गोड निबंध-भाग १ 70
देवा गणेशा
काल गणेशचतुर्थीचा मंगल दिवस. सर्व महाराष्ट्रभर घरोघर गणेशाची पूजाअर्चा कालपासून सुरू झाली असेल. कोठें पांच दिवस, कोठें सात दिवस, कोठें दहा दिवस असा हा उत्सव सुरू राहील. मीहि मंगलमूर्तीचा उत्सव मांडला आहे. माझ्या हृदयमंदिरांत त्याची स्थापना केली आहे. बुध्दि त्याच्या पायांशीं नम्रपणें बसली आहे. मधून मधून जीव मान वर करून देवा गणेशाला प्रश्न विचारीत आहे व तो त्याचीं उत्तरें देत आहे. असा हा वैयक्तिक उत्सव सुरू आहे. हीं आमचीं भक्तिप्रेमाचीं प्रश्नोत्तरें, या गुजगोष्टी तुम्हांला ऐकावयाच्या असतील तर ऐका. तुम्हांलाहि त्याचा कदाचित् फायदा होईल.
जीव:- गणेशा, तूं सुखकर्ता, दु:खहर्ता, विघ्नहर्ता. आमचीं दु:खें केव्हां जातील, आमचीं विघ्नें केव्हां हरतील, आम्हांला सुखाचे दिवस कधीं येतील ?
गणेश :- दु:खें दूर करण्याचा व सुख जवळ आणण्याचा एकच सनातन मार्ग आहे. विघ्नांचा विनाश होणें व विकासाचा मार्ग मोकळा होणें याचाहि तोच मार्ग आहे. हा कोणता बरें मार्ग ? येतो का तुझ्या लक्षांत ?
जीव :- नाहीं येत; तूंच स्पष्ट करून सांग.
गणेश :- सहानुभूति. एकमेकांबद्दल सहानुभूति वाटणें हाच धर्माचा प्राण आहे. आज तुमच्या राष्ट्रांत सारे सहानुभूतिशून्य झाले आहेत. परस्परांबद्दल सहानुभूति वाटूं लागली म्हणजे विरोध कमी होतात. द्वेषमत्सर मावळतात. सहकार्याचें राज्य सुरू होतें.
जीव :- ही सहानुभूति कशानें उत्पन्न होईल ?
गणेश :- विवेकानें. दुसर्याला आपल्याचसारखें हृदय आहे, मन, बुध्दि आहे, याची जाणीव झाली म्हणजे सहानुभूति उदयास येते. आत्म्याचें नातें वाढवीत चला. आपलेपणाचें नातें म्हणजे परीस आहे. मुलगा कितीहि वाईट असला तरी आपलेपणाच्या नात्यामुळें तो आईला गोड वाटतो. हें आपलेपणाचें नातें प्रत्यक्ष सृष्टींत उत्तरोत्तर अधिक आणा. हरिजन आपलेच, भंगी आपलेच, मुसलमान बंधू आपलेच, अशा रीतीनें राष्ट्र बनवा. एकजीव करून मानवाच्या विकासाकडे वळा. अरे माझी तुम्हीं कालपासून पूजा करीत आहांत. परन्तु तुमची पूजा मला विषाप्रमाणें झोंबते.
जीव :- कां बरें ? तुला मखरें घातलीं आहेत, खिरापती वाटीत आहेत, मेळे चालले आहेत. काय आमचें चुकतें ?
गणेश :- अरें माझें नांव काय ? गणपति हें माझें नांव. सर्व गणांचा मी पति, सर्व गणांचा ईश. सारे मानवी समाज माझ्यासमोर प्रेमानें आले तर ना माझी गणेशाची पूजा होणार ? त्या दिवशीं अमळनेरमधील विद्यार्थी वर्गणी गोळा करावयास गेले. तर कोणी म्हणाले 'महारामांगांना नका जवळ येऊं देऊं.' महारामांगांचा जो गण, तो माझ्यांत नाहीं का ? अरे माझे असे लचके काय तोडतां ? असे खंड खंड काय करतां ? सारे माझ्याजवळ जर येणार नसतील तर कसला माझा उत्सव ? तुम्ही आमचे उत्सव करतां कीं थट्टा करतां ? आम्हांला परमेश्वररूप मानतां कीं डबक्यांतील बेडूक समजतां ? परवां गोकुळअष्टमीचा उपवास केलात. परन्तु भगवान् श्रीकृष्ण गोकुळांत प्रेमानें काला करी. सर्वांना घास देई तुम्ही तर हॉटेलमध्यें हरिजन बंधूंस येऊं देण्यासहि तयार नाहीं. कसली गोकुळ अष्टमी ? कसली गणेशचतुर्थी ? आतां नवरात्रांत देवीचा उत्सव कराल. देवीला चार हात, अठरा हात, अशा कल्पना आहेत. अठरा पगड जातींकडून प्रभु आपलीं कार्ये करवून घेतो. सार्या जाती म्हणजे जणूं त्याचे हात. परन्तु तुम्ही एकमेकांस तुच्छ लेखतां. काय तुम्हांला सांगावें ? आम्हां देवतांचा तुम्हीं शेंकडों वर्षे अज्ञानानें वा अहंकारानें अपमान करीत आहांत. खरा गणेशोत्सव करावयाचा असेल तर सर्व गणांना प्रेम द्या. सर्व गणांबद्दल सहानुभूति बाळगा.