायीं ॥५३॥
दुसरें उपवस्त्र खांद्यावरी ॥ किंचि सामग्री त्याचे पदरीं ॥ निळोबासी ते अवसरीं ॥ येऊनि काय बोलत ॥५४॥
मी निर्मळ ब्राह्मण आहें दीन ॥ सामग्रीं किंचित आलों घेऊन ॥ तयाचा स्वयंपाक करून ॥ घालावें भोजन मजलागीं ॥५५॥
विप्रासी नमन करूनियां ॥ म्हणे तुमची सामग्री पाहिजे कासया ॥ आतां देवासी नैवेद्य दावूनियां ॥ प्रसाद घ्यावा एथेंचि ॥५६॥
यावरी काय बोले श्रीहरी ॥ आमची इच्छा मिष्टान्नावरी ॥ तरी पूर्णगर्भा करूनि सत्वरी ॥ भोजन पोटभरी घालावें ॥५७॥
निळोबा कांतेसी सांगत पाही ॥ ब्राह्मणाची सामग्री ठेवीं ॥ आणि स्वयंपाक करूनि ये समयीं ॥ भोजन लवलाहीं घालावें ॥५८॥
अवश्य म्हणोनि ते अवसरीं ॥ शिधा घेतला आपुले पदरीं ॥ म्हणे हे तों किंचित सामग्री ॥ कैसा पोटभरी जेविशी तूं ॥५९॥
यावरी म्हणे रुक्मिणीकांत ॥ हे टाकी लग्नाचिये सामग्रींत ॥ आणि तूं आपुलें घेऊनि त्वरित ॥ मज क्षुधितासी तृप्त करीं ॥१६०॥
आणि माझें साहित्य नाहीं घेत ॥ तरी मी सर्वथा न जेवीं येथ ॥ वचन ऐकोनि प्रेमळ भक्त ॥ काय बोलत कांतेसी ॥६१॥
एका ब्राह्मणाकारण ॥ भोजन घालितां संकट कोण ॥ आतां सत्वर स्वयंपाक करून ॥ करीं समाधान विप्राचें ॥६२॥
मग म्हणे रुक्मिणीकांत ॥ स्वयंपाकासी उशीर होईल बहुत ॥ तरी अन्न निपजलें प्रस्तुत ॥ तें भक्षूं त्वरित निजप्रीतीं ॥६३॥
तेव्हां निजभक्ताचे पंक्तीस ॥प्रीतीनें जेविले जगन्निवास ॥ रात्रीं बैसूनियां स्वस्थमानस ॥ निळोबाबावास बोलती ॥६४॥
उदयीक तुमचें घरीं लग्न ॥ उदक आणावयास नाहीं ब्राह्मण ॥ जरी ठेवाल मजकारण ॥ तरी मिष्टान्नभोजन करीन मीं ॥६५॥
आणि ईश्वरपीर्त्यर्थ तुमचे रांजणीं ॥ घालीन चार घागरी पाणी ॥ अवश्य म्हणोनि तये क्षणीं ॥ निळोबा चरणीं लागला ॥६६॥
दुसरे दिवशीं प्रातःकाळीं ॥ सत्वर उठोनि वनमाळी ॥ कोणासी न कळतां ते वेळीं ॥ सडासंमार्जन पैं केलें ॥६७॥
तों वर्‍हाडी घेऊनि पांचशत ॥ वरबाप आला अकस्मात ॥ सीमांतपूजा करूनि त्वरित ॥ जानवशांत राहिले ॥६८॥
साहित्यासी आले जगज्जीवन ॥ म्हणोनि सर्वथा न पडेचि उण ॥ कल्पतरूचे छायेसी बैसतां जाण ॥ तरी उपवासी कोण राहील ॥६९॥
भास्कर घरीं आला पाहुणा ॥ तरी अंधार सर्वथा पडेना ॥ गंगा स्वयमेव बैसली रांजणां ॥ तरी तों उणें जीवना नव्हे कीं ॥१७०॥
मेघचि निजांगें घाली सडा ॥ मग राहील जागा कैसा कोरडा ॥ कीं गजवदनें घालोनि धडा ॥ तरी विद्यार्थी वेडा नव्हे कीं ॥७१॥
विधात्यानेंचि दिधलें सुंदरपण ॥ तेथें सामुद्रिकांत न येचि उण ॥ नातरी सरस्वतीनें केलें लेखन ॥ तेथें न चुके व्यंजन सर्वथा ॥७२॥
तेवीं लग्ना आले हृषीकेशी ॥ तरी उणे न पडे साहित्यासी ॥ कावडी घेऊनि खांद्यासीं ॥ उदक तांतडी वाहातसे ॥७३॥
ब्राह्मणें शिधा टाकिला कोठींत ॥ तेणें ते सामग्री जाहली बहुत ॥ पांचशें मनुष्य नित्य जेवीत ॥ परी ते न सरे सर्वथा ॥७४॥
कामाची होतां आडाडी ॥ सामग्री देत अति तांतडी ॥ उच्छिष्टें काढूनि लवडसवडी ॥ अंगण झाडी अतिवेगें ॥७५॥
जेवित्या पदार्थ पडतां न्यून ॥ आणोनि वाढी जगज्जीवन ॥ सोयर्‍यांसी विनवी कर जोडून ॥ कीं स्वस्थ भोजन करावें ॥७६॥
निळोबा आश्चर्य करी मनांतून ॥ म्हणे हा ब्राह्मण फार सज्जन ॥ सर्वस्वीं निभावलें प्रयोजन ॥ पडों नेदीं उणें सर्वथा ॥७७॥
मग म्हणे प्रेमळ भक्त ॥ तुम्ही कार्यासी पडलां बहुत ॥ तरी आपुलें नामाभिधान निश्चित ॥ सांगावें त्वरित आम्हांसी ॥७८॥
यावरी म्हणे जगज्जीवन ॥ विठोबा माझें नामाभिधान ॥ चार्‍ही दिवस मिष्टान्नभोजन ॥ यथेच्छ जेविलों तुमचें घरीं ॥७९॥
निळोबा विचारीं मानसीं ॥ कीं याचा उपकार न फिटे मजसी ॥ परी एक वस्त्र जाते समयीं यासी ॥ मनोभावेंसीं अर्पावें ॥१८०॥
असो विप्रवेष घेऊनि तयाचें घरीं ॥ पांच दिवस होते श्रीहरी ॥ निजांगें कष्ट नानापरी ॥ भक्ताघरीं करीतसे ॥८१॥
वर्‍हाड बोळवूनि सहावे दिवसीं ॥ निळोबा आले मंदिरासी ॥ तयासवेंचि हृषीकेशी ॥ घरासी आले तेधवां ॥८२॥
देवघरांत सर्वांदेखत गेले ॥ निमिष न लागतां अदृश्य जाहले ॥ निळोबा म्हणे विठोबासी वहिलें ॥ पांचारावें ये समयीं ॥८३॥
कोरा शेला घेऊनि त्वरित ॥ म्हणे त्यासी पांघरवूं एवढें वस्त्र ॥ विठोबा म्हणोनि हांका मारीत ॥ तों राजीवनेत्र दिसेना ॥८४॥
इतुक्यांत समजलें चित्तांत ॥ म्हणे म्यां कष्टविले पंढरीनाथ ॥ जळो या प्रपंचाची संगत ॥ घडलें विपरीत आजि बहु ॥८५॥
मग स्वप्नांत येऊनि रुक्मिणीवर ॥ निळोबाचें मस्तकीं ठेविला अक्र ॥ कीं मी कटावरी ठेवूनि कर ॥ राहें निरंतर तुजपासीं ॥८६॥
त्याचें भक्तीस्तव श्रीहरी ॥ अद्यापि आहेत पिंपळनेरीं ॥ फाल्गुनवद्य द्वितीयेसी निर्धारीं ॥ महोत्साह गजरीं होतसें ॥८७॥
आणिक एक चरित्र रसाळ गहन ॥ धारुरकर उद्धवचिद्धन ॥ ते सप्रेम करितां कीर्तन ॥ देशावरासी चालिले ॥८८॥
जयांचीं पदापदांतरें बहुत ॥ अनुभव रसिक जडाव अद्भुत ॥ प्रेमळ विरक्त भाविक भक्त ॥ भजनीं रत जाहला असे ॥८९॥
तंव एकदां चैत्रशुद्ध प्रतिपदेसीं ॥ अकस्मात आले बेदरासी ॥ नगरांत कीर्तन तये दिवसीं ॥ प्रेमोल्हासीं मांडिलें ॥१९०॥
श्रवणासी आले सज्ञान पंडित ॥ इतर यातींचें भाविक भक्त ॥ कीर्तन ऐकोनि सप्रेमभरित ॥ रिझलें चित्त तयांचें ॥९१॥
माळ लावावी नगरांत ॥ तों उद्धव तयासी काय बोलत ॥ श्रीरामजयंतीकरितां त्वरित ॥ जाणें लागत धारुरा ॥९२॥
लोक म्हणती त्या अवसरा ॥ रामनवमी येथेंचि करा ॥ सकळांचा हेत देखोनि बरा ॥ अवश्य म्हणती तयांसी ॥९३॥
मग प्रशस्त वाडा पाहूनि त्वरित ॥ मंडप उभारिला तेथ ॥ मखर करूनि तयाआंत ॥ अयोध्यानाथ बसविले ॥९४॥
हरिदास वैष्णव बोलावून ॥ नित्य करीत हरिकीर्तन ॥ नानापरींचीं पक्वान्नें करून ॥ ब्राह्मणसंतर्पण करीतसे ॥९५॥
एकदां दिंड्या पातका घेऊन सत्वर ॥ मिरवत चालिले वैष्णववीर ॥ पुढें वाजंत्र्यांचा गजर ॥ उल्हास थोर मांडिला ॥९६॥
सप्रेमभरें हरिदास गाती ॥ तों मशिदीमाजी यवन कुमती ॥ बैसले होते सहजस्थिती ॥ ते काय बोलती एकमेकां ॥९७॥
उद्धवचिद्धन हरिदास नाना ॥ बोलावूनि मांडिला कुफराणा ॥ तरी आपण शेणमार करूनि जाणा ॥ करूं विटंबना सकळांची ॥९८॥
तेव्हां यवनांचें प्राबल्य बहुत ॥ कोणी न पाहे न्यायनीत ॥ शहरीं गुंडे उन्मत्त बहुत ॥ बैसले पांचशत ते ठायीं ॥९९॥
असो हरिदास गात नाचत ॥ पुढें वाद्यांचा गजर होत ॥ मशिदीपुढें मिरवत ॥ आले अकस्मात तेधवां ॥२००॥
तों ते टवाळ धांवले सत्वरगती ॥ वैष्णवांसी शेणमार करिती ॥ पताका हिरून घेतल्या किती ॥ वैष्णवांसी ताडिती निजहस्तें ॥१॥
विण्याच्या तोडोनि टाकिल्या तारा ॥ मृदंग फोडिले तया अवसरा ॥ विक्षेप सकळांचे अंतरा ॥ मग हरिदास घरा पातले ॥२॥
शिष्यसांप्रदायी येऊनि त्वरित ॥ उद्धवचिद्धनासी सांगती वृत्तांत ॥ ऐसी ऐकतांचि मात ॥ विक्षेप चित्तांत वाटला ॥३॥
जैसें दुग्धामाजी पडे लवण ॥ मग नासोनि जाय न लागतां क्षण ॥ पक्वान्नासी शिवलें श्वान ॥ मग स्वयंपाकीण तळमळी ॥४॥
कीं वधूवरें बैसलीं भोजनाकारण ॥ तंव दीप विझविला पतंगान ॥ मग वरमायेचें विक्षेपे मन ॥ तैसेंचि वाटलें तयासी ॥५॥
नातरी ग्रास घेतांचि क्षुधितासी ॥ मुखांत अकस्मात गेली माशी ॥ तेवीं अविंधीं छळितां हरिदासासी ॥ उद्धवचिद्धनासी वातलें ॥६॥
मग मखरापासीं जाऊण तत्त्वतां ॥ म्हणे जयजयाजी रघुनाथा ॥ हें नव्हतें येत तुझिया चित्ता ॥ तरी अट्टाहास वृथा कां केला ॥७॥
तूं विश्वात्मा जानकीवरू ॥ वसविसी सर्वांचें अंतरू ॥ मी कासया आतां खेद करूं ॥ केला अनादरू संतांचा ॥८॥
मग रघुनाथाची मूर्ति उचलोनी ॥ देव्हार्‍यामाजी ठेविली तये क्षणीं ॥ मखर टाकिलें मोडोनी ॥ मंडप सोडोनि ठेविला ॥९॥
हरिदासांसी करून नमन ॥ करीत बैसले श्रीरामभजन ॥ तंव मारुती जाहले क्रोधायमान ॥ म्हणे बेदर घालीन पालथें ॥२१०॥
माझा स्वामी श्रीरघुनाथ ॥ त्याचा उत्साह करिती भक्त ॥ त्या वैष्णवांसी गांजिलें येथ ॥ तरी जिणें व्यर्थ पैं माझें ॥११॥
मग मशिदीवरी अंजनीसुत ॥ उभा ठाकला जाऊनि त्वरित ॥ टवाळगुंड पांचशत ॥ बैसले होते त्याखालीं ॥१२॥
धरूनि मशिदीचि भिंती ॥ निजकरें हालवितां मारुती ॥ जवळ फकीराची झोंपडी होती ॥ तेणें अवचितीं देखिलें ॥१३॥
तो फकीर होता परम ज्ञानी ॥ सत्वर उमजला आपुलें मनीं ॥ रामभक्तांसी छळिलें म्हणोनी ॥ मारुती क्षोभोनि पातला ॥१४॥
जोडोनियां बद्धांजली ॥ हनुमंतासी म्हणे ते वेळीं ॥ माझी झोंपडी आहे खालीं ॥ तरी हे वांचविली पाहिजे ॥१५॥
गोष्टी ऐकोनियां ऐसी ॥ टवाळ म्हणती एकमेकांसी ॥ पिसें लागले फकीरासी ॥ बोलतो कोणासीं कळेना ॥१६॥
तो म्हणे एक वानर येऊन ॥ मशीद पाडूं पाहे जाण ॥ तरी तुम्ही आतांचि उठोन ॥ पळा बाहेर सत्वर ॥१७॥
गुंड बोलती तये संधीं ॥ मशीद आहे चिरेबंदी ॥ वानराचे पित्यासी त्रिशुद्धी ॥ न पडेचि जाण सर्वथा ॥१८॥
ऐसी ऐकतांचि मात ॥ परम क्षोभला श्रीरामदूत ॥ निमिष न लागतां अकस्मात ॥ मशीद पाडूनि टाकिली ॥१९॥
जाहला एकचि हाहाकार ॥ म्हणती अघटित जाहलें थोर ॥ यवनवाड्यापासीं सत्वर ॥ जाऊनि कोणी सांगती ॥२२०॥
कीं मशीद पडली अकस्मात ॥ गुंड मरूनि गेले बहुत ॥ तों त्यांचें पोटीं शूळ अकस्मात ॥ उठिला लोळत गडबडां ॥२१॥
तो ज्या फकीरानें देखिला वानर ॥ तो अविंधासी जाऊनि सांगे सत्वर ॥ कीं उधवचिद्धन भक्त थोर ॥ छळिलें साचार तयासी ॥२२॥
टवाळांनीं केला शेणमार ॥ तेणें क्षोभला मारुती वानर ॥ मनांत करूनियां निकर ॥ मशीद सत्वर पाडिली ॥२३॥
ऐसी वार्ता ऐकून ॥ भयभीत जाहला तो यवन ॥ मग उद्धवचिद्धनाचे चरण ॥ येऊनि वंदिले सद्भावें ॥२४॥
रौप्यमुद्रा सहस्रवरी ॥ आणूनि ठेविल्या पायांवरी ॥ म्हणे आपुला महोत्साह सुखरूप करीं ॥ संकोच अंतरीं न धरितां ॥२५॥
तुमचें छळण केलें ज्यांनीं ॥ ते तत्काळ गेले मृत्युसदनीं ॥ आतां मारुतीसी प्रार्थूनी ॥ आम्हांलागोनि वांचवीं ॥२६॥
नगरवासी होऊनि गोळा ॥ तत्काळ मंडप उभा केला ॥ मखर श्रृंगारूनि तये वेळां ॥ जानकीवरा बैसविलें ॥२७॥
टाळ मृदंग घेऊनि प्रीतीं ॥ वैष्णव आनंदें गाती नाचती ॥ द्वारशीपावेतों महोत्साह प्रीतीं ॥ केला मागुती उल्हासें ॥२८॥
साधुसंतांचा द्वेष करी ॥ तयासी दुःख जन्मभरी ॥ विघ्नें येती नानापरी ॥ तयाचें घरीं शोंधीत ॥२९॥
श्रीविठ्ठलाचे चरण आठवितां ॥ सर्व विघ्नेण जाती दूर पंथा ॥ शरीरांतील रोगव्यथा ॥ जाय निघोनि ते काळीं ॥२३०॥
असो त्रयोदशीस करूनि लळित ॥ सकळ गौरविले हरिभक्त ॥ भजनप्रसाद महीपति तेथ ॥ सांगे उचित संतांसी ॥३१॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ षट्पंचाशत्तमाध्याय रसाळ हा ॥२३२॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

श्री भक्तविजय

Shivam
Chapters
॥ मंगलाचरणम् ॥ आरती श्रीविठ्ठलाची, प्रार्थना - आरती श्रीविठ्ठलाची युगें ... अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७