Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय ४०

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीअनंतकोटिब्रह्मांडनायकाय नमः ॥    
जय जय भक्तवत्सला रुक्मिणीकांता ॥ दीनबंधो अनाथनाथा ॥ निजभक्तांसी सुखदाता ॥ तुजविण सर्वथा असेना ॥१॥
जय जय अनंतअवतारधारिया ॥ कृपासागरा करुणालया ॥ गुणसमुद्रा यादवराया ॥ निरसीं माया भक्तांची ॥२॥
जय विश्वपते विश्वेश्वरा ॥ कैवल्यदानीं अति उदारा ॥ भक्तभूषणा जगदुद्धारा ॥ निजभक्तअंतरा वससी तूं ॥३॥
जय कमलापते कमललोचना ॥ अक्षयरूपा चैतन्यघना ॥ विश्वकर्त्या राजीवनयना ॥ दीनोद्धारणा जगद्गुरो ॥४॥
निजभक्त पडतां संकटीं ॥ सत्वर धांवसी जगजेठी ॥ त्याचें कार्य करिसी उठाउठीं ॥ लज्जा पोटीं न धरितां ॥५॥
तीं आपुलीं सगुणचरित्र ॥ तूंचि वदविलीं राजीवनेत्र ॥ मी तंव उगाचि निमित्तमात्र ॥ बुद्धि स्वतंत्र असेना ॥६॥
मागील अध्यायीं निरूपण ॥ श्रोतीं ऐकिलें प्रीतींकरून ॥ कान्होपात्रेस जगज्जीवन ॥ दिधलें दर्शन निजकृपें ॥७॥
आतां उदार ज्ञानी धैर्यवंत ॥ जो प्रपंचीं असोनि अति विरक्त ॥ तो निजभक्त दामाजीपंत ॥ परिसा चरित्र तयाचें ॥८॥
अविंधराजा होता बेदरीं ॥ एकनिष्ठ करी त्याची चाकरी ॥ संसार मिथ्या जाणोनि अंतरीं ॥ श्रीहरिभजन करीतसे ॥९॥
पंढरीक्षेत्रापासूनि जाण ॥ मंगळवेढें दोन योजन ॥ तेथील राजमहाल ठाण ॥ केलें स्वाधीन तयाच्या ॥१०॥
रायें विश्वासूक जाणून ॥ दास्तान केलें त्याचें स्वाधीन ॥ कुटुंबासहवर्तमान ॥ तेथेंच येऊन राहिला ॥११॥
मध्यान्हकाळीं अभ्यागतांसी ॥ येतां अन्न देतसे त्यांसी ॥ श्रीपांडुरंगचरणीं अहर्निशीं ॥ भाव मानसीं धरियेला ॥१२॥
ऐसें लोटतां दिवस बहुत ॥ तों दुष्काळ पडला अकस्मात ॥ तेणें जीवजंतु समस्त ॥ क्षुधेनें मरत उपवासीं ॥१३॥
मुखामाजी घालोनि होन ॥ प्राणी पावती मृत्युसदन ॥ परी कोठेंही न मिळे अन्न ॥ ऐसा काळ कठिण आलासे ॥१४॥
स्वदेश टाकोनि लोक गेले ॥ कोणी निर्बळ ते ठायींच राहिले ॥ पंढरीक्षेत्रीं अन्न न मिळे ॥ नाहींत मळे क्षेत्र तेथें ॥१५॥
तंव एक ब्राह्मण क्षुधित होऊन ॥ मंगळवेढ्यास आला त्वरेंकरून ॥ म्हणे आजिचा दिवस मिळेल अन्न ॥ इच्छा मनें हे धरिला ॥१६॥
दामाजपितांचिया घरीं ॥ द्विज पातला त्या अवसरीं ॥ विप्रासी देखतांचि झडकरी ॥ नमन करी सद्भावें ॥१७॥
म्हणे स्नान करूनियां त्वरित ॥ प्रसाद घ्यावया यावें येथ ॥ ऐसा आदर देखोनि बहुत ॥ संतोषे चित्त द्विजाचें ॥१८॥
याचकासी नम्र बोलतां वचन ॥ तेणें संतोषे जगज्जीवन ॥ जेवीं बाळकाचें कोड करितां जाण ॥ समाधान मायेसी ॥१९॥
निजपुत्राचा होतां आदर ॥ पिता संतोष मानी थोर ॥ तेवीं याचकपूजनीं करितां आदर ॥ शारंगधर उल्हासे ॥२०॥
गृहस्थासी काळ असला कठिण ॥ द्यावयासी नसे वस्त्र अन्न ॥ तरी नम्र वचन बोलून ॥ करावें नमन आदरें ॥२१॥
भिक्षा द्यावयासी नसली जरी ॥ तरी आवरोनि धरावी श्वानवैखरी ॥ वसवसोनि पाठी लागला तरी ॥ नरकीं अघोरीं पडेल तो ॥२२॥
ऐसी शास्त्रीं बोलिली नीत ॥ हें सर्व जाणे दामाजीपंत ॥ म्हणोनि द्विजाचा आदर बहुत ॥ करी निजप्रीत लावूनि ॥२३॥
स्नान करूनि आला ब्राह्मण ॥ पंक्तीस बसविला सन्मानेंकरून ॥ नानापरींचीं दिव्यान्न ॥ पात्रीं आणोन वाढिलीं ॥२४॥
शेवटीं पंक्तीसी वाढितां घृत ॥ संकल्प सांगे पुरोहित ॥ आपोशन करवी त्वरित ॥ तों देखिलें विपरीत तेधवां ॥२५॥
पंढरीहूनि आला ब्राह्मण ॥ तो तत्काळ करूं लागला रुदन ॥ अश्रु पडती नेत्रांतून ॥ विस्मित मन सकळांचें ॥२६॥
घरधनी पुसे त्याकारण ॥ म्हणे स्वामी हा समय कोण ॥ काय दुःख आठवून ॥ जाहलेति उद्विग्न त्यासाठीं ॥२७॥
ऐकोनि बोले द्विजवर ॥ आजि दिवस लोटले चार ॥ कुटुंबासहित मुलें लेंकरें ॥ राहिलीं साचार उपवासी ॥२८॥
मी निर्दय बहु कठिण भारी ॥ जेवींत बैसलों तुमचें घरीं ॥ पुढें कैसी होईल परी ॥ खेद अंतरीं वाटातो ॥२९॥
दामाजीपंत ऐकूनि वचन ॥ सांगता जाहला द्विजाकारण ॥ एक संवत्सरपर्यंत जाण ॥ पुरवीन अन्न तुम्हांसी ॥३०॥
आतां स्वस्थ करूनि चित्त भोजन ॥ करावें जीं त्वरित ॥ सायंकाळीं धान्य निश्चित ॥ तुमचें गृहांत पाठवीन ॥३१॥
ऐसें ऐकूनि अभयवचन ॥ द्विजासी वाटलें समाधान ॥ जेवीं आयुष्यहीनासी अमृतपान ॥ शचीरमणें पाजिलें ॥३२॥
तैसा संतोष मानूनि चित्तीं ॥ द्विज जेविला यथानिगुतीं ॥ विडा दक्षिणा घेऊनि प्रीतीं ॥ आशीर्वाद देत संतुष्टचित्तें ॥३३॥
मग बोलावूनि निजभूत्यांसी ॥ दामाजीपंत सांगे त्यांसी ॥ दोन खंड्या धान्य द्विजासी ॥ द्यावें पंढरीसी नेऊनी ॥३४॥
ऐसी आज्ञा होतांचि त्वरित ॥ ब्राह्मणासी आनंद वाटला बहुत ॥ म्हणे मज पावला रुक्मिणीकांत ॥ उल्हासयुक्त मानसीं ॥३५॥
मग धान्य घालोनि वृषभांवरी ॥ सत्वर पाठविलें पंढरपुरीं ॥ दृष्टीसी देखोनि नरनारी ॥ पडलीं त्यावरी सकळिक ॥३६॥
गोण्या फोडोनि तत्काळ ॥ धान्य लुटोनि घेतलें सकळ ॥ कोणाचेंही न चाले बळ ॥ उपवासें पीडिले म्हणूनि ॥३७॥
जयासी दिधलें होतें धान्य ॥ तो रुदन करूं लागला ब्राह्मण ॥ म्हणे माझें धान्य घ्यावया लुटोन ॥ तुम्ही कोण होतसां ॥३८॥
जैसें कृषीवलाचें पिकलें शेत ॥ त्यावरी टोळ पडती बहुत ॥ मग तो जैसा तळमळ करीत ॥ तैसेंचि जाहलें तयासी ॥३९॥
पंढरीचे सकळ ब्राह्मण ॥ तयासी पुसती वर्तमान ॥ कोठोनि आणिलें होतें धान्य ॥ आम्हांकारण सांगिजे ॥४०॥
तो म्हणे दामाजीपंत ॥ उदार ज्ञानी धैर्यवंत ॥ त्यानें कृपा करूनि मातें ॥ अन्न होतें दीधलें ॥४१॥
देवें दिधलें कर्में नेलें ॥ तैसेंचि मजला घडोनि आलें ॥ कुटुंबाचें प्राक्तन फुटलें ॥ धान्य लुटिलें सकळिकीं ॥४२॥
ऐसी ऐकोनियां मात ॥ सकळ ब्राह्मण निघाले त्वरित ॥ दामाजीपंताचें मंदिरांत ॥ आले समस्त तेधवां ॥४३॥
ब्राह्मण देखतांचि दृष्टीसी ॥ नमस्कार केला सद्भावेंसी ॥ द्विज आशीर्वाद देती त्यासी ॥ कल्याण तुम्हांसी असावें ॥४४॥
म्हणती दुष्काळ पडिला कठिण ॥ तुम्हीं ब्राह्मणासी दिधलें अन्न ॥ तो वृत्तांत श्रवणीं ऐकून ॥ आलों धांवून सकळिक ॥४५॥
तूं धैर्यवंत अति उदार ॥ चित्तीं नाहीं सान थोर ॥ अन्नदानीं पात्रविचार ॥ तुज साचार असेना ॥४६॥
गगनी उगवला नारायण ॥ तो प्रकाश करी सर्वां समान ॥ तवी तूं करितां अन्नदान ॥ थोर साने न म्हणसी ॥४७॥
आम्ही क्षेत्रवासी ब्राह्मण ॥ उपवासीं मरतों अन्नाविण ॥ तुझी कीर्ति कानी ऐकून ॥ आलों धांवून या ठाया ॥४८॥
ऐकून द्विजवरांची मात ॥ करुणा उपजली मनांट ॥ मग अभय देऊनि दामाजीपंत ॥ विप्र समस्त बैसविले ॥४९॥
मग सदनीं जाऊन कांतेपासीं ॥ विचार पुसे तियेसी ॥ अन्नावांचूनि पंढरीसीं ॥ मरती उपवासी द्विजवर ॥५०॥
ते सकळ गोळा होऊनि जाण ॥ आपुल्या घरासी आले ब्राह्मण ॥ नाहीं म्हणतां त्यांजकारण ॥ सत्वासी हान होईल कीं ॥५१॥
सकळ संतुष्ट करावयासी ॥ धान्य तों नाहीं आपणापासीं ॥ म्हणोनि विचार पडिला मानसीं ॥ काय ऐसियासी करावें ॥५२॥
एकास धान्य जें दिधलें ॥ तें सकळीं त्याचें हिरूनि नेलें ॥ दुष्काळानें लोक पीडिले ॥ टाकूनि गेले स्वदेश ॥५३॥
कांता बोले तयाप्रती ॥ जैसी तुम्हांसी सुचेल युक्ती ॥ तैसेंच करूनि यथानिगुतीं ॥ द्विजांप्रति तोषवावें ॥५४॥
म्हणे राजधान्याचीं अंबरें दोन ॥ आपणापासीं आहेत जाण ॥ तीं द्विजांहातीं लुटवून ॥ वांचवावे प्राण सकळांचे ॥५५॥
रायासी कळतां वर्तमान ॥ तरी कोपोन घेईल माझा प्राण ॥ एका जीवासी येतां मरण ॥ क्षेत्रीचे ब्राह्मण वांचतील ॥५६॥
म्यां एकल्यानें देहलोभ धरिला ॥ तरी मृत्यु येईल सकळांला ॥ ऐसा चित्तीं विचार केला ॥ मग बाहेर आला सत्वरी ॥५७॥
धान्यअंबरें उघडोनि त्वरित ॥ द्विजांसी म्हणे दामाजीपंत ॥ जयासी धान्य जितुकें लागत ॥ न्यावें तितुकें सदनासी ॥५८॥
ऐसें ऐकोनि उदार वचन ॥ आशीर्वाद देती सकळ ब्राह्मण ॥ श्रीरुक्मिणीपती तुम्हांकारण ॥ करो कल्याण सर्वदा ॥५९॥
समस्त द्विजवर जाऊनि त्वरित ॥ धान्य लुटिलें अपरिमित ॥ हा पंढरींत कळतां वृत्तांत ॥ लोक समस्त पातले ॥६०॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण ॥ वाणी वटाव अनाथ दीन ॥ मंगळवेढ्यासी येऊन ॥ धान्य घेऊन जाताती ॥६१॥
सुतार चर्मक नाना याती ॥ कुलाल नापित हीनमती ॥ दामाजीपंताची ऐकूनी कीर्ती ॥ धान्य नेती सकळिक ॥६२॥
गवंडी गवळी पाथववट जाण ॥ कोळी तांबट बागवान ॥ मंगळवेढियांत सत्वर येऊन ॥ नेती धान्य स्वइच्छा ॥६३॥
गुर्जर रंगारी खाराईत ॥ अनुष्ठानी आणि संत महंत ॥ म्हणती आम्हांस तुष्टला रुक्मिणीकांत ॥ याच्या हृदयांत रिधोनियां ॥६४॥
शिंपी रजक बेलदार ॥ आणिक वर्णयाती अपार ॥ अंत्यजादिक हीन नर ॥ धान्य अपार ते नेती ॥६५॥
श्रोते आशंका धरितील कांहीं ॥ कीं सकळ याती एके ठायीं ॥ आणावयासी कारण कायी ॥ उंचनीच नाहीं निवडिले ॥६६॥
तरी पंढरीक्षेत्रीं राहती ॥ ते सारिखेच मानावे निश्चितीं ॥ पुरातन अभंगीं बोलिलें संतीं ॥ संशय चित्तीं न धरावा ॥६७॥
नव लक्ष जलचरें सागरापोटीं ॥ परी त्याची सकळांवरी सारिखी दृष्टी ॥ तेवीं सकळ यातींस कृपादृष्टीं ॥ पाहे जगजेठी सारिखें ॥६८॥
कीं दश लक्ष पक्षियांच्या जाती ॥ तितुक्या आकाशांत हिंडती ॥ तेवीं सकळ यातींसी रुक्मिणीपती ॥ सारिखें चित्तीं लेखीत ॥६९॥
नातरी वीस लक्ष स्थावरांकुर ॥ वसुधेसी सारिखे निरंतर ॥ तेवीं पतितपावन दीनोद्धार ॥ लेखी चराचर सारिखें ॥७०॥
जयांसी पूर्ण आत्मज्ञान ॥ तेचि जाण सिद्धांतखूण ॥ ते दृष्टीसी पाहूनि सकळ वर्ण ॥ थोर सान न म्हणती ॥७१॥
हे उत्तम भक्तांची निजस्थिती ॥ जाणीतली दामाजीपंतीं ॥ म्हणवूनि अन्न सर्वांभूतीं ॥ वांटी निजप्रीतीकरूनि ॥७२॥
अनाथ दुर्बळ अति दीन ॥ त्यांचे दुष्काळीं वांचविले प्राण ॥ परी मज घडलें अन्नदान ॥ नव्हेचि आठवण चित्तांत ॥७३॥
एकासी एक सांगती मात ॥ कीर्ति प्रकटली स्वदेशांत ॥ कृपण नर जे का प्रपंचांत ॥ ते ऐकूनि चित्तांत जळती कीं ॥७४॥
म्हणती राजयाचें धान्य वांटिलें ॥ त्याच्या पदरचें काय गेलें ॥ कायाकष्टें मेळवूनि भलें ॥ नाहीं वांटिलें तयानें ॥७५॥
एक म्हणती टाकूनि आपुला धंदा ॥ व्यर्थ कां करितां त्याची निंदा ॥ राजयासी कळतां भरेल क्रोधा ॥ करील आपदा बहु त्याची ॥७६॥
कायाकष्टाचें वांटावें धन ॥ त्यापरीस अघटित केलें तयान ॥ अविंधासी कळल्या वर्तमान ॥ घेईल प्राण तयाचे ॥७७॥
ऐसी परस्परें मात ॥ आपुल्या घरीं लोक बोलत ॥ परी दामाजीपंत आनंदयुक्त ॥ हर्षशोकांत पडेना ॥७८॥
एक मासपर्यंत जाण ॥ धान्य नेती याचकजन ॥ तों पुढें ओढवलें महाविघ्न ॥ तेंचि परिसा सज्जन भाविक हो ॥७९॥
मुजुमदार कानडा ब्राह्मण ॥ विष्णुद्रोही होता दुर्जन ॥ त्यानें बेदरीं वर्तमान ॥ रायासी लिहून पाठविलें ॥८०॥
म्हणे राजाधिराजा नगराधिपती ॥ परिसावी सेवकाची विनंती ॥ तुमचें धान्य दामाजीपंतीं ॥ विप्रांहातीं लुटविलें ॥८१॥
मी तुमचा म्हणवितों अंकित ॥ सेवेसी निवेदन केली मात ॥ ऐसा सर्व लिहूनि वृत्तांत ॥ बेदरीं त्वरित पाठविला ॥८२॥
पत्र ऐकतांचि श्रवणीं ॥ अविंधराजा संतप्त मनीं ॥ जेवीं घृतें शिंपितां अग्नी ॥ प्रदीप्त गगनीं होय जैसा ॥८३॥
कीं वारणासी मद्य पाजितां सत्वर ॥ तो पाडूं पाहे भलतेंचि मंदिर ॥ तेवीं वृत्तांत नृपवर ॥ ऐकोनि विचार करीना ॥८४॥
म्हणे माझी आज्ञा नाहीं घेतली ॥ आणि धान्यअंबरें कैसीं वांटिलीं ॥ मग दूत पाठवूनि ते काळीं ॥ तलब केली सक्रोध ॥८५॥
दुर्बुद्धि धरिली मनांत ॥ हजूर बोलावूनि दामाजीपंत ॥ शिक्षा करूनियां निश्चित ॥ शिरच्छेद त्वरित करावा ॥८६॥
मंगळवेढ्यासी येऊनि दूत ॥ आज्ञापात्र दाखविती त्वरित ॥ ग्रामवासी लोक समस्त ॥ चिंताक्रांत मानसीं ॥८७॥
म्हणती अन्याय केला थोर ॥ येणें लुटविलीं धान्यअंबरें ॥ म्हणोनि आले राजकिंकर ॥ बेदरीं सत्वर न्यावया ॥८८॥
पत्र वाचितांचि त्वरित ॥ चित्तीं उमजला दामाजीपंत ॥ म्हणे मज अन्याय घडला बहुत ॥ आतां कासया खंत करावी ॥८९॥
दूत पाठविले न्यावयासी ॥ दामाजीपंत म्हणे त्यांसी ॥ बेदरीं जातां पंढरीसी ॥ रुक्मिणीकांतासी भेटावें ॥९०॥
ऐसें म्हणूनि त्या अवसरा ॥ सत्वर आले पंढरपुरा ॥ स्नान करूनि भीमातीरा ॥ महाद्वारा चालिला ॥९१॥
गरुडपारीं लोटांगण ॥ घालोनि केलें पुढें गमन ॥ मग शेजारमंडपीं येऊन ॥ केलें नमन साष्टांग ॥९२॥
वरतें पाहातांचि सत्वरीं ॥ तों परब्रह्म देखिलें विटेवरी ॥ जो अनाथनाथ भक्तकैवारी ॥ विश्वोद्धारी जगद्गुरु ॥९३॥
श्रीमुख साजिरें अति सुंदर ॥ दिव्य कुंडलें मकराकार ॥ कंठीं कौस्तुभ पुष्पहार ॥ कांसे पीतांबर वेष्टिला ॥९४॥
सम चरण कर कटीं ॥ नासाग्रीं ठेविली असे दृष्टी ॥ ऐसा देखोनि जगजेठी ॥ संतोष पोटीं वाटला ॥९५॥
सप्रेम देऊनि आलिंगन ॥ मग सद्भावें धरिले दोनी चरण ॥ मागुती स्वरूप न्याहाळून ॥ कर जोडोनि विनवित ॥९६॥
म्हणे देवाधिदेवा रुक्मिणीकांता ॥ शेवटील भेटी हेचि आतां ॥ लोभ न सांडावा सर्वथा ॥ चरणीं माथा ठेविला ॥९७॥
मी अन्याय आचरलों प्रसिद्ध ॥ रायें अंतरीं धरिला क्रोध ॥ आतां करावया शिरच्छेद ॥ पाठविले दूत न्यावया ॥९८॥
परी जन्मोनि सार्थक जाहलें पाहें ॥ शेवटीं देखिले तुझे पाये ॥ ऐसें बोलोनि लवलाहें ॥ सद्गदित पैं जाहला ॥९९॥
गहिंवरें कंठ दाटला जाण ॥ आसुवें भरले दोनी नयन ॥ मागुती स्वरूप न्याहाळून ॥ आज्ञा मागे दामाजी ॥१००॥
ऐसें ऐकूनि वचन ॥ दूत म्हणती चला त्वरेन ॥ उशीर न करावा म्हणून ॥ जरूर जाणें असे पैं ॥१॥
मग सत्यभामा राधा रुक्मिण ॥ यांसी साष्टांगें केलें नमन ॥ गरुड हनुमंत वंदोन ॥ सत्वर तेथोन चालिला ॥२॥
क्षेत्रवासी लोक समस्त ॥ एकमेकांसी बोलत ॥ कैसें करील पंढरीनाथ ॥ न कळे निश्चित कोणासी ॥३॥
सव्य घालोनि पंढरपुर ॥ दामाजीपंत गेला सत्वर ॥ संकट देखोनि रुक्मिणीवर ॥ काय करिते जाहले ॥४॥
म्हणे मजवरी त्याणें घालून भार ॥ लुटविलें धान्याचें अंबर ॥ आतां राजा सक्रोध होऊन थोर ॥ नेतो सत्वर मारावया ॥५॥
तरी मी भक्तकैवारी जाण ॥ ऐसें बोलती शास्त्रें पुराण ॥ आतां न करितां त्याचें धांवण ॥ येईल उणेपण आपणासी ॥६॥
ऐसें विचारूनि मनीं ॥ काय करी मोक्षदानी ॥ धान्याची गणना करूनी ॥ द्रव्य ते क्षणीं घेतलें ॥७॥
ऐसें बोलोनि पंढरीश ॥ तत्काळ धरिला अंत्यजवेष ॥ भक्तकाजासी जगन्निवास ॥ धरी उल्हास सप्रेम ॥८॥
दामाजीपंताचें हस्ताक्षर ॥ राजासी अर्जी लिहिली सत्वर ॥ आपण होऊनि पाडेवार ॥ चालिले सत्वर बेदरा ॥९॥
फाटक्या चिंध्या रुक्मिणीकांत ॥ मस्तकीं बांधोनियां त्वरित ॥ कंठीं घालूनि काळें सूत ॥ पगर कानांत घातले ॥११०॥
कांसेसी बांधोनी लंगोटी ॥ हातीं सत्वर घेतली काठी ॥ रुक्मिणी म्हणे जगजेठी ॥ काय गोष्टी योजिली ॥११॥
मग म्हणे वैकुंठनाथ ॥ दामाजी माझा निजभक्त ॥ त्यासी मारावया निश्चित ॥ बेदरीं त्वरित नेलें कीं ॥१२॥
त्याचें करावया काज ॥ अनामिक मी जाहलों आज ॥ भक्तांसी संकट पडतां मज ॥ नये लाज सर्वथा ॥१३॥
द्रव्यपोतें घेउनि सत्वर ॥ तयावरी केली राजमोहोर ॥ अति लगबगें शारंगधर ॥ प्रकटले बेदरपट्टणीं ॥१४॥
द्वारपाळांसी जगज्जीवन ॥ सांगते जाहले वर्तमान ॥ मी आलों मंगळवेढ्याहून ॥ करा निवेदन ॥ धन्यासी ॥१५॥
राजाज्ञा घेऊनि त्वरित ॥ द्वारपाळीं नेला आंत ॥ जोहार करी पंढरीनाथ ॥ नवल अद्भुत वाटलें ॥१६॥
श्रुतिशास्त्रें वर्णिती गुण ॥ त्यांसी न कळे ज्याचें महिमान ॥ तो खालीं करूनि मान ॥ जोहार म्हणून बोलत ॥१७॥
अठ्ठ्यायशीं सहस्र ऋषि अमूप ॥ जयाचे प्राप्तीसी करिती तप ॥ तो अविंधासीं म्हणे मायबाप ॥ येतां अभिशाप भक्तासी ॥१८॥
वजीर पुसती त्याकारणें ॥ कोठूनि नाईक जाहलें येणें ॥ ऐसें ऐकोनि मनमोहनें ॥ बोलिलें वचन तें ऐका ॥१९॥
म्हणे मी मंगळवेढियाचा ॥ राबता महार दामाजीचा ॥ खानजाद त्याच्या घरचा ॥ गुलाम साचा म्हणवितों ॥१२०॥
म्हणाल क्षीरसागरीं शेषशायीं ॥ तो नीचशब्द बोलेल कायी ॥ तरी येचिविषयीं आपुले ठायीं ॥ विकल्प कांहीं न धरावा ॥२१॥
नंदाच्या गायी राखोनि जाणा ॥ गुराखी प्रसिद्ध म्हणवी आपणा ॥ धर्माघरीं यादवराणा ॥ उच्छिष्टें काढी प्रीतीनें ॥२२॥
अर्जुनाचा होऊनि सारथी ॥ घोडीं धुतलीं चहूं हातीं ॥ तो खानजाद म्हणतां रुक्मिणीपती ॥ संकोच चित्तीं धरीना ॥२३॥
नांव पुसतां तये वेळां ॥ म्हणे मी विठोनाईक लेंकुरवाळा ॥ ऐसें बोलोनि घनसांवळा ॥ कागद टाकिला त्यापुढें ॥२४॥
अक्षर ओळखितां त्यांसी ॥ यथार्थ वाटलें अवघियांसी ॥ अर्जदास्त वाचूनि राजयासी ॥ दाविते झाले तेधवां ॥२५॥
दृष्टीसी पत्र देखोन ॥ राजा करी आवडीं श्रवण ॥ म्हणे अन्याय केला असतां जाण ॥ काय लिहून पाठविलें ॥२६॥
पत्र लिहिलें ऐशा रीतीं ॥ म्हणे राजाधिराज भूपती सेवेसी दामाजीपंत विनंती ॥ तुम्हांप्रती करीतसे ॥२७॥
दुष्काळ पडिला स्वदेशांट ॥ अन्न महर्घ झालें बहुत ॥ सातशें खंडी धान्य त्वरित ॥ तुमच्या स्वहितार्थ विकलें कीं ॥२८॥
एका रुपयावरी जाण ॥ निरख पायली होती धारण ॥ तें सर्वही द्रव्य पोतें भरून ॥ सेवेसी पाठवून दीधलें ॥२९॥
विठोनाईक राबता आमुचा ॥ कुलअखत्यार आहे घरींचा ॥ हिशोब द्रव्य देईल साचा ॥ जाब पावल्याचा देइंजे ॥१३०॥
ऐसें पत्र ऐकोनि जाणा ॥ असत्य वाटलें सकलां जणां ॥ खलेती लहान देखोनि नयना ॥ संशय मना वाटतसे ॥३१॥
हिशेब पाहतां सकळांसी ॥ जाऊनि सांगती रायासी ॥ अडुसष्ट सहस्र एक लक्षासी ॥ गणती द्रव्यासी पाहिजे ॥३२॥
पोतें फोडोनि जंव पाहात ॥ तंव तें भरलें अगणित ॥ मोजणारांचे शिणले हात ॥ राजा विस्मित अंतरीं ॥३३॥
जैशा वाळूंतील विहिरी जाण ॥ पाणी भरतां न सरे त्यांतून ॥ तैसेंचि लाघव जगज्जीवन ॥ दावी करून तयांसी ॥३४॥
परी उमज न पडे कोणाप्रती ॥ मायालोभें घातली भ्रांती ॥ ते राजयाचें दैव वानिती ॥ सभाग्य म्हणती तयासी ॥३५॥
द्रव्य न सरेचि अपरिमित ॥ मग पोतें टाकिलें भांडारांत ॥ म्हणती धन्य दामाजीपंत ॥ आपुलें स्वहित जाणतो ॥३६॥
मुजुमदारची ऐकूनि बोली ॥ म्यां व्यर्थचि त्याजला तलब केली ॥ जैसीं रजकांचीं खरें भुललीं ॥ म्हणूनि दवडिली कामधेनु ॥३७॥
तंव अंगणीं बोले शारंगधर ॥ पावल्याचा जाब द्यावा सत्वर ॥ मंगळवेढें बहुत दूर ॥ होईल उशीर जावया ॥३८॥
दामाजीपंतासी पत्र लिहिले ॥ धान्याचें सकळ द्रव्य पावलें ॥ मुजुमदारासी धरूनि वहिलें ॥ बंदी घातलें पाहिजे ॥३९॥
पत्र वाचितांचि तत्काळ ॥ हक्क बुडवावा त्याचा सकळ ॥ मंगळवेड्यांत चिरकाळ ॥ अखंद तुम्ही असावें ॥१४०॥
विठो नाइकासी वस्त्रें देऊन ॥ रायें गौरविला सन्मानेंकरून ॥ हें देखोनि जगज्जीवन ॥ आशीर्वचन बोलती ॥४१॥
तुम्हांसी हयात व्हावी धनिया ॥ उदंड यावी दौलत दुनिया ॥ पुढती मुजरा करूनियां ॥ पत्र मागोनियां घेतलें ॥४२॥
दामाजीपंतासी वस्त्रें भूषणें ॥ रायें दिधलीं संतुष्टमनें ॥ शिबिका गज रथ आभरणें ॥ दूतांहातीं पाठविलीं ॥४३॥
त्यांसवेंचि जगज्जीवन ॥ चालिले मंगळवेढियालागून ॥ हें दामाजीपंतास वर्तमान ॥ कळलें नाहीं सर्वथा ॥४४॥
तयासी बेदरीं येतां देख ॥ वाटेसी पडली चुकामुक ॥ तो मायालाघवी वैकुंठनायक ॥ लीला भक्तांसी दावितसे ॥४५॥
तया दामाजीपंतासी त्वरित ॥ राजदूत आणिती बेदरांत ॥ राजयासी कळला वृत्तांत ॥ तो सामोरा येत तयासी ॥४६॥
दृष्टादृष्टि होतांचि जाण ॥ नृपवर देतसे आलिंगन ॥ म्हणे काल विठो महार येऊन ॥ रसद भरून दिधली कीं ॥४७॥
वस्त्रें भूषणें तयाहातीं ॥ तुम्हांस पाठविलीं निजप्रीतीं ॥ आम्हीं कानड्याची ऐकोनि कुमती ॥ राग चित्तीं आणिला ॥४८॥
बोलावणें पाठवितां देख ॥ तों कालचि आला विठो नाईक ॥ त्याणें वृत्तांत सकळिक ॥ आम्हांसी देख सांगितला ॥४९॥
तुमचें हातींचें हस्ताक्षर ॥ पत्र आणिलें जी साचार ॥ द्रव्य देऊन अपार ॥ आपण सत्वर गेला कीं ॥१५०॥
वचन ऐकोनि दामाजीपंत ॥ आश्चर्य करी मनांत ॥ मग म्हणे शिणला पंढरीनाथ ॥ माझा आघात चुकवावया ॥५१॥
जो निर्गुण निर्विकार ॥ निष्काम निरुपम साचार ॥ तेणें अंत्यजरूप लक्ष्मीपती ॥ माथां द्रव्यभार वाहिला ॥५२॥
ज्याच्या मुकुटाची पहतां दीप्ती ॥ कोटि सूर्य लोपोनि जाती ॥ तो पुराणपुरुष लक्ष्मीपती ॥ बांधी चिंधोटी मस्तकीं ॥५३॥
कुंडलें टाकूनि मकराकार ॥ कानीं घातले असतील पगर ॥ कौस्तुभमणि अति सुंदर ॥ साम्डोनि दोर कां ल्याला ॥५४॥
शंख चक्र टाओनि जगजेठी ॥ हातीं घेतली असेल काठी ॥ पीतांबर सोडोनि उठाउठीं ॥ नेसला लंगोटी मजसाठीं ॥५५॥
वाळे नेपुरें सांडोनि चरणा ॥ ल्याला असेल फाटाक्या वाहणा ॥ आग लागो माझिया जीवपणा जगज्जीवना कष्टविलें ॥५६॥
ऐसें बोलोनि दामाजीपंत ॥ झाला कंठीं सद्गदित ॥ प्रेमें अश्रु नयनीं लोटात ॥ तो आनंद न वर्णवे ॥५७॥
रायासमवेत सकळ जन ॥ आश्चर्य करिती मनांतून ॥ म्हणती अंत्यज नव्हे तो रुक्मिणीरमण ॥ अनुभवें खूण कळतसे ॥५८॥
तो जरी मानवी असता नर ॥ तरे कैसा वागविता इतका भार ॥ एक लष अडसष्ट सहस्र ॥ द्रव्य मोलून घतलें ॥५९॥
तरी न्यून नव्हे पोत ॥ मोजणारांचे शिणले हात ॥ मग भांडारगृहीं ते त्वरित ॥ टाकिलें असे अद्यापि ॥१६०॥
ऐसें बोलतां सकळांपती ॥ विवेकें अनुताप जाहला चित्तीं ॥ म्हणे जेणें शिणला रुक्मिणीपती ॥ तें कर्म मगुती करींना ॥६१॥
कानीं घालितां तुटती कान ॥ तें कासया पाहिजे कांचन ॥ जेणें शिणला जगज्जीवन ॥ तें कर्म परतोन न करीं मी ॥६२॥
मग रायासी म्हणे ते अवसरीं ॥ आतां पुरे तुमची चाकरी ॥ आम्हांसी निरोप द्यावा सत्वरी ॥ पंढरपुरीं रायावया ॥६३॥
राजा म्हणे तयालागूनी ॥ तुमचा देवचि झाला ऋणी ॥ तुमचेनि योगें आम्हांलागूनी ॥ चक्रपाणी भेटले ॥६४॥
असो इकडे शारंगधर ॥ मंगळवेढियासी गेले सत्वर ॥ घरीं सांगोनि समाचार ॥ अदृश्य झाले तेधवां ॥६५॥
राजसेवा टाकूनि त्वरित ॥ पंढरीसी आला दामाजीपंत ॥ कंठीं होऊनि सद्गदित ॥ आलिंगन देत देवासी ॥६६॥
म्हणे पतितपावना रुक्मिणीकांता ॥ दीनबंधो पंढरीनाथा ॥ माझिया अपराधांची गणिता ॥ नव्हे सर्वथा कोणासी ॥६७॥
तूं सनकादिकांसी पूज्यमान ॥ शिवादिक वंदिती तुझे चरण ॥ तो तूं अनामिक होऊन ॥ माझा प्राण रक्षिला ॥६८॥
तूं विरंचीचा जनिता ॥ पवित्र गंगेचा आहेसी पिता ॥ मजकारणें जगन्नाथा ॥ अंत्यज वृथा झालासी ॥६९॥
विठोनाईक नामाभिधान ॥ तुझें ठेवणार होता कोण ॥ घरचा लेंकवळा म्हणोन ॥ आलासी सांगून रायासी ॥१७०॥
ऐसें म्हणोनि तये क्षणीं ॥ सप्रेम लोटले अश्रु नयनीं ॥ स्वरूप दृष्टीं न्याहाळूनी ॥ मस्तक चरणीं ठेविला ॥७१॥
कुटुंबासहित पंढरींत ॥ निश्चल राहिला दामाजीपंत ॥ कीर्तनीं होऊनि प्रेमभरित ॥ गुण वर्णीत हरीचे ॥७२॥
क्षेत्रवासी लोक बोलती ॥ म्हणती धन्य धन्य याची भक्ती ॥ ऋणी केला रुक्मिणीपती ॥ वाढविली कीर्ति अद्भुत ॥७३॥
अघटित करूनि दाविली करणी ॥ म्हणोनि तुष्टला चक्रपाणी ॥ ऐसें आपआपुलें सदनीं ॥ लोक बोलती परस्परें ॥७४॥
पुढिले अध्यायीं कथानक ॥ मृत्युंजयचरित्र अलोलिक ॥ आवडीनें परिसा भाविक ॥ सौख्यदायक सर्वांसी ॥७५॥
जरी भावार्थ नसला चित्तीं ॥ तरी नादलुब्धही पावन होती ॥ किंवा चकोरासी अमृत लाधतां निश्चितीं ॥ प्रकाश देखती सर्वत्र ॥७६॥
म्हणोनि आबालवृद्ध सकळांप्रती ॥ प्रार्थीतसे महीपती ॥ अंतरीं लावूनियां प्रीती ॥ रुक्मिणीपती भजावा ॥७७॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ चत्वारिंशाध्याय रसाळ हा ॥१७८॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
श्रीभक्तविजय चत्वारिंशाध्याय समाप्त

श्री भक्तविजय

Shivam
Chapters
॥ मंगलाचरणम् ॥ आरती श्रीविठ्ठलाची, प्रार्थना - आरती श्रीविठ्ठलाची युगें ... अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७