Get it on Google Play
Download on the App Store

गोड निबंध-भाग १ 9

रामनवमी साजरी करणारे हरिजनांना हृदयाशीं धरावयास तयार आहेत का ? नाशिक येथें राममंदिरांत त्यांना येऊं दिलें का ? अंमळनेरच्या वाडींत हरिजनांना येऊं दिलें का ? पुण्याच्या तुळशीबागेंत हरिजनांना प्रेमानें येऊं दिलें का ? हरिजनांना सर्वत्र बंदी. आणि रामनवमी साजरी करितात ! रामाला वानर प्रिय होते. माणसें तरी आहेत कीं नाहीं अशी ज्यांची दुर्दशा वरिष्ठ वर्गांनीं केली होती, त्यांचे अश्रू पुसावयास राम उभा होता. रामाला शेट सावकार प्रिय नव्हते; भटभिक्षुक, शास्त्रीपंडित प्रिय नव्हते. त्या सर्वांना सोडून तो भिल्लांची भेट घ्यावयास आला. तो कोळयांना कुरवाळावयास आला. तो वानरांना वंदावयास आला. आणि राम अयोध्येंत गेला तेव्हां वानरांनीं वेष्टित असा गेला. रामाच्या भोंवतीं वानर आहेत असें पाहून वसिष्ठ ऋषि पळाले नाहींत. रामाला प्रायश्चित्त देण्यासाठीं त्यांनीं गोमूत्र भरून आणलें नाहीं. रामावर कोणी बहिष्कार घातला नाहीं. सर्व पददलितांची मान उंच करून, त्यांना विमानांत स्वत: बरोबर घेऊन राम अयोध्येंत आला. त्या रामाची जयंति आज हिंदुस्थानांत कशी होत आहे ?

जोंपर्यंत पददलितांना तुम्हीं जवळ करीत नाहीं, तोंपर्यंत रामजन्म तुम्हांला कळला नाहीं. जोंपर्यंत हरिजनांना जवळ करीत नाहीं, त्यांना पाणी भरूं देत नाहीं, त्यांना घरींदारीं येऊं देत नाहीं, त्यांच्यांत बंधुभावानें जात नाहीं, त्यांना मंदिरांत येऊं देत नाहीं, तोंपर्यंत या भारतांत रामजन्म होणें शक्य नाहीं. तोंपर्यंत या भारतांत रावणांचेच जन्म होणार.

जोंपर्यंत शेतकर्‍याचें दु:ख दूर व्हावें, त्याला पोटभर धान्य उरावें, रहावयाला लहानसें घर असावें, असें आम्हांस वाटत नाहीं तोंपर्यंत रामजन्म आम्हांस कळला नाहीं.

जोंपर्यंत कामगारांची कष्टदशा पाहून आम्हीं कळवळून उठत नाहीं, त्यांना माणसांसारखें वागवलें जात नाहीं, हें पाहून आम्हीं पेटत नाहीं, त्यांना उंदीरघुशींप्रमाणें लहान बिळांत रहावें लागतें हें पाहून संतापत नाहीं, तोंपर्यंत रामजन्म आम्हांला कळला असें वाटत नाहीं.

भारतांतील स्त्रीपुरुषांनो ! रामजन्म खरोखरच पाहिजे असेल तर हरिजनांचें प्रेम येऊं दे. सध्यां प्रखर उन्हाळा आहे. गांवोगांव हरिजन बंधूंना नीट पाणीहि मिळत नाहीं. अरे रामाच्या भक्तांनो ! कसें हें तुम्हांला पाहवतें ? अमळनेर तालुक्यांतील अमळगांवचे कांहीं तरुण मित्र माझ्याकडे आले व म्हणाले 'गुरुजी ! आमचे गांवाला हरिजनांना नीट पाणी मिळत नाहीं. आम्हीं आमच्या आडांवर भरूं दिलें तर गांवांतील लोक ओरडतील. काय करावें ?' मी त्यांना सांगितलें, 'तुम्हाला हृदय असेल तर हरिजनांना पाणी भरूं द्या. पुकारूं दे गावकर्‍यांना बहिष्कार. अत:पर तरुणांनीं तरी रूढिधर्म जाळावयास व माणुसकीची पूजा करावयास उभें राहिलें पाहिजे.'

खेड्यांपाड्यांतील मित्रानो ! अरे तुम्ही रामाचे व कृष्णाचे ना भक्त ? मग अशी कसाबकरणी कशी करतां ? रामाचा खरा भक्त आपलें घर, आपली विहीर, आपलें मंदिर, आपलें हृदय सर्वांसाठी मोकळें करील. त्यानेंच देशांत व स्वत:च्या हृदयांत राम आणला. बाकीच्यांनीं रामाचा वध केला; समाजाचा व देशाचा रामबोलो केला !

सर्व उदार मनाच्या तरुणांनो ! तुम्ही खरे रामभक्त बना. हरिजनांसाठीं उठा. त्यांना भेटा. त्यांना पाणी द्या. तें रामाला पाणी दिल्यासारखें होईल. तडफडणारा राम जिवंत होईल. आणि भारतांत राम जिवंत झाला म्हणजे रावणांचा अंत झाल्याशिवाय कसा राहील ?
११ एप्रिल, १९३८

गोड निबंध-भाग १

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
पावसाळ्यातील एक दिवस गोड निबंध-भाग १ 1 गोड निबंध-भाग १ 2 गोड निबंध-भाग १ 3 गोड निबंध-भाग १ 4 गोड निबंध-भाग १ 5 गोड निबंध-भाग १ 6 गोड निबंध-भाग १ 7 गोड निबंध-भाग १ 8 गोड निबंध-भाग १ 9 गोड निबंध-भाग १ 10 गोड निबंध-भाग १ 11 गोड निबंध-भाग १ 12 गोड निबंध-भाग १ 13 गोड निबंध-भाग १ 14 गोड निबंध-भाग १ 15 गोड निबंध-भाग १ 16 गोड निबंध-भाग १ 17 गोड निबंध-भाग १ 18 गोड निबंध-भाग १ 19 गोड निबंध-भाग १ 20 गोड निबंध-भाग १ 21 गोड निबंध-भाग १ 22 गोड निबंध-भाग १ 23 गोड निबंध-भाग १ 24 गोड निबंध-भाग १ 25 गोड निबंध-भाग १ 26 गोड निबंध-भाग १ 27 गोड निबंध-भाग १ 28 गोड निबंध-भाग १ 29 गोड निबंध-भाग १ 30 गोड निबंध-भाग १ 31 गोड निबंध-भाग १ 32 गोड निबंध-भाग १ 33 गोड निबंध-भाग १ 34 गोड निबंध-भाग १ 35 गोड निबंध-भाग १ 36 गोड निबंध-भाग १ 37 गोड निबंध-भाग १ 38 गोड निबंध-भाग १ 39 गोड निबंध-भाग १ 40 गोड निबंध-भाग १ 41 गोड निबंध-भाग १ 42 गोड निबंध-भाग १ 43 गोड निबंध-भाग १ 44 गोड निबंध-भाग १ 45 गोड निबंध-भाग १ 46 गोड निबंध-भाग १ 47 गोड निबंध-भाग १ 48 गोड निबंध-भाग १ 49 गोड निबंध-भाग १ 50 गोड निबंध-भाग १ 51 गोड निबंध-भाग १ 52 गोड निबंध-भाग १ 53 गोड निबंध-भाग १ 54 गोड निबंध-भाग १ 55 गोड निबंध-भाग १ 56 गोड निबंध-भाग १ 57 गोड निबंध-भाग १ 58 गोड निबंध-भाग १ 59 गोड निबंध-भाग १ 60 गोड निबंध-भाग १ 61 गोड निबंध-भाग १ 62 गोड निबंध-भाग १ 63 गोड निबंध-भाग १ 64 गोड निबंध-भाग १ 65 गोड निबंध-भाग १ 66 गोड निबंध-भाग १ 67 गोड निबंध-भाग १ 68 गोड निबंध-भाग १ 69 गोड निबंध-भाग १ 70 गोड निबंध-भाग १ 71 गोड निबंध-भाग १ 72 गोड निबंध-भाग १ 73 गोड निबंध-भाग १ 74 गोड निबंध-भाग १ 75 गोड निबंध-भाग १ 76 गोड निबंध-भाग १ 77 गोड निबंध-भाग १ 78 गोड निबंध-भाग १ 79 गोड निबंध-भाग १ 80 गोड निबंध-भाग १ 81 गोड निबंध-भाग १ 82 गोड निबंध-भाग १ 83 गोड निबंध-भाग १ 84 गोड निबंध-भाग १ 85 बापूजींच्या गोड गोष्टी 52 श्याम 37 चार गोष्टी 1