Get it on Google Play
Download on the App Store

गोड निबंध-भाग १ 40

गोड भक्ति
आईला विचारा तुला कोणता मुलगा आवडतो ? एक असा आहे कीं आईच्याजवळ कधीं भांडत नाहीं; आईविरुध्द ब्र काढीत नाहीं; मुकाट्यानें सांगितलेलें ऐकतो. परन्तु दुसरा असा आहे कीं आईजवळ कधीं भांडतो, तिचा हात धरून ओढतो, अमुक दे असा हट्ट धरतो. रागावून रुसून जरा लांब जातो व आईला त्याची समजूत घालावी लागते. तो प्रेमानें गोड हंसतो, कधीं रागावतो. विचारा, आईला कोणता बाळ आवडेल ? मला तर वाटतें कीं पहिला जो सात्त्वितेचा पुतळा त्याच्यापेक्षा हा दुसरा मुलगा तिला अधिक प्रिय वाटत असेल. या मातृभक्तींत मौज आहे. ऊन आहे. पाऊस आहे. कोणत्याहि स्वरूपाचें प्रेम घ्या. तेथें थोडें भांडणहि असतें. त्या भांडणांत एक अपूर्व गोडी असते. अर्थात् भांडण म्हणजे पुनश्च तोंड न पाहणें नव्हे. काँग्रेसला आम्ही माता म्हणतों. श्री. सुरेश बानर्जी मुंबईला असेंच म्हणाले. या मातेजवळ एखादी गोष्ट आम्हीं मागितली तर का रागावून ती आम्हांला हद्दपार करणार ? माता म्हणेल 'ये. इतका रागावूं नको. घे काय पाहिजे तें.' कोणी ही उपमा लांबवून म्हणेल 'मुलानें सोमलाचा खडा मागितला तर.' आई त्याची समजूत घालील. परंतु घरांतून बाहेर हांकलणार नाहीं. आम्हांला मातेचीं कधीं न भांडणारीं कांहीं मुलें घालवून लावूं पाहतील तर माता प्रेमानें उचंबळून येऊन आम्हांला पोटाशींच धरील. जें प्रेम कधीं भांडत नाहीं त्यापेक्षा असल्या या लागट प्रेमाचीच मातेला अधिक गोडी वाटेल. जें प्रेम कधीं भांडत नाहीं तें प्रेम तरी आहे का असेंहि मनांत येतें. केवळ आज्ञाधारकपणा म्हणजे प्रेम नव्हे.

माझी विठ्ठल माउली । प्रेमपान्हा पान्हावली
कुरवाळोनी लावी स्तनीं । नच जाई दुरि जवळुनी
केली पुरवी आळी । नव्हे निष्ठुर कोंवळी
तुका म्हणे रस । मुखीं घाली ब्रह्मरस
५ डिसेंबर, १९३८.

बा शेतकर्‍या ऊठ !
खानदेशांतील शेतकर्‍यांचीं दररोज सारखीं पत्रें येत आहेत. सर्वांच्या मनांतून एकच केविलवाणा स्वर निघतो. 'पीक बुडालें, शेतकर्‍यांची परिस्थिती अगदींच खालावली. सारातहकुबी द्या, कर्जतहकुबी द्या.' शहरांतील आम्हां नोकरीवाल्या लोकांना खेड्यांतील शेतकर्‍यांच्या परिस्थितीबद्दल कल्पना येणार नाहीं. शहरांत आमचीं सुखसाधनें व करमणुकी वाढतच आहेत. पण खेड्यांत शेतकर्‍यावर मरण ओढवलें आहे. हे शहरी गृहस्था, तूं जर शेतकर्‍याच्या आजच्या दु:खद परिस्थितीकडे लक्ष दिलें नाहीं तर थोडेच दिवसांत तुझ्यावरहि मरण ओढवल्याशिवाय रहाणार नाहीं हें पक्कें लक्षांत ठेव. शेतकरी शेतांत धान्य पिकवितो म्हणूनच आज तुला मोठ्या मजेंत येथें चैन करावयास मिळत आहे. तूं शिक्षक अस, तूं वकील अस; डॉक्टर अस, सावकार, शेटजी, सरकारी नोकरीवाला कोणीहि अस; तुला स्वत:चें जीवन सुखी करण्याकरितां तरी सुध्दां निर्मात्या शेतकर्‍याकडे पाहणें हें तुझें कर्तव्य आहे. देठ सुकला म्हणजे वरचें कमलहि सुकल्याशिवाय राहणार नाहीं. तेव्हा शहरांतील नागरिकांनो, वेळेवर जागे व्हा, शेतकर्‍याला मदत करण्याकरितां धांवा, त्याचें म्हणणें तुम्ही सरकारच्या कानावर पोहोंचवा, त्याला शेतसार्‍यांत कांहीं तरी सूट मिळवून देण्याचा प्रयत्न करा. त्याच्या पाठीवरील तें भरगच्च कर्जाचें ओझें कमी करा. तो आज मरावयाला टेकला आहे.

पण हें काय, शहरी सावकार म्हणतो, 'मी कशाला शेतकर्‍याला मदत करूं, त्यांचें पीक विकल्यानें माझे पैसे फिटतील. मग त्याला घरांत दाणा, पैसा आहे कीं नाहीं ह्याच्याशीं मला काय करावयाचें आहे ? माझे पैसे शेतकर्‍यानें नेले, मला ते वसूल केलेच पाहिजेत. मग तो आहे आणि त्याचें नशीब आहे. भोगेल नशिबाचीं फळें.'

इकडे हे शेटजी काय म्हणत आहेत ? ते म्हणतात, ' आहे कुठें मला वेळ ? कमी भाव देऊन कापूस खरेदी करणें हा तर माझा जाणून बुजून धंदा आहे. एवढी मोठी गिरणी मी उभारली आहे. इतकें मोठें भांडवल घातलेलें आहे. तें कांहीं दान देण्याकरितां नव्हे. भांडवलावर नफा राहण्याकरितां मी इतका विचार करीत असतों कीं माझ्या स्वत:च्या गिरणींतील मजुरांकडे पहावयास जर मला वेळच मिळत नाहीं, तर शेतकर्‍याच्या राहाणीकडे लक्ष देणें दूरच राहिलें. शेतकरी मला कांहीं फुकट माल पुरवीत नाहीं.'

गोड निबंध-भाग १

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
पावसाळ्यातील एक दिवस गोड निबंध-भाग १ 1 गोड निबंध-भाग १ 2 गोड निबंध-भाग १ 3 गोड निबंध-भाग १ 4 गोड निबंध-भाग १ 5 गोड निबंध-भाग १ 6 गोड निबंध-भाग १ 7 गोड निबंध-भाग १ 8 गोड निबंध-भाग १ 9 गोड निबंध-भाग १ 10 गोड निबंध-भाग १ 11 गोड निबंध-भाग १ 12 गोड निबंध-भाग १ 13 गोड निबंध-भाग १ 14 गोड निबंध-भाग १ 15 गोड निबंध-भाग १ 16 गोड निबंध-भाग १ 17 गोड निबंध-भाग १ 18 गोड निबंध-भाग १ 19 गोड निबंध-भाग १ 20 गोड निबंध-भाग १ 21 गोड निबंध-भाग १ 22 गोड निबंध-भाग १ 23 गोड निबंध-भाग १ 24 गोड निबंध-भाग १ 25 गोड निबंध-भाग १ 26 गोड निबंध-भाग १ 27 गोड निबंध-भाग १ 28 गोड निबंध-भाग १ 29 गोड निबंध-भाग १ 30 गोड निबंध-भाग १ 31 गोड निबंध-भाग १ 32 गोड निबंध-भाग १ 33 गोड निबंध-भाग १ 34 गोड निबंध-भाग १ 35 गोड निबंध-भाग १ 36 गोड निबंध-भाग १ 37 गोड निबंध-भाग १ 38 गोड निबंध-भाग १ 39 गोड निबंध-भाग १ 40 गोड निबंध-भाग १ 41 गोड निबंध-भाग १ 42 गोड निबंध-भाग १ 43 गोड निबंध-भाग १ 44 गोड निबंध-भाग १ 45 गोड निबंध-भाग १ 46 गोड निबंध-भाग १ 47 गोड निबंध-भाग १ 48 गोड निबंध-भाग १ 49 गोड निबंध-भाग १ 50 गोड निबंध-भाग १ 51 गोड निबंध-भाग १ 52 गोड निबंध-भाग १ 53 गोड निबंध-भाग १ 54 गोड निबंध-भाग १ 55 गोड निबंध-भाग १ 56 गोड निबंध-भाग १ 57 गोड निबंध-भाग १ 58 गोड निबंध-भाग १ 59 गोड निबंध-भाग १ 60 गोड निबंध-भाग १ 61 गोड निबंध-भाग १ 62 गोड निबंध-भाग १ 63 गोड निबंध-भाग १ 64 गोड निबंध-भाग १ 65 गोड निबंध-भाग १ 66 गोड निबंध-भाग १ 67 गोड निबंध-भाग १ 68 गोड निबंध-भाग १ 69 गोड निबंध-भाग १ 70 गोड निबंध-भाग १ 71 गोड निबंध-भाग १ 72 गोड निबंध-भाग १ 73 गोड निबंध-भाग १ 74 गोड निबंध-भाग १ 75 गोड निबंध-भाग १ 76 गोड निबंध-भाग १ 77 गोड निबंध-भाग १ 78 गोड निबंध-भाग १ 79 गोड निबंध-भाग १ 80 गोड निबंध-भाग १ 81 गोड निबंध-भाग १ 82 गोड निबंध-भाग १ 83 गोड निबंध-भाग १ 84 गोड निबंध-भाग १ 85 बापूजींच्या गोड गोष्टी 52 श्याम 37 चार गोष्टी 1