Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय ३४

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीराधाकृष्णाय नमः ॥    ॥
सेना न्हावी भक्त थोर ॥ हरिभजनीं अति तत्पर ॥ त्याचें चरित्र श्रुतिप्रियकर ॥ ऐका सादर भाविक हो ॥१॥
संसार जाणूनि नाशवंत ॥ उदासपणें असे विरक्त ॥ श्रीहरिभजनीं अहोरात्र ॥ प्रीति जडली तयाची ॥२॥
श्यामसुंदर विराजमान ॥ चतुर्भुज पीतवसन ॥ मूर्ति गृहीं असे जाण ॥ देदीप्यमान साजिरी ॥३॥
प्रातःकाळीं करूनि स्नान ॥ आधीं करीत विष्णुपूजन ॥ ऐसा नित्यनेम सारून ॥ संसारधंदा करीतसे ॥४॥
नापितवृत्ति नीच जाण ॥ त्याहुनि विशेष मुलानपण ॥ जन्म दिधला नारायण ॥ दोष पदरीं यास्तव ॥५॥
ग्रामजोशी मुळेपण ॥ त्याहूनि विशेष सोनार जाण ॥ जन्म देत नारायण ॥ पदरीं दोष यास्तव ॥६॥
चौकीदार कुळकर्ण ॥ त्याहूनि विशेष अंत्यजपण ॥ जन्म दिधला त्याकारण ॥ दोष पदरीं यास्तव ॥७॥
मातंग आणि धीवर जाण ॥ ग्रामकंटक करी दंडन ॥ जन्म देत नारायण ॥ दोष पदरीं यास्तव ॥८॥
खाटीक कसाब चाटेपण ॥ अखंड निर्दय असती पूर्ण ॥ जन्म देत नरायण ॥ पदरीं दोष यास्तव ॥९॥
धर्मरीति ऐकोनि ऐसी ॥ श्रोतीं राग न धरावा मानसीं ॥ शास्त्रीं दूषिलें कुकर्मासी ॥ शब्द तुम्हांसी नसे कीं ॥१०॥
अंगीकारितां हे वृत्ती ॥ न कळतां दोष नरासी घडती ॥ म्हणोनि सज्जनीं ऐकोनि नीती ॥ अनुताप चित्तीं न धरावा ॥११॥
ऐसे यातींत जन्मला ॥ आणि श्रीहरिभजन न घडे ज्याला ॥ तो भवचक्रांत पडियेला ॥ सुटका त्याजला नसेचि ॥१२॥
ऐसें जाणोनि न्हावी सेन ॥ श्रीहरीस गेला शरण ॥ तेव्हांचि त्याचें दोषतृण ॥ दग्ध जाहलें तत्काळ ॥१३॥
ग्रामींचा ओहळ होता जाण ॥ गंगेसी मिळतां गंगार्पण ॥ तैसें श्रीहरीस जातां शरण ॥ दोष संपूर्ण नासती ॥१४॥
जैसें परिसाचें संगतीन ॥ लोह तत्काळ होय सुवर्ण ॥ तैसें श्रीहरीस जातां शरण ॥ दोष संपूर्ण नासती ॥१५॥
नाना काष्ठें अग्नींत जाण ॥ टाकितां होती एकवर्ण ॥ तेवीं श्रीहरीस जातां शरन ॥ दोष संपूर्ण नासती ॥१६॥
तैसा भलते यातींत जन्मला ॥ आणि अनुतापें हरीस शरण गेला ॥ तो आपुले ऐसाचि केला ॥ जगदुद्धारें तेधवां ॥१७॥
एके दिवसीं न्हावी सेना ॥ भावेंकरूनि बैसला पूजना ॥ तों राजदूत येऊनि जाणा ॥ तत्काळ तया बोलावी ॥१८॥
देवपूजेसी बैसला जाण ॥ कांता सांगे तयालागून ॥ राजयाचा सेवक येऊन ॥ तुम्हांकारण पाचारी ॥१९॥
निरोप सांगतसे ते अवसरीं ॥ सांग जाऊन नाहींत घरीं ॥ चारी वेळ तयाचपरी ॥ बोलावणें पातलें ॥२०॥
तितुकियांसी सांगे जाणा ॥ म्हणे घरांत नाहीं सेना ॥ शेजारीं संधी फावली दुर्जना ॥ तेणें जाऊन सांगितलें ॥२१॥
राजयास सांगे ते वेळां ॥ सेना देवपूजेसी बैसला ॥ ऐकूनि दुर्जनाच्या बोला ॥ क्रोधावला नृपनाथ ॥२२॥
आधींच राजा अविंध दुर्जन ॥ तयासी सांगितले अवगुण ॥ मर्कटासी मदिरापान ॥ वृश्चिकदंश त्यामाजी ॥२३॥
मूळींच कांदा दुर्गंध पूर्ण ॥ तयामाजी मिळाला लसुण ॥ तयापरी ते दुर्जन ॥ एकचित्त जाणिजे ॥२४॥
राजा सांगे भृत्यांसी ॥ बांधोनि आणा तयासी ॥ मोट बांधोनि त्वरेंसीं ॥ नदीमाजी टाका रे ॥२५॥
ऐसा विचार होतां जाण ॥ भक्तकैवारी नारायण ॥ सेनियाचें रूप धरून ॥ राजद्वारासी पातला ॥२६॥
जो आदिपुरुष नारायण ॥ क्षीरसागरी शेषशयन ॥ तो श्रीहरी धोकटी घेऊन ॥ राजद्वारासी पातला ॥२७॥
ब्रह्मादि देव ऋषिजन ॥ जयासी ध्याती रात्रंदिन ॥ तो सेना न्हावी होऊन ॥ रायापासीं चालिला ॥२८॥
वज्रासनीं बैसोन ॥ योगीं करिती अखंड ध्यान ॥ तो सेन्याचें संकट देखोन नापित होऊन जातसे ॥२९॥
दश इंद्रियें बुद्धि मन ॥ वर्तती जयाचे सत्तेकरून ॥ तो विश्वव्यापक चैतन्यघन ॥ न धरी थोरपण सर्वथा ॥३०॥
किरीट कुंडलें कौस्तुभमणी ॥ काढूनि ठेवी चक्रपाणी ॥ खांदां धोकटी लावूनी ॥ त्वरेंकरूनि निघाला ॥३१॥
वेदशास्त्रें धुंडाळिती ॥ जयाकारणें बहुत कष्टती ॥ तो उभा राहूनि श्रीपती ॥ मुजरा करी रायासी ॥३२॥
नापितरूप धरिलें हरीनें ॥ त्याचें होतांचि दर्शन ॥ तत्काळ क्रोध गेला जाण ॥ राजयाचा तेधवां ॥३३॥
समोर राजयासी बैसवून ॥ त्याचें श्मश्रुकर्म करून ॥ परम चतुर जगज्जीवन ॥ मस्तक त्याचें चोळीतसे ॥३४॥
नृपवर म्हणे तयासी ॥ तूं राहवें आम्हांपासीं ॥ सर्व नापितांत तूं चतुर होसी ॥ ऐसें मजला वाटतसे ॥३५॥
यावरी बोले जगज्जीवन ॥ ब्रह्मांड म्यां व्यापिलें जाण ॥ रिता ठाव मजवांचून ॥ अणुमात्र नसेचि ॥३६॥
येणें जाणें करणें राहाणें ॥ माझें अंगीं नसे जाण ॥ करूनि अकर्ता व्यापकपण ॥ सर्वांत असोन निराला ॥३७॥
निजभक्तकार्याकारण ॥ क्षणैक रूप धरितों सगुण ॥ परंतु माझें अव्यक्तपण ॥ न मोडेचि सर्वथा ॥३८॥
ऐसें बोलतां शारंगधर ॥ राजा सुखावला थोर ॥ अभ्यंगाकारणें सत्वर ॥ सुगंधी तैल आणविलें ॥३९॥
मैलागिरी चंदन ॥ त्याचा चौरंग मांडून ॥ त्यावरी राजा बैसला जाण ॥ सेना मर्दन करीतसे ॥४०॥
रत्नजडित प्याला सुंदर ॥ त्यामाजी घातलें मोगरेल ॥ आंत बिंबलें साकार ॥ चतुर्भुज रूपडें ॥४१॥
मुकुत विराजे देदीप्यमान ॥ पीतांबरधारी घनश्यामवर्ण ॥ राजा ऐसें रूप देखोन ॥ आश्चर्य मनीं करीतसे ॥४२॥
वरती दृष्टी करूनि पाहे ॥ तों सेना मर्दन करीत आहे ॥ मागुती प्याल्यामध्यें जंव पाहे ॥ तों श्रीकृष्णरूप दिसतसे ॥४३॥
रूपीं गुंतले लोचन ॥ रायासी नाहीं देहभान ॥ पुरे करावें मर्दन ॥ त्याजकारणें कळेना ॥४४॥
दश इंद्रियें बुद्धि मन ॥ पांगुळ स्वरूपीं जाहली लीन ॥ देखोनि हांसती सभाजन ॥ रायासी संचार जाहला ॥४५॥
सेवक म्हणती तयाकारण ॥ आतां उठावें स्नानालागून ॥ दोन प्रहर आला दिन ॥ सावध होई नृपनाथा ॥४६॥
राजा म्हणे सेवियासी ॥ बैसें क्षणभरी मजपासीं ॥ जरी तूं जाशील गृहासी ॥ तरी मी प्राण देईन ॥४७॥
तयासी उत्तर देत श्रीहरि ॥ आतां फिरून येतों सत्वरी ॥ मज तूं हृदयमंदिरीं ॥ कोंडूं नको नृपनाथा ॥४८॥
राजयानें ते अवसरीं ॥ होन आणिलें ओंजळभरी ॥ सेना न्हावियाचें पदरीं ॥ घाली सत्वरी तेधवां ॥४९॥
त्याचें गृहासी जाऊनि हरी ॥ धोकटी ठेविली खुंटीवरी ॥ होन टाकूनि तियेभीतरी ॥ अदृश्य जाहला तत्काळ ॥५०॥
असो इकडे राजयान ॥ लवलाहें करून स्नान ॥ सेवकासी आज्ञा करी आपण ॥ कीं सेनियासी सत्वर पाचारा ॥५१॥
मज न लागती रे उपचार ॥ वस्त्रें भूषणें अलंकार ॥ सेना न्हावियासी सत्वर ॥ गजकारणें भेटवा ॥५२॥
मज न लागेचि रे मिष्टान्न ॥ अबीर वस्त्रें परिमळ सुमन ॥ सेनियासी सत्वर पाचारून ॥ मजकारणें भेटवा ॥५३॥
जरी तो सत्वर न ये जाण ॥ तरी हे जातील माझे प्राण ॥ तो भक्तराज मजकारण ॥ सत्वर आणून भेटवा ॥५४॥
त्याचें होतांचि दर्शन ॥ माझें चुकेल जन्ममरण ॥ सेना न्हावी वैष्णवजन ॥ मज आणून भेटवा ॥५५॥
राजा विव्हळ जाहला पूर्ण ॥ घाबरले सेवकजन ॥ मग सेनियाचें गृहासी जाऊन ॥ केलें पाचारण तयासी ॥५६॥
सेना म्हणे ते अवसरीं ॥ राजा कोपला मजवरी ॥ धोकटी घेऊनि खांद्यावरी ॥ राजद्वारीं पातला ॥५७॥
सेनियासी देखतांचि त्वरित ॥ उभा ठाकला नृपनाथ ॥ सभालोक हांसती समस्त ॥ नवल अद्भुत देखोनि ॥५८॥
राजा म्हणे तयासी ॥ प्रातःकाळीं तूं आलासी ॥ रूप दाखविलें मजसी ॥ चतुर्भुज होऊनि ॥५९॥
तैसेंच दाखवीं मजकारण ॥ म्हणूनि धरिले दोनी चरण ॥ सेना न्हावी ऐकून ॥ विस्मितमन जाहला ॥६०॥
तैल आणवोनि प्याल्यांत ॥ सेनियासी पाहावी नृपनाथ ॥ तों चतुर्भुज न दिसे त्यांत ॥ चमत्कार अद्भुत वाटला ॥६१॥
म्हणे दीनबंधु पतितपावना ॥ वैकुंठवासिया नारायणा ॥ नीच काम मनमोहना ॥ मजकारणें त्वां केलें ॥६२॥
अनाथनाथा रुक्मिणीवरा ॥ मदनताता श्यामसुंदरा ॥ नीच काम जगदुद्धारा ॥ सयुज्यउदारा त्वां केलें ॥६३॥
श्रुतिशास्त्रें वर्णिती गुण ॥ तयांसी न कळे तुझें महिमान ॥ नीच कर्म त्वां मजकारण ॥ अंगीकारिलें दयाळा ॥६४॥
ब्रह्मा इन्द्र आणि हर ॥ हे णेनती तुझा पार ॥ आज कां धोकटी खांद्यावर ॥ मजकारणॆं घेतली ॥६५॥
रडे आक्रोशेंकरून ॥ गहिंवरें दाटलासे पूर्ण ॥ राजा धांवून धरी चरण । सेनियाचे तेधवां ॥६६॥
म्हणे तुझ्या संगतीकरून ॥ मज जाहलें कृष्णदर्शन ॥ संतसंगाचें महिमान ॥ काय आतां वर्णावें ॥६७॥
होतां नारदाचें दर्शन ॥ कोळियानें कथिलें रामायण ॥ ऐसा कृपाळु वैष्णवजन ॥ तारक पूर्ण जड जीवां ॥६८॥
व्यासकृपा संजयासी जाण ॥ तयासी गीता जाहली श्रवण ॥ तेवीं तुझ्या योगें मजकारण ॥ श्रीकृष्णदर्शन जाहलें कीं ॥६९॥
धोकटींत होन टाकिले ॥ सेनियानें ते विलोकिले ॥ तत्काळ ब्राह्मणांसी वांटिले ॥ सकळ लोकांदेखतां ॥७०॥
राजयासी अनुताप जाहला ॥ हरिभजनीं लागला ॥ सेना न्हावी संतोषला ॥ हरि तुष्टला म्हणोनियां ॥७१॥
पुढें रसाळ कथा अलौकिक ॥ जगन्नाथीं राजा सात्विक ॥ त्याचें चरित्र ऐकतां देख ॥ सज्ञान सुख पावती ॥७२॥
तेंचि निरूपण यथामती ॥ वदवील आतां रुक्मिणीपती ॥ श्रोत्यांसी विनवी महीपती ॥ श्रवणीं प्रीति असों द्या ॥७३॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ चतुस्त्रिंशाध्याय रसाळ हा ॥७४॥
अध्याय ॥३४॥    ॥ ओंव्या ॥७४॥

श्री भक्तविजय

Shivam
Chapters
॥ मंगलाचरणम् ॥ आरती श्रीविठ्ठलाची, प्रार्थना - आरती श्रीविठ्ठलाची युगें ... अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७