Get it on Google Play
Download on the App Store

गोड निबंध-भाग १ 11

क्रांतिकारक उपाय योजल्याशिवाय शेतकरी जगणार नाहीं. परंतु क्रांतिकारक उपाय तरी कसे योजावयाचे ? सावकाराचें सारें कर्ज माफ, असें जाहीर करावयास हवें. सावकाराशीं सरकारनें करार मदार कर्जफेडीचे करावे. परंतु शेतकर्‍यांना कर्ज देण्याची नवीन भरपूर व्यवस्था केल्याशिवाय सावकार दूर करतां येत नाहीं. भर कर्ज देतां येण्यासाठीं चांगल्या भरपूर भांडवलाच्या बँका पाहिजेत. त्यासाठीं प्रांतांतून मध्यवर्ती सरकाराकडे लष्करी वगैरे अवाढव्य खर्चासाठीं जाणारे पैसे कमी करतां आले पाहिजेत. प्रांतांतील सर्व धनिकांवर निर्वाणीचा जादा कर बसवला पाहिजे. परंतु हें सर्व करावयाचें म्हणजे सत्ता हातीं हवी. ती कोठें आहे ? सत्ता हातीं नाहीं. लष्करी खर्च कमी करतां येत नाहीं. बड्या अधिकार्‍यांचे पगार कायद्याप्रमाणें कमी करतां येत नाहींत. श्रीमंतांवर जादा प्रांतिक कर बसवावा तर ते गव्हर्नरकडे संरक्षण मागतील. गव्हर्नर कायद्याप्रमाणें त्यांना तें देईल. अशामुळें बँकांना भरपूर भांडवल नाहीं. सावकारी दूर करतां येत नाहीं. सरकारी खर्च कमी करतां येत नाहीं. म्हणून शेतसाराहि कमी करतां येत नाहीं. कर्ज देण्याचीहि व्यवस्था करतां येत नाहीं.

बड्या अधिकार्‍यांचे पगार कायद्याप्रमाणें कमी करतां येत नाहींत हें खरें. परंतु माणुसकीचा कायदा सर्वांच्या हृदयांत नाहीं का ? ज्यांना ज्यांना शंभर रुपयांच्यावर पगार मिळत आहे, त्या सर्वांनीं आपले पगार देशांतील शेतकर्‍यासाठीं कां न कमी करून घ्यावे ? शेतकर्‍यांचे हाल हाल होत असतां मी शंभरापेक्षां अधिक पगार घेणें म्हणजे शेतकर्‍यांचे खून करणें होय. अरे शंभरावर पगार घेणार्‍या मित्रांनो ! तुम्हीं या देशचे, या लोकांच्या रक्तामांसाचे ना ? तुम्हीं तर सातासमुद्रापलीकडून नाहीं नां आलेत ? तुम्हांला शेतकर्‍याची करुणा कां येऊं नये ? शेतकरी जगेल तर तुम्ही जगाल. शेतकर्‍याला जगविणें हा उपकार नसून स्वत:च्या जगण्यासाठींच तें अवश्य आहे.

वरती कमळ हंसतें. परंतु कमळाचा देंठ खालीं चिखलांत लडबडत असतो. देंठाच्या जवळचा ओलावा जर सुकला तर वरचें कमळ हंसेल का ? देंठ सुकला तर कमळ सुकणार, गळणार ! म्हणून पांढरपेशांनो, शंभरावर पगार घेणार्‍यांनो ! तुम्ही प्रांतिक सरकारला भराभरा कळवा कीं, 'आम्हांला शंभर रुपये पगार जास्तींत जास्त द्या, बाकीचा कापून टाका व शेतकर्‍यांचा बोजा कमी करा.'

प्रांतसाहेब अमळनेर तालुक्यांत रागावले. परंतु त्यांना जर हृदय असतें तर ते शेतकर्‍यांवर रागावले नसते. त्यांनीं सरकारला वरती कळविलें असतें 'शेतकर्‍याची दुर्दशा आहे. मी ४ । ५ शें पगार कसा घेऊं ? मला पुढील महिन्यापासून शंभर रुपये पगार पुरे.' परंतु ही माणुसकी कोण ओळखणार ? माणुसकीहि कायद्यानें शिकवावी लागते.

स्वातंत्र्याचा लढा तीव्र करणें हाच याला उपाय आहे. आणि हा लढा केव्हां तीव्र होईल ? काँग्रेस किसान व कामगार यांचीं दु:खें दूर करण्यासाठीं लढेल तेव्हां. किसान व कामगार यांचे प्रश्न हे काँग्रेसचे मुख्य प्रश्न झाले पाहिजेत. कारण बहुजन समाज म्हणजे किसान कामगार. ते सुखी तर बाकी सर्व सुखी.

किसान व कामगार हीं दोन राष्ट्रपुरुषाचीं फुफ्फुसें आहेत. या फुफ्फुसांची काळजी घेण्यास काँग्रेसनें एकदिलानें उठलें पाहिजे. म्हणजे किसान कामगारांत स्फुरण चढेल. देशांत तेज उत्पन्न होईल. काँग्रेसची खरी शक्ति वाढेल व स्वराज्य जवळ येईल.
११ एप्रिल  १९३८.

गोड निबंध-भाग १

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
पावसाळ्यातील एक दिवस गोड निबंध-भाग १ 1 गोड निबंध-भाग १ 2 गोड निबंध-भाग १ 3 गोड निबंध-भाग १ 4 गोड निबंध-भाग १ 5 गोड निबंध-भाग १ 6 गोड निबंध-भाग १ 7 गोड निबंध-भाग १ 8 गोड निबंध-भाग १ 9 गोड निबंध-भाग १ 10 गोड निबंध-भाग १ 11 गोड निबंध-भाग १ 12 गोड निबंध-भाग १ 13 गोड निबंध-भाग १ 14 गोड निबंध-भाग १ 15 गोड निबंध-भाग १ 16 गोड निबंध-भाग १ 17 गोड निबंध-भाग १ 18 गोड निबंध-भाग १ 19 गोड निबंध-भाग १ 20 गोड निबंध-भाग १ 21 गोड निबंध-भाग १ 22 गोड निबंध-भाग १ 23 गोड निबंध-भाग १ 24 गोड निबंध-भाग १ 25 गोड निबंध-भाग १ 26 गोड निबंध-भाग १ 27 गोड निबंध-भाग १ 28 गोड निबंध-भाग १ 29 गोड निबंध-भाग १ 30 गोड निबंध-भाग १ 31 गोड निबंध-भाग १ 32 गोड निबंध-भाग १ 33 गोड निबंध-भाग १ 34 गोड निबंध-भाग १ 35 गोड निबंध-भाग १ 36 गोड निबंध-भाग १ 37 गोड निबंध-भाग १ 38 गोड निबंध-भाग १ 39 गोड निबंध-भाग १ 40 गोड निबंध-भाग १ 41 गोड निबंध-भाग १ 42 गोड निबंध-भाग १ 43 गोड निबंध-भाग १ 44 गोड निबंध-भाग १ 45 गोड निबंध-भाग १ 46 गोड निबंध-भाग १ 47 गोड निबंध-भाग १ 48 गोड निबंध-भाग १ 49 गोड निबंध-भाग १ 50 गोड निबंध-भाग १ 51 गोड निबंध-भाग १ 52 गोड निबंध-भाग १ 53 गोड निबंध-भाग १ 54 गोड निबंध-भाग १ 55 गोड निबंध-भाग १ 56 गोड निबंध-भाग १ 57 गोड निबंध-भाग १ 58 गोड निबंध-भाग १ 59 गोड निबंध-भाग १ 60 गोड निबंध-भाग १ 61 गोड निबंध-भाग १ 62 गोड निबंध-भाग १ 63 गोड निबंध-भाग १ 64 गोड निबंध-भाग १ 65 गोड निबंध-भाग १ 66 गोड निबंध-भाग १ 67 गोड निबंध-भाग १ 68 गोड निबंध-भाग १ 69 गोड निबंध-भाग १ 70 गोड निबंध-भाग १ 71 गोड निबंध-भाग १ 72 गोड निबंध-भाग १ 73 गोड निबंध-भाग १ 74 गोड निबंध-भाग १ 75 गोड निबंध-भाग १ 76 गोड निबंध-भाग १ 77 गोड निबंध-भाग १ 78 गोड निबंध-भाग १ 79 गोड निबंध-भाग १ 80 गोड निबंध-भाग १ 81 गोड निबंध-भाग १ 82 गोड निबंध-भाग १ 83 गोड निबंध-भाग १ 84 गोड निबंध-भाग १ 85 बापूजींच्या गोड गोष्टी 52 श्याम 37 चार गोष्टी 1