गोड निबंध-भाग १ 77
धर्म म्हणजे शब्द नव्हेत; अनुभव
अमळनेरच्या जैन युवक मण्डळानें ५ दिवस एक व्याख्यानमाला चालविली. पहिले दिवशीं साने गुरुजी गेले होते. श्री.मुनि महाराज अध्यक्ष होते. साने गुरुजी म्हणाले, 'मी तुम्हांला काय सांगणार ? माझ्या जवळ नवीन कांहीं नाहीं. तुमचा धर्म अहिंसाप्रधान आहे. जगांत दु:ख नसावें ह्यासाठीं तुमचा धर्म आहे. जगांतील दु:ख जावें म्हणून तुम्हीं काय करतां ? तुम्हीं मंदिरांत जातां. हिंदु हिंदु मंदिरांत जातात, मुसलमान मशिदींत जातात. परन्तु एवढ्यावरून धर्म दुनियेंत आहे असें कसें म्हणूं ? अमळनेरमध्यें धर्म असता तर गटारें बांधावयास आपण उभे राहिलों असतों. डांस वाढत आहेत; रोग फैलावत आहेत. त्यांचा बंदोबस्त करावयास उठलों असतों. तिकडे लढाई सुरू झाली. येथें एकदम भाव वाढले. धान्य, साखर, रॉकेल, काड्याची पेटी, औषधें सार्यांचे भाव वाढले. परंतु मजुराची मजुरी वाढली नाहीं. भाजीविक्या माळणीची भाजी महाग झाली नाहीं. केळीं महाग झालीं नाहींत. तुमच्या दुकानांतील महाग वस्तु ते गरीब कसे घेणार ? काय खाणार ? तुमच्यामध्यें अहिंसा असली, तर तुम्हीं व्यापारी एकदम जमले असतेत. भावनियंत्रण केलें असतेंत. माझ्याकडे दहा गरीब लोक आले व म्हणाले 'गुरुजी, भाव वाढतात. व्याख्यान द्या.' माझ्या शब्दांत तेवढी शक्ति नाहीं. अहिंसा धर्म जर तुम्हांस प्रवृत्त करीत नाहीं तर माझ्यासारख्या क्षुद्राचें कोण ऐकणार ? परन्तु उद्यां मामलेदारांनीं बोलावलें, सरकारचें कडक फर्मान निघालें म्हणजे पटकन ऐकाल. आपण सत्तेला भितों, दंडुक्याला भितों. अहिंसेचा कायदा मानीत नाहीं, दंडुक्याचा कायदा मानतों. बंधुभाव दंडुक्यानें शिकवावा लागतो. कोठें आहे धर्म ?
धर्म शब्द स्वस्त झाला आहे. व्याख्यानांत आम्ही 'माझ्या बंधूंनो' म्हणून म्हणतों. परंतु 'सारे माझे बंधू' याचा जीवनांत अनुभव येतो का ? मी कांहीं दिवसांपूर्वी सावदे स्टेशनवरून फैजपूरला जात होतों. पाऊस पडत होता. मोटार भिजली होती. मी आंत गेलों व बाकांवरील कोरड्या जागेवर बसलों. दुसरे लोक येत होते. शेवटीं एक जण आला. उरलेली जागा फारच भिजली होती. ती कडेची होती. तिकडून आंत पाणी येई. त्यांनीं मला ओळखलें. नमस्कार केला. ते त्या ओल्या जागेवर बसणार तों मी माझी घोंगडी त्यावर पसरली. इतका वेळ ती घोंगडी मी मांडीवर ठेवली होती. त्या ओल्या जागेवर मीच कां बसलों नाहीं ? कोणीतरी बसणारच ना माझा भाऊ ? परंतु माझ्या देहाची, माझ्या कपड्यांची मला चिंता होती. मला लाज वाटली. कसलें आपलें प्रेम असें मनांत आलें. कोठें आहे बंधुभाव ? सारें ओठांत आहे. पोटांत नाहीं. माझी पै किंमत त्या दिवशीं मला कळली. सत्य, अहिंसा, प्रेम हे शब्द स्वस्त झाले आहेत. परंतु त्याचा अल्पसा अनुभवहि दुर्मिळ आहे.
आपल्या देशांत अपार दु:ख आहे. हें दु:ख दूर करावयास पंथातीत भेदातीत काँग्रेस उभी राहिली. तुम्ही अहिंसा धर्माचे. तुम्ही त्या संस्थेचे आधार झालें पाहिजे. परंतु यंदा तुम्ही सभासदहि झाले नाहींत. म्हणतात, तुमच्यांत भांडणें आहेत तीं मिटवा. घरांतील भावाभावांतहि जरा मतभेद होतात. परंतु एका घरांत रहातात. काँग्रेस पस्तीस कोटि लोकांची. मतभेद असणारच. सुभाषचंद्रांचे मतभेद असले तरी ते आधीं काँग्रेस सभासद व्हा असें सांगतात. काँ. च्या पोटांत, काँग्रेसच्या गोटांत सारें करा. देशांतील एक महान् संस्था अहिंसेनें दु:ख दूर करायला उभी राहिली, तिचे सभासदहि तुम्ही होत नाहीं. तुम्ही कसे अहिंसा धर्माचे ? दु:ख दूर करण्यासाठीं संघटना हवी. सर्व दु:खी जनांनीं एकत्र आलें पाहिजे. काँग्रेस सर्वांना एकत्र हांक मारते. जें दु:ख सर्वांचें होतें, तें क्षणांत विझवतात. हिंदुस्थानांतील दु:ख अजून सर्वांचें होत नाहीं. लाखोंची उपासमार आपली वाटत नाहीं. अशानें दु:ख कसें दूर होणार ? सूर्य उगवला म्हणजे न दिसूं देणारें धुकें उडून जातें. मनांत प्रेमसूर्य उगवला म्हणजे दुसर्याचें दु:ख न दिसूं देणारा स्वार्थ निघून जातो. हृदयांत थोडें प्रेम बाळगा.