गोड निबंध-भाग १ 67
त्रिपुरी म्हणजे
महात्मा गांधींचा राजकोटचा उपवास होता. उपवास सुटल्यावरहि अशक्तपणामुळें ते त्रिपुरीस त्वरित येऊं शकले नसते. बरें वाटतांच दिल्लीस जाणें त्यांचा धर्म होता. राष्ट्रपति सुभाषबाबू त्रिपुरीस होते, परन्तु ते रुग्णशय्येवर. जुन्या व. कमिटींतील सभासद फारसे कोणी उघड बोलत नव्हते. त्यांचें वकीलपत्र प्रधानांनीं घेतलें होतें. अशा परिस्थितींत पंडित जवाहरलालांवर सर्वांत मोठी जबाबदारी पडली होती. ज्याच्यावर जबाबदारी पडते त्याला बरेंवाईट पहावें लागतें. जवाहिरलालांवर अनेकांचा रोष झाला आहे. त्यांनीं अवसानघात केला असा त्यांचेवर आरोप आहे. त्यांच्या सांगण्यामुळेंच कांग्रेससमाजवादी तटस्थ राहिले असें मानण्यांत येतें. राष्ट्रांत समाजवादी विचार, किसान कामगारांचे कार्यक्रम यांवर भर पंडितजींनीं दिला होता. त्यांच्याकडे जहालांचे डोळे होते. परंतु त्यांच्या कसोटीस पंडितजी उतरले नाहींत.
याचें कारण काय ? पंडितजी एकदम परंपरा तोडूं इच्छित नाहींत. ते संयमी वाढ इच्छितात. व्याख्यानांतून विचार मांडणें, निराळे सूर्यकिरण कांचेंतून वाकून जातात तसेच ध्येयवाद कर्मसृष्टींत आणतांना थोडा वाकडा होतो. महात्माजींच्या गैरहजेरींत कांग्रेसचे तुकडे पडूं न देणें हें जवाहिरलालांचें काम होतें. गोविंद वल्लभ पंत यांचा ठराव सर्व कारभाराचा पाया होता. जुन्या सभासदांस तसा ठराव पाहिजे होता. एरव्हीं ते नवीन व. कमिटींत येण्यास तयार नव्हते. जर हा ठराव नापास झाला असता तर काय झालें असतें ? व. कमिटीचे जुने लोक दूर राहिले असते. नवीन व. कमिटी बनवावी लागली असती. कदाचित् त्यांत जवाहिरलाल येते, कदाचित् न येते. मंत्रिमंडळांनीं राजिनामे दिले असते. नवीन कार्यक्षम मंत्री मिळणें कठिण झालें असतें. शिवाय निरनिराळे प्रांत म्हणजे कडबोळीं. मुंबई इलाख्यांत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजराथ एकत्र आहेत. मद्रास इलाख्यांत तामील, तेलगू, कन्नड व मल्याळम् यांचें मिश्रण आहे. मध्यप्रांतांत हिंदी, मराठी व वर्हाड असे भेद आहेत. या सर्वांस एकत्र ठेवणें हें कठीण काम आहे. कार्यक्षम मंत्री व वजनदार, कसलेले, शेंकडों लढाया लढलेले, सरदारांसारखे नियंत्रक असतील तरच हा गाडा चालणार. नाहीं तर फजीति होण्याचा संभव. आमचे ओंगळ प्रांतीय व जातीय भेद पुढें येण्याचा संभव. जगासमोर स्वातंत्र्येच्छु भारताचें हंसें. उद्यांच कांहीं लढाई सुरू होणार नव्हती. उद्यांच कांहीं कायदेभंग नव्हता. मंत्रिमंडळांचें अद्याप काम आहे. या सर्व गोष्टी जवाहिरलालांसमोर असतील. या गोष्टी कां. सोशॅलिस्टांतील कांहींसमोर असतील. पंतांच्या ठरावावर जवाहिरलाल कांहीं बोलले नाहींत. वर्किंग कमिटींतील कोणीच बोललें नाहीं. परन्तु एकदां हा ठराव पास झाल्यावर जवाहिरलाल उठावले. राष्ट्राध्यक्षांच्या व जहालांच्या जास्तींत जास्त ज्या भावना प्रकट करणें शक्य त्या त्यांनीं ठरावांत मांडल्या. फेडरेशनचा त्यानीं स्पष्ट धिक्कार केला. हिंदी प्रतिनिधीच आपली योजना तयार करतील, यावर भर दिला. मंत्र्यांचें काम तितकें मला पसंत नाहीं असें सांगून त्यांना सूचना दिली. लढा जवळ आहे, तयार रहा; असा इशारा दिला. ब्रिटनचें धोरण मान्य नाहीं, असें सांगितलें. कां. संस्थानी लढ्यांत जरूर तेथें व योग्य तेव्हां हात घालील, तिचा हा हक्क आहे; व्यक्तींना भाग घ्यावयास हरकत नाहींच, असें घोषित केलें. अशा प्रकारें परंपरा न सोडतां जेवढें पुढें जातां येईल तेवढें पाऊल त्यानीं पुढें टाकलें.
जहालांजवळ अद्याप शिस्त नाहीं, संघटना नाहीं, एकभाव नाहीं. त्यांच्या आपसांतहि स्पर्धा आहेत. त्यांच्यांत अखिल भारतीय प्रतिष्ठेचे पुढारी फार नाहींत. अशामुळें काय करावयाचें ? शिवाय महात्माजींचें नेतृत्व तर अत्यंत जरूर. महात्माजींचा ज्यांच्यावर विश्वास, त्यांचीहि म्हणूनच जरूर. अशा परिस्थितींत आपले पुरोगामी विचार, आपल्या योजना यांचा कांग्रेसच्या कार्यक्रमावर जेवढा परिणाम एकत्र राहून घडवितां येईल तेवढा घडवावा, असें जवाहिरलालांस वाटलें असल्यास त्यांत आश्चर्य नाहीं. कांग्रेसला हळुहळू ते नवीन रंग चढवीत आहेत. पटकन दिलेला रंग टिकणारहि नाहीं.
सारांश, त्रिपुरी म्हणजे संयमाचा व ऐक्याचा विजय, जवाहिरलालांचा विजय. जवाहिरलालांचींच भाषणें, त्यांचेच ठराव, त्यांच्या हस्तें झेंडावंदन, त्यांच्या हस्तें स्वयंसेवकांस समारोपाचे शब्द; हुल्लड चालली असतां त्यांचें तें शांत, परन्तु गंभीर व खंबीरपणें सव्वा तास उभें राहणें, ती त्यांची विजयी इच्छाशक्ति--या सर्वांतून त्यांचेंच प्रभावी व्यक्तिमत्त्व प्रकट होत होतें. म.गांधींचे नंतर राष्ट्र कोणाकडे पहात असेल तर तें जवाहिरलालांकडेच होय, हें गोविंद वल्लभपंतांचें विधान यथार्थ नाहीं असें निर्मळ मनाचा कोण म्हणेल ?
२० मार्च, १९३९.