गोड निबंध-भाग १ 31
जगाच्या पाठीवर हिंदुस्थानच एक असा अभागी देश आहे, जेथें अद्याप शेंकडा ८५ लोक निरक्षर आहेत. स्त्रियांना शिक्षणाचा गंधच नाहीं. थोर कविसम्राट रवींद्रनाथ ९ वर्षांपूर्वीं रशियांत गेले होते. तेथें ७५ वर्षांच्या म्हातार्या बायका ७ वर्षांच्या मुलीबरोबर शिकत होत्या. त्या बाया रवींद्रनाथांना म्हणाल्या, 'तुमच्या हिंदुस्थानांत स्त्रिया सुशिक्षित आहेत कीं नाहींत ?' रवींद्रनाथ म्हणाले, 'माझ्या देशाची मान खालीं आहे. पुरुषहि जेथें शेंकडा ८० निरक्षर आहेत, तेथें स्त्रियांची गोष्ट काय सांगू ?' त्या रशियन बायका मग म्हणाल्या, 'आम्ही हिंदुस्थानांत येऊन तुमच्या आयाबहिणींना, लेकीसुनांना शिकवूं.' हिंदुस्थानांतील स्त्रियांना का रशियन भगिनींनीं येऊन शिकवायचें ? इंग्लण्डमधून मार्गारेट ई नोबेल या भगिनी निवेदिता होऊन बंगालमधील मुलींना शिकवितां शिकवितां मेल्या. मिराबेन आज महात्माजींच्या शिष्या होऊन खेड्याची सेवा करीत आहेत. परदेशांतील नरनारींनीं येऊन आमची सेवा करावी, आम्हीं काय करीत आहोंत ?
स्त्रियांनाहि शिकूं दे. बार्डोलींत जेव्हां झगडा चालू होता, तेव्हां त्या झगड्यांत स्त्रियांनींहि शर्थ केली. त्याचें कारण काय ? ज्या ज्या वेळेस सरदार वल्लभभाई सभा घेत तेव्हां ते आधीं म्हणत 'स्त्रिया घेऊन या. ज्या सभेंत आयाबहिणी नाहींत तेथें मी बोलणार नाहीं. पुरुष तुरुंगांत गेल्यावर स्त्रिया झगडा चालवतील. त्यांच्या कानांवर विचार गेले पाहिजेत.' अशा रीतीनें बार्डोलींतील स्त्री-पुरुष लढावयास सिध्द झाले.
ज्ञानाची टिंगल करूं नका. नौकर्या थोड्याच मिळणार आहेत असें म्हणूं नका. सर्वजण साक्षर व्हा. तेजस्वी स्वातंत्र्याच्या चळवळीचें मर्म जाणा. फसूं नका. जगांत काय चाललें आहे तें वाचा. तुम्हांला ही शक्ति यावी म्हणून ज्या विद्यार्थ्यांनीं सुट्टीचे दिवस तुमच्यांत काढले, तुमच्यासाठीं जे झटले, त्यांचें मी अभिनंदन करतों.'
"बंधूंनो ! तुम्हांला काँग्रेसमध्यें या असें म्हटलें म्हणजे तुम्हीं अनेक शंका काढतां. कोणी म्हणतात, काँग्रेसनें भाव घटविले. भाव ठरविणें हें काँग्रेसच्या हातांत नाहीं. जगांतील परिस्थति त्याला कारण असते. तसेंच इंग्लंडांतील शिलिंगाशीं आमच्या रुपयाची जी किंमत ठरते त्यावरहि हें अवलंबून असतें. हल्लीं रुपयाची किंमत १८ पेन्स आहे. म्हणजे काय ? आपणांस रुपया देतात व १८ पेन्सांचा म्हणजे अठरा आण्यांचा माल नेतात. वर रुपयामागें आपलें दोन आण्यांचें नुकसान होत आहे. परंतु सरकार कांहीं करीत नाहीं. हुंडणावळीचा भाव बदलला तर आतां भाव वर चढतील. म्हणून काँग्रेसला शिव्या नका देऊं. काँग्रेसला जें आज करतां येत नाहीं, तें करतां यावें म्हणून काँग्रेसमध्यें या. उगीच खोट्या कंड्यांना बळी नका पडूं.
कोणी म्हणतात, काँग्रेस सबगोलंकार करिते. काँग्रेस सबगोलंकार नाहीं करीत. ती माणुसकीनें वागा सांगते. सार्वजनिक ठिकाणीं सारे समान व्हा असें तिचें सांगणें आहे. ज्यांना ज्यांना विहिरीवर पाणी भरूं देतां, ओटीवर घेतां, त्यांच्याशीं का एकदम लग्नें लाविलींत ? मग हरिजनाला ओटीवर घ्या, विहिरीवर येऊं दे असें म्हणतांच असे चावट प्रश्न कां करतां ? संतांनीं केलें तें काँग्रेस करीत आहे. शास्त्रीपंडित गादीमहाराज समाज बुडवितात; संत तारतात. ज्ञानबातुकाराम म्हणून तुम्ही टाळ कुटतां. खरोखरच त्या टाळांखालीं माझे संत तुम्ही चिरडीत असतां. 'वंदीन मी भूतें । आतां अवघींचीं समस्तें' अशा घोषणा करणार्या संतांना तुम्ही ठार मारीत आहांत. संताचा खरा माणुसकीचा धर्म ओळखा. 'या रे या रे अवघेजण' अशी त्यांनीं हाक मारली. त्यांनीं फक्त वरच्या वर्गांना हांक मारली ? 'अवघाची संसार सुखाचा करीन' असें संत म्हणत. केवळ ब्राह्मणाचा नाहीं, मराठ्याचा नाहीं. सर्वांचा संसार. आज काँग्रेस सर्वांचा संसार सुखाचा करूं इच्छीत आहे सर्वांना रहायला घर, सर्वांना पोटाला भाकर व मनाची भाकर-धान्याची भाकर व विचाराची भाकर, सर्वांना पोटभर खायला, अंगभर ल्यायला असावें म्हणून कांग्रेस मरत आहे.