गोड निबंध-भाग १ 26
खानदेशाची परीक्षा
उद्यां २४ तारीख. बोर्डाच्या निवडणुकीचा उद्यांचा दिवस. खानदेशांतील मतदार उद्यां कोणाला मतें देणार ? राष्ट्राचा तिरंगी झेंडा त्यांना हांक मारीत आहेत. भारताचें स्वातंत्र्य त्यांना हांक मारीत आहे. ३५ कोटी लोकांचा संसार सुंदर करूं पाहणारी मायमाउली कांग्रेस हांक मारीत आहे. खानदेशांतील मतदार या हांकेला ओ देतील अशी सबळ आशा आहे.
कांग्रेसचें बळ आज वाढलें आहे. कांग्रेसचा शब्द आज ब्रिटिश सरकाराकडून सन्मानिला जात आहे. ओरिसा प्रांतांत ही गोष्ट दिसून आली. कोणाला तरी गव्हर्नर नेमून कांग्रेसचा अपमान करणार असाल तर तें कांग्रेसला सहन होणार नाहीं असे महात्माजींनीं लिहितांच सरकार नरमतें व कांग्रेसच्या इच्छेप्रमाणें वागतें. कांग्रेसचें हें बळ आज कोठून आलें ? आज सात प्रांतांत कांग्रेसचीं मंत्रिमंडळें आहेत त्यामुळें. हें कांग्रेसचें बळ आपण आणखी वाढविलें पाहिजे. हें कसें वाढविणार ? सदैव कांग्रेसच्या पाठीमागें उभें राहून. ज्या ज्या वेळीं कांग्रेस हांक मारील, त्या त्या वेळेस तिच्या पाठीमागें मागें पुढें न पाहतां उभे राहत जा.
कांग्रेसला मत म्हणजे स्वराज्याला मत. कांग्रेस राष्ट्राची प्रतिनिधीभूत संस्था नाहीं असें ब्रिटिश सरकार म्हणत असतें. सारे मतदार झाडून जर कांग्रेसला मत देतील तर सरकारला आपण पुरावा देऊन सांगू कीं राष्ट्र कांग्रेसच्याच पाठीमागें आहे. कांग्रेसला मत देणें म्हणजे कांग्रेसच्या स्वराज्याच्या ध्येयाला संमति देणें. आम्ही स्वराज्यासाठीं धडपडणार्या कांग्रेसच्या पाठीशीं आहोंत असें नि:शंकपणें जगाला कळविणें. कांग्रेसला मत न देणें म्हणजे स्वराज्याचें ध्येय आम्हांस मान्य नाहीं, इंग्रज सरकारच सुखानें येथें राज्य करो; याचें राज्य किती न्यायाचें, भरभराटीचें; याच्या राज्यांत शेतकरी कसे सुखी आहेत, उद्योगधंदे कसे वाढले आहेत, कसें नंदनवन सर्वत्र आहे, असें जाहीर करणें होय.
ब्रिटिश सरकारानें नंदनवनें निर्मिलीं का नंदनवनांचीं स्मशानें केलीं हें आपल्या मतानें जगाला कळवायचें आहे. आणि जर ब्रिटिश राजवटींत दिवसेंदिवस वाईट दिवस येत असतील तर ही सत्ता दूर करणार्या कांग्रेसला मत देणें हें सर्वांचें कर्तव्य ठरतें.
इंग्लंडमध्यें कांहीं दिवसांपूर्वीं हिंदुस्थानांतून परत गेलेला एक ब्रिटिश मुत्सद्दी सभेमध्यें म्हणाला, 'हिंदुस्थानाला स्वराज्य देण्याची जरूरी नाहीं.' हे शब्द ऐकून कोणाला संताप येणार नाहीं ? जगाच्या बाजारांत हिंदुस्थानची ही बेअब्रू कां ? जर्मनीला स्वराज्य नको असें म्हणण्याची ब्रिटिश मुत्सद्दयांची छाती झाली असती का ? जर्मनीच्या गर्जनेनें त्यांच्या उरांत धडकी भरते. कां ? सात कोटी जर्मन एक आवाज काढतात म्हणून.