गोड निबंध-भाग १ 35
खरा धर्म
ठाणें जिल्ह्यांतील बोर्डी गांवची ही एक सत्यकथा आहे. त्या गावांत एक टांगेवाला होता. हा टांगेवाला मुसलमान खाटीक होता. तो टांगेवाल्याचें काम करी व खाटकाचाहि धंदा करी. परंतु तरीहि कुटुंबाच्या पोषणापुरतें त्याला मिळत नसे. स्टेशनवर मोटारींची जा ये सुरू झाली. त्यामुळें टांगेवाल्यांचा धंदा बसला. खाटकाचाहि धंदा आमच्या या टांगेवाल्याला जमेना. एक तर त्याच्याजवळ पुरेसें भांडवल नव्हतें. आणि दुसरें म्हणजे त्याला त्या धंद्यांत पडावें असें वाटत नसे. नाइलाज म्हणून तो खाटीक बने. परंतु केव्हां हा धंदा सुटेल असें त्याला वाटे.
त्या खाटिक टांगेवाल्याला कर्ज होतें. हें कर्ज तो कसा फेडणार ? घरांत ना पोटभर खायला, ना नीट ल्यायला. काय करील बिचारा ! जें कांहीं थोडें फार उरे तें तो सावकारास नेऊन देई. सावकाराचा संताप शांत करण्यासाठीं तो पाया पडे, डोळ्यांत पाणी आणी.
परंतु एके दिवशीं सावकार फारच संतापला. 'बस्स, तुझ्यावर फिर्याद करतों. किती दिवस वाट पाहायची तरी ? व्याज सुध्दां तूं देत नाहीं.' अशी सावकाराची संतापगाथा सुरू झाली.
"मालक, रागावूं नका. घरांतून काढूं नका. कोठें जाऊं बालबच्चे घेऊन ? वडिलांपासूनचें घर. राहूं दे एवढें. दया करा" खाटिक म्हणाला.
"दया करा ? हा व्यवहार आहे. व्यवहार पाहिलाच पाहिजे. धर्माच्या वेळेस दया. व्यवहारांत दया करून कसें चालेल ?" तो मालक म्हणाला.
खाटिक घरीं गेला. बायको व तो दोघे विचार करीत बसलीं, कांहीं उपाय सुचेना. लहान मूल थंडींत गारठत होतें. आईनें त्याला आपल्या पोटाशीं धरलें. शेवटीं ती नवर्याला म्हणाली,
"खाटकाचा धंदा जरा नीट करा ना. कंटाळून कसें चालेल ? तुम्हांला बकर्याची मान कापवत नाहीं, परंतु सावकार तुमची मान कापायला तयार आहे. आपल्या मुलांबाळांची उपासमार होऊं नये, तीं उघडीं पडूं नयेत म्हणून करा धंदा"
"पण धंद्यांत किती स्पर्धा ! एकदम खरेदी केलीं तर स्वस्त पडतात जनावरें. एक दोन घेणें परवडत नाहीं." तो म्हणाला.
"सावकाराजवळ आणखी कर्ज मागा. तो देईल.' ती म्हणाली.
"तुमचें कर्ज मी फेडीन. परंतु आणखी भांडवल पाहिजे. शंभर रुपये आणखी द्या. तीनशेंचा कागद करून घ्या." खाटिक सावकारास म्हणाला.
"अशी हिंमत बाळग. इतर खाटकांना बंद पाड. किती, शंभर रुपये हवेत म्हणतोस ? हरकत नाहीं, देतों. परंतु जसजसे मिळतील तसतसे आणले पाहिजेस." सावकार म्हणाला.