गोड निबंध-भाग १ 28
शेतकरी जागा झाला
सोमवार १६ मे १९३८ हा दिवस खानदेशच्या इतिहासांत महत्त्वाचा मानला जाईल. त्या दिवशीं अमळनेर तालुक्यांतील शेतकर्यांनीं अमळनेरच्या म्युनिसिपालिटीशीं असहकार एक प्रकारें पुकारला. अमळनेरच्या हद्दींत आपल्या गाड्या न्यावयाच्या नाहींत अशा प्रकारचा निश्चय शेतकरी करीत आहेत. अमळनेर शहराचीं आठ ठिकाणीं नाकीं आहेत. या आठ ठिकाणांहून गाड्या शहरांत येतात. मागील सोमवारीं तीन नाक्यांवर कडक बंदोबस्त झाला. दोनतीनशें गाड्या अमळनेर शहराच्या हद्दीच्या बाहेर उभ्या होत्या. अमळनेरच्या हद्दींत गाड्या नेऊं नका अशी प्रार्थना खेड्यांतील स्वयंसेवक करीत होते. डांगरीकर दे. भ. उत्तमराव पाटील, मारवडचे श्री. यशवंतराव, अमळगांवचे श्री. नामदेवराव, भरवसचे कांग्रेस उमेदवार श्री. दगाजीराव पाटील हे स्वत: ठायीं ठायीं शेतकर्यांस सांगून गाड्या बाहेर सोडावयास लावीत होते. शेतकरी बंधू ऐकत होते.
लढ्याला तोंड आतां लागलें आहे. अमळनेर तालुक्यांतील हजारों शेतकर्यांनीं संघटित झालें पाहिजे. त्रास सहन केला पाहिजे. अमळनेरच्या हद्दींत गाडी आणतां कामा नये. खेड्यापाड्यांतून स्वयंसेवक उभे राहिले पाहिजेत. खेड्यापाड्यांतील प्रतिष्ठित व वृध्द माणसांनीहि पुढाकार घेतला पाहिजे. शेतकर्यांची दीडशें वर्षें दडपलेली मान वर होऊं दे. आज भारतमाता आनंदली असेल. तिचीं लेंकरें अन्यायाविरुध्द आपण होऊन उभीं रहाण्यास तयार आहेत.
म्युनिसिपालटीचा हा टॅक्स अन्याय्य आहे. या टॅक्साविरुध्द चळवळ करणार्यास कोणी प्रतिष्ठित प्रश्न विचारतात 'उद्यां तुम्ही तहशील देऊं नका म्हणूनहि सांगाल.' या शहाण्यांना आमचें सांगणें आहे कीं 'आमच्या जवळ थोडा सारासार विवेक आहे. तहशीलाची फाजील वाढ झाली तर तसें आम्हीं सांगूंहि. सरदार वल्लभभाईंनीं नाहीं का तसें केलें ? बार्डोलींतील शेतकरी अन्याय्य करवाढ झाली म्हणून झगडले. आम्हीहि झगडूं.'
ज्यांच्यावर कर बसविण्यात येतो, त्यांचे प्रतिनिधि घेतले पाहिजेत असा एक सर्वसामान्य सिध्दांत आहे. अमेरिकेंतील लोक १५० वर्षांपूर्वी इंग्रजांजवळ याच तत्त्वावर लढले व स्वतंत्र झाले. 'प्रतिनिधित्त्व नाहीं तर करहि नाहीं' अशी गर्जना अमेरिकन लोकांनीं केली. अमळनेरची म्युनिसिपालटी खेड्यांतील जनतेवर कर बसविणार. परन्तु त्या खेड्यांतील जनतेला एका अक्षरानें विचारलें का ? खेड्यांतील जनतेचे प्रतिनिधी का म्युनिसिपालटींत असतात ? त्यांची बाजू कोण मांडणार, त्यांना न्याय कोण देणार ?
एक दिवस उजाडतो व खेड्यांतील लोकांवर बाँबगोळा पडतो. हा कराचा बांबगोळा पडतो. जे खेड्यांतील शेतकरी अंमळनेरच्या सर्व शहरास पोसतात, त्यांच्यावर आणखी कर बसविणें ही अन्यायाची परमावधी आहे. अंमळनेरचे दलाल, सावकार, व्यापारी, कारखानदार, वकील, सारे खेड्यांवर पोसतात. त्या खेड्यांचा अंत पाहूं नका.
अशा रीतीनें शहराच्या सुखसोयी करा व तिकडे शेतकर्याला नाहींसा करा. शेतकरी मेला तर अंमळनेरा, तूं कोणावर जगणार ?
शेतकर्या ! तुझी कोणी दाद घेणार नाहीं. तुझ्यावर कितीहि कर बसविले तरी तूं रागावणार नाहींस असेंच सारे समजतात. अंमळनेरच्या म्युनिसिपालिटीचे प्रमुख चालक वर सरकारकडे गेले असतील व म्हणाले असतील 'शेतकरी रागावणार नाहीं. आणा दोन आण्यांचा तर प्रश्न. असंतोष माजणार नाही.' मिळाली परवानगी.