अध्याय ४७
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीद्वारकानाथाय नमः ॥
ऐका श्रोते हो कथा चोखंडी ॥ जेणें परमार्थी लागेल गोडी ॥ श्रवणीं ऐकतांचि तांतडी ॥ दुरितें रोकडीं न राहती ॥१॥
तुटोनि मायामोहपाश ॥ विकल्पसंशयांचा होय नाश ॥ भेदाभेद मावळे निःशेष ॥ शांतिसुख अनायासें ये हातां ॥२॥
तुटोनियां कर्माकर्म ॥ चित्तीं ठसावें भजनप्रेम ॥ भक्तकथेचा महिमा निरुपम ॥ पुरुषोत्तमें म्हणितला ॥३॥
हे सांगूं काय बहु व्युत्पत्ती ॥ अनुभवें खूण सभाग्य जाणती ॥ जयांसी चित्तीं बाणली विरक्ती ॥ जे कां भक्तिपंथा लागले ॥४॥
टाकोनियां लौकिकप्रौढी ॥ जे कीर्तनीं नाचती कडोविकडी ॥ त्यांवांचूनि कथेस गोडी ॥ न लागे रोकडी कवणासी ॥५॥
यास्तव तुम्हीं सभाग्य श्रोतीं ॥ जोडिल्या मागें पुण्यसंपत्ती ॥ म्हणोनि कथाश्रवणीं धरोनि आर्ती ॥ श्रवणासी प्रीतीं बैसलां ॥६॥
मागील अध्यायीं कथा अद्भुत ॥ एकनाथ प्रेमळ वैष्णवभक्त ॥ जो विष्णुअवतार मूर्तिमंत ॥ परिसिलें चरित्र तयाचें ॥७॥
कृष्णातीरीं जांबनगर ॥ तेथें रामउपासक एक द्विजवर ॥ परम भाविक ज्ञानी चतुर ॥ असे उदार सर्वस्वें ॥८॥
कांतापुरुष दोघें जाण ॥ एकचित्तें असती जाण ॥ अहोरात्र प्रेमेंकरून ॥ श्रीरामभजन करिताती ॥९॥
सहज कुळकर्णाची वृत्ती ॥ म्हणोनि निरंतर तेथेंच नांदती ॥ अन्नार्थियांसी तृप्त करिती ॥ भूतदया चित्तीं धरूनियां ॥१०॥
रामजयंती येतां जाण ॥ बोलावूनि साधु वैष्णवजन ॥ मंडप पताका उभारून ॥ महोत्साह करित उल्हासें ॥११॥
सर्व साहित्य करूनि प्रीतीं ॥ द्विजांसी पक्वान्नभोजन घालिती ॥ कीर्तन करूनि नवरात्रीं ॥ जागरण करिती उल्हासें ॥१२॥
श्रीराम सीता लक्ष्मण ॥ या मूर्ति घरीं पुरातन ॥ त्यांसी दिव्य मखरें श्रृंगारून ॥ षोडशोपचारें पूजिती ॥१३॥
वाजंत्री भेरी मृदंग कुसरी ॥ वाद्यें वाजती मंडपद्वारीं ॥ प्रतिवर्षीं ऐशियापरी ॥ महोत्साह गजरीं करीतसे ॥१४॥
दशमीचे रात्रीं करून ललित ॥ सकळ गौरवावे साधुसंत ॥ मानसीं धरूनि अत्यंत प्रीत ॥ नमस्कार करीत सद्भावें ॥१५॥
परी पुत्रसंतान नाहीं पोटीं ॥ म्हणोनि कांता होतसे कष्टी ॥ तों रात्रीं निद्रा न लागतां मोठी ॥ मग स्वप्न दृष्टीं देखिलें ॥१६॥
दृष्टांतीं येऊन श्रीरघुनाथ ॥ ब्राह्मणाप्रति काय सांगत ॥ मारुतिअवतार मूर्तिमंत ॥ तुमचें उदरां येईल ॥१७॥
भक्ति ज्ञान वैराग्य जाण ॥ त्याचें देहीं वसती पूर्ण ॥ तो निजभक्त अंजनीनंदन ॥ पुत्रनिधान देखसी ॥१८॥
ऐसें स्वप्न देखोनि ब्राह्मण ॥ जागृत जाहला न लागतां क्षण ॥ मनांत विस्मय होऊन ॥ कांतेप्रति सांगतसे ॥१९॥
भ्रताराचें वचन ऐकून ॥ चित्तीं वाटलें समाधान ॥ तों नवमास गर्भांत होतां जाण ॥ पुत्रनिधान प्रसवली ॥२०॥
गृहीं सर्व संपत्तिसुख ॥ त्यावरी पाहिलें पुत्रमुख ॥ द्विजासी वाटला परम हरिख ॥ म्हणे जानकीनायक पावला ॥२१॥
प्रसन्न होऊन अयोध्याधीश ॥ पुत्र दिधला हा मोठा हर्ष ॥ नाम ठेविलें रामदास ॥ द्वादश दिवस लोटतां ॥२२॥
दिवसेंदिवस थोर जाहला ॥ पांचवे वर्षीं व्रतबंध केला ॥ वैदिक ब्राह्मण घरीं ठेविला ॥ पढों घातला त्यापासीं ॥२३॥
कांता म्हणे भ्रताराकारण ॥ निजपुत्राचें करावें लग्न ॥ तेव्हां पुरोहितें तत्काळ जाऊन ॥ वधू विचारून ठेविली ॥२४॥
मग लग्नसामुग्री अलंकार ॥ वस्त्रें भूषणें घेऊनि फार ॥ नरनारी सोयरे सत्वर ॥ घेतले सकळ लग्नासी ॥२५॥
पुढें सोयरा होऊनि सामोरी ॥ वर पूजिला ते अवसरीं ॥ बिर्हाड देऊनि जानवसघरीं ॥ उल्हास गजरीं वाद्यांचा ॥२६॥
देवक प्रतिष्ठा करूनि जाण ॥ केलें ब्राह्मणसंतर्पण ॥ लग्नघटि उरतांचि दिन । मधुपर्कविधान पैं केलें ॥२७॥
मग अंतःपट धरूनि देख ॥ ब्राह्मण बोलती मंगलाष्टक ॥ शेवटीं अवघे होऊनि एक ॥ सावधान देख म्हणताती ॥२८॥
तंव एक पुरोहित सन्निध बैसला ॥ रामदास प्रश्न करी त्याजला ॥ तुम्ही सावधान म्हणतां कवणाला ॥ सांगा मजला ये समयीं ॥२९॥
तंव तो विनोदें बोले वचन ॥ सावधान म्हणतों तुजकारण ॥ आजिपासोनि संसारबंधन ॥ पडलें जाण निश्चितीं ॥३०॥
परम दुःखरूप संसार पाहीं ॥ येथें अणुमात्र सौख्य नाहीं ॥ संसार म्हणितला जिंहीं ॥ तरी ते सर्वस्वेंही नाडले ॥३१॥
म्हणोनि सकळ पुरोहित ॥ तुजलागूनि सावधान म्हणत ॥ रामदास ऐकोनि मात ॥ थरथरां कांपत तेधवां ॥३२॥
वैराग्य होऊनि निजअंतरीं ॥ पळोनि चालिले वनांतरीं ॥ मायबापें धरूं पाहाती सत्वरीं ॥ परी मोहें अंतरीं परतेना ॥३३॥
जैसें विष रांधिलें अन्नांत ॥ तो जेवणारासी कळला वृत्तांत ॥ मग तो जैसें पात्र टाकोनि देत ॥ उपचार समस्त अव्हेरी ॥३४॥
तैसा कंटाळोनि विषयसुखीं ॥ पळोनि गेला एकाएकीं ॥ उदंड गौरव केला लोकीं ॥ परी नायके शेखीं कोणाचें ॥३५॥
तयामागेंचि मातापिता ॥ अरण्यांत गेलीं उभयतां ॥ पुत्रासी लावूं म्हणती ममता ॥ परी तो सर्वथा परतेना ॥३६॥
रामदास म्हणे पितयासी ॥ तुम्ही व्यर्थ कां गोवूं पाहतां मजसी ॥ प्रपंच केवळ दुःखराशी ॥ उमजलें मजसी निश्चित ॥३७॥
कामाचे आर्त पुरवावया ॥ म्हणोनि केली सुंदर जाया ॥ तिचें पालन करावया ॥ आटली काया सर्वस्वें ॥३८॥
धनवंताचें उपार्जन ॥ करूनि द्रव्य मिळविलें जाण ॥ आणि अवचित तस्कर पडले येऊन ॥ तरी घेती प्राण आपुले ॥३९॥
जेवीं गळ आहे उंडियांत ॥ हें मीनासी उमजलें अकस्मात ॥ मग पळोनि गेला पाणियांत ॥ तैसा सावधचित्त मी जाहलों ॥४०॥
कीं नलिकायंत्र देखोनि डोळां ॥ शुक आकाशीं पळोनि गेला ॥ तेवीं प्रपंचफांसा न पडतां भला ॥ उमजलें मजला या रीतीं ॥४१॥
आतां कांहीं ममता न धरितां चित्तीं ॥ परतोनि जावें सदनाप्रती ॥ ऐसें म्हणोनि सत्वरगती ॥ अरण्याप्रती चालिला ॥४२॥
पिता उमजला निजअंतरीं ॥ हा मारुतीचा अवतार ब्रह्मचारी ॥ कदापि न बुडे भवपुरीं ॥ मग परतोनि मंदिरीं चालिला ॥४३॥
पूर्वीं दृष्टांत जो जाहला ॥ तो कांतेसी मागुती आठव दिधला ॥ म्हणती धन्य वंश आपुला ॥ कीं पुत्र निघला वीतरागी ॥४४॥
यापरी समाधान करूनि चित्ता ॥ ग्रामासी गेलीं उभयतां ॥ हृदयीं ध्याती श्रीरघुनाथा ॥ माया ममता टाकोनि ॥४५॥
तों इकडे रामदास अरण्यांत ॥ एकांती जाऊनि बैसला त्वरित ॥ होऊनि वैराग्यभरित ॥ विचार करित मानसीं ॥४६॥
तीर्थें व्रतें अनुष्ठान ॥ कलीमाजी नव्हतीं साधन ॥ तरी श्रीरामासी रिघोनि शरण ॥ करावें चिंतन तयाचें ॥४७॥
नाम घेतां उठाउठीं ॥ गणिका चढली वैकुंठीं ॥ नाम जपतां धूर्जटी ॥ शीतळ पोटीं जाहला ॥४८॥
ऐसा विश्वास धरून ॥ करीत बैसला नामस्मरण ॥ न घे फळ मूळ अथवा जीवन ॥ मांडिलें निर्वाण निजनिष्ठें ॥४९॥
म्हणे जय अयोध्यावासी दशरथकुमरा ॥ कौसल्यातनया जानकीवरा ॥ रावणांतका जगदुद्धारा ॥ सायुज्यउदरा श्रीरामा ॥५०॥
मी अनाथ बाळक तुझें दीन ॥ अरण्यांत बैसलों किलवाण ॥ तूं भक्तकैवारी पतितपावन ॥ तरी द्यावें दर्शन मज आतां ॥५१॥
ऐसी करुणा भाकितां चित्तीं ॥ तों तेथें प्रकटला मारुती ॥ विक्राल रूप दाविलें निश्चित्तीं ॥ परी भयभीत चित्तीं न होय ॥५२॥
जैसा अग्नि प्रदीप्त होऊनि पाहें ॥ कृशानासी पोळवूं जाये ॥ परी तयासी सर्वथा नुपजे भय ॥एकचि देह म्हणोनि ॥५३॥
कीं दिनकर भास्कराचें गेलियां घरा ॥ त्यासी सर्वथा न येचि उबारा ॥ तेवीं उग्ररूपें मारुति भेटला खरा ॥ परी रामदास अंतरा गजबजेना ॥५४॥
किंवा पौर्णिमेसीं सागरा आणूनि भरतें ॥ आपुलाचि कल्लोळ लपवूं पाहात ॥ परी तो न बुडे निश्चित ॥ असे एकत्र म्हणोनि ॥५५॥
कीं आकाश सक्रोध होऊनि पाहें ॥ नभासी अवचित गिळूं जाये ॥ तरी तें त्याचेन गिळवेल काय ॥ व्यर्थचि उपाय हा तैसा ॥५६॥
तेवीं विक्राळ रूपें अंजनीसुत ॥ रामदासासी भय दाखवित ॥ परी तो निर्भय चित्तांत ॥ एकत्र भावित आपणासी ॥५७॥
रामदासाचा निश्चय देखोन ॥ मारुतीस वाटलें समाधान ॥ मग सौम्य रूप धरून ॥ दिधलें दर्शन निजप्रीतीं ॥५८॥
रामदासें देऊनि आलिंगन ॥ वंदिले मारुतीचे चरण ॥ म्हणे श्रीरामाचें होय दर्शन ॥ तो उपाय सांगणें मजलागीं ॥५९॥
अभय देऊन ते अवसरीं ॥ मारुति अदृश्य जाहले सत्वरीं ॥ मग रामदास जाऊनि नगरांतरीं ॥ करतलभिक्षा मागती ॥६०॥
तें भिक्षेचें अल्प सेवूनि अन्न ॥ अरण्यांत जाऊनि करी स्मरण ॥ निद्रा आलस्य न येचि जाण ॥ अनुताप बळें सर्वथा ॥६१॥
आपुलेंचि मन आपुल्यासी श्रोता ॥ आपुलेंचि मन आपुल्यासी वक्ता ॥ मनापरीस ज्ञानदाता ॥ सद्गुरु सर्वथा असेना ॥६२॥
मग मनासी बोध करून साच ॥ श्लोक रचिले दोनशें पांच ॥ ते सप्रेम गाती जे नित्य वाचे ॥ वैराग्य त्यांचें आंदण ॥६३॥
श्रीरामरूप आठवूनि मनीं ॥ कीर्तनीं नाचे प्रेमेंकरूनी ॥ मग कंठ सद्गदित होऊनी ॥ आनंदाश्रु नयनीं लोटती ॥६४॥
झाडे वृक्ष आणि पाषाण ॥ पक्षी श्वापदें वनचरें जाण ॥ हेचि आपुले सखे सज्जन ॥ निश्चय मनीं दृढ केला ॥६५॥
मध्याह्नसमयीं भिक्षेपुरतें ॥ क्षणभर जाऊनि नगरांत ॥ तेणें क्षुधा करून शांत ॥ मागुती अरण्यांत बैसावें ॥६६॥
प्रापंचिक लोक येतां जवळी ॥ तरी पळोनि जावें तत्काळीं ॥ म्हणे गुंता करोनि मज ये काळीं ॥ मायाजाळीं पाडितील ॥६७॥
जो परमार्थी विषयीं विरक्त ॥ सज्ञान आणि धैर्यवंत ॥ तेणें धरितां जनांची संगत ॥ तरी होईल अनर्थ रोकडा ॥६८॥
कस्तूरीचें सुवासपोतें ॥ क्षणैक ठेविलें हिंगाआंत ॥ तरी त्याचें मोल तुटे निश्चित ॥ अवगुण लागत निमिषमात्रें ॥६९॥
कीं तंबाखू आणि पूगीफल पाहीं ॥ दोन्ही सांठविलीं एक ठायीं ॥ तरी दुर्गंधि लागेल निश्चयीं ॥ संशय काहीं न धरावा ॥७०॥
तेवीं प्रापंचिक जे अज्ञान ॥ समूळ वेष्टिले अविद्येंकरून ॥ त्यांचे संगतीसी विरक्त सज्जन ॥ लागतां नाडले निश्चित ॥७१॥
म्हणोनि रामदास वैराग्यशील ॥ मनुष्य देखोनि पळे तत्काळ ॥ नामस्मरण सर्वकाळ ॥ करीत प्रेमळ विदेही ॥७२॥
तों एके दिवशीं आषाढमासीं ॥ पंढरीसी चालिले यात्रेसी ॥ मार्गीं मारुति सांगे त्यासी ॥ श्रीराम तुजसी भेटतील ॥७३॥
ऐसा दृष्टांत देखोनि सत्वरीं ॥ परम हर्ष वाटला अंतरीं ॥ मग रामदास सप्रेम गजरीं ॥ पंढरीसी लवकरी चालिले ॥७४॥
तंव तेथें टाळ मृदंग वाजती ॥ वैष्णव आनंदें गाती नाचती ॥ पुढें वाहे भीमरथी ॥ तेव्हां संशय चितीं वाटला ॥७५॥
म्हणे मी जयाचें करितों ध्यान ॥ तो कांहींच न दिसे येथें जाण ॥ मग विक्षेप पावूनि निजमन ॥ श्रीरामभजन करीतसे ॥७६॥
श्रीरामचरित्र मुखीं गात ॥ महाद्वारासी आला त्वरित ॥ तंव गरुड आणि हनुमंत ॥ पुढें अवचित देखिले ॥७७॥
मागुती त्यांसी करूनियां नमन ॥ पुढें पाहातसे विलोकून ॥ तों संतसाधु वैष्णवजन ॥ करिती कीर्तन स्वानंदें ॥७८॥
दिंड्या पताका गरुडटके ॥ जैसें वैकुंठ उतरलें निकें ॥ मग रामदासासी वाटला हरिख ॥ सप्रेमसुख देखोनि ॥७९॥
तेव्हां हरिदासांसी करूनि नमन ॥ घ्यावया चालिले देवदर्शन ॥ तों विटेवरी उभे जगज्जीवन ॥ देखिले दुरून दृष्टीसी ॥८०॥
समचरण कर कटीं ॥ नासाग्रीं ठेविलीं दिठी ॥ ऐसें स्वरूप देखोनि दृष्टीं ॥ रामदास भेटी न घेचि ॥८१॥
म्हणे मी मानसपूजा करितों नित्य ॥ तें श्रीरामस्वरूप न दिसे येथ ॥ मग संमुख उभा राहूनि तेथ ॥ काय बोलत देवासी ॥८२॥
चापबाण हातींचे काय केले ॥ निजकर जघनावरी कां ठेविले ॥ कां निजवेषासी पालटिलें ॥ सांग वहिलें श्रीरामा ॥८३॥
अबोला धरिला जगजेठी ॥ कांहीं आम्हांसीं न बोलसीच गोष्टी ॥ काय अपराध धरिला पोटीं ॥ तें मज उठाउठीं सांगावें ॥८४॥
शरयू गंगा त्यजिली काय ॥ येथें भीमरथी वाहात आहे ॥ ऐसें विपरीत जाहलें काय ॥ सांग लवलाहें रघुनाथा ॥८५॥
लोपोनि गेली अयोध्यानगरी ॥ येथें वसविली क्षेत्र पंढरी ॥ काय जाहली सीतासुंदरी ॥ येथें चौघी नारी मेळविल्या ॥८६॥
अमित वानरदळ पाहीं ॥ तें कांहींचि न दिसे या ठायीं ॥ आतां आम्हीं नमावें कायी ॥ सांग लवलाहीं श्रीरामा ॥८७॥
एक हनुमंत दिसतो येथ ॥ हा सैन्यांतूनि फुटला किमर्थ ॥ तुज चाळवूनि कोण्या भक्तें ॥ उभें केलें या ठायीं ॥८८॥
आतां कोणासी द्यावें आलिंगन ॥ जेणें चित्तासी वाटे समाधान ॥ कोणासी करावें साष्टांग नमन ॥ ते मजकारण कळेना ॥८९॥
कंठ जाहला सद्गदित ॥ नेत्रीं अश्रुपात वाहात ॥ म्हणे अयोध्यावासी जानकीकांत ॥ भेटावें त्वरित मजलागीं ॥९०॥
मी तरी तुझा अनाथ दीन ॥ येथें दिसतों किलवाण ॥ आतां कृपादृष्टीं विलोकून ॥ द्यावें दर्शन श्रीरामा ॥९१॥
ऐसा निश्चय देखोनि चित्तीं ॥ संतोषले रुक्मिणीपती ॥ म्हणे धन्य रामदासाची भक्ती ॥ उपासक निश्चित या नांव ॥९२॥
मग रुक्मिणीसी म्हणे जगज्जीवन ॥ रामउपासक निजभक्त जाण ॥ घ्यावया आला आपुलें दर्शन ॥ तरी तों सीता होऊन बसावें ॥९३॥
ऐसें सांगूनि पंढरीनाथ ॥ आपुलें स्वरूप पालटिलें त्वरित ॥ श्रीरामस्वरूप धरूनि तेथ ॥ जाहले उदित भेटावया ॥९४॥
मुकुट कुंडलें विराजमान ॥ सुंदर सगुण मेघश्याम वर्ण ॥ हातीं घेतले धनुष्यबाण ॥ ठाण मांडोन उभे कीं ॥९५॥
सन्निध होती रुक्मिणीमाता ॥ ती तत्काळ जाहली सगुण सीता ॥ हें दृष्टीस देखोनि निजभक्ता ॥ आनंद चित्ता वाटला ॥९६॥
मग रामदास सन्निध येऊन ॥ श्रीरामासी दिधलें आलिंगन ॥ तें ध्यान दृष्टीसी न्याहाळितां जाण ॥ समाधान वाटलें ॥९७॥
कंठ होऊनि सद्गदित ॥ आनंदाश्रु नेत्रीं वाहात ॥ मग चरणीं मिठी घालोनि त्वरित ॥ मस्तक ठेवित सद्भावें ॥९८॥
बहुत दिवसीं दिधली भेटी ॥ म्हणोनि समाधान वाटलें पोटीं ॥ रामदासासी जगजेठी ॥ कृपादृष्टीं पाहातसे ॥९९॥
म्हणती तुझिया आवडीकारण ॥ म्यां श्रीरामरूप धरिलें जाण ॥ आतां हेंच रूप ध्यानीं आणून ॥ द्वैतखंडन करावें ॥१००॥
शिष्यसंप्रदायी करून कांहीं ॥ सद्भावें कीर्तन करीत जायीं ॥ तेणें जड मूढ अज्ञान पाहीं ॥ माझें भजनीं लागतील ॥१॥
ऐसें सांगोनि जानकीवर ॥ मस्तकीं ठेविला अभयकर ॥ मागुती कटीवरी ठेवूनि कर ॥ स्वरूप सत्वर पालटिलें ॥२॥
पांडुरंगस्वरूप जगज्जीवन ॥ धरिते जाहले न लागतां क्षण ॥ तो मायालाघवी मनमोहन ॥ लाघव पूर्ण कळों नेदी ॥३॥
धन्य रामदासाची सप्रेम भक्ती ॥ स्वाधीन केला जगत्पती ॥ जैसी इच्छा धरिली चित्तीं ॥ तैसा श्रीपति जाहला कीं ॥४॥
मग विठ्ठलमूर्तीस आलिंगन ॥ देऊनी सद्भावें धरिले चरण ॥ रामदासें मांडिलें हरिकीर्तन ॥ प्रेमउल्हासें ते समयीं ॥५॥
रामकृष्ण स्वरूपें दोनी ॥ हा संशय होता निजमनीं ॥ तों देवें तत्काळ निरसूनी ॥ अद्वैतभजनीं लाविला ॥६॥
गोपाळकाला झालियावरी ॥ देवासी पुसोनियां चालिले सत्वरीं ॥ आश्रमासी जातां ते अवसरीं ॥ तों वाटेसीं जेजुरी लागली ॥७॥
रामदास येतां नगरांत ॥ चित्तीं हर्षले म्हाळसाकांत ॥ म्हणती धन्य हा वैषणवभक्त ॥ आणिक दैवत नेणेचि ॥८॥
जो पांडुरंगमूर्तीसी न करी नमन ॥ तो कैसा घेईल माझें दर्शन ॥ तरी आपण मनुष्यरूप धरून ॥ यावें भेटोनि तयासी ॥९॥
तेव्हां होतां शिवाजी नृपवर ॥ तैसेचि जाहले म्हाळसावर ॥ अश्वारूढ होऊन सत्वर ॥ कपाळीं भंडार लाविला ॥११०॥
ऐशा रूपीं मणिमल्लमर्दन ॥ तेथोनि चालिले न लागतां क्षण ॥ रामदासासी देखतां दुरून ॥ अश्वावरून उतरले ॥११॥
म्हणे धन्य आजिचा सुदिन ॥ स्वामीचें अकस्मात जाहलें दर्शन ॥ मग रामदासाचे धरूनि चरण ॥ दिधलें आलिंगन निजप्रीतीं ॥१२॥
जो साक्षात शिवअवतार पाहें ॥ तो रामदासाचे वंदी पाय ॥ हस्त जोडोनियां लवलाहें ॥ बोलती काय तयासी ॥१३॥
पंढरीसी येतां जाण ॥ आम्हांसी देत जावें दर्शन ॥ मी गडावरी राहिलों बहुत दिन ॥ तुमची भेट इच्छीतसें ॥१४॥
ऐसें बोलोनि म्हाळसापती ॥ रामदासासी बोले पुढती ॥ जे श्रीरामाचें भजन करिती ॥ ते मज आवडती सज्जन ॥१५॥
रामदासें उत्तर द्यावें कांहीं ॥ तों अदृश्य जाहले तये ठायीं ॥ अश्व नृपति कांहींचि नाहीं ॥ म्हणती हे नवाई अगाध ॥१६॥
मग विवेकदृष्टीं जंव पाहात ॥ म्हणे आले असतील म्हाळसाकांत ॥ तो शंकर अवतार साक्षात ॥ जो भजन करीत अहर्निशीं ॥१७॥
तरी आतां परतोनि जाऊन ॥ पाहावें तयाचें निजस्थान । ऐसा विचार मनीं करून ॥ चालिले तेथून सत्वर ॥१८॥
जो रामाचा प्रियकर ॥ साक्षात मारुतीचा अवतार ॥ त्यानें सत्वर जाऊन गडावर ॥ म्हाळसावर पाहिला ॥१९॥
श्रीरामस्वरूप आठवूनि मनीं ॥ मग नमस्कर केला तये क्षणीं ॥ सभामंडपीं कीर्तन करूनी ॥ आरती रचोनि गायली ॥१२०॥
पंचानन हयवाहन म्हणती ॥ ते रामदासांनीं केली आरती ॥ नमस्कार करूनि सत्वरगती ॥ तेथूनि मागुती निघाले ॥२१॥
परतोनि जांबासी येतां जाण ॥ शिवाजीसी कळलें वर्तमान ॥ कीं मार्तंड आपुलें रूप धरून ॥ रामदासासी भेटले ॥२२॥
हे कीर्ति ऐकोनियां ऐकोनियां ऐसी ॥ शरण आला सद्भावेंसीं ॥ मग अधिकार देखोनि रामदासीं ॥ उपदेश तयासी दीधला ॥२३॥
आणिक संप्रदायी वैराग्यशीळ ॥ भजनीं लाविले भक्त प्रेमळ ॥ परी रामदास उदास सर्वकाळ ॥ न करी तळमळ सर्वथा ॥२४॥
मानापमान दोन्ही सारिखीं ॥ अरण्यांत बैसले एकाएकीं ॥ कांहीं गुंता कळतां लौकिकीं ॥ तेथोनि शेखी पळावें ॥२५॥
राजा रंक आणि दीन ॥ दृष्टीसी लेखीतसे समान ॥ सर्वां भूतीं सद्भाव पूर्ण ॥ हें आत्मज्ञान प्रकटलें ॥२६॥
अनुभवाचे सोलींव शब्द ॥ ग्रंथ रचिला दासबोध ॥ तो सद्भावें वाचितां बुद्धिमंद ॥ तरी तो होय अगाध ज्ञानराशी ॥२७॥
रामदासाचें ज्ञान अद्भुत ॥ स्वमुखें रचिला अध्यात्मग्रंथ ॥ जे श्रवण करिती वैष्णवभक्त ॥ जीवन्मुक्त ते होती ॥२८॥
करावया विश्वोद्धार ॥ भूतळीं अवतरले वैष्णववीर ॥ जे सिद्धांतज्ञानी अति उदार ॥ करुणाकर दीनांचे ॥२९॥
रामदासाची अद्भुत स्थिती ॥ सारिखीच दिसे शेण माती ॥ पुढें येतां इंद्रसंपत्ती ॥ तरी न गणी चित्तीं सर्वथा ॥१३०॥
श्रवणीं ऐकावें श्रीरामकीर्तन ॥ मुखीं जपावें त्याचें नाम ॥ ध्यानीं आणोनि आत्माराम ॥ दृष्टी सम सर्वा भूतीं ॥३१॥
पुढिले अध्यायीं अति सुगम ॥ कथा रसाळ निरुपम ॥ जो वैष्णवभक्त तुकाराम ॥ त्यासी पुरुषोत्तम पावतील ॥३२॥
त्या कथेची रसउत्पत्ती ॥ वदविता श्रीरुक्मिणीपती ॥ श्रोतयां विनवी महीपती ॥ अवधान चित्तीं असों द्या ॥३३॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ सप्तचत्वारिंशाध्याय रसाळ हा ॥१३४॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥