Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय ४३

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीवसुदेवनंदनाय नमः ॥    
ऐका श्रोते सज्जन प्रेमळ ॥ आजि कल्पतरूसी पातलें फळ ॥ जे भक्तकथा अति रसाळ ॥ प्रकटल्या प्रांजळ निरुपम ॥१॥
जो अनिर्वाच्य वैष्णवमहिमा ॥ विरिंचीसी न कळे ज्याची सीमा ॥ जयाचा पार नेणवे निगमा ॥ तो अनुपम प्रेमा जाणिजे ॥२॥
जयांसी सत्कर्मचि प्रधान ॥ ते अंतीं पावती ब्रह्मभुवन ॥ जे यज्ञयाग आचरती जाण ॥ ते करिती गमन स्वर्गलोकीं ॥३॥
जे पितरांचे ठाईं भाव धरिती ॥ ते अंतीं पितृवासींच विचरती ॥ जे ज्या देवातें भजतीं ॥ तें पद पावती अंतीं ते ॥४॥
पिशाच उपासिती तामसगुणी ॥ ते तैसेच होती देहांतीं मरणीं ॥ जे भक्तकथा ऐकती श्रवणीं ॥ ते वैकुंठभुवनीं पावती ॥५॥
त्यांचें संकट देखतां नयनीं ॥ तें तत्काळ निवारी चक्रपाणी ॥ अंतीं चतुर्भुजरूप करूनी ॥ सायुज्यसदनीं बैसवी ॥६॥
ऐसा वर पंढरीनाथें ॥ दिधला असे या ग्रंथातें ॥ म्हणोनि श्रोते सादर चित्तें ॥ ऐका श्रवणार्थ निजप्रीतीं ॥७॥
मागील अध्यायाचे अंतीं ॥ भानुदासास भेटले रुक्मिणीपती ॥ मग त्याणें धरून विरक्ती ॥ प्रपंचवृत्ति सांडिली ॥८॥
आतां ऐका यावरी निरुपण ॥ पंढरीक्षेत्रींचा एक ब्राह्मण ॥ द्रव्यइच्छा मनीं धरून ॥ देशावरासी चालिला ॥९॥
तो पुरें पट्टणें पाहतां सत्वरा ॥ अकस्मात आला विद्यानगरा ॥ नगरीं प्रवेशोनि सत्वरा ॥ म्हणे नृपवरा भेटावें ॥१०॥
स्नानसंध्या करूनि द्विजवर ॥ मग प्रवेशला राजमंदिर ॥ परी द्वारपाळ जाऊं न देती सत्वर ॥ बैसा क्षणभर म्हणोनि ॥११॥
भूपतीची आज्ञा आणितों सत्वर ॥ मग प्रवेशा जी नृपमंदिर ॥ रायासी पुसोनि आले किंकर ॥ मग भीतरीं द्विजवर प्रवेशाला ॥१२॥
ब्राह्मणास देखोनि रामराजा ॥ नमन करूनि केली पूजा ॥ अति उल्हास वाटला द्विजा ॥ म्हणे धन्य महाराजा धर्ममूर्ति ॥१३॥
राजा पुसे त्याजकारण ॥ कोठोनि जाहलें जी आगमन ॥ काय मनीं इच्छा धरून ॥ कृपा करून आलेती ॥१४॥
ऐसें पुसतां नृपनाथ ॥ ब्राह्मण सांगें उल्हासयुक्त ॥ म्हणे पंढरीक्षेत्र अति अद्भुत ॥ वास्तव्य तेथें असे कीं ॥१५॥
तुझें औदार्य ऐकोनि सत्वर ॥ पहावयासी आलों देशावर ॥ वचन ऐकोनि नृपवर ॥ संतोष थोर वाटला ॥१६॥
राजा म्हणे ब्राह्मणासी ॥ तुम्हीं असावें स्वस्थ मानसीं ॥ मी स्नान करूनि त्वरेंसीं ॥ देवपूजनासी जाईन ॥१७॥
तुम्हीं तेथें येऊनि पाहावें स्थळ ॥ सुवर्णकांति असे देऊळ ॥ मी अर्चन करूनि सकळ ॥ तुलसीदल अर्पीन ॥१८॥
ऐसें बोलतां तयाप्रती ॥ द्विज संतोष पावला चित्तीं ॥ देवीदर्शना चालिला भूपती ॥ त्याचे संगती जातसे ॥१९॥
देवालयाभोंवतीं अमोलिका ॥ रायें लाविली पुष्पवाटिका ॥ अंतरगाभारी स्थापूनि अंबिका ॥ समारंभ निका करीतसे ॥२०॥
नानावाद्यांचे होती गजर ॥ पूजा करीत बैसला नृपवर ॥ द्विज बोलती मंत्रोच्चार ॥ आनंदें गजर होतसें ॥२१॥
षोडशोपचारें करूनि पूजनें ॥ देवीस लेववी वस्त्रें भूषणें ॥ नानापरींचीं दिव्य रत्नें ॥ शोभायमान दिसती पैं ॥२२॥
चंदनादिक उपचार ॥ कंठीं घातलें सुमनहार ॥ धूप दीप करूनि नृपवर ॥ नैवेद्य भावें अर्पीतसे ॥२३॥
मग पंचारती उजळोनियां ॥ ओंवाळिली महामाया ॥ साष्टांग नमस्कार घालोनियां ॥ लागला पायां नृपनाथ ॥२४॥
प्रसाद वांटोनियां सकळांसी ॥ राजा बैसला स्वस्थ मानसीं ॥ मग पंढरीच्या द्विजासी ॥ बोलतां झाला तेधवां ॥२५॥
म्हणे राजाईऐसें दैवत पाहीं ॥ धुंडितां त्रिभुवनीं न दिसे कांहीं ॥ आम्हीं देखिलें ऐकिलें नाहीं ॥ धन्य नवाई अगाध ॥२६॥
सुंदर देऊळ पाहावें नयनीं ॥ यासी रुप्याचें सारिलें पाणी ॥ भोंवतीं पुष्पवाटिका लावूनी ॥ पूजितों सुमनीं जगदंबा ॥२७॥
विद्यानगरींचे सकळ जन ॥ येती घ्यावया दर्शन ॥ सेवेसी लाविले प्रधानजन ॥ मी निजांगें पूजन करीतसें ॥२८॥
तुम्हीं राहतां पंढरीसी ॥ तेथें तों महिमा नसेल ऐसी ॥ राजाईऐसे पांडुरंगासी ॥ उपचार तयासी नसतील ॥२९॥
दुर्बळ ब्राह्मण करिती पूजन ॥ तेथें कैंचें वस्त्र भूषण ॥ ऐकोनि रामराजाचें वचन ॥ विप्र निजमनीं क्रोधावला ॥३०॥
मग म्हणे गा नृपनाथा ॥ पंढरी दृष्टीसी न देखतां ॥ आपुलीचि थोर म्हणसी देवता ॥ अभिमान वृथा धरूनि ॥३१॥
देउळासी रुप्याचें दिधलें पाणी ॥ तेंचि भूषण सांगसी जनीं ॥ आमुचें क्षेत्र सुवर्णकोंदणीं ॥ गेला रचोनि विश्वकर्मा ॥३२॥
तेथें कल्पतरूचीं लागलीं झाडें ॥ परीस चिंतामणि लोळती खडे ॥ दिव्य पताका चहूंकडे ॥ चपळेऐशा झळकती ॥३३॥
तेथें कामधेनूंचें गोधन ॥ रत्नजडित वृंदावन ॥ तेथें प्रेमळ वैष्णवजन ॥ करिती कीर्तन उल्हासें ॥३४॥
तेथें चंद्रभागा अमृतवाहिनी ॥ जे सकळ तीर्थांची स्वामिनी ॥ दर्शनेंचि मुक्त होती प्राणी ॥ वैकुंठभुवनीं पावती ॥३५॥
रंभा तिलोत्तमा येऊनि सुंदरी ॥ नृत्य करिती गरुडपारीं ॥ गंधर्वगायन होतसें द्वारीं ॥ नाद अंबरीं कोंदाटे ॥३६॥
ऐसा देवाधिदेव रुक्मिणीकांत ॥ क्षीरसागरीं होतां नांदत ॥ तो पुंडलीक देखोनि निजभक्त ॥ आला त्वरित त्या ठाया ॥३७॥
दोन्ही कर ठेवूनि जघनीं ॥ उभा राहिला चक्रपाणी ॥ निजभक्तांचें संकट देखोनी ॥ पावे ते क्षणीं निजांगें ॥३८॥
त्याचें स्वरूप पाहतां नयनीं ॥ लष्मी लज्जित जाहली मनीं ॥ कोटि सूर्य जाती लपोनी ॥ मुकुटावरूनि तयाच्या ॥३९॥
सांवळा सुकुमार शारंगधर ॥ कांसे कसिला पीतांबर ॥ दिव्य कुंडलें मकराकार ॥ श्रीमुख मनोहर साजिरें ॥४०॥
हें रूप देखावया दृष्टीं ॥ इंद्रादि देव तेहतीस कोटी ॥ कर जोडोनि सदा तिष्ठती ॥ सद्भावें स्तविती निजप्रेमें ॥४१॥
ज्याचें नाम अहर्निशीं ॥ एकांती जपे कैलासवासी ॥ श्रुतिशास्त्रें वर्णिती जयासी ॥ पार विरिंचीसी नेणवे ॥४२॥
सहस्रमुखें स्तवन प्रीतीं ॥ शेष करिता जाहला निगुतीं ॥ जिव्हा चिरूनि दुखंड होती ॥ मग निवांतस्थिती राहिला ॥४३॥
पांडुरंगाऐसें दैवत ॥ आणि पंढरीऐसें पुण्यक्षेत्र ॥ चंद्रभागेऐसें पावन तीर्थ ॥ नाहीं दिसत त्रिभुवनीं ॥४४॥
हें दृष्टीसी आधीं न पाहतां ॥ आपुलेंचि भूषण सांगसी वृथा ॥ राजाई तुझी कुळदेवता ॥ हे माझिया चित्ता न ये कीं ॥४५॥
हे नित्य पंढरीस येऊन ॥ करीतसे सडासंमार्जन ॥ ऐसें बोलतांचि ब्राह्मण ॥ क्रोधायमान नृपनाथ ॥४६॥
म्हणे माझी आराध्यदेवता ॥ याणें निंदिली मजदेखतां ॥ आपुलीच सांगे प्रशंसावार्ता ॥ विचार चित्ता न करितां ॥४७॥
आतां जीवें मारावें यासी ॥ तरी अधिकारी व्हावें दोषासी ॥ शिक्षा करूनि द्विजासी ॥ नगरप्रदेशीं दवडावा ॥४८॥
मग ब्राह्मणासी म्हणे नृपवर ॥ तूं असत्य बोलिलासी उत्तर ॥ सुवर्णमय पंढरपुर ॥ ऐकिलें साचार नाहीं कीं ॥४९॥
आणि राजाई दैवत मूळपीठवासी ॥ इजला स्वमुखें म्हणतोसी दासी ॥ तरी शिक्षा करूनि तुजसी ॥ अरण्यासी दडवीन ॥५०॥
मग ब्राह्मण म्हणे ऐक भूपती ॥ म्यां यथार्थ सांगितलें तुजप्रती ॥ तुम्हीं पंढरीस येऊन सत्वरगति ॥ रुक्मिणीपति पहावा ॥५१॥
म्यां सांगितलें त्याचें महिमान ॥ त्याहूनि विशेष कोटिगुण ॥ तुझे दृष्टीस न पडतां जाण ॥ मग दंडन करावें ॥५२॥
तो देवादेव देखिला नाहीं ॥ तोंवरींच थोर हे राजाई ॥ जैसा सूर्योदय न होतांचि पाहीं ॥ दीपक सोज्ज्वळ दिसती ॥५३॥
जो देखिला नाहीं ऐरावती ॥ तों इतर वारण थोर भासती ॥ कीं पौर्णिमेचा नुगवतां निशापती ॥ उडुगणें वाटती सतेज ॥५४॥
नातरी सुधारस न येतां हाता ॥ इतर रसांची तंवचि वार्ता ॥ कीं पयोब्धि दृष्टीस न देखतां ॥ दिसती सरिता अनुपम ॥५५॥
कल्पतरूंचें न देखतां वन ॥ तोंवरीं झगमगित ॥ तेवीं जों देखिला नाहीं पंढरीनाथ ॥ तों इतर दैवतें आवडती ॥५७॥
ऐकोनि म्हणे नृपवर ॥ आतां पंढरीस येतों सत्वर ॥ सांगितल्याऐसें देखिलें जर ॥ तरीच बरें द्विजवरा ॥५८॥
आणि असत्य वदलें असेल जरी ॥ तरी शिक्षा करीन तुज सत्वरीं ॥ मग प्रधानासी सांगे ते अवसरीं ॥ करावी स्वारी निजांगें ॥५९॥
अश्व गज रथ शिबिकाभरण ॥ सवें घेऊनि कांहीं सैन्य ॥ राजा सत्वर चालिला जाण ॥ पांडुरंगदर्शन घ्यावया ॥६०॥
नानावाद्यांचे होताती गजर ॥ तयांमागून चाले द्विजवर ॥ म्हणे लज्जा रक्षील रुक्मिणीवर ॥ कीं करील अव्हेर दीनाचा ॥६१॥
म्यां सांगितलें जैशा रीतीं ॥ तैसें न देखे जरी भूपती ॥ तरी शिक्षा करील मजप्रती ॥ संशय चित्तीं न धरितां ॥६२॥
मग ध्यानीं आणोनि पांडुरंगमूर्ती ॥ स्तवन करी आपुलें चित्तीं ॥ म्हणे भक्तवत्सला रुक्मिणीपती ॥ मज या आकांतीं पावावें ॥६३॥
अनाथ दीन तुझा ब्राह्मण ॥ देशावरासी निघालों जाण ॥ तुझें सांगूनि नामाभिधान ॥ कुटुंबरक्षण करीतसें ॥६४॥
देवा तुझी अद्भुत कीर्ती ॥ वर्णिली आहे मागिल्या संतीं ॥ तैसीच सांगितली रायाप्रती ॥ परी यथार्थ चित्तीं वाटेना ॥६५॥
त्याची निंदिली कुळदेवता ॥ म्हणोनि राग आला नृपनाथा ॥ साक्ष पाहावयासी आतां ॥ पंढरीनाथा येतसे ॥६६॥
पंढरी आहे जैशा रीतीं ॥ तैसेंच कथिलें रायाप्रती ॥ परी कलियुगीं मृत्तिकेच्या भिंती ॥ लोकांसी भासती अभिन्नत्वें ॥६७॥
जैसें वडिलांचें द्रव्य पुरलें असे ॥ तें निर्दैव्यासी पाहतां दिसती कोळसे ॥ तैसीचि पंढरी सुवर्णमय असे ॥ परी विकल्पें न दिसे सर्वथा ॥६८॥
संतीं मागें वर्णिली कथनीं ॥ म्यां तैसेंचि सांगितलें त्यालागोनी ॥ आतां दृष्टीसी न देखतां चक्रपाणी ॥ तरी मजलागोनि दंडील तो ॥६९॥
मग मी आपुला देईन प्राण ॥ परी असत्य होईल संतवचन ॥ पुढें पंढरीमाहात्म्य ऐकोनि सज्जन ॥ विश्वास मनीं न धरितील ॥७०॥
अनाथनाथा रुक्मिणीवरा ॥ ऐशा संकटीं पाव सत्वरा ॥ करुणा भाकितां द्विजअंतरा ॥ जगदुद्धारा जाणवलें ॥७१॥
म्हणे माझी कीर्ति वाखाणितां गहन ॥ ब्राह्मणाचा होतो अपमान ॥ तरी जैसें कथिलें आहे तयानें ॥ तैसेंचि दाखवणें लागेल ॥७२॥
ऐसा स्वमनीं करूनि विचार ॥ रुक्मिणीसी सांगे शारंगधर ॥ विद्यानगरींचा नृपववर ॥ येतो सत्वर दर्शना ॥७३॥
तरी जैसी होती द्वारकापुरी ॥ त्याहूनि विशेष आहे पंढरी ॥ नृपवरासी दाखवूं निमिषभरी ॥ संशय निवारूं तयाचा ॥७४॥
नाहीं तरी शिक्षा पावेल ब्राह्मण ॥ मग तो देईल आपुला प्राण ॥ आणी आपुले बिरुदासी येईल उणें ॥ संतसज्जन हांसतील ॥७५॥
वचन ऐकोनि जगज्जननी ॥ चरण नमस्कारी तये क्षणीं ॥ म्हणे वैकुंठींची रचना आणोनी ॥ रायासी ये क्षणीं दाखवीन ॥७६॥
ऐसी कल्पना करितां जाण ॥ तैसेचि जाहलें न लागतां क्षण ॥ तो मायालाघवी जगज्जीवन ॥ निजभक्तमहिमान वाढवी ॥७७॥
तों इकडे रामराजा चालतां सत्वर ॥ सन्निध उरलें पंढरपुर ॥ भयभीत होऊनि द्विजवर ॥ रुक्मिणीवर आळवीतसे ॥७८॥
मग सन्निध पाचारूनि द्विजा ॥ काय बोलतसे रामराजा ॥ आतां संशय न फिटतां माझा ॥ तरी अपमान तुझा करीन ॥७९॥
मग सन्निध वारण आणवूनि त्वरित ॥ अंबारींत बैसला नृपनाथ ॥ पंढरी विलोकितांचि त्वरित ॥ तों नवल अद्भुत देखिलें ॥८०॥
जैसा पौर्णिमेचा निशापती ॥ त्याभोंवतीं नक्षत्रें दिसतीं ॥ तेवीं देवालयाच्या कळसाभोंवती ॥ मंदिरें चमकती लखलखित ॥८१॥
हें कौतुक देखतां दृष्टीसी ॥ राजा विस्मित जाहला मानसीं ॥ म्हणे ब्राह्मणें कथिली जैसी ॥ पंढरी तैसी दिसताहे ॥८२॥
मग अनुताप धरूनि चित्तांत ॥ खालीं उतरला नृपनाथ ॥ नमस्कार साष्टांग घालूनि त्वरित ॥ विप्रासी बोलत तेधवां ॥८३॥
तुम्हीं सांगितलें जैशा रीतीं ॥ तैसेंचि दिसोनि येतसे पुढती ॥ मीं नेणतां अभिमान धरूनि निश्चितीं ॥ विकल्प चित्तीं धरियेला ॥८४॥
ऐसें बोलोनि नृपवर ॥ द्विजासी केला नमस्कार ॥ मग शुद्ध करूनि अभ्यंकर ॥ चरणीं सत्वर लागला ॥८५॥
ब्राह्मण विस्मय पावला चित्तीं ॥ म्हणे मज पावला रुक्मिणीपती ॥ हर्ष न मावे त्रिजगतीं ॥ गातसे कीर्ति सप्रेम ॥८६॥
भक्तांमाजी अग्रगणी ॥ एक पुंडलीक शिरोमणी ॥ त्याचे भेटीसी द्वारकेहूनी ॥ चक्रपाणी पातले ॥८७॥
सकळ तीर्थांत वरिष्ठ गंगा ॥ तीहूनि विशेष चंद्रभागा ॥ दर्शनेंचि पावन करी जगा ॥ अभिमान अंगा जडों नेदी ॥८८॥
मथुरा गोकुळ वृंदावन ॥ ये स्थळीं नदि जगज्जीवन ॥ द्वारकेंतही श्रीकृष्ण ॥ भक्तांकारण तिष्ठत ॥८९॥
परी या क्षेत्रींचें महिमान ॥ अनुपम दिसतसे मजलागून ॥ ऐसा ब्राह्मण निर्लज्ज होऊन ॥ गातसे गुण निजप्रीतीं ॥९०॥
टाळ मृदंग आणिनि त्वरित ॥ समारंभ करी नृपनाथ ॥ मिळवूनियां वैष्णवभक्त ॥ गजर करित स्वानंदें ॥९१॥
पुढें विलोकितांचि जाण ॥ तों कल्पतरूंचें लागलें वन ॥ खडे परीस चिंतामणीसमान ॥ लागतां रान पंढरीचें ॥९२॥
कामधेनूऐशा उदंड गायी ॥ भोंवत्या असती तये ठायीं ॥ राजा विस्मित होऊनि पाहीं ॥ म्हणे धन्य नवायी अगाध ॥९३॥
ब्राह्मणाचा धरूनि हात ॥ भूपति पुढें विलोकित ॥ तों पंढरीक्षेत्र लखलखित ॥ पाहतां दिपत नेत्रपातीं ॥९४॥
तरूंवरी बैसोनि पक्षियाती ॥ निजच्छंदें गायन करिती ॥ हंस मयूर नृत्य करिती ॥ सप्रेम गाती उल्हासें ॥९५॥
तपस्वी करिती अनुष्ठान ॥ ब्राह्मण करिती वेदाध्ययन ॥ विष्णुभक्त करिती कीर्तन ॥ मृदंग विणे घेऊनि ॥९६॥
ठायीं ठायीं सभा करूनि जाणा ॥ नृत्य करिती देवांगना ॥ तेणें तटस्थता येऊनि नयना ॥ विषयिक जना भुलविलें ॥९७॥
संत बैसोनि ठायीं ठायीं ॥ आत्मचर्चा बोलती पाहीं ॥ अनुभवें तल्लीन होऊनि तेही ॥ आलिंगन देती येरयेरां ॥९८॥
चंद्रभागेसी अष्टोत्तरश तीर्थें येऊनि मूर्तिमंत ॥ स्नान करूनि पावन होत ॥ दृष्टीस पाहात नृपनाथ ॥९९॥
एक कनकाचें रचून वृंदावन ॥ त्यावरी बैसविएलं रत्नकोंदण ॥ दिव्य लेवूनि वस्त्राभरण ॥ करिती पूजन नरनारी ॥१००॥
मग भीमरथींत करूनि स्नाना ॥ राजा चालिला देवदर्शना ॥ तों इंद्रादिदेव सकळ जाणा ॥ पंढरीराणा लक्षिती ॥१॥
अष्टसिद्धि सकळ दासी ॥ निजांगें राबती देवापासीं ॥ तयांमाजी अकस्मात राजाईसी ॥ रायें दृष्टीसी ओळखिलें ॥२॥
म्हणे विद्यानगरीं अर्चितों पूजनीं ॥ तेचि हे आमुची कुळस्वामिनी ॥ ती पंढरीस झाडीतसे अंगणीं ॥ विस्मित मनीं नृपनाथ ॥३॥
उदो शब्द म्हणोनि ते समयीं ॥ राजा तीस पुसे लवलाहीं ॥ म्हणे माते तूं किमर्थ ये ठायीं ॥ निजांगें पाहीं झाडितेसी ॥४॥
मग भवानी उत्तर देत तयासी ॥ तुवां व्यर्थचि अहंता धरिली मानसीं ॥ मजऐशा अनंता दासी ॥ येती पंढरीसी राबावया ॥५॥
या पुंडलिकाचें अंगणीं ॥ सकळ तीर्थें घालिती लोळणी ॥ मग पवित्र होऊनि तत्क्षणीं ॥ वाहाती पाणी निजांगें ॥६॥
विस्मित होऊनि नृपनाथ ॥ पुढें विलोकूनि जों पाहात ॥ तों नारद तुंबर येऊन तेथ ॥ कीर्तन करित देखिले ॥७॥
चतुर्भुजरूपें नारीनर ॥ अवघे दिसती साकार ॥ लोटांगण घाली नृपवर ॥ स्वानंदें निर्भर मानसीं ॥८॥
शंखचक्रादि आयुधें घेऊनी ॥ द्वारीं जय विजय तिष्ठती दोनी ॥ दिव्य पताका गगनीं ॥ चपळेऐशा झळकती ॥९॥
मागुती घालोनि दंडवत ॥ राजा प्रवेशला राउळांत ॥ तें तेज पाहतां नेत्र झांकत ॥ मग धरिला हस्त ब्राह्मणाचा ॥११०॥
तों सांवळा सुकुमार राजीव नयन ॥ पीतांबरधारी जगज्जीवन ॥ कमललोचन सुहास्यवदन ॥ स्वरूप सगुण देखिलें ॥११॥
जें योगियांचें निजध्यान ॥ हृदयीं ध्यातो पंचवदन ॥ तें स्वरूप वर्णितांचि जाण ॥ उपमा गौण दिसताहे ॥१२॥
अमृताची चवी सांगतां ॥ उपमा द्यावया रस कोणता ॥ तेवीं देवाधिदेव रुक्मिणीकांता ॥ दृष्टांतीं वर्णितां न ये कीं ॥१३॥
तरी दृष्टीसी देखती निजभक्तजन ॥ तेचि अनुभवें जाणती खूण ॥ येर्‍हवीं बुद्धिमंत करितां स्तवन ॥ पडलें मौन श्रुतीसी ॥१४॥
ऐसी निरुपम परब्रह्ममूर्ती ॥ प्रीतीनें आलिंगी भूपती ॥ स्वरूप न्याहाळूनियां दिठीं ॥ मग चरणीं मिठी घातली ॥१५॥
ब्राह्मणासी म्हणे रामराजा ॥ तूं सखा सद्गुरु जिवलग माझा ॥ काय उपकार आठवूं तुझा ॥ गरुडध्वजा भेटविलें ॥१६॥
तुवां जें कां कथिलें देख ॥ त्याहूनि कोटिगुणें अधिक ॥ दृष्टीं देखिला वैकुंठनायक ॥ सौख्य अनेक पावलों ॥१७॥
राजाई माझी कुलस्वामिनी ॥ तेही झाडितां देखिली अंगणीं ॥ इंद्रासमवेत सुर येऊनी ॥ कर जोडोनि तिष्ठती ॥१८॥
पंढरीऐसें क्षेत्र अद्भुत ॥ आणि पांडुरंगाऐसें वरिष्ठ दैवत ॥ चंद्रभागेऐसें पावन तीर्थ ॥ नाहीं दिसत त्रिभुवनीं ॥१९॥
घुंघरडें होतां उंबराआड ॥ तें म्हणे माझें हें ब्रह्मांड गाढ ॥ फोडोनि दाखवितां चहूंकडे ॥ होतसे वेडें निजमनीं ॥१२०॥
तैसेंचि जाहलें रायाकारण ॥ मग ब्राह्मणाचे धरिले चरण ॥ म्हणे मी वेष्टिलों होतों अविद्येकरून ॥ परी जाहलों पावन तुझेनि ॥२१॥
यापरी कौतुक दाखवूनि जाणा ॥ मग अदृश्य जाहली तितुकीही रचना ॥ तों मृत्तिकेच्या भिंती दिसती नयना ॥ आश्चर्य मनांत वाटात ॥२२॥
जैसें दाखविलें रायाप्रती ॥ तैसेंचि पंढरीक्षेत्र आहे निश्चितीं ॥ परी मनुष्यासी मृत्तिकेऐसी भासती ॥ निजकर्मगतीकरूनि ॥२३॥
सांप्रत आपणा जैसें दिसत ॥ तैसेंचि देखे नृपनाथ ॥ विस्मित होऊनि मनांत ॥ म्हणे चमत्कार बहुत देखिला ॥२४॥
राजा विचारी आपुलें मनीं ॥ आतां व्यर्थ कासया पूजावी भवानी ॥ सन्निध क्षीरसागर टाकूनी ॥ सरिताजीवनीं कां न्हावें ॥२५॥
अमृतसरोवर देखिल्या पाहीं ॥ दिव्य औषधी कासया घ्यावी ॥ कल्पतरु सन्निध असोनि पाहीं ॥ बाभूळछायीं कां बैसावें ॥२६॥
हातींचा परिस टाकोनियां ॥ धातुवादी व्हावें कासया ॥ कामधेनु गृहासी आलिया ॥ अजा कासया पूजावी ॥२७॥
गृहीं प्रकटतां सूर्यनारायण ॥ मग दीप कासया सरसावणें ॥ तेवीं जाहलिया पांडुरंगदर्शन ॥ देवीउपासन कासया ॥२८॥
ऐसीं म्हणोनि रामराजा ॥ प्रार्थीतसे गरुडध्वजा ॥ म्हणे देवाधिदेवा वैकुंठराजा ॥ मनोरथ माझा पुरवीं कां ॥२९॥
चित्तीं हेत आहे ऐसा मजला ॥ कीं विद्यानगरासी न्यावें तुजला ॥ आतां अभय देऊनि शरणागताला ॥ सत्वर चला देवराया ॥१३०॥
देव म्हणे भूपतीवरी ठेवितां मजसी ॥ तरी तेथेंचि राहीन निश्चयेंसीं ॥ कांहीं अन्याय घडतां तुजसी ॥ मागुती पंढरीसी येईन ॥३१॥
ऐसें सांगतां चक्रपाणी ॥ राजा हर्षला आपुलें मनीं ॥ म्हणे स्थळीस्थळीं डांक ठेवूनी ॥ जाईन घेऊनि देवासी ॥३२॥
पंढरीक्षेत्रापासूनि जाण ॥ विद्यानगरापर्यंत तेण ॥ दां भागीं मनुष्यें उभीं करून ॥ मूर्ति काढून नेतसे ॥३३॥
पुजारी ब्राह्मण निवांत ठायीं ॥ बूपतीसीं बळ न चले कांहीं ॥ मूर्ति उचलोनि लवलाहीं ॥ हातोहातीं चालिले ॥३४॥
विद्यानगरासी नेऊनि सवेग ॥ तेथें स्थापिला पांडुरंग ॥ नानापरींचे उपचारभोग ॥ राजा निजांगें करीतसे ॥३५॥
इकडे यात्रेसी आषाढमासीं ॥ वैष्णव आले पंढरीसी ॥ तेथें मात ऐकिली ऐसी ॥ कीं विद्यानगरासी देव गेले ॥३६॥
उदास दिसे पंढरपुर ॥ जैसें प्राणावांचोनि शरीर ॥ कीं सरितेमाजी नसतां नीर ॥ जेवीं भयासुर वाटे ते ॥३७॥
कीं नृपावांचोनि सैन्यसंपत्ती ॥ कीं चंद्रावांचोनि नक्षत्रजाती ॥ नातरी भ्रताराविण पतिव्रता सती ॥ निढळ दिसती जनांत ॥३८॥
तेवीं विद्यानगरासी गेलिया हरी ॥ अवघी उदास दिसे पंढरी ॥ संतमहंत गरुडपारीं ॥ येऊनि सत्वरीं बैसले ॥३९॥
म्हणती कोणाचें करावें कीर्तन ॥ आम्हांसी टाकिलें जगज्जीवनें ॥ पुंडलीकासी दिधलें वरदान ॥ तें असत्य वचन जाहलें कीं ॥१४०॥
भाविक भक्त आले सर्व ॥ म्हणाती काय जाहला पंढरीराव ॥ विद्यानगरासी गेले देव ॥ कळला अभिप्राव सकळांसी ॥४१॥
संतसाधु वैष्णवजन ॥ एकमेकांसी बोलती वचन ॥ विद्यानगरासी कोणी जाऊन ॥ रुक्मिणीरमण आणावा ॥४२॥
ऐसें एकमेकांसी बोलती वचन ॥ परी कोणीच न देती आश्वासन ॥ म्हणती पुंडलीकासी गेला उपेक्षून ॥ तो आमुचेन न ये सर्वथा ॥४३॥
एक बोलती प्रत्युत्तरीं ॥ आमुचा प्रवेश नोहे राजमंदिरीं ॥ नृपास वृत्तांत कळेल जरी ॥ तरी शिक्षा बरी करील कीं ॥४४॥
एक दाविती निर्गुणभाव ॥ आपुले देहींच आहे देव ॥ चित्तीं नसतांचि अनुभव ॥ बोलती वाव आत्मज्ञानी ॥४५॥
एक म्हणती ईश्वरइच्छेन ॥ जें जें जैसें येईल घडोन ॥ तें तें दृष्टीं पाहावें आपण ॥ तळमळ कोणी न करावी ॥४६॥
त्यांत भानुदास वैष्णवभक्त ॥ प्रतिज्ञा करूनि काय बोलत ॥ मी घेऊनि येतों रुक्मिणीकांत ॥ नाहीं तरी जीवित न ठेवीं ॥४७॥
ऐसें बोलोनि तयांप्रति ॥ तेथोनि निघाला सत्वरगती ॥ विद्यानगरासी जाऊन रातीं ॥ लोकांप्रति पुसतसे ॥४८॥
पंढरीहूनि पांडुरंगमूर्ती ॥ येथें घेऊनि आला नृपती ॥ ते कोठें स्थापिली निश्चितीं ॥ सांगा मजप्रति लवलाहें ॥४९॥
राजयाच्या भयेंकरून ॥ कोणी यथार्थ न सांगती वचन ॥ आम्हांसी विदित नाहें म्हणोन ॥ प्रतिवचन बोलती ॥१५०॥
मग भानुदास पुसती एकांती ॥ त्यांस सांगितलें वैष्णवभक्तीं ॥ मंदिरीं ठेवूनि रुक्मिणीपती ॥ पूजी एकांती नृपनाथ ॥५१॥
राजा करूनि गेलिया पूजन ॥ मग आणिकासी नव्हे दर्शन ॥ कपाटें कुलुपें घालून ॥ द्वारपाळ रक्षणा ठेविले ॥५२॥
ऐसी ऐकोनियां मात ॥ भानुदास झाला हर्षयुक्त ॥ मग अर्धरात्र लोटतांचि त्वरित ॥ झाले निद्रित सकळिक ॥५३॥
द्वारापासीं येतांचि जाण ॥ कुलुपें गळालीं न लागतां क्षण ॥ भानुदास आंत प्रवेशोन ॥ घातलें नमन साष्टांग ॥५४॥
स्वरूप दृष्टीं न्याहाळून ॥ आलिंगन दिधलें प्रीतीकरून ॥ कंठ सद्गदित होऊन ॥ देवासी विनवण करीतसे ॥५५॥
म्हणे लक्ष्मीकांता वैकुंठवासिया ॥ पुंडलिकवरदा यादवराया ॥ आम्हांवरील लोभ सांडोनियां ॥ जाहलासी रायास्वाधीन ॥५६॥
पुंडलिकासी दिधलें वरदान ॥ कीं कदापि न जाईं येथून ॥ तें तुझें आतां अभयवचन ॥ असत्य दिसोन आलें कीं ॥५७॥
आम्हां दुर्बळांची नावडे पूजा ॥ येथें उपचार करितो राजा ॥ तें सुख मानोनि अधोक्षजा ॥ गरुडध्वजा राहिलासी ॥५८॥
दिव्य वस्त्रें आणि आभरण ॥ नैवेद्यासी अनेक पक्वान्न ॥ यालागीं दुर्बळांचें स्मरण ॥ तुजकारण नव्हे कीं ॥५९॥
रुक्मिणी राधा सत्यभामा ॥ इतुक्यांसी सांडोनि पुरुषोत्तमा ॥ रामरायें तुज लावूनि प्रेमा ॥ मेघश्यामा चालविले ॥१६०॥
सांडोनियां पंढरपुर ॥ वसतें केलें विद्यानगर ॥ वाट पाहाती ऋषीश्वर ॥ भक थोर तिष्ठती ॥६१॥
रंभा तिलोत्तमा उर्वशी मेनका ॥ सेवेसी येती अष्टनायिका ॥ सांडोनियां विधिजनका ॥ बैसलासी निका ये ठायीं ॥६२॥
कीं आमुचें पदरीं दोष दारुण ॥ पळोनि आलासी तयाभेण ॥ कीं तुज मागतसों प्रेमदान ॥ म्हणोनि पळून आलासी ॥६३॥
कीं कीर्तनाचा होतो गलबला ॥ तेणें निद्रा न लागेचि तुजला ॥ म्हणोनि एकांतीं ठाव पाहिला ॥ कळलें मजला यथार्थ ॥६४॥
कीं यात्रा मिळते असंख्यात ॥ तयांसी भेटतां शिणसी बहुत ॥ मग येऊनि विद्यानगरांत ॥ घेतोसी विश्रांति या ठायीं ॥६५॥
ऐकोनि भानुदासाचें वचन ॥ काय बोलतसे जगज्जीवन ॥ तूं बोलतोसी उदासवचन ॥ विचार मनीं न करितां ॥६६॥
मज न रुचती नाना उपचार ॥ वस्त्रें भूषणें अलंकार ॥ कधीं देखेन भीमातीर ॥ म्हणोनि अंतर झुरतसे ॥६७॥
रायें आणोनि मजलागूनी ॥ येथें घातलें बंदिखानीं ॥ तुम्हींही निष्ठुर होऊनि मनीं ॥ परत कोणीं न केली ॥६८॥
ऋद्धिसिद्धि चारी मुक्ती ॥ मी देत होतों तुम्हांप्रती ॥ परी त्यांसी अव्हेरूनि निश्चितीं ॥ भजन प्रीतीं करीतसां ॥६९॥
याविरहित तों मजपसीं ॥ कांहींचि न दिसे द्यावयासी ॥ सेवा ऋण न फिटे मजसीं ॥ म्हणोनि तुम्हांसी टाकिलें ॥१७०॥
ऐसें बोलोनि रुक्मिणीकांत ॥ कंठ जाहला सद्गदित ॥ आनंदाश्रु नेत्रीं वाहात ॥ दोघेही स्फुंदत निजप्रेमें ॥७१॥
भानुदासासी जगज्जीवनें ॥ मागुती दिधलें आलिंगन ॥ म्हणे प्रातःकाळीं करितां पूजन ॥ देईन दर्शन तुजलागीं ॥७२॥
मग नवरत्नांचा काढोनि हार ॥ भानुदासासी देत शारंगधर ॥ म्हणे आतां बिर्‍हाडासी जाईं सत्वर ॥ येईल नृपवर दर्शना ॥७३॥
बाहेर येतांचि भानुदास ॥ कुलुपें बैसलीं कवाडास ॥ अणुमात्र न कळतां कोणास ॥ निजभक्तास भेटला ॥७४॥
प्रातःकाळीं उठोनि नृपती ॥ स्नान केलें सत्वरगती ॥ देवासी नमन करूनि प्रीतीं ॥ कांकडआरती करीतसे ॥७५॥
तों कंठीं न दिसे रत्नहार ॥ पूजार्‍यासी पुसिलें सत्वर ॥ म्हणे येथें कोण आला तस्कर ॥ म्हणोनि नृपवर क्रोधावला ॥७६॥
तयांसी ताडन करूनि बहुत ॥ म्हणे हार त्वरित आणिजे येथ ॥ अमूल्य रत्नें न मिळती निश्चित ॥ पृथ्वी समस्त धुंडिती ॥७७॥
ऐसी आज्ञा होतांचि सत्वर ॥ झाडा घेती घरोघर ॥ परी कोठेंचि न दिसे हार ॥ मग पाहाती बाहेर तस्करासी ॥७८॥
तों गंगातीरीं स्नान करूनी ॥ भानुदास बैसले नामस्मरणीं ॥ राजदूत पाहती विलोकूनी ॥ तों हार दुरूनि देखिला ॥७९॥
म्हणती सांपडला ते तस्कर ॥ आतां यास धरावा सत्वर ॥ अकस्मात बांधोनि वैष्णववीर ॥ चालिले किंकर रायाचे ॥१८०॥
नगरांत आणितां त्याकारण ॥ देखोनि हांसती सकळ जन ॥ म्हणती हा भोंदावया जनांकारण ॥ संत होऊन हिंडतो ॥८१॥
देवावरी हात घातला पाहें ॥ तो मनुष्यासी भियेल काय ॥ कसाबासी भेटतां कपिला गाय ॥ तो पूजील काय तिजलागीं ॥८२॥
ऐसें नानापरींचे त्रिविध जन ॥ भानुदासासी निंदिती देखोन ॥ परी तो खेद न करी जाण ॥ नामस्मरण करीतसे ॥८३॥
एक म्हणती मैंदाचिया गळां ॥ अहाना बोलती तुळसीमाळा ॥ तो आजि प्रत्यक्ष देखिला डोळां ॥ हार चोरिला येणेंचि ॥८४॥
नवरत्नांचा हार घेऊन ॥ दूतांनीं रायासी दिधला नेऊन ॥ म्हणती तस्कर आणिला बांधोन ॥ तयासी दंड कोण करावा ॥८५॥
सक्रोध बोले नृपवर ॥ त्यास शूलावरी घाला सत्वर ॥ कोण कैसा पाहावा तस्कर ॥ ऐसा विचार न केला ॥८६॥
भानुदास दूतांसी बोले वचन ॥ माझें तंव सन्निध आलें मरण ॥ शेवटीं पांडुरंगाचें दर्शन ॥ मजकारण करवावें ॥८७॥
त्यांत कोणी होते सज्जन ॥ त्यांस मानलें त्याचें वचन ॥ मग रायासी आज्ञा मागून ॥ गेले घेऊन देउळासी ॥८८॥
भानुदास म्हणे देवाप्रती ॥ मी न्यावयासी आलों एकांतीं ॥ म्हणोनि योजिली ऐसी युक्ती ॥ आणि नृपाहातीं दंडविलें ॥८९॥
जो न्यावया येईल तुजकारण ॥ त्याचा ऐसाच घ्यावा प्राण ॥ मग राजमंदिरीं विलास भोगून ॥ सुखें राहावें या ठायीं ॥१९०॥
ऐसा विचार करूनि घननीळा ॥ मग हार घातला माझिया गळां ॥ ऐसें बोलतां तये वेळां ॥ अश्रु डोळां लोटले ॥९१॥
परी शतसहस्र जन्मांअंतीं । तुज मी न सोडीं रुक्मिणीपती ॥ ऐसें बोलोनि मागुतीं ॥ नमन प्रीतीं घातलें ॥९२॥
दूत म्हणती ते अवसरीं ॥ आतां ऊठ गा चाल झडकरी ॥ आधींच केली नसती चोरी ॥ तरी ऐसी परी कां होती ॥९३॥
ऐसें म्हणोनि सत्वर ॥ भानुदासासी काधिलें बाहेर ॥ शूळ देऊनि खांद्यावर ॥ माथां शेंदूर घातला ॥९४॥
कौतुक पाहावया सत्वरीं ॥ अमित मिळाल्या नरनारी ॥ मग नेऊनि नगराबाहेरी ॥ शूळ झडकरी रोंविला ॥९५॥
उचलूनि जों घालावें वरी ॥ तों भानुदास देवातें विनंति करी ॥ म्हणे आकाश कडकडोनि पडो मजवरी ॥ तरी तुज अंतरीं आठवीन ॥९६॥
सप्तसमुद्र समरस जाहलिया ॥ तरी तुज न सोडीं देवराया ॥ तुजकरूनि नाशवंत काया ॥ ओवाळूनियां सांडिली ॥९७॥
लया जाईल सकळ क्षिती ॥ आणि पंचभूतेंही प्रळय पावती ॥ तैं तुजवांचूनि रुक्मिणीपती ॥ आणिक सांगाती असेना ॥९८॥
वडवानल खाईल त्रिभुवन ॥ तैं तूं माझा जिवलग प्राण ॥ भानुदासाचा निश्चय देखोन ॥ जगज्जीवन पावले ॥९९॥
तंव नवल वर्तलें अति अद्भुत ॥ तें सादर परिसा भाविक भक्त ॥ शूळ रोंविला होता जेथ ॥ त्यासी पल्लव अकस्मात फूटले ॥२००॥
फुलें फळें आलीं बहुत ॥ राजासी जाऊनि सांगती मात ॥ म्हणती तो आहे वैष्णवभक्त ॥ पंढरीनाथ पावला तया ॥१॥
शूळाचा वृक्ष जाहला सत्वर ॥ राजासी सांगते जाहले किंकर ॥ वचन ऐकूनियां नृपवर ॥ आश्चर्य थोर करीतसे ॥२॥
पाहावयासी येतां त्वरित ॥ तंव दृष्टीसी देखिलें साक्षात ॥ मग अनुताप पावला चित्तांत ॥ म्हणे अन्याय बहुत मज घडला ॥३॥
भानुदासासी नमस्कार प्रीतीं ॥ सद्भावें घालीतसे नृपती ॥ म्हणे अपराध घडला मजप्रती ॥ विवेक चित्तीं न करितां ॥४॥
मग रामरायें भानुदासाप्रती ॥ देउळीं नेलें सत्वरगती ॥ दृष्टीसी देखतां पांडुरंगमूर्ती ॥ सद्गदित कंठीं जाहला ॥५॥
चरणीं मिठी घालितांचि जाण ॥ उचलोनि धरी जगज्जीवन ॥ भानुदासासी म्हणे रुक्मिणीरमण ॥ मजकारण शिणलासी ॥६॥
आतां मज घेऊनि खांद्यावरी ॥ पंढरपुरासी चाल सत्वरी ॥ तेथें पुंडलिकाचें द्वारीं ॥ निरंतर वसेन ॥७॥
रामराजा धरीतसे पाय ॥ मज उपेक्षूनि जातां काय ॥ देव म्हणती तुझा अन्याय ॥ घडोनि आला अनायसें ॥८॥
कांहीं तुझें होतें सुकृत ॥ म्हणोनि होतों दिवस बहुत ॥ आतां माझें रूप हृदयांत ॥ आठवीं नित्य सप्रेम ॥९॥
भानुदास म्हणे रुक्मिणीकांता ॥ कैसा उचलसील मज आतां ॥ माझी तों नाहीं राजसत्ता ॥कीं मेळवूनि बहुतां तुज न्यावें ॥२१०॥
ऐकोनि म्हणे दीनदयाळ ॥ मी तुझे स्वाधीन जाहलों केवळ ॥ आतां माझी सत्ता आहे सकळ ॥ ते तुझीचि असे निजभक्ता ॥११॥
ऐसें म्हणोनि जगज्जीवन ॥ तत्काळ रूप धरीतसे सान ॥ भानुदासासी बोले वचन ॥ सांबळींत घालोन मज नेईं ॥१२॥
मग गवाळें आणोनि तये क्षणीं ॥ त्यांत बांधिले चक्रपाणी ॥ ऐसी ऐकोनियां वाणे ॥ आशंकित मनीं न व्हावें ॥१३॥
जैसें आकाश विस्तीर्ण आहे बहुत ॥ परी घटीं पाहतां तेवढेंचि होत ॥ तेवीं भक्तलीलेसी वैकुंठनाथ ॥ सूक्ष होत निजप्रीतीं ॥१४॥
कीं अफात समीर आहे बहुत ॥ परी विंझणा हलवितां तैसाचि होत ॥ तेवीं भक्तां स्वाधीन रुक्मिणीकांत ॥ तैसाचि होत निजछंदें ॥१५॥
मागें कृष्णावतारीं यशोदा घुसळितां ॥ जो डेरियामाजी लागला तिच्या हातां ॥ तो भानुदासाच्या गवळ्यांत जातां ॥ संशय कोणता आणावा ॥१६॥
जो अनंत घटीं व्यापूनि जाण ॥ तैसाचि दिसे थोर सान ॥ अणुरेणूंपरीस लहान ॥ ज्ञानदृष्टीनें दिसताही ॥१७॥
तो भानुदासाचे आवडीसाठीं ॥ सांबळींत मावला जगजेठी ॥ खांद्यावरी घेऊनि उठाउठी ॥ सत्वरगती जातसे ॥१८॥
मंजुळ शब्द गवाळ्यांतून ॥ भक्तांसी बोले जगज्जीवन ॥ धन्य आजिचा उगवला सुदिन ॥ संतसज्जन भेटतील ॥१९॥
पद्मालयासी आले भानुदास ॥ तेथें खाली ठेविला जगन्नीवास ॥ आपण लागले स्नानास ॥ हर्ष चित्तास वाटला ॥२२०॥
इकडे सांबळींत होते रुक्मिणीवर ॥ ते एकाएकीं झाले थोर ॥ वरील पूड मस्तकावर ॥ तळींचा चूर झाला कीं ॥२१॥
भानुदास येऊनि जंव पाहे ॥ म्हणे देवाधिदेवा हें केलें काये ॥ थोर झालासी लवलाहें ॥ आतां उचलसील काय मजलागीं ॥२२॥
मग म्हणे रुक्मिणीवर ॥ तूं पुढें जाऊन सांग सत्वर ॥ नानावाद्यांचा करूनि गजर ॥ येतील सामोरे संतसाधु ॥२३॥
सुदिनघटिका आजिचे दिनीं ॥ मज बैसवावें सिंहासनीं ॥ ऐसें बोलतां चक्रपाणी ॥ भानुदास तेथोनि निघाला ॥२४॥
तों गरुडपारीं वैष्णवभक्त ॥ अवघे बैसले चिंताक्रांत ॥ म्हणती भानुदासासी दिवस लागले बहुत ॥ परी रुक्मिणीकांत नये कीं ॥२५॥
तों अकस्मात भक्त विजयी ॥ हास्यवदन त्यांहीं पाहीं ॥ येतां देखिला लवलाहीं ॥ म्हणती शेषशायी आणिला ॥२६॥
संतांसी क्षेम देऊनि त्वरित ॥ म्हणे पद्मालयासी आले रुक्मिणीकांत ॥ ऐसी ऐकोनि हर्षमात ॥ संतोषे चित्त सकळांचें ॥२७॥
दिंडी पताका घेऊनि सत्वर ॥ सामोरे चालिले वैष्णववीर ॥ टाळमृदंगांचा गजर ॥ वाद्यें अपार वाजती ॥२८॥
पुजारी आणि लोकपाळ ॥ नरनारी सामोरे जाती सकळ ॥ पद्मालयासी येतां ते वेळ ॥ देखिला घननीळ दृष्टीसी ॥२९॥
सकळीं घालोनि दंडवत ॥ देवासी आलिंगन देऊनि त्वरित ॥ रथावरी बैसवोनि रुक्मिणीकांत ॥ चालिले मिरवत संभ्रमें ॥२३०॥
संत गर्जती गुणानुवाद ॥ त्यांपुढें नट नाचती छंद ॥ भेरी वाजंत्रांचा नाद ॥ वाटतो आनंद सकळांसी ॥३१॥
तो समारंभ वर्णितां वाचेसीं ॥ दृष्टांत न पुरे द्यावयासी ॥ आतां प्रत्यक्ष कार्तिकमासीं ॥ पाहाती दृष्टीसी वारकरी ॥३२॥
रथोत्साह पौर्णिमेसी होत ॥ तेचि उपमा तया सरत ॥ तैशाचपरी पंढरीनाथ ॥ येती मिरवत निजछंदें ॥३३॥
येतां चंद्रभागेचे तीरीं ॥ तंव ते पुढारी येत सामोरी ॥ देवासी स्नान घालोनियां झडकरी ॥ मग महाद्वारीं चालिले ॥३४॥
रथाखालीं उतरून सांवळी मूर्ती ॥ शिबिकेंत घातली हातोहातीं ॥ देवालयीं नेऊन सत्वरगती ॥ मग अभिषेक करिती मधुपर्क ॥३५॥
ब्राह्मण बोलती मंत्रघोष ॥ कीर्तनीं गर्जती वैष्णवदास ॥ सिंहासनीं बैसे जगन्निवास ॥ धन्य दिवस सुदिन तो ॥३६॥
वस्त्रालंकारभूषण ॥ षोडशोपचारें केलें पूजन ॥ पक्वान्न नैवेद्य अर्पून ॥ मंगलारती पैं केली ॥३७॥
पुष्पांजलि मंत्रघोष ॥ पुजारी समर्पिती देवास ॥ संत वैष्णव यात्रेकर्‍यांस ॥ वाटला उल्हास तेधवां ॥३८॥
नरनारी मिळोनि समस्त ॥ भानुदासाचें स्तवन करित ॥ म्हणती याच्या योगें वैकुंठनाथ ॥ आले पंढरींत मागुती ॥३९॥
एक शर्करा नगरांत वांटिती ॥ एक पक्वान्नभोजन विप्रां घालिती ॥ क्षेत्रवासी लोकांप्रती ॥ आनंद चित्तीं वाटला ॥२४०॥
जैसा चतुर्दशवर्षें वनवास कंठोन ॥ अयोध्येसी आला रघुनंदन ॥ नगरवासी आनंदले जन ॥ तैसेंचि झालें तयांसी ॥४१॥
कीं अवर्षणीं अहाळला होता पवत ॥ त्यावरी मेघ वर्षला अपरिमित ॥ पंढरीचे लोक समस्त ॥ संतोष मानीत या रीतीं ॥४२॥
कीं अगस्तीच्या पोटांतूनी ॥ समुद्र निघाला देखूनि नयनीं ॥ मग मेघांसी उल्हास वाटला मनीं ॥ तैसीचि करणी झाली कीं ॥४३॥
नातरी वसंतकाळ येतांचि त्वरित ॥ वनस्पती दिसती सुशोभित ॥ तेवीं पंढरीसी येतां अनाथनाथ ॥ लोक समस्त आनंदले ॥४४॥
कीं शरीरांतील परतला प्राण ॥ मग इंद्रियें वर्तती सावधान ॥ पंढरीचे सकळही जन ॥ तैशाचिपरी जाहले ॥४५॥
पुढीले अध्यायीं कथा सुरस ॥ ऐकतां यश जोडे निर्दोष ॥ म्हणूनि भक्त हो सावकाश ॥ जोड करा हेचि पैं ॥४६॥
हें सात्त्विक भक्तांचें महीमान ॥ वाढविता श्रीरुक्मिणीरमण ॥ महीपती त्याचा बंदीजन ॥ गातो सद्गुण कीर्तनीं ॥४७॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ त्रिचत्वारिंशाध्याय रसाळ हा ॥२४८॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ श्रीभक्तविजय त्रिचत्वारिंशाध्याय समाप्त ॥

श्री भक्तविजय

Shivam
Chapters
॥ मंगलाचरणम् ॥ आरती श्रीविठ्ठलाची, प्रार्थना - आरती श्रीविठ्ठलाची युगें ... अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७