Get it on Google Play
Download on the App Store

गोड निबंध-भाग १ 82

मंगल विवाह
अडावदचे चिरंजीव बन्सीलाल काबरे यांचा विवाह नगर जिल्ह्यांत शेवगांव येथें कांहीं दिवसांपूर्वी झाला. हा लग्नसमारंभ खरोखरच मंगल असा झाला. वधूवरें शुध्द खादीच्या वस्त्रांनीं नटलेलीं होतीं. नटलेलीं म्हणण्याऐवजीं साधेपणानें शोभत होतीं. नवरदेव रोजचाच सदरा व कोट घालून मिरवणुकींत पायीं जात होता. त्याच दिवशीं तेथें एक दुसराहि विवाह होता. त्या समारंभांतील नवरदेव भरजरी पोषाखांत घोड्यावरून छत्रचामरांसह जात होता. एकीकडे तो देखावा तर एकीकडे पायीं जाणारा हा खादीच्या पोषाखांतील ध्येयवादी नवरदेव !

या समारंभांत सर्व रूढींना चाट दिली होती. वधूच्या घरीं नवरदेव मण्डळीबरोबर पायीं आला. नंतर त्यानें अभ्यंगस्नान केलें. त्यानंतर वधू व वर चौरंगावर उभीं राहिलीं. वधूवरांनीं मारवाडी भाषेंत छापलेली सुंदर प्रतिज्ञा म्हटली. ही प्रतिज्ञा फार अर्थपूर्ण होती. वधू म्हणते, 'मी केवळ भोग्य वस्तु नाहीं. स्त्री म्हणजे पुरुषाहून कमी अशी भावना हे नाथ तुमची असूं नये. आपण दोघें परस्परांच्या आत्म्यास ओळखूं या. संसार नेटका करून परमार्थ करूं या. स्वातंत्र्य मिळविणार्‍या राष्ट्रीय सभेचें बळ वाढवूं या.' किती तरी सुंदर विचार त्या प्रतिज्ञेंत होते. वधूला वर म्हणतो 'तुझे विचार मला मान्य आहेत. ईश्वर मला सामर्थ्य देवो.'

या समारंभास माहेश्वरी समाजांतील थोर थोर कार्यकर्ते आले होते. हैद्राबाद स्टेट कांग्रेसचे कार्यकर्ते आले होते. माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष, चिटणीस वगैरे आले होते. पूर्व खानदेश जिल्हा काँग्रेसचे चिटणीस श्री. सितारामभाई बिर्ला, अमळनेरचे सुप्रसिध्द श्री. लटे वकील, अडावदचे श्री. बंडूशेट काबरे वगैरे खानदेशांतील नवविचाराची कितीतरी मंडळी आली होती. वधूवरांकडील मंडळी सुशिक्षित व राष्ट्रप्रेमी अशी असल्यामुळें अत्यंत आनंदानें सारें कार्य झालें. वधूवरांनीं परस्परांस माळ घातल्यावर सानेगुरुजींचें लहानसें भाषण झालें. ते म्हणाले 'श्री. बन्सीलाल यांच्या घराण्याशीं माझा घरोबा आहे. अमळनेरला त्यांचे सारे भाऊ शिकले. त्यांच्या घरीं आम्हीं अनेकदां विद्यार्थि घेऊन गेलेले आहोंत. या घरोब्यामुळें, त्याप्रमाणेंच हा विवाह सर्व रूढी झुगारून, पडदा दूर करून, खादी परिधान करून होणार, म्हणूनहि मी आलों आहें. हा खरा मंगल विवाह आहे. आपण वधूवरांवर मंगलाष्टकांच्या वेळेस अक्षता वर्षत होतों. अक्षतांचा वर्षाव याचा अर्थ काय ? अक्षता म्हणजे ज्याला क्षय नाहीं, नाश नाहीं, अशा भावनांची खूण. अक्षतांचा तांदुळ तुटका नको. तो निर्मळ स्वच्छ तांदुळाचा दाणा-म्हणजे निर्मळ सौभाग्य व भाग्य. त्या अक्षतांच्या वर्षावानें वधूवरांवर आपण खर्‍या मांगल्याची वृष्टि करीत होतों. वधूवर अक्षय सुखांत व समृध्दींत राहोत असें सांगत होतों. मांगल्याचा असा वर्षाव होत असतांना सावधान शब्दहि बरोबर होता. मांगल्याची वृष्टि पाहिजे असेल तर विचारपूर्वक आचार झाला पाहिजे. जपून संयमानें वागलें पाहिजे. बेसावध मनुष्य बुडतो; सावधानी मनुष्याचा सांभाळ होतो. सावधान असणें म्हणजे आसमंतात् पाहणें. वधूवरांवर व अक्षता फेकणार्‍या आपणांवर यामुळें मोठी जबाबदारी येते. सभोंवती दास्य व उपासमार असेल तर कोठली मंगलाची वृष्टि ? देश परतंत्र आहे. देश उपासमारीनें मरत आहे. धंदा नाहीं, ज्ञान नाहीं, सर्वत्र भांडणें. अशा परिस्थितींत मंगलाची प्राप्ति कशी होणार ? सभोंवतीं सुखसमाधान असेल तर मला सुखसमाधान मिळेल. सभोंवतीं आग पेटली असेल तर मला तिची आंच लागल्याशिवाय कशी राहील ? वधूवरांना खरें सुख मिळावें असें ज्यांना वाटत असेल त्यांनीं देश स्वतंत्र करावा. स्वातंत्र्याशिवाय सुख नाहीं. देश स्वतंत्र होईपावेतों कोठले सुखाचे संसार ? कोठलें मांगल्य ? वधूवरांनीं आपल्या प्रतिज्ञेंतहि त्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्या प्रतिज्ञेची जाणीव, कोट्यवधि भुकेकंगाल, बंधुभगिनींची जाणीव त्यांना आहे. म्हणूनच आज त्यांनीं पवित्र खादी अंगावर घातली आहे. गरिबांची अन्नान्न दशा थांबविणारी खादी, तिच्याहून कोणतें अधिक मंगल वस्त्र ? मघां मी बाजारांतून जात होतों. जुन्या रूढीचे भक्त अशी कांहीं मारवाडी मंडळी जात होती. मी पुढें जात होतों. पाठीमागून त्यांचा संवाद कानीं पडत होता. एक जण म्हणाला -ते धर्मशाळेंत उतरले आहेत. चला पाहूं तर खरी ती मंडळी.' दुसरा म्हणाला 'रस्ता कोठचा ?' तिसरा म्हणाला 'ते गांधीटोपडे जात आहेत आपण त्यांच्या मागोमाग जाऊं, 'पवित्र खादीची टोपी डोक्यावर घालणारांना ते चुस्त सनातनी 'गांधी टोपडे' म्हणत होते. माझ्या देशाला गुलाम करणार्‍या टोपड्यांची यांना चीड येत नाहीं. परन्तु देशांत स्वाभिमान, स्वावलंबन, तेज, त्याग, यांची ज्योत पेटविणारी ही खादी, गरिबांची अन्नपूर्णा अशी ही खादी, ती पाहून ते जळफळत होते. दुर्दैव आहे आपल्या देशाचें. परन्तु दु:ख करून काय होणार ? निराशेंत हा येथला विवाह म्हणजे आशा आहे. अंधारांतील हा किरण आहे. लग्नाच्या वेळेस, किंवा कोणत्याहि मंगल प्रसंगीं उदकुंभ भरून ठेवतात. डोक्यावर भरलेले घडे घेतात. डोक्यावर खादी टोपी घालणें म्हणजेच मंगल घडे डोक्यावर घेणें. गरिबांच्या जीवनाचे रिकामे घडे, त्यांत खादी जीवनरस ओतते. त्यांचे दु:खी जीवनाचे घडे सुखाच्या अमृतानें भरते. खादी म्हणजे गरिबाशीं सहकार. विवाहाच्या वगैरे प्रसंगीं आम्रवृक्षाचे पल्लव हवेत. आम्रवृक्षाला संस्कृतांत सहकारं अशी संज्ञा आहे.

गोड निबंध-भाग १

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
पावसाळ्यातील एक दिवस गोड निबंध-भाग १ 1 गोड निबंध-भाग १ 2 गोड निबंध-भाग १ 3 गोड निबंध-भाग १ 4 गोड निबंध-भाग १ 5 गोड निबंध-भाग १ 6 गोड निबंध-भाग १ 7 गोड निबंध-भाग १ 8 गोड निबंध-भाग १ 9 गोड निबंध-भाग १ 10 गोड निबंध-भाग १ 11 गोड निबंध-भाग १ 12 गोड निबंध-भाग १ 13 गोड निबंध-भाग १ 14 गोड निबंध-भाग १ 15 गोड निबंध-भाग १ 16 गोड निबंध-भाग १ 17 गोड निबंध-भाग १ 18 गोड निबंध-भाग १ 19 गोड निबंध-भाग १ 20 गोड निबंध-भाग १ 21 गोड निबंध-भाग १ 22 गोड निबंध-भाग १ 23 गोड निबंध-भाग १ 24 गोड निबंध-भाग १ 25 गोड निबंध-भाग १ 26 गोड निबंध-भाग १ 27 गोड निबंध-भाग १ 28 गोड निबंध-भाग १ 29 गोड निबंध-भाग १ 30 गोड निबंध-भाग १ 31 गोड निबंध-भाग १ 32 गोड निबंध-भाग १ 33 गोड निबंध-भाग १ 34 गोड निबंध-भाग १ 35 गोड निबंध-भाग १ 36 गोड निबंध-भाग १ 37 गोड निबंध-भाग १ 38 गोड निबंध-भाग १ 39 गोड निबंध-भाग १ 40 गोड निबंध-भाग १ 41 गोड निबंध-भाग १ 42 गोड निबंध-भाग १ 43 गोड निबंध-भाग १ 44 गोड निबंध-भाग १ 45 गोड निबंध-भाग १ 46 गोड निबंध-भाग १ 47 गोड निबंध-भाग १ 48 गोड निबंध-भाग १ 49 गोड निबंध-भाग १ 50 गोड निबंध-भाग १ 51 गोड निबंध-भाग १ 52 गोड निबंध-भाग १ 53 गोड निबंध-भाग १ 54 गोड निबंध-भाग १ 55 गोड निबंध-भाग १ 56 गोड निबंध-भाग १ 57 गोड निबंध-भाग १ 58 गोड निबंध-भाग १ 59 गोड निबंध-भाग १ 60 गोड निबंध-भाग १ 61 गोड निबंध-भाग १ 62 गोड निबंध-भाग १ 63 गोड निबंध-भाग १ 64 गोड निबंध-भाग १ 65 गोड निबंध-भाग १ 66 गोड निबंध-भाग १ 67 गोड निबंध-भाग १ 68 गोड निबंध-भाग १ 69 गोड निबंध-भाग १ 70 गोड निबंध-भाग १ 71 गोड निबंध-भाग १ 72 गोड निबंध-भाग १ 73 गोड निबंध-भाग १ 74 गोड निबंध-भाग १ 75 गोड निबंध-भाग १ 76 गोड निबंध-भाग १ 77 गोड निबंध-भाग १ 78 गोड निबंध-भाग १ 79 गोड निबंध-भाग १ 80 गोड निबंध-भाग १ 81 गोड निबंध-भाग १ 82 गोड निबंध-भाग १ 83 गोड निबंध-भाग १ 84 गोड निबंध-भाग १ 85 बापूजींच्या गोड गोष्टी 52 श्याम 37 चार गोष्टी 1