बापूजींच्या गोड गोष्टी 52
५४
त्या वेळेस महात्माजी आगाखान राजवाड्यात पुण्याला अटकेत होते. ४२ च्या लढ्याचे ते अमर दिवस. स्वातंत्र्याचा ‘चले जाव’चा लढा सुरू झाला आणि महात्माजींचा महादेव अकस्मात देवाघरी गेला. बापूंचा उजवा हात गेला. त्यांची वेदना तेच जाणोत. जेथे दहन झाले तेथे गांधीजींनी लहानशी समाधी बांधली. झाड लावले. रोज त्या समाधीजवळ ते जायचे व फुले वाहायचे. गांधीजी भावसिंधू होते.
एके दिवशी राष्ट्राचा पिता महादेवभाईंच्या समाधीला नित्याप्रमाणे भेट देऊन परतत होता. त्या लहान अरुंद मार्गाने ते येत होते. तो पलीकडे कुंपणाआड त्यांना हरणाचे एक निष्पाप पाडस दिसले. त्या पाडसानेही बापूंकडे करुण दृष्टीने पाहिले. बापू बंधनात होते. बापू बघत राहिले. भरल्या अंत:करणाने ते गेले. संतांना सर्वांविषयी प्रेम. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ असे तुकाराम म्हणत. भारतीय संस्कृती म्हटली म्हणजे आश्रम, हरणे डोळ्यांसमोर येतात. आणि त्या पाडसाला पाहून बापूंना का महादेवाचा आत्मा आठवला?
दुस-या दिवशी तुरुंगाचे अधिकारी आले. बापू म्हणाले, ‘ते तिकडे हरीण असते. ते स्थानबद्ध, मीही स्थानबद्ध. आम्हां दोघांना भेटण्याची परवानगी असू दे.’
संशयी अधिका-यांनी ते हरीणच तेथून हालविले! बापूंना ते हरीण पुन्हा दिसले नाही.