Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय ५०

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीप्रलंबासुरमर्दनाय नमः ॥    
जय जय कृपासागरीं चक्रपाणी ॥ भवभंजना ॥ मज कृपादृष्टीं विलोकुनी ॥ कर्मापासूनि सोडवावें ॥१॥
आशापाश तोडूनि श्रीपती ॥ करीं निरपेक्ष उदासवृत्ती ॥ तुझें भजनीं लागे प्रीती ॥ ऐसें श्रीपति करावें ॥२॥
कामक्रोधादि मद मत्सर ॥ देहीं उठती अनिवार ॥ तूं कृपा करिसी जैं शारंगधर ॥ शुद्ध अंतर तैं होय ॥३॥
लौकिक प्रतिष्ठा मानाभिमान ॥ हें पुढें ओढवलें महाविघ्न ॥ तेथेंचि लावूनियां मन ॥ तुझें चिंतन घडेना ॥४॥
ऐसे अवगुण असोनि अंतरीं ॥ मी तुझा म्हणवितों लोकाचारी ॥ हाचि अभिमान धरूनि श्रीहरी ॥ मज उद्धरीं पतितासी ॥५॥
चंचळ मन हें अनिवार ॥ तुझे चरणीं असावें स्थिर ॥ हेंचि इच्छितों निरंतर ॥ जाणसी अंतर पांडुरंगा ॥६॥
हस्त इच्छिती तुझें अर्चन ॥ षोडशोपचारें करावें पूजन ॥ त्यांचें करावें समाधान ॥ मनोरथ पूर्ण करावे ॥७॥
समदृष्टींनें चराचर भूतीं ॥ तुजचि पाहावें वैकुंठपती ॥ विकल्प द्वेष हे नये चित्तीं ॥ ऐसें श्रीपति करावें ॥८॥
चरणांचें सार्थक तरीच जाण ॥ तुझे यात्रेस करावें गमन ॥ नृत्य करावें निर्लज्ज होऊन ॥ देहाभिमान टाकोनी ॥९॥
तुझे निजभक्त रुक्मिणीपती ॥ त्यांचीच मुखें वर्णावी कीर्ती ॥ हे इच्छा धरूनि चित्तीं ॥ विनवितों तुजप्रति दयाळा ॥१०॥
हे म्यां अघटित घेतली आळ ॥ तूं निरूपण वदवीं रसाळ ॥ जें श्रवणीं पडतांचि तत्काळ ॥ श्रोते प्रेमळ संतोषती ॥११॥
मागील अध्यायीं शेवटी कथा ॥ देउळीं गेली तुकयाची कांता ॥ प्रसन्न होऊनि रुक्मिणीमाता ॥ बोलिली अवचितां निजभाग्यें ॥१२॥
साडी चोळी मुष्टीभरी होन ॥ देतांचि वाटलें समाधान ॥ पाषाणमूर्ति बोलिली वचन ॥ हें अघटित देखोन विस्मित ॥१३॥
परिधान करूनि दिव्यांबर ॥ रुक्मिणीस केला नमस्कार ॥ बाहेर येतांचि सत्वर ॥ कळलें साचार तुकयासी ॥१४॥
मग कांतेसी काय वचन बोलत ॥ तुवा उतावेळ केलें चित्त ॥ तेणें अंतरलें परमार्थहित ॥ ऐक ते मात निजकर्णीं ॥१५॥
उभेंचि शेत मोडितां जाण ॥ पुढें राशीस येतसे उणेपण ॥ कीं दुधावरील साय भक्षितां जाण ॥ मग नवनीत कोठून येईल ॥१६॥
नातरी ऊंस उभाचि चोखिला सारा ॥ तरी कोठून लाभेल शर्करा ॥ ऐसा विवेक करूनि अंतरा ॥ होन द्विजवरां वांटावे ॥१७॥
कांचमणीचा त्याग करितां ॥ मुक्ताफळ येतसे हाता ॥ तरी धीर धरून निजचित्ता ॥ उदास आतां त्वां व्हावें ॥१८॥
खद्योत त्यागितां मनांतूनी ॥ गृहासी येतसे वासरमणी ॥ कीं थिल्लर टाकितां डावलोनी ॥ पयोब्धि येऊनि भेटेल ॥१९॥
गुंजाहार न लेतां वाडेंकोडें ॥ तरी अनर्घ्य रत्नें लाधती पुढें ॥ कीं न धरितां औषधाची चाड ॥ तरी सुधारस गोड लागेल कीं ॥२०॥
न करितां सिद्धीचा आदरू ॥ तरी निजभाग्यें भेटतो कल्पतरू ॥ दुर्जनत्यागें भेटती सद्गुरू ॥ तरी कां न अव्हेरू करावा ॥२१॥
तेवीं ऋद्धि सिद्धि संपत्ति धन ॥ त्यांस त्यागितां मनांतून ॥ तरी तूं पावसी सायुज्यसदन ॥ जें इच्छिती सुरगण मानसीं ॥२२॥
ऐसीं ऐकोनि दृष्टांतवचनें ॥ कांता पावली समाधान ॥ तत्काळ विप्र बोलावून ॥ वांटिले होन तयांसी ॥२३॥
सांडोनि लोभ ममता ॥ हृदयीं आठवी श्रीपंढरीनाथा ॥ पुढें वर्तली अपूर्व कथा ॥ ते सावधानता ऐकावी ॥२४॥
तुकयाची प्रशंसा जाहली फार ॥ मानूं लागले थोरथोर ॥ कीं याजसवें जेवितो रुक्मिणीवर ॥ लोक परस्पर बोलती ॥२५॥
हें चिंचवडीं देवासी कळतां जाण ॥ असह्य जाहलें त्यांजकारण ॥ म्हणती आम्ही प्रतिष्ठित ब्राह्मण ॥ गणपति प्रसन्न केला कीं ॥२६॥
आणि तुकया जातीचा शूद्रवाणी ॥ त्यासवें जेवितो चक्रपाणी ॥ हे तंव अघटि असे करणी ॥ आली दिसोनि यथार्थ ॥२७॥
तरी तयासी बोलावूनि येथ ॥ दृष्टीस पाहावी कांहीं प्रचीत ॥ ऐसें विचारिलें चित्तांत ॥ तो कळला वृत्तांत तुकयाची ॥२८॥
म्हणे चिंचवडींचे थोर ब्राह्मण ॥ त्यांनीं केलें आपुलें स्मरण ॥ तरी आतां तेथवरी जाऊन ॥ घ्यावें दर्शन तयांचें ॥२९॥
ऐसी कल्पना धरूनि पोटीं ॥ सत्वर निघाला उठाउठीं ॥ मग मूषकवाहनाची घेऊन भेटी ॥ बैसले निकटीं देवांचे ॥३०॥
तुकयासी देखोनियां त्यांनीं ॥ म्हणती इच्छित होतों जें मनीं ॥ तें अनायासें आलें घडोनि ॥ चमत्कार नयनीं पाहावा ॥३१॥
तों सहज पातला मध्यान्हकाळ ॥ पंक्तीसी बैसले ब्राह्मण सकळ ॥ तुकयासी पात्र ते वेळ ॥ वाढिलें तत्काळ तयांनीं ॥३२॥
देवांसी म्हणे वैष्णवभक्त ॥ आमुचा सांगाती पंढरीनाथ ॥ तो भोजनासी येईल येथ ॥ तरी आणिक पात्र मांडावें ॥३३॥
आणखी तुम्हींही प्रार्थूनि गजवदनासी ॥ येथें आणावें भोजनासी ॥ वचन ऐकतांचि मानसीं ॥ आश्चर्य देवांसी वाटलें ॥३४॥
म्हणती हें तों अघटित जाहलें ॥ आमुचे मंत्र आम्हांसी फळलें ॥ मग देव्हारां जाऊनि ते वेळे ॥ करकमळ जोडिले तयासी ॥३५॥
नानापरींची केली स्तुती ॥ परी भोजनासी न येचि गणपती ॥ काय कराव्या शास्त्रयुक्ती ॥ एक सद्भक्ती नसतांचि ॥३६॥
बाह्यात्कारें केलें पूजन ॥ अंतरीं विकल्पें भरलें मन ॥ तरी कोणतेंही दैवत नव्हे प्रसन्न ॥ दुश्चित मन असतां पैं ॥३७॥
गजेंद्रासी पावला वैकुंठपती ॥ तो काय जाणे शास्त्रव्युत्पत्ती ॥ गोपी उद्धरल्या नेणों किती ॥ सप्रेमभक्ति देखोनी ॥३८॥
विधियुक्त याज्ञिक कर्मठपण ॥ त्यांसी अंतरले श्रीकृष्णचरण ॥ ऋषिपत्न्यांनीं नेलें अन्न ॥ त्यांसी जगज्जीवन भेटला ॥३९॥
भोळे भाविक भक्त प्रेमळ ॥ त्यांस्वाधीन जाहला दीनदयाळ ॥ हुंबली घालितांचि गोपाळ ॥ तें ऐके घननीळ निजप्रीतीं ॥४०॥
असो आतां बोलूनि काय फार ॥ हें वर्म जाणती वैष्णववीर ॥ जिंहीं शुद्ध करूनि अंतर ॥ शारंगधर वश केला ॥४१॥
मग ब्राह्मण म्हणती तुकयासी ॥ पाषाणमूर्ति जेवील कैसी ॥ नैवेद्य दाखवितां गजवदनासी ॥ सुवास तयासी जातसे ॥४२॥
यावरी बोले वैष्णववीर ॥ मूर्तीमाजी नाहीं विघ्नहर ॥ तुम्हांसी संशय असला जर ॥ तरी ऐका विचार निजकर्णीं ॥४३॥
समुद्रजीवनीं करितां स्नान ॥ एक भक्त बुडत होता जाण ॥ त्याणें एकदंताचें केलें स्तवन ॥ करी धांवणें म्हणोनी ॥४४॥
तयासी काढावया त्वरित ॥ विनायक गेले असती तेथ ॥ याची पाहाणें असेल प्रचीत ॥ तरी बैसावें मुहूर्त क्षणभरी ॥४५॥
देव्हारीं नसतां गजवदनासी ॥ तुम्ही नेवैद्य दाखविला कवणासी ॥ ऐसें बोलतां तुकयासीं ॥ आश्चर्य देवांसी वाटलें ॥४६॥
तों एक मुहूर्त लोटतांचि त्यांनीं ॥ कौतुक देखिलें आपुले नयनीं ॥ गणपतीची मूर्ति सिंहासनीं ॥ उदकें भरूनी निथळत ॥४७॥
पीतांबर पिळोनि पाहातां जाण ॥ तों क्षार लागलें समुद्रजीवन ॥ हा चमत्कार अद्भुत गहन ॥ देखोन आश्चर्य करिताती ॥४८॥
तुकयासी पुसती द्विजवर ॥ किमर्थ भिजलासे पीतांबर ॥ यावरी म्हणे वैष्णववीर ॥ आले विघ्नहर ये ठायीं ॥४९॥
निजभक्त बुडतां जाण ॥ त्याचें सत्वर केलें धांवण ॥ ऐलतीरीं बैसवोनी त्याकारण ॥ गजवदन आले कीं ॥५०॥
ऐकोनि तुकयाची वचनोक्ती ॥ देव निजमनीं आश्चर्य करिती ॥ म्हणे विष्णुभक्तांची अद्भुत स्थिती ॥ आपणाप्रति नेणवे ॥५१॥
पुढती ब्राह्मण काय बोलत ॥ समुद्रासी गेले पार्वतीसुत ॥ हें तुम्हांस कैसें जाहलें श्रुत ॥ साक्षात प्रचीत दाखविली ॥५२॥
परस्परें आपण उत्तर देती ॥ याणें आराधिला रुक्मिणीपती ॥ सकळ दैवतांछी गती ॥ आलीसे हातीं यास्तव ॥५३॥
प्रसन्न होतां सूर्यनारायण ॥ काय एक न दिसे त्याकारण ॥ का कल्पतरूंचें देखतां उद्यान ॥ कामना अपूर्व न राहे ॥५४॥
क्षीरसागरीं रहिवास केला ॥ तरी क्षुधेतृषेचा उद्वेग गेला ॥ नातरी अमृतसिद्धी येतां साधकाला ॥ औषधी त्याजला न लागती ॥५५॥
तेवीं कृपा करितां पंढरीनाथ ॥ तयासी ओळंगती सकळ दैवत ॥ जेवीं विलोकितां रोहिणीपतीतें ॥ उडुगण समस्त दिसती ॥५६॥
यापरी परस्परें बोलती देव ॥ ऐकोनि म्हणे तुका वैष्णव ॥ भोजनासी आले पंढरीराव ॥ अंतरीं सद्भाव देखोनी ॥५७॥
तुम्हीं प्रार्थोनि गजवदन ॥ तयासी साक्षात जेववा अन्न ॥ ऐसें ऐकोनियां वचन ॥ देवीं मौन धरियेलें ॥५८॥
मग मुकयासी म्हणती द्विजवर ॥ तुम्हीं प्रार्थिला रुक्मिणीवर ॥ त्याचे पंक्तीस विघ्नहर ॥ जेववा साचार निजप्रीतीं ॥५९॥
अवश्य म्हणोनि तये क्षणीं ॥ पात्र वाढिलें त्यांजकडोनी ॥ मग गणपतीच्या सन्निध येवोनी ॥ कर जोडोनि विनवीत ॥६०॥
जयजयाजी लंबोदरा ॥ चौदा विद्यांच्या सागरा ॥ तुझें तांडव देखोनि उमावरा ॥ हर्ष अंतरा न समाये ॥६१॥
तुझी होतांचि कृपादृष्टीं ॥ विघ्नें पळती उठाउठीं ॥ सप्रेम अनुभव घेतां दिठी ॥ तुटे फांसोटी भवबंध ॥६२॥
आतां प्रार्थितों तुजकारण ॥ नैवेद्य भक्षावा प्रीतीकरून ॥ वचन ऐकोनि गजवदन ॥ करिती भोजन तेधवां ॥६३॥
एके पात्रीं रुक्मिणीरमण ॥ त्यासन्निध गजवदन ॥ तुकयाचे भक्तीस्तव जान ॥ बैसले येऊन उभयतां ॥६४॥
परी कोणासी न दिसती नयनीं ॥ अन्न तर सरलें पात्रांवरूनी ॥ हा चमत्कार देखोनि मनीं ॥ आश्चर्य वाटलें देवांसी ॥६५॥
म्हणती आम्हीं लंबोदर उपासिला ॥ परी साक्षात नाहीं कधी जेविला ॥ तुकयानें अघटित दाविली लीला ॥ नवल सकळां वाटलें ॥६६॥
गणपति जेविला अपूर्व काये ॥ हें अघटित सर्वथा म्हणों नये ॥ साक्षात आले पंढरीराये ॥ जें दुर्लभ होये साधकां ॥६७॥
पयोब्धीच जाहलिया स्वाधीन ॥ मग सरितांचा पाड कोण ॥ तेवीं कृपा करितां रुक्मिणीरमण ॥ दैवतें संपूर्ण तुष्टती ॥६८॥
कामधेनुगृहासी येतां पाहीं ॥ तेथें सहजचि येती इतर गायी ॥ कीं रोहिणीवराच्या दर्शनें पाहीं ॥ नक्षत्रें कायी न दिसती कीं ॥६९॥
वज्रासनीं बैसोनि नेटीं ॥ योगियांसी ज्याची दुर्लभ भेटी ॥ तो सगुण साकार जगजेठी ॥ पावतो संकटीं निजदासां ॥७०॥
यापरी ब्राह्मण स्तविती देखा ॥ म्हणती वैष्णवभक्त प्रेमळ तुका ॥ स्वाधीन केले वैकुंठनायका ॥ जो ब्रह्मादिकां दुर्लभ ॥७१॥
मग करशुद्धी तांबूल घेऊन ॥ तेथें मांडिलें हरिकीर्तन ॥ एक रात्र तेथें राहून ॥ चालिले पुसोन निजग्रामा ॥७२॥
गजवदनासी करोनि नमन ॥ देवांसी विनवी कर जोडून ॥ आतां देहूसीं जावयाकारण ॥ आज्ञा देणें मजलागीं ॥७३॥
यावरी ब्राह्मण बोलती वचन ॥ पुन्हा मागुती द्यावें दर्शन ॥ निरोप येईल तुम्हांकारण ॥ तैं करावें आगमन निजप्रतीं ॥७४॥
अवश्य म्हणोनि वैष्णव भक्त ॥ तेथोनि चालिलें अति त्वरित ॥ ग्रामासमीप येतां निश्चित ॥ तों एक माळी अकस्मात पातला ॥७५॥
तुकयासी करोनि साष्टांग नमन ॥ कर जोडोनि बोले वचन ॥ मळियांत गुर्‍हाळ लागले जाण ॥ तेथवरी आगमन करावें ॥७६॥
सद्भाव देखोनि त्याचें अंतरीं ॥ अवश्य म्हणती ते अवसरीं ॥ तुकयासी येतां मळियाभीतरी ॥ माळी अंतरीं संतोषला ॥७७॥
बैसावयासी ते वेळे ॥ घडी करोनि टाकिलें चवाळें ॥ म्हणे धन्य भाग्य माझें सकळ ॥ जे दीनदयाळ पातले ॥७८॥
इक्षुदंड मोडोनि लवडसवडी ॥ काढोनि दिधली मध्यकांडी ॥ परी तुकयासी तेथींची गोडी ॥ न रुचे चोखडी सर्वथा ॥७९॥
जेणें ब्रह्मरस सेविला प्रीतीं ॥ त्यासी इतर सर्वथा नावडती ॥ जेवीं दिनकराचे लागतां संगती ॥ दीपक दिसती तेजहीन ॥८०॥
जो सिद्धांतज्ञानीं मग्न आहे ॥ तो पाखंड कर्णीं ऐकेल काय ॥ कामधेनुऐसी जोडल्या गाय ॥ मग अजापालन कासया ॥८१॥
तेवीं नामसुधेची लागतां गोडी ॥ इतरांसी येत अनावडी ॥ आणोनि इक्षुदंडाची चोखडी ॥ चवी धडफुडी जाणेना ॥८२॥
परी माळियाचा सद्भाव देखोन ॥ तेथें बैसलें निवांत क्षण ॥ त्याणें सोज्ज्वळ पात्र उटोन ॥ रस आणोनि पाजिला ॥८३॥
जाते समयीं तुकयाप्रती ॥ माळी कर जोडोनि करी विनंती ॥ कीं ऊंस न्यावें लेंकुराप्रती ॥ मंदिराप्रती आपुल्या ॥८४॥
आकळूनि इक्षुदंड एके ठायीं ॥ बांधोनि दिधले ते समयीं ॥ ते खांद्यावरी घेऊनि लवलाहीं ॥ तेथोनि सत्वरी चालिले ॥८५॥
देहूसी प्रवेशतां तुकयास ॥ गांवींचीं लेंकूरें मागती ऊंस ॥ तेव्हां आपुलें परावें न दिसे त्यास ॥ देतसे ऊंस त्यांप्रती ॥८६॥
जैसा घरधनी आणि तस्कर ॥ दीपकासी सारिखे निरंतर ॥ कीं दरिद्री आणि नृपवर ॥ यांसी प्रकाशे दिनकर सारिखा ॥८७॥
कीं चूतवृक्ष आणि बाभूळ जाण ॥ गंगातीरीं उगवलीं दोघें जण ॥ परी तिजला अधिक उणें ॥ न वाटे जाण सर्वथा ॥८८॥
नातरी उर्वीवरी जाण ॥ वसती मुंगी आणि वारण ॥ सम विषम न वाटे तिजलागून ॥ लेखीं समान दोहींतें ॥८९॥
कीं असंख्य जळचरें जाण ॥ प्रयोब्धींत वसती रात्रंदिन आपपर हा भाव जाण ॥ न लेखीच सर्वथा ॥९०॥
नातरी पौर्णिमेचा निशापती ॥ प्रकाशे सारिखा सर्वाप्रती ॥ तैसाच भाव तुकयाचा निश्चितीं ॥ अद्भुत स्थिति निरुपम ॥९१॥
इक्षुदंड न्यावें आपुलें घरीं ॥ हा आठव सर्वथा नव्हे अंतरीं ॥ सर्वां भूतीं मैत्री बरी ॥ दृष्टीं चराचरीं सारिखी ॥९२॥
मुलांस वांटितां ऊंस देख ॥ गृहासी न्यावया उरला एक ॥ हें कांतेनें देखिलें सम्यक ॥ देखोन संताप वाटला ॥९३॥
तंव गृहासी येऊनि वैष्णववीर ॥ कांतेसी बोले मधुरोत्तर ॥ तिणें ऊंस घेऊन सत्वर ॥ मग कठीण उत्तर बोलिली ॥९४॥
इक्षुदंड वांटिले सर्वास ॥ ते काय पावले तुमचे वडिलांस ॥ घरीं लेंकुरें दिसती उदास ॥ नाहीं खावयास राहिलें ॥९५॥
मग सक्रोध होऊनि अंतरीं ॥ इक्षुदंड मारिला पाठीवरी ॥ दोन कांडी पडलीं भूमीवरी ॥ एक निजकरीं राहिलें ॥९६॥
निजशांति अंतरीं धरोनि देखा ॥ कांतेसी बोले वैष्णव तुका ॥ वांटा जाहलासे नेटका ॥ साह्य निजसखा पांडुरंग ॥९७॥
तुझा तुजपाशीं राहिला भाग ॥ खालीं दोन पडले सवेग ॥ ते लेंकुरें आणि आम्ही सांग ॥ घेऊं वांटून निजप्रीतीं ॥९८॥
ऐसी निजांगें देखोनि शांती ॥ आश्चर्य वाटलें कांतेप्रती ॥ म्हणे हा निर्लज्ज जाहला निश्चितीं ॥ प्रपंचभ्रांती टाकोनी ॥९९॥
आतां मायाभ्रांती टाकोनि पाहीं ॥ यासी वायां छळोनि कायी ॥ मानापमान न कळे कांहीं ॥ संसारसोयी टाकिली ॥१००॥
ऐसा विवेक करोनि चित्ता ॥ निवांत राहिली निजकांता ॥ तुकयाची शांति वर्णितां ॥ तुळणेसी दृष्टांता नये कीं ॥१॥
मग विवेक करोनियां महीपती ॥ पुरातन भक्तांच्या धुंडोनियां स्थिती ॥ तंव एकादशस्कंधीं उद्धवाप्रती ॥ कदर्युकथा सांगितली ॥२॥
तें एकनाथाचे टीकेवरूनी ॥ परिसिलें असेल संतसज्जनीं ॥ तैसीच तुकयाची शांति नयनीं ॥ दृष्टांतीं दिसोनि येतसे ॥३॥
हे उपमा देतां जाण ॥ मजला दिसोन येतसे गौण ॥ जे कदर्यूनें घेतलें संन्यासग्रहण ॥ मग केलें छळण तयाचें ॥४॥
आणि गृहस्थाश्रमीं असतां वैष्णवभक्त ॥ मानापमान सारिखे मानित ॥ निजकांटेनें मारितां त्वरित ॥ परी क्रोध अणुमात्र नयेचि ॥५॥
म्हणोनि उपमा द्यावयासी पाहीं ॥ दृष्टांत न पुरें कवणे ठायीं ॥ जैसा क्षीरसागराचे तुळणेस पाहीं ॥ रत्नाकर कायी येईल ॥६॥
कीं सायुज्यतेचे साम्यतेसी निश्चितीं ॥ सलोकता समीपता न सरती ॥ तुकयाची तसी अद्भुत स्थिती ॥ सभाग्य श्रोतीं जाणिजे ॥७॥
जेणें कलीमाजी वैकुंठीं सहज ॥ देहासहित लाविला ध्वज ॥ तो प्रेमळ भक्त वैष्णवराज ॥ जगद्गुरु सहज अवतरला ॥८॥
तयासी थोर थोर म्हणतां पाहें ॥ तरी वरिष्ठ सर्वथा म्हणों नये ॥ जैसा समुद्र गंभीर म्हणतां पाहें ॥ येरवीं काये नव्हे तो ॥९॥
कीं वासरमणी सतेज आगळा ॥ कासया म्हणावें वेळोवेळां ॥ नातरी शीतळ रोहिणीपतीला ॥ म्हणावयाला नलगेचि ॥११०॥
पृथ्वीची क्षमा वर्णितां पाहें ॥ ते तेव्हांचि तैसी झाली काये ॥ ना ते स्वभावेंचि तैसी आहे ॥ तरी वानावें काय निजमुखें ॥११॥
तेवीं विवेकशांतीचें भूषण ॥ तुकयाचें अंगीं अक्षय लेणें ॥ तें निजमुखें वर्णावें कोणें ॥ पवित्र सज्ञान जाणती ॥१२॥
कायिक वाचिक मानसिक पाहीं ॥ त्याचे तपासी तुळणा नाहीं ॥ असत्य वचन न येचि कांहीं ॥ प्राणांतही ओढवल्या ॥१३॥
हें वाचिक तप जाणा सुनिश्चितीं ॥ आतां मानसिकाची कैसी रीती ॥ सारिखीच करुणा सर्वां भूतीं ॥ विषम चित्तीं न धरितां ॥१४॥
हा मानसतपाचा विचार ॥ संक्षेपें बोलिलों साचार ॥ आतां निजांगें करावा परोपकार ॥ हें तप शारीर बोलिजे ॥१५॥
हे तीन यथापद्धतीनें ॥ तुकयासी सर्वांगीं जाहले भूषण ॥ चरणचाली निजप्रीतीनें ॥ पंढरीस गमन करावें ॥१६॥
पंधरा दिवसीं हरिदिनीसी ॥ नेमें वारीं धरिली ऐसी ॥ एक दिवस राहोनि मंदिरासी ॥ दुसरें दिवशीं निघावें ॥१७॥
गात नाचत प्रेमभरित ॥ पंढरीसी सातवें दिवशीं जात ॥ तीन रात्र राहूनि तेथ ॥ परतोनि येत गृहासी ॥१८॥
तीन वर्षें लोटतां ऐसीं ॥ तों शीतज्वर लागला शरीरासी ॥ मग शक्तिहीन देखोनि मानसीं ॥ तळमळ चित्तासी करीतसे ॥१९॥
निजांगें न चालवे पाऊलभरी ॥ म्हणे पंढरीची अंतरली वारी ॥ कांहीं दोष होता पदरीं ॥ तें विघ्न लौकरी ओढवलें ॥१२०॥
तों निजभक्त ते अवसरीं ॥ पंढरीसी चालिले वारकरी ॥ त्यांचे हाती पत्र लिहूनि सत्वरी ॥ पंढरीसी पाठविलें ॥२१॥
त्या विसां अभंगांचा अन्वय निश्चितीं ॥ अभिप्राय परिसिला वैष्णवभक्तीं ॥ जे श्रवण करितां निजप्रीतीं ॥ प्रेम चित्ती ठसावें ॥२२॥
ध्यानीं आनोनि पांडुरंगमूर्ती ॥ म्हणे देवाधिदेवा रुक्मिणीपती ॥ तुज विनवावया निश्चितीं ॥ भाग्य मजप्रती असेना ॥२३॥
परी धीट होऊनि आपुलें मनीं ॥ पत्र लिहितों आवडीकरूनी ॥ पार नेणिजे श्रुतिपुराणीं ॥ मी पामर कोठूनि वर्णूं शकें ॥२४॥
परी जैसी तैसी आर्ष वाणी ॥ अंगीकारावी चक्रपाणी ॥ सलगी केली पायांलागोनी ॥ मस्तक चरणीं ठेविला ॥२५॥
तूं सकळ सुरवरां वरिष्ठ देव ॥ गोपिकापति सगुण माधव ॥ उदारख्याती वर्णिती सर्व ॥ सत्कीर्तिवैभव त्रिभुवनीं ॥२६॥
नामयामात्रेंचि हृषीकेशी ॥ नाशितोसी पातकांच्या राशी ॥ कर्में जळतील आपैसीं ॥ दारिद्र्य दृष्टीसी दिसेना ॥२७॥
सर्व सुखें विठाबाई ॥ तुझ्या ओळंगती पायीं ॥ ऋद्धि सिद्धि अनुकूल ठायीं ॥ चारी मुक्ती आंदण्या ॥२८॥
इंद्रादिकां जें दुर्लभ पद ॥ तें निजदास पावती सप्रेम बोध ॥ कीर्तनीं नाचतां अति आल्हाद ॥ टाळिया छंदें पीटितां ॥२९॥
विश्वीं जड असती अनंत ॥ त्यांचें जीवन तूं रुक्मिणीकांत ॥ परी माझेंचि खोटें संचित ॥ म्हणोनि मूळ न पाठविसी ॥१३०॥
नाहीं निरोप पाठविला तुज ॥ म्हणोनि उदास धरिलें मज ॥ निष्ठुर होऊनियां सहज ॥ मोकलिलें आज ये समयीं ॥३१॥
कीं कांहीं जरूर पडला धंदा ॥ म्हणूनि विसरलासी मज गोविंदा ॥ मी वाट पाहातसे मुकुंदा ॥ दाखवीं पदा आपुल्या ॥३२॥
नातरी कांहीं द्यावें लागेल मजला ॥ हेचि सांकडें पडलें तुजला ॥ म्हणोनि सांड करूनि विठ्ठला ॥ मूल मजला न पाठविसी ॥३३॥
एवढा संकोच मानसीं ॥ तरी पोरें कासया व्यालासी ॥ आम्हीं जाऊनि कोणापासीं ॥ तोंड वासूनि मागावें ॥३४॥
तुवां दिधलें मोकलून ॥ तरी कोण आहे आम्हां कारण ॥ कोण निवारी भागशीण ॥ एका तुजविण पांडुरंगा ॥३५॥
कोणाची वाट पाहूं सांग ॥ कोण सखा आम्हांसी जिवलग ॥ तुवांछ मोकलिलें श्रीरंग ॥ तरी होईल भवभंग कैशिया रीतीं ॥३६॥
कोण माझें जीवींछें सांकडें ॥ न सांगतां जाणेल वाडेंकोडें ॥ तुजविण निवारितां रोकडें ॥ मागें पुढें दिसेना ॥३७॥
देवाधिदेवा रुक्मिणीपती ॥ काय माझी देखिली अनीती ॥ म्हणोनि करुणा नये चित्तीं ॥ मोकलिलें मजप्रति दयाळा ॥३८॥
तरी डोळेभेट द्यावी सत्वर ॥ कांहीं वेंच न घालीं तुजवर ॥ अहर्निशीं नामउच्चार ॥ वारंवार करीतसें ॥३९॥
जैसें चित्ताप्रमाणें मिळेल ॥ तेंचि करोनि दाट पातळ ॥ कडे लावूं आपुला काळ ॥ सोडोनि तळमळ चित्ताची ॥१४०॥
परी तुजवरी भार न घालीं सर्वथा ॥ हाचि निश्चय पंढरीनाथा ॥ हृदयमंदिरीं तूं वसता ॥ जाणसी तत्त्वतां अंतरींचें ॥४१॥
परी आम्हां लेंकुरांची जाती ॥ भेटावयासी वाटे खंती ॥ म्हणोनियां रुक्मिणीपती ॥ तळमळ चित्तीं करीतसें ॥४२॥
तुज तंव पोरें जाहलीं फार ॥ त्यांची न सहे किरकिर ॥ म्हणोनि चित्तीं होऊनि निष्ठुर ॥ माझा अव्हेर केला कीं ॥४३॥
आम्ही करितों कलागती ॥ तुजसीं भांडतों रुक्मिणीपती ॥ म्हणोनियां मजप्रती ॥ सांडिलें निश्चितीं दयाळा ॥४४॥
नातरी कुटुंब बहुत जाहलें पदरीं ॥ कन्या गेलिया वराचें घरीं ॥ मग निष्ठुरता धरोनि अंतरीं ॥ आम्हांस सासुरीं टाकिलें ॥४५॥
कां व्यवहार करितां जगजेठी ॥ व्यवसायांत आली तुटी ॥ म्हणोनि कृपणता धरोनि पोटीं ॥ मज ये संकटीं टाकिलें ॥४६॥
नातरी पत बुडाली लोकांचारीं ॥ ऋणकरी येऊनि बैसले द्वारीं ॥ म्हणोनि विसर अंतरीं ॥ पडला श्रीहरी आमुचा ॥४७॥
बरें मूळ पाठवावया न होय ॥ तरी निरोप धाडितां वेंचे काय ॥ कोरडें यशही न घेववें ॥ उपजलें भय मानसीं ॥४८॥
आम्हांसी टाकिलें जगजेठी ॥ तरी जोड संचिली कोणासाठीं ॥ एवढी करिसी आटाआटी ॥ लेंकुरें दृष्टी नावडती ॥४९॥
फुकाचा शब्द वेंचितां जाण ॥ यश न घेववे तुजकारण ॥ तरी धन केलें बहुत जतन ॥ तें कोणाकारण देशील ॥१५०॥
पोटींच्या लेंकुरांसी नाहीं सुख ॥ रुदन करितां लागली भूक ॥ तरी जेणें होईळ तुझा लौकिक ॥ तैसा विवेक करावा ॥५१॥
आमुचा तळतळाट घेशील जर ॥ तरी तुझें कदापि न होय बरें ॥ ऐसा मानसीं करूनि विचार ॥ घ्यावा समाचार दीनाचा ॥५२॥
नाहीं तरी भीड न धरितां अंतरीं ॥ सर्वथा न ठेवीं कांहीं उरी ॥ संतांसी सांगोनियां सत्वरीं ॥ तुझी जोड निर्धारीं बुडवीन ॥५३॥
नाम जपतों अहर्निशीं ॥ तें कदापि मी न घें वाचेसी ॥ जरी तूं होऊन उदासी ॥ आस बुडविसी दयाळा ॥५४॥
तूं एवढा समर्थ जगजेठी ॥ पोटीं जन्मलों आम्हीं करंटीं ॥ हेच अपकीर्ति जाहली खोटी ॥ फजीती मोठी जनांत ॥५५॥
येथें खावयास न मिळे अन्न ॥ मूळही नयेच माहेरींहून ॥ आतां वृथाच हें खोटें जीवपण ॥ कासया वागवण व्यर्थचि ॥५६॥
पुढें आठव धरोनि रुक्मिणीपती ॥ सांगोनि पाठवावें मजप्रती ॥ रात्रंदिवस करितों खंती ॥ तरी निष्ठुर चित्तीं न व्हावें ॥५७॥
कंठीं धरोनियां प्राण ॥ पायांपासीं पातलें मन ॥ चित्त जाहलें असे उद्विग्न ॥ तुझें दर्शन घ्यावया ॥५८॥
सांडोनि प्रपंचआडाआडी ॥ वाट पाहातों मी वराडी ॥ तरी कृपादृष्टि करोनि गाढी ॥ मूळ तांतडी पाठवावें ॥५९॥
धीर न धरवे निमेषभर ॥ कैंची बुद्धि माझी स्थिर ॥ मानसी आंवरोनि वारंवार ॥ मति साचार शुद्ध नाहीं ॥१६०॥
ऐसी दया आलीं अंगा ॥ तूं सर्व जाणसी पांडुरंगा ॥ म्हणोनियां रुक्मिणीरंगा ॥ करीं भवभंगा माझिया ॥६१॥
शरणागत उपेक्षिला कोणी ॥ हे मात ऐकिला नाहीं कर्णीं ॥ म्हणोनि पाय आठवोनि मनीं ॥ मस्तक चरणीं ठेवितों ॥६२॥
कधीं करिसील उचित ॥ हें मज न कळेचि निश्चित ॥ परी समान मानोनि चित्त ॥ वर्णितों कीर्त निशिदिनीं ॥६३॥
हें विनंति ऐकोनि शारंगधरा ॥ मूळ पाठवीं मज सत्वरा ॥ वारकरी परतोनि येती घरां ॥ तोंवरी वाट पाहातसें ॥६४॥
मग सामोरा जाऊनि त्वरित ॥ सद्भावें घालीन दंडवत ॥ पुसेन निरोपाची मात ॥ कीं त्वां काय उचित पाठविलें ॥६५॥
महाद्वाराची पायरी निश्चित ॥ निवांत पडली आहे तेथ ॥ तैसेंचि माझें दंडवत ॥ सांगतील संत तुजलागीं ॥६६॥
कीं दंडकाठी उभीचि सोडितां ॥ धरणीसी पडे अवचितां ॥ तैसेंचि दंडवत पंढरीनाथा ॥ सांगती संत तुजलागीं ॥६७॥
नातरी जननीपासीं छंद घेत ॥ बाळक गडबडां जैसें लोळत ॥ तैसेंचि माझें दंडवत ॥ सांगतील संत तुजलागीं ॥६८॥
मग वारकरियांसी म्हणे तये क्षणीं ॥ माझी तुम्ही करा विनवणी ॥ कीं तुकयासी टाकूनि दिधलें वनीं ॥ अन्याय देखोनि कोणता ॥६९॥
दाखवोनियां कींव काकुळती ॥ मात पुसावी तयाप्रती ॥ कीं तुइकयाचे अन्याय देखिले किती ॥ म्हणोनि तयाप्रती मोकलिलें ॥१७०॥
कां पंढरीसी न होय त्याचें येणें ॥ विटेवरी न दिसती समचरणें ॥ मोकलूनि दिधलें कवण्या गुणें ॥ त्याजकारणें पुसा कीं ॥७१॥
मग कृपा करूनि पंढरीनाथ ॥ मज बोलावील जरी तेथ ॥ तरी मी धांवोनि येईल त्वरित ॥ साधुसंत भेटती ॥७२॥
त्रिविधताप आहे पोटीं ॥ ते तत्काळ पळतील उठाउठीं ॥ जे गुणचरित्रें गातां कंठीं ॥ हरुषें वाळुवंटीं नाचतां ॥७३॥
मातेपुढें रिघोनि जाण ॥ प्रेमें करीन स्तनपान ॥ परिसोनि माझें करुणावचन ॥ उत्तर पाठवणें सत्वर ॥७४॥
कृपासागरा जगज्जीवना ॥ गुण दोष कांहींच नाणीं मना ॥ करोनि पापाचा उगाणा ॥ दाखवी चरणा मजलागी ॥७५॥
माझीं दुरितें हरावया तुजसी ॥ सामर्थ्य नाहीं हृषीकेशी ॥ म्हणोनि निष्ठुर होवोनि मानसीं ॥ मज परदेशीं मोकलिलें ॥७६॥
कीर्ति ऐकोनि रुक्मिणीपती ॥ रात्रंदिवस वाटे खंती ॥ मी साक्षात भेटतां निश्चितीं ॥ तैं लोभ जोडती अपार ॥७७॥
तुझें चरित्र जगज्जीवना ॥ वर्णावयास नाहीं रसना ॥ प्रेमामृत चाखावया मना ॥ उतावीळ वासना होतसे ॥७८॥
परी काळ साह्य नसतां देख ॥ वायांचि करीत बैसलों शोक ॥ पुढें अधिकचि वाटे दुःख ॥ कल्पना अधिक नावरती ॥७९॥
अंतरसाक्ष तूं श्रीहरी ॥ आतां जाणसील तैसें करीं ॥ मी तळमळ टाकोनि सर्वतोपरी ॥ निश्चल अंतरीं राहिलों ॥१८०॥
परी अव्हेरून टाकितां सहज ॥ तरी दांतकसाळी लागेल तुज ॥ तूं मरोन गेलिया अधोक्षज ॥ पोरवडें मज येईल कीं ॥८१॥
तरी आशिर्वाद देतों तुज आतां ॥ सुखरूप नांदें रुक्मिणीकांता ॥ कधीं तरी धरोनि ममता ॥ आम्हां अनाथां आपंगीतसां ॥८२॥
जरी टाकोनियां दिधले दूर ॥ तरी निरोपें घेसी समाचार ॥ मोहें दाटलिया अंतर ॥ दाखविसी माहेर मजलागीं ॥८३॥
कृपासागरा जगजेठी ॥ आतां ऐक माझी गोष्टी ॥ कळेल तैसें करीं शेवटीं ॥ पुढें वटवट करीनां ॥८४॥
जैसें येईल तुझिया चित्ता ॥ तो जबाब पाठवीं पंढरीनाथा ॥ मी बोललों जाणतां नेणतां ॥ तो अपराध अनंता क्षमा करीं ॥८५॥
आधीं बाळकासी दिधला लाड ॥ तैसेंच पुरवीं माझें कोड ॥ भेट देउनि निजनिवाड ॥ भवबंधसांकड निवारीं तूं ॥८६॥
ऐसें करुणाशब्द लिहून प्रीतीं ॥ पाठविले वारकर्‍यांचे हातीं ॥ इतुका पाल्हाळ ऐकोनि श्रोतीं ॥ आशंकित चित्तीं न व्हावें ॥८७॥
म्हणाल अनुसंधान टाकोनि दूरी ॥ ग्रंथ लिहिला अति विस्तारीं ॥ स्वानंदप्रेमाचिये भुली ॥ आठवण मागिली नयेचि ॥८८॥
तरी तैसेंचि नव्हे निश्चित ॥ वायांच वाढविला नाहीं ग्रंथ ॥ पत्रिकेचे अभंग पाहोनि त्वरित ॥ लिहिलें संकलित ये ठायीं ॥८९॥
तुकयाचें प्रेम वर्णितां प्रीतीं ॥ सहसा न पुरे आपुली मती ॥ जैसा चितार्‍यानें लिहिला गभस्ती ॥ परी प्रकाश त्याप्रति काढवेना ॥१९०॥
कां सरिता भरोनि चालिली जरी ॥ ते करील काय सागराची बरोबरी ॥ नातरी दुधाळ धेनु असली जरी ॥ ते कामधेनूची सरी करीना ॥९१॥
पितळ लखलखित दिसे दुरून ॥ तें काय होईल शुद्ध कांचन ॥ कीं सुधारसाचें सामर्थ्य जाण ॥ औषधीकारणें नये कीं ॥९२॥
काम मेघ गर्जना करितां नाचे मयूर ॥ तैसेंच करूं पाहे लांडोर ॥ परी दोहींची कळा भिन्न साचार ॥ सज्ञान चतुर जाणती ॥९३॥
तेवीं तुकयाचें प्रेम वर्णितां प्रीतीं ॥ कुंठित जाहली सकळ मती ॥ जैसा उदयासी येतां गभस्ती ॥ उडुगणें लोपती त्यापुढें ॥९४॥
कस्तूरींत मृत्तिका पडतां भली ॥ परी तैशाच मोलें तुकयासी आली ॥ तेवीं संतस्तवनीं वैखरी भली ॥ हे पावन जाहली अनायासें ॥९५॥
असो मागील अनुसंधान ॥ पंढरीस चालिले वैष्णवजन ॥ त्यांजहातीं पत्र तुकयान ॥ दिधलें लिहून निजप्रीतीं ॥९६॥
मग तुकयासी भेटोनि सत्वरीं ॥ पंढरीसी चालिले वारकरी ॥ पुढिले अध्यायीं भक्तचतुरीं ॥ सप्रेम भरीं परिसिजे ॥९७॥
जैसा कृपण मोजितां धन ॥ अणुमात्र फांकों नेदी मन ॥ कां परनिंदा कर्णीं ऐकोन ॥ कुटिल तल्लीन होतसे ॥९८॥
तैशापरी अवधान प्रीतीं ॥ देतां तुष्टेल रुक्मिणीपती ॥ श्रोतयांसी विनवी महीपती ॥ श्रवणीं सद्भक्ती असों द्या ॥९९॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ पंचाशत्तमाध्याय रसाळ हा ॥२००॥
अध्याय ॥५०॥ ओंव्या ॥२००॥

श्री भक्तविजय

Shivam
Chapters
॥ मंगलाचरणम् ॥ आरती श्रीविठ्ठलाची, प्रार्थना - आरती श्रीविठ्ठलाची युगें ... अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७