गोड निबंध-भाग १ 64
कुंभार म्हणाला, 'मी कामांत दंग असतों. कोण येतें जातें तिकडे माझें लक्ष नसतें. माझें काम घाणेरडें असें कोण म्हणेल ? महाराज, तुम्हीं घरांत राहतां का आकाशाखालीं उघड्यांत राहतां ?' सुंदर पुरुष म्हणाला, 'अरे आकाशाखालीं सारखा उघड्यावर राहीन तर उन्हानें करपेन, थंडीनें गारठेन, पावसानें भिजेन. राजानें सुंदर बंगला दिला आहे त्यांत मी राहतों, म्हणून तर माझें सौंदर्य टिकलें आहे,' कुंभार म्हणाला 'तो बंगला कशाचा बांधला आहे ?' सुंदर पुरुष म्हणाला 'विटांचा.' कुंभार म्हणाला 'त्या विटा मीच तयार करीत आहें. मग मला तुच्छ कां मानतां ? आणि तुम्ही पाणी कशानें पितां ? उन्हाळयांत थंडगार पाणी कशानें पितां ?' सुंदर पुरुष म्हणाला 'खुजामधून.' कुंभार म्हणाला 'ते खुजे आम्ही तयार करीत असतों. मग आमचें काम वाईट कसें ?' तो सुंदर पुरुष म्हणाला 'तुझ्याजवळ बोलण्यांत अर्थ नाहीं. जा नीघ माझ्यासमोरून, नाहीं तर राजाला सांगेन.'
कुंभार कामाला लागला व तो सुंदर मनुष्य पुढें चालला. तों समोरून कोण येत होतें ? डोक्यावर मळाचें पिंप घेतलेला भंगी येत होता. तो सुंदर पुरुष नाकाला पदर लावून फारच रागानें त्या भंग्याकडे पाहूं लागला. हातांत दगड घेऊन त्या भंग्याला तो मारणार, इतक्यांत भंगी म्हणाला, 'कां मारतां ? मी काय केलें ?' तो सुंदर पुरुष म्हणाला 'माझेसमोरून नरक घेऊन यावयास लाज नाहीं वाटत ? घाणेरडे आहांत अगदीं, आणि अक्कलहि नाहीं.' भंगी म्हणाला 'मीं का वाईट आहें ? तुमची घाण मी भरून नेली नाहीं तर कसें होईल ? मी घाण भरून नेतों व तुम्हांला स्वच्छतेच्या स्वर्गांत ठेवतों. तुमच्या भोवतीं स्वच्छता निर्माण करणारा मी चांगला, का आपल्या सभोंवतीं घाण करणारे तुम्हीं चांगले ? तुम्हीं घाण करणारे व मी घाण हरण करणारा. दोघांत कोण श्रेष्ठ ? आई मुलाची विष्ठा काढते म्हणून का ती तुच्छ झाली ? भंगी म्हणजे समाजाची आई आहे. आईचा अपमान करणारा नरकांत जातो, तुम्हांला माहीत नाहीं. आणि मी जें डोक्यावरून नेत आहे तें तुमच्याच पोटांतील हें तुम्हीं विसरलेले दिसतां.'
तो सुंदर पुरुष म्हणाला, 'सारेच बेटे मिजासखोर. जो तो मला उपदेशच करीत आहे. घाणेरडे आणि पुन्हां त्याचें समर्थन करतात. एवढी अक्कल रे तुम्हांला कोठून आली ? तरी बरें, शाळेंत तुम्ही जात नाहीं. शाळेंत न जातां अशीं व्याख्यानें, प्रवचनें देतां, मग शाळांतून गेल्यावर बृहस्पतीच व्हाल. बघतोस काय ? नीच. का मारूं दगड ? राजाला सांगेन बघ.'
भंगी निघून गेला. सुंदर पुरुष आतां बाजारांत आला. सर्वत्र त्याला घाणच दिसली. एका दुकानांत मडक्यांतून धान्य ठेवलें होतें. तो सुंदर पुरुष त्या दुकानदाराला म्हणाला, 'हे सोन्यासारखें धान्य असल्या मडक्यांतून कां ठेवतां ? सोन्याचांदीच्या भांड्यांतून तें कां ठेवीत नाहीं ? आणि हें काय ? या बरण्यांतून काय आहे ? मध, मुरावळा, गुलकंद ! असल्या सुंदर व उंची वस्तु असल्या मातीच्या बरण्यांतून का ठेवावयाच्या ? सोन्याचांदीच्या नाहीं, तर निदान स्वच्छ कांचेच्या बरण्यांतून तरी ठेवाव्या. हीं मडकीं व या बरण्या कशाला ?'
दुकानदार म्हणाला, 'सोनेंचांदी कोठून आणूं ? राजाजवळ असेल, परन्तु आमच्या जवळ कोठली ? आणि काच तरी मातीपासूनच होते, माहीत नाहीं का ? राजाच्या पदरीं असलेल्या त्या पंडितानें त्या दिवशीं रात्री हें नाहीं का सांगितलें ? आणि शेवटीं तर तो पंडित म्हणाला : सारें मातींतून निर्माण झालें आहे. सुंदर गुलाब, सुंदर डोळे, सुंदर केस सारें मातींतूनच आलें आहे व मातींतच जाईल. तुम्हीं मातीला तुच्छ मानतां, परन्तु त्याच मातीचे तुम्ही बनलेले आहांत. कवीचा चरण तुम्हांला माहीत नाहीं का ? ऐका.
'माती असशी मातिंत मिळशी'