Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय ३९

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥    
ऐका श्रोते सावकाश ॥ पंढरीक्षेत्र दक्षिणेस ॥ तेथूनियां सात कोस ॥ मंगळवेढें ग्राम पैं ॥१॥
तेथील वेश्या कलावंतीण ॥ श्यामा तिचें नामाभिधान ॥ तिचें पोटीं दिव्य रत्न ॥ कान्होपात्रा जन्मली ॥२॥
तिचें लावण्य पाहातां जाण ॥ देवांगना होतील लज्जायमान ॥ मृत्युलोकीं तिजसमान ॥ नाहीं विधीनें निर्मिली ॥३॥
बाळपणीं ते अबला ॥ गायन शिकली नृत्यकला ॥ रंभा तिलोत्तमा मेनका सकळा ॥ पाहतां डोळां लज्जित ॥४॥
माता म्हणे कन्येसी ॥ चाल जाऊं राजद्वारासी ॥ अलंकार देईल तुजसी ॥ रुपलावण्य देखोनि ॥५॥
ते म्हणे वो जननी ॥ मजयोग्य पुरुष सुंदर कोणी ॥ धुंडितां न दिसेचि नयनीं ॥ जाणसी मनीं आपुल्या ॥६॥
मजहूनि लावण्य कोटिगुणीं ॥ असल्या वरीन त्यालागोनी ॥ ऐसा निश्चय करूनि मनीं ॥ कान्होपात्रा राहिली ॥७॥
मृत्युलोकींचे पुरुष समस्त ॥ माते ते मज ऐसे भासत ॥ जैसें सूर्यापुढें खद्योत ॥ तैसें दिसत मजलागीं ॥८॥
तंव कोणे एके अवसरीं ॥ यात्रा जातसे श्रीपंढरी ॥ गरुडटके निशान भेरी ॥ वैष्णव गजरीं गाताती ॥९॥
कान्होपात्रा तयांस देखोन ॥ संतांसी घाली लोटांगण ॥ कोठें जातां वैष्णवजन ॥ दया करून मज सांगा ॥१०॥
ते म्हणती पंढरीसी ॥ आम्ही जातों यात्रेसी ॥ तेथें आला वैकुंठवासी ॥ पुंडलिकाकारणें ॥११॥
कान्होपात्रा पुसे संतांसी ॥ कैसा आहे वैकुंठवासी ॥ ते म्हणती ब्रह्मादिकांसी ॥ त्याचा महिमा न वर्णवे ॥१२॥
उदार धीर सुंदर पूर्ण ॥ लक्ष्मीहूनि कोटिगुण ॥ चंद्रसूर्यादि तारागण ॥ जयाचे तेजें राहाटती ॥१३॥
कान्होपात्रा म्हणे संतांसी ॥ ऐसा सांगतां हृषीकेशी ॥ जरी मी शरण गेलें तयासी ॥ तरी अंगीकारासी करील कीं ॥१४॥
ते म्हणती कुब्जा कंसदासी ॥ कुरूप हीन मथुरेसी ॥ कृष्णें अंगीकारूनि तियेसी ॥ आपुल्याऐसी ते केली ॥१५॥
अजामिळ चोखामेळ ॥ त्याचा अंगीकार करी तत्काळ ॥ पतितपावन दीनदयाळ ॥ तो घननीळ म्हणवीतसे ॥१६॥
ऐसें ऐकूनि संतवचन ॥ कान्होपात्रा घरास गेली त्वरेन ॥ मातेसी म्हणे नमन करून ॥ पंढरीस मी जातें ॥१७॥
मग वीणा घेऊनियां करीं ॥ सप्रेम गायन करी ते सुंदरी ॥ कान्होपात्रा आली ते अवसरीं ॥ श्रीहरीचे गुण वर्णित ॥१८॥
महाद्वारीं लोटांगण ॥ कान्होपात्रा घाली प्रेमेंकरून ॥ म्हणे तुझी कीर्ति ऐकून ॥ आलें शरण श्रीविठ्ठला ॥१९॥
उदार धीर सुंदर पूर्ण ॥ षड्गुणऐश्वर्यलक्षण ॥ तुझ्या ठायीं वसती म्हणोन ॥ आलें शरण श्रीविठ्ठला ॥२०॥
अजामिळ गणिका जाण ॥ तुवां उद्धरिलीं येतां शरण ॥ संतीं सांगितलें म्हणोन ॥ आलें शरण श्रीविठ्ठला ॥२१॥
लौकिक काम देहाभिमान ॥ माझे ठायीं होता जान ॥ सर्व त्यजोनि तुजकारण ॥ आलें शरण श्रीविठ्ठला ॥२२॥
आतां मजलागीं अंगीकारीं ॥ शरण आलें तुज श्रीहरी ॥ म्हणोनि माथा चरणांवरी ॥ कान्होपात्रा ठेवितसे ॥२३॥
हरिरूप धरून मानसीं ॥ कान्होपात्रा राहिली पंढरीसी ॥ महाद्वारीं सद्भावेंसीं ॥ श्रीहरिगुण वर्णीतसे ॥२४॥
तंव कोणे एके अवसरीं ॥ एक होता दुराचारी ॥ त्यानें जाऊनि बेदरीं ॥ रायापासीं सांगितलें ॥२५॥
म्हणे पंढरपुरीं महाद्वारीं ॥ एक गणिका आहे सुंदरी ॥ तिजसारखी आणिक नारी ॥ मृत्युलोकीं असेना ॥२६॥
कांहीं नसतां अपराधासी ॥ धीवर मारी जळचरांसी ॥ तैसें सज्जनदुर्जनांसी ॥ अखंड वैर चालतसे ॥२७॥
निरपराधें श्वापदांसी ॥ पारधी विंधोनि वधी त्यांसी ॥ तैसें दुर्जनसज्जनांसीं ॥ अखंड वैर चालतसे ॥२८॥
व्याघ्र देखोनि मनुष्यासी ॥ ग्रासूं पाहे सक्रोध मानसीं ॥ तैसें दुर्जनसज्जनांसीं ॥ वैर मानसीं सर्वदा ॥२९॥
अपराध नसतां निद्रितासी ॥ ढेंकूण डसती मनुष्यासी ॥ तैसें दुर्जन सज्जनासीं ॥ वैर मानसीं सर्वदा ॥३०॥
अन्याय केला नसतां जाण ॥ रायासी सांगे जाऊनि दुर्जन ॥ ऐकूनि पंढरीसी त्यानें ॥ दूत पाठविले तत्काळ ॥३१॥
कान्होपात्रा महाद्वारीं ॥ सप्रेम भावें कीर्तन करी ॥ तों राजकिंकर येऊनि सत्वरीं ॥ तिजकारणें बोलती ॥३२॥
म्हणती बेदरासी चाल सत्वर ॥ नातरी करूनि नेऊं बलात्कार ॥ ते म्हणे देवासी नमस्कार ॥ करूनि सत्वर येतसें ॥३३॥
सभामंडपीं उभे दूत ॥ कान्होपात्रा गेली राउळांत ॥ कर जोडोनि विनवीत ॥ बहु विनीत होऊनि ॥३४॥
म्हणे पुंडलीकवरदा पांडुरंगा ॥ मी तुझीच म्हणवितें श्रीरंगा ॥ आतां मोकलितां भवभंगा ॥ उणें कोणासी येईल ॥३५॥
म्यां तुझें म्हणविल्यावरी ॥ रायें धरूनि नेलिया बेदरीं ॥ पंढरीनिवासा श्रीहरी ॥ उणें कवणासी येईल ॥३६॥
गजेंद्राची ऐकोनि करुणा ॥ सतर पावलासी जगज्जीवना ॥ मज मोकलितां करुणाघना ॥ उणें कवणासी येईल ॥३७॥
कपोती संकटीं पडतां जाण ॥ तुवां टाळिलें तिचें विघ्न ॥ आतां मज देतां अव्हेरून ॥ उणें कवणासी येईल ॥३८॥
श्वापद हरिणी पडली फांसा ॥ स्मरतां पावलांसी हृषीकेशा ॥ मज मोकलितां पंढरीशा ॥ उणें कवणासी येईल ॥३९॥
दुर्वासें छळितां अंबरीषा ॥ त्याचे गर्भवास तूं सोशिसी ॥ आतां नेतां बेदरासी ॥ उणें कवणासी येईल ॥४०॥
अजामिळ आणि चोखा महार ॥ यांचा केला अंगीकार ॥ आतां माझा करितां अव्हेर ॥ उणें कवणासी येईल ॥४१॥
कढईंत घातलें मंडूकबाळ ॥ स्मरतां पावलासी तत्काळ ॥ मज मोकलितां ऐसिया वेळ ॥ उणें कवणासी येईल ॥४२॥
तुझें स्वरूपीं जडलें मन ॥ मज स्पर्शिताति हे दुर्जन ॥ तरी देवा तुजकारण ॥ संत सज्जन हांसतील ॥४३॥
ऐसें भाकितांचि करुणावचन ॥ कृपेनें द्रवला नारायण ॥ तिचें चैतन्य काढून ॥ आपुलें स्वरूपीं मेळविलें ॥४४॥
संत पुजारी सन्निध होते ॥ त्यांनीं तत्काळ देखिलें तेथें ॥ कान्होपात्रेसी कृपावंतें ॥ जानूमाजी घातलें ॥४५॥
कान्होपात्रा जिराली मांडीवरी ॥ ते साक्ष आहे अद्यापिवरी ॥ भावें जाताती जे पंढरी ॥ ते आवडीं पाहताती ॥४६॥
तिचें प्रेत अवसरीं ॥ नेऊनि पुरिलें दक्षिणद्वारीं ॥ त्याचा वृक्ष ते अवसरीं ॥ तरटीझाड उगवलें ॥४७॥
असो बेदराहूनि आले दूत ॥ सभामंडपीं ते तिष्ठत ॥ पुजार्‍यांसी तेव्हां पुसत ॥ कान्होपात्रा काय जाहली ॥४८॥
ते म्हणती तिचे चैतन्य ॥ हरिस्वरूपीं जाहलें लीन ॥ दूत म्हणती आणोन ॥ प्रेत आम्हांसी दाखवा ॥४९॥
पुजारी सांगती दुतांस ॥ तिचे प्रेताचा जाहला वृक्ष ॥ मग ते म्हणती अभिलाष ॥ तुम्हीच केला तियेचा ॥५०॥
द्वारापुढती उकरून ॥ पळविली कोठें सुरुंगांतून ॥ आतां वृक्ष जाहला म्हणून ॥ असत्य वचन बोलतसां ॥५१॥
कांहीं विचार न करितां जाण ॥ पुजारी नेले सर्व धरून ॥ बेदरीं जाऊनि वर्तमान ॥ रायापासीं सांगितलें ॥५२॥
अविंधराजा अविविएकी बहुत ॥ पुजारी जाहले भयभीत ॥ नारळ बुका प्रसाद त्वरित ॥ रायापुढें ठेविला ॥५३॥
तेणें घेतलें प्रसादास ॥ तंव त्यामाजी निघाला एक केंस ॥ क्रोध आला अविंधास ॥ पुजार्‍यांसी पुसिलें पैं ॥५४॥
परम भय वाटलें तयांसी ॥ विचार पडला तयांचें मानसीं ॥ म्हणती सांगावें राजयासी ॥ केश देवाचा म्हणोनि ॥५५॥
म्हणे वैकुंठवासी इटेवरी ॥ उभा राहिला भिंतरेतीरीं ॥ कान्होपात्रेचा कैवारी ॥ केश निर्धारीं तयाचा ॥५६॥
तुम्हीं चलावें पंढरीस ॥ जरी केंस नसेल देवास ॥ तरी शिक्षा करावी आम्हांस ॥ ऐसें लिहोन दिधलें ॥५७॥
राजा पुसे ब्राह्मणांसी ॥ कान्होपात्रा देवांत मिळाली कैसी ॥ पुजारी म्हणती सागरासी ॥ लवण मिळे तैशा रीतीं ॥५८॥
साक्ष पाहावयाकारण ॥ राजा सत्वर निघाला जाण ॥ विचार करिती ब्राह्मण ॥ आतां कैसें करावें ॥५९॥
केश न देखतां देवास ॥ अविंध मारील आपणांस ॥ लज्जा रक्षील जगन्निवास ॥ कीं उपेक्षील आम्हांस कळेना ॥६०॥
पंढरीसमीप आले जेव्हां ॥ ब्राह्मण करुणा भाकिती तेव्हां ॥ म्हणती कृपावंता माधवा ॥ तूं रक्षिता आम्हांसी ॥६१॥
लाक्षाजोहरीं पांडव जळतां ॥ तेथें धांवलासी अनंता ॥ आतां आम्हांसी रक्षितां ॥ संकट तुज कोणतें ॥६२॥
वाढितां दुर्जनांची पंक्ती ॥ चतुर्भुज केली द्रौपदी सती ॥ आम्हांसी रक्षितां रुक्मिणीपती ॥ संकट तुज चित्तीं कोणतें ॥६३॥
वणवा लागतां गिळिल्या ज्वाळा ॥ रक्षिलें गाई आणि गोपाळां ॥ आम्हांसी वांचवितां ये वेळां ॥ संकट तुजला कोणतें ॥६४॥
मेघ वर्षतां दारुण ॥ नखीं धरिला गोवर्धन ॥ आमचें वांचवितां प्राण ॥ संकट तुजला कोणतें ॥६५॥
तुझा प्रताप जाणून ॥ राजद्वारीं दिघलें लिहोन ॥ तूं चतुर्भुज श्यामवर्ण ॥ केश कुरळ असती ॥६६॥
असो महाद्वारीं ते अवसरीं ॥ राजा पातला अति सत्वरीं ॥ ब्राह्मण देवासी गरुडपारीं ॥ लोटांगणें घालिती ॥६७॥
म्हणती पुंडलीकवरदा अनंता ॥ ये संकटीं आम्हांसी रक्षिता ॥ तुजवांचोनि जगन्नाथा ॥ कोणी न दिसे ये वेळे ॥६८॥
शेजारमंडपीं जाऊनि त्वरित ॥ राजा देवासी जों पाहात ॥ तों मुकुट देखिला अकस्मात ॥ प्रकाशमान साजिरा ॥६९॥
कुरळ केश बहुसुंदर ॥ कमलनेत्र अति विशाळ ॥ दिव्य कुंडलें मकराकार ॥ कंठीं कौस्तुभ साजिरा ॥७०॥
हृदयीं पदक अति सुंदर ॥ जघनीं ठेविले दोनी कर ॥ कांसे वेष्टिला पीतांबर ॥ शोभे माळ वैजयंती ॥७१॥
जें योगियांचें निजध्यान ॥ सकळ देवांचें देवतार्चन ॥ एकाएकीं राजा आपण ॥ देखतां जाहला तेधवां ॥७२॥
अनुतप जाहला चित्तासी ॥ राजा म्हणे ब्राह्मणांसी ॥ तुम्हीं मूर्ति सांगितली जैसी ॥ तैसीचि येथें देखिली ॥७३॥
अनन्यभावें दंडवत ॥ राजा देवासी असे घालीत ॥ आलिंगन देवोनियां त्वरित ॥ पुजार्‍यांसी बोलतसे ॥७४॥
कान्होपात्रेचें भाग्य परम ॥ हरिस्वरूपीं जाहली लीन ॥ आम्ही अभागी ज्ञानहीन ॥ केलें छळण तियेचें ॥७५॥
मागुती बोले पुजार्‍यांसी ॥ कान्हो वृक्ष जाहली कैसी ॥ त्यांनीं दक्षिणद्वारापासीं ॥ तरटीवृक्ष दाखविला ॥७६॥
राजयासी सांगती ब्राह्मण ॥ पंढरीक्षेत्र हें पुरातन ॥ येथील तरुवर होऊन ॥ सकळ सुरगण बैसले ॥७७॥
तरटीवृक्ष तैसाचि आहे ॥ अद्यापि दक्षिणद्वारीं पाहें ॥ भाविक भक्त लवलाहें ॥ पंढरीसी पाहाताती ॥७८॥
पुढिले अध्यायीं कथा अद्भुत ॥ दामजींपंत वैष्णवभक्त ॥ महीपति त्याचा शरणागत ॥ गुण वर्णीत सद्भावें ॥७९॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ एकोनचत्वारिंशाध्याय रसाळ हा ॥८०॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥    ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगार्पणमस्तु ॥    ॥ शुभं भवतु ॥    ॥ श्रीरस्तु ॥        ॥    ॥    ॥    ॥
॥ श्रीभक्तविजय एकोनचात्वारिंशाध्याय समाप्त ॥

श्री भक्तविजय

Shivam
Chapters
॥ मंगलाचरणम् ॥ आरती श्रीविठ्ठलाची, प्रार्थना - आरती श्रीविठ्ठलाची युगें ... अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७