गोड निबंध-भाग १ 3
हें पत्र कोणाचें मिंधें नाहीं. कोणाचें बंदें नाहीं. या पत्राचें एकच दैवत म्हणजे काँग्रेस संस्था. काँग्रेस संस्थेचा निर्मळ आत्मा जनतेस दाखवून त्या निर्मळ आत्म्याचे उपासक व्हा असें हें पत्र आग्रहानें व प्रेमानें सर्वांना सांगेल. काँग्रेसचें मला जें स्वरूप दिसतें, जें आवडतें, तेंच मी दाखविणार. काँग्रेसच्या ज्या स्वरूपाची मी पूजा करतों, त्याच स्वरूपाची इतरांस करावयास लावणार. मी या पत्राला नांवच 'काँग्रेस' ठेविलें आहे. कारण काँग्रेसशिवाय मला अस्तित्व नाहीं. भगवान् नानक म्हणत 'देवा तुझें नाम मला श्वासोच्छवासाप्रमाणें होऊं दे.' काँग्रेसचें नांव म्हणजे माझा श्वासोच्छ्वास. काँग्रेसचें काम माझ्या हातून न झालें तरी मी तिचा जप करीत असतों. खानदेशांत काँग्रेसचे एक लाख सभासद होवोत, पांच हजार स्वयंसेवक होवोत, पन्नास हजार खादीधारी होवोत, अशीं स्वप्नें मी रंगवीत असतों. या माझ्या वृत्तीमुळें मी 'काँग्रेस' असें नाव माझ्या पत्राला दिलें आहे. साने गुरुजी व काँग्रेस हा संबंध अभेद्य आहे.
या पत्राच्या काँग्रेस नांवामुळें खानदेशांत काँग्रेसचा जयजयकार होण्यास मदत होईल. विकणारा 'काँग्रेस, काँग्रेस' म्हणून पुकारील आणि घेणारा 'काँग्रेस, काँग्रेस' अशी हांक मारील. काँग्रेस काँग्रेस असें सर्वत्र व्हावें अशी मला तहान आहे. ही तहान तृप्त करण्याचें लहान साधन म्हणून हें पत्र मी सुरू करीत आहें. कोणाला हें नांव आवडणार नाहीं, कोणाला यांतील विचार क्वचित् आवडणार नाहींत; कोणाला यांत वेडेपणा वाटेल, कोणाला अहंकार दिसेल. कवि रवींद्रनाथ म्हणतात-
'तुझी हांक ऐकून कोणी येवो वा न येवो. तूं एकटा जा. तुझ्या हातांतील दिवा टीकेच्या वार्यानें विझेल. श्रध्देनें पुन्हां पेटवून एकटा जा.'
हे रवींद्रनाथांचे शब्द ध्यानांत धरून हें पत्र मी सुरू करीत आहें. या पत्रद्वारां काँग्रेसची संघटना, काँग्रेसचें सामर्थ्य, काँग्रेसची शोभा, काँग्रेसचें वैभव वाढो, वाढण्यास मदत होवो, एवढीच माझी इच्छा आहे.
वंदे मातरम् ! वंदे भ्रतरम् ! ६ एप्रिल, १९३८