गोड निबंध-भाग १ 59
मंत्र्यांचे चरणीं
पू. खानदेश जिल्ह्यांतील ५० हजारांवर शेतकरी जळगांवला २६ तारखेस जमले होते. उदासीन शेतकरी कां जमा झाले ? त्यांना अपार कष्ट आहेत म्हणून. सुखासुखी शेतकरी सभा-परिषदांस जमणार नाहीं, पायीं वणवण करीत येणार नाहीं.
खानदेशच्या शेतकर्यांची यंदा कमर मोडली आहे. किती तरी वर्षे तो हालांत दिवस काढीत आहे. आज कित्येक वर्षे भाव नाहींत म्हणून तो डबघाईस आला आहे. १९३१ सालीं अतिवृष्टि होऊन पिकें बुडालीं. तरी तेव्हांहि त्यांची हांक कोणी ऐकली नाहीं, तहशील वसूल केले गेले. त्या वेळेस एका शेतकर्यानें सभेंत सांगितलें होतें, 'आतां आम्हांला सरकारनें विकावें व तहशील वसूल करावे.' दुसरा एक शेतकरी म्हणाला 'आमच्या सर्व जमिनी सरकारनें घ्याव्या. आम्हांला रोज काम द्यावें, पोटभर मजुरी द्यावी.' १९३१ सालांतील ते शब्द. आज सात वर्षानंतर आणखी काय दैना झाली असेल हें ज्यांना हृदय असेल त्यांनीं ओळखून घ्यावें.
दगडावर दहा घाव घातले तरी तो फुटलेला दिसत नाहीं. परंतु त्याचे अणुपरिमाणु ढिले होत असतात. अकरावा घाव पडतांच त्या अभंग दिसणार्या दगडाचीं छकलें होतात. कोणी विचारतो, 'एकदम कशीं छकलें झालीं ?' त्याला उत्तर मिळतें 'पहिले दहा घाव तुम्ही पाहिले नाहीं.' खानदेशांत एके ठिकाणीं एकानें विचारलें, 'अशीं वर्षे का शेतकर्याला येत नाहींत ? यंदांच कां ओरड ?' त्याला उत्तर आहे कीं, 'यंदाचा अकरावा घाव होता. दहा घाव दहा वर्षे बसले. तरी अभंग दिसणारा शेतकरी या अकराव्या टोल्यानें जमीनदोस्त झाला आहे.'
ठिकठिकाणच्या शेतकर्यांच्या कहाण्या ऐकल्या म्हणजे काय करावें तें समजत नाहीं. एदलाबाद पेट्यांतील पूर्णा नदीच्या कांठचीं ३० गांवें तर भयंकर आपत्तींत आहेत. हिंदुस्थान सरकारचीं राखीव शिकारीचीं जंगलें शेतकर्यांना उध्वस्त करीत आहेत. ३००-३०० विहिरी असलेलीं गांवें उजाड होत आहेत. अतिवृष्टि व जंगली जनावरांचा पिकांवरचा हल्ला यांमुळें तेथील शेतकरी ठार झाला आहे. सार्या खानदेशानें कुर्हाडी हातांत घेऊन तीं जंगलें सफा करण्याची वेळ आली आहे. कोणी म्हणतात, 'त्या जनावरांना जगण्याचा हक्क नाहीं का ?' परंतु माणसांनाहि जगण्याचा हक्क आहे कीं नाहीं ? सरकारला तीं जंगली जनावरें प्रिय असतील तर या तीस गांवच्या लोकांना सर्व नुकसानभरपाई देऊन दुसरीकडे वसाहतीस जागा द्यावी. गांवें उजाड होत चाललीं. इंग्लंड देशांत ४।५ शें वर्षांपूर्वी जमीनदार लोक शेती सोडून शेतांचीं कुरणें करूं लागले होते. लोंकरीचा व्यापार तेजींत होता. शेतांत मेंढ्या चरत. त्या वेळेस धान्याचा तुटवडा पडूं लागला. सर थॉमस मूर या विद्वानानें लिहिलें, 'इंग्लंडच्या जनतेस जगावयाचें असेल तर त्यांनीं मेंढ्या बनावें.' आज एदलाबाद पेटयांतील लोकांस जगावयाचें असेल तर त्यांनीं जंगली जनावरें व्हावें. एदलाबाद पेटयांतील ही स्थिति उपेक्षणीय नाहीं.
एदलाबाद पेटयांतील दु:ख अनन्त आहे. आणि उरलेल्या खानदेशांतील का कमी आहे ? कोणी म्हणतो, 'महिनाभर धान्य पुरेल.' कोणी म्हणतो 'आजच बाजारांतून विकत आणावें लागलें.' ज्वारीचें पीक साफ गेलें आहे. कपाशीचें पीकहि बुडालें आहे. धरणगांवचीं जिनें लौकर बंद पडलीं. शेंगा जमिनींत राहिल्या. बाजारांत गाड्या येतात. परंतु यंदा शेंगांना दुप्पट मजुरी पडली. पाऊस पडल्यामुळें काढलेल्या शेंगा पुन्हा चिखलांत मिळाल्या. त्या पुन्हां नदीनाल्यावर धुवाव्या लागल्या. परंतु शेतकर्याची सर्व बाजूंनीं स्थिति कोण पाहतो ? शेंगाच्या गाड्या दिसतात, त्यांना किती मजुरी पडली हें कशाला कोण पाहील ?
गेला महिनाभर सर्व खानदेशभर आम्ही घुमलों आहोंत. शेतकर्याच्या मुक्या जीवनांच्या आंत प्रचंड वणवा पेटत आहे. हा ज्वालामुखी केव्हां पेट घेईल याचा नेम नाहीं. आम्ही करबंदी करूं असे बोल महिन्या दोन महिन्यांपासून ऐकूं येत आहेत. कांग्रेस सरकार असतांना अशी वेळ येणार नाहीं असें बैठकींतून आम्ही सांगत असूं. शेतकर्याचा अंत पाहूं नका.