सोन्याची साखळी 9
प्रधानाचा मुलगा राजाकडे गेला. त्याने सारे वर्तमान सांगितले. राजाला आश्चर्य वाटले. केव्हा मुलाला, सुनेला, नातवाला पाहीन असे त्याला झाले. राजपुत्राच्या आईस कळले. राणी धावतच आली. ती म्हणाली, 'त्या लहान मुलास पाहून मला माझ्या मुलाची आठवण होई ती उगीच नसे होत. तो माझाच नातू. माझे ह्दय मला सांगत असे. ह्दयाचा सूर खोटा कसा ठरेल! चला, आपण त्याला डोळेभर पाहू. पोटाशी धरु.'
हा हा म्हणता बातमी शहरात पसरली. लाखो लोक निघाले. हत्ती, घोडे, रथ, चतुरंग सैन्य निघाले. हत्तीवर सोन्याची अंबारी ठेवली होती. वाद्ये वाजू लागली. राजा व राणी बागेजवळ आली. सून पाया पडली. त्यांनी तिला आशीर्वाद दिले. मुलगा भेटला. नातवाला जवळ घेऊन, त्याला आजीने कुरवाळले. राजाराणीचा आनंद गगनात मावेना. मिरवीत मिरवीत सारे राजवाडयात आले. राजाने मोठा सोहळा केला. गरिबांना अन्नदान, वस्त्रदान झाले, जो जे मागेल ते त्याला मिळाले. सारे सुखी होते. एकच प्राणी दु:खी होता व तो म्हणजे ती सावत्र माता. राजा तिचे नाक कान कापून हाकलून देणार होता; परंतु राजाचा मुलगा उदार होता. त्याने तसे होऊ दिले नाही. 'दया करणे हाच थोर धर्म.' असे तो म्हणाला. तो सावत्र आईच्या पाया पडून म्हणाला. 'माझे प्राण तुझ्या गळयात होते. मी तुझ्या गळयातील ताईत. झाले गेले विसर व मजवर मुलाप्रमाणे प्रेम कर. मी माझ्या आईचा तसाच तुझा. 'सावत्र आईचे ह्दय भरुन आले व ती म्हणाली, 'आजपासून मी तुझी खरी आई झाल्ये'
शेवट गोड झाला
सर्वाना आंनद झाला.
तसा तुम्हा आम्हास होवो.