गोड निबंध-भाग १ 13
अण्णा ! तुमचे ते थोर अर्थपूर्ण उद्गार मला नेहमीं आठवतात. त्या शब्दांची मी स्वत:ला सदैव आठवण देत असतों व जेथें कोठें विद्यार्थी भेटतील त्यांनाहि देतों. स्त्रियांच्या शिक्षणाला तुम्ही कां हात घातलात ? त्या स्वावलंबी होतील, त्यांना कामधंदा मिळेल, बालसंगोपन चांगलें करतील, हिशोब ठेवतील-शेंकडो फायदे होतील. परंतु तुमची मुख्य दृष्टि कोणती होती ? स्त्रियांचा आत्मा जागृत व्हावा ही, पुरुषांप्रमाणेंच स्त्रियांना मन, बुध्दि, हृदय आहे. त्यांना आत्मा आहे. त्या आत्म्याच्या विकासासाठीं शिकावयाचें.
आत्मा जागृत होणें म्हणजे काय ? दुसर्याच्या सुखदु:खांचा विचार करावयास शिकणें. सुशिक्षित अशिक्षित यांत फरक कोणता ? जो दुसर्यांच्या सुखदु:खाचा विचार करूं लागला, तो शिकलेला. लिहिणें वाचणें म्हणजे मुख्य शिक्षण नव्हे. लिहिण्यावाचण्यानें मानवजातीच्या, बहुजन समाजाच्या जीवनाशीं एकरूप होण्यास शिकलें पाहिजे. शिकलेला मनुष्य देशांतील बहुजनसमाजाचें दु:ख पाहील. तें दु:ख दूर करण्याचे उपाय हातीं घेईल. स्वराज्य व स्वातंत्र्य जवळ आणण्यासाठीं खटपट करील. शिकलेला मनुष्य शेतकरी कामकरी यांना तुच्छ मानणार नाहीं. उलट त्यांना प्रेमानें जवळ करील, त्यांच्या दुर्दशेनें दु:खी होईल. आत्मा जागृत होणें याचा हा अर्थ आहे. म्हणून स्वातंत्र्यासाठीं मुंबईच्या हजारों स्त्रिया उभ्या राहिलेल्या पाहून, व्यापक राष्ट्रजीवनांत त्या भाग घेत आहेत असें पाहून तुमचें हृदय उचंबळलें.
स्त्रियांचें शिक्षण हातीं घेणार्या कितीकांना अण्णांच्या हृदयांतील ही तहान कळेल ? ही दृष्टि कळेल ? सुशिक्षित स्त्रियांत ही दृष्टि कितीशी आहे ? उलट पुष्कळ वेळां सुशिक्षित भगिनी म्हणजे निराळेंच कांहीं तरी वाटतें. विदेशी खेळणीं, विदेशी वस्त्रें, विदेशी वस्तू यांतच त्यांचा आत्मा रमतो. त्यांना स्वदेशाची स्मृति नसते. अशिक्षित भगिनींपासून त्या अहंकारानें दूर राहतात. शहरांतील सुशिक्षित स्वयंसेविका खेड्यांतील अशिक्षित परंतु देशप्रेमानें भारलेल्या स्वयंसेविकांस कसें वागवितात याचे कटु अनुभव क्वचित् येतातच.
शिक्षणानें असें होतां कामा नये. अण्णांना याचें फार वाईट वाटेल. आज अण्णांचा वाढदिवस महाराष्ट्रांत हजारों सुशिक्षित स्त्री-पुरुष साजरा करितील. परंतु अण्णांचा मोठा सत्कार म्हणजे शिक्षणानें स्त्रियांचा आत्मा जागृत करून त्यांना बहुजनसमाजाच्या सुखदु:खाशीं एकरूप होण्यास शिकविणें हा होय.
अण्णा ! तीन मुली घेऊन ज्या कार्याचा तुम्ही विस्तार केलात, त्याचा आज केवढा विस्तार झाला आहे ! स्त्रियांचें स्वतंत्र विद्यापीठ आज महाराष्ट्रांत शोभत आहे. सार्या भारतखंडांत ही अपूर्व गोष्ट तुम्ही घडवून आणली. संस्थेसाठीं लाखों रुपये तुम्ही जमविलेत, त्याच्यासाठीं वणवण केलीत. ध्येयवादी लोकांच्या हातांत ती संस्था देऊन आज तुम्ही एक प्रकारें कृतार्थ झालां आहांत.