खरा मित्र 11
ती पतिव्रता आनंदली व माघारी आली. प्रधानपुत्र हळूच आधी येऊन परत घोरत राहिला. दुसर्या दिवशी त्या पतिव्रतेने पतीस दु:खाचे कारण विचारले. तो म्हणाला, 'तुझा पती तू जिवंत पाहात आहेस; परंतु तुझा पती तुला मिळावा म्हणून राजपुत्राने पहिल्या मुलाचा बळी दिला आहे. त्या मलाचे तुकडे मी आणले आहेत. ते जिवंत करून आण तर तू खरी पतिव्रता. ते बालक जिवंत होईल, तरच मी हसेन, आनंदाने जगेन, नाही तर मी जीव देईन. 'पतीचे बोलणे तिने ऐकून घेतले व म्हणाली, 'रात्री आपण दोघे देवीच्या देवळात जाऊ. तुम्ही तुकडे घेऊन या. आई जगदंबा बाळ जिवंत करील. चिंता करू नका.'
उभयता रात्रीची वाट पाहत होती. रात्र झाली. सारे जग झोपी गेले. ती दोघे मृत मुलाला घेऊन मंदिरात गेली. ती पतिव्रता जगदंबेस म्हणाली. 'आई, या मुलाच्या बलिदानाने माझा पती मला परत मिळाला. या बाळाला जिवंत कर, या बाळाला हसव. याला जिवंत करशील तर माझे पतिदेव जिवंत राहातील. या मुलाला हसवशील तर ते हसतील. आई, लाव, तुझा अमृताचा हात या कोवळया तुकडयांना लाव.'
देवीने हात लांबवला व त्या तुकडयांस लावला. एकदम बाळ हसू खेळू लागले. प्रधानाचा मुलगा पत्नीसह ते मूल घेऊन राजधानीस आला. सर्वांना आनंद झाला. राजाने राजपुत्रास गादीवर बसविले व प्रधानाच्या मुलास मुख्य प्रधान केले. राजा व प्रधान म्हातारे झाले होते. ते वनात संन्यासी होऊन तप करू लागले. इकडे नवीन राजा व नवीन प्रधान चांगल्या प्रकारे राज्य करू लागले. प्रजा सुखी झाली. कोणी रोगी नाही, दु:खी नाही, कुणाचा छळ नाही. शेते पिकत होती, पाऊस वेळेवर पडत होता. उद्योगधंदे भरभराटीत होते. सारे सुशिक्षित होते. बेकार कोणी नव्हता, आळशी कोणी नव्हता, अनुदार कोणी नव्हता. जुलमी कोणी नव्हता. सारी प्रजा नव्या राजाला व नव्या प्रधानाला दुवा देत होती. आनंदीआनंद होता.
तुमच्या आमच्या देशात तसा आनंद येवो, दुसरे काय?
गोष्ट संपली माझी
फुले आणा ताजी॥
देवा वाहू फुले
नाचू आपण मुले॥
या रे या रे सारे
गाणे गोड गा रे॥
देव आहे मोठा
नाही कुणा तोटा॥
नाही जगी दु:ख
आहे जगी सुख॥