Get it on Google Play
Download on the App Store

सोन्याची साखळी 5

आईचा हात धरून ती धीराची मुलगी चालू लागली. होता होता सायंकाळ झाली. राजाची राजधानी दिसत होती. आईचा हात धरून मुलगी चालत होती. आता अंधार पडला. आईला तहान लागली होती. आता रात्री पाणी कोठे मिळणार? कोठे शोधणार? परंतु फुलांचा वास येत होता. जवळपास बाग असावी असे त्या मुलीला वाटले. ती आईला म्हणाली, 'आई, तू येथे बैस. कोठे तरी जवळच बाग असावी. फुलांचा वास येत आहे. रातराणीचा, निशिगंधाचा, प्राजक्ताच्या कळयांचा वास येत आहे. 'असे म्हणून ती मुलगी पाणी शोधावयास निघली.

ती प्रधानाच्या मुलाची गावाबाहेरची बाग होती. केवढी थोरली अफाट बाग होती. एकदा आत मनुष्य शिरला की बाहेर निघणे कठीण. रात्रीच्या वेळी कोणी अनोळखी नवखा मनुष्य शिरला की बाहेर पडणे शक्य होत नसे. उजाडले म्हणजे तो बाहेर पडे. ती मुलगी त्या बागेत शिरली. पाणी शोधीत चालली. शेवटी एका कारंजाजवळ आली. रात्रीची वेळ होती. कर्दळीची पाने तिने तोडली, परंतु त्या झोपलेल्या पानांना तोडण्याआधी तिने नमस्कार केला व क्षमा मागितली. त्या पानांचा द्रोण करून तो पाण्याने भरून घेतला व ती निघली. परंतु तिला रस्ता सापडेना. तिला बागेतून बाहेर पडता येईना घुटमळत राहिली, हिंडत राहिली. 'माझी आई तहानेली असेल, पाणी पाणी म्हणून प्राण सोडील' असे म्हणून ती रडे व भिरीभिरी हिंडे, परंतु रस्ता सापडेना.

आता बरीच रात्र झाली होती. प्रधानाचा मुलगा गावाला गेला होता. आज राजपुत्र एकटाच होता. तो रात्री जिवंत झाला व बागेत हिंडू लागला. हिंडता हिंडता त्या मुलीची व त्याची गाठ पडली. ती दोघे एकमेकांकडे पाहात राहिली. 'माझी आई' एवढा एकच शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडला. त्या राजपुत्राने सारी चौकशी केली. तो म्हणाला, 'चल, मी तुला रस्ता दाखवतो. 'किती तरी दिवसांत राजपुत्र बागेच्या बाहेर पडला नव्हता. दोघेजण बागेच्या बाहेर आली व आईला शोधीत फिरू लागली. सापडली एकदाची आई.

'आई, हे पाहा पाणी, आई' तिने हाक मारली. आईचे डोके तिने मांडीवर घेतले. आईने डोळे उघडले. 'बाळ, माझा प्राण वाचत नाही. घाल शेवटचे पाणी. तुझ्या हातची गंगा. तुझे कसे होईल?' असे म्हणून म्हातारी मांडीवर पडली. तो राजपुत्र म्हणाला, 'तुमच्या मुलीची काळजी करू नका. मी राजपुत्र आहे. मी तिला माझी बायको करीन. आमचे हात एकमेकांच्या हातांत द्या व आम्हा दोघांस आशीर्वाद द्या.'

म्हातारीने थंडगार होत जाणार्‍या हातांनी आपल्या मुलीचा हात राजपुत्राच्या हातात दिला. झाडावरून फुले डोक्यावर पडली. म्हातारीने दोघांच्या डोक्यावर ते सुकलेले परंतु प्रेमाने भरलेले हात ठेवले व म्हणाली, 'देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो! मुलेबाळे देवो! सुखात ठेवो! एकमेकांस अंतर देऊ नका. कसेही दिवस येवोत, देवाला विसरू नका, उतू नका, मातू नका; कोणाचे वाईट करू नका, वाईट चिंतू नका. कोणाचा हेवादावा नको, मत्सर नको. मी आणखी काय सांगू? माझ्याने बोलवत नाही. आता देवाचे नाव घेत सुखाने मरू दे. 'असे म्हणून ती 'राम राम' म्हणू लागली.

म्हातारीचा प्राण गेला. त्या दोघांनी तो मृत देह बागेत नेला व त्याला अग्नी दिला. दोघेजण दमली होती. ती मुलगी रडत होती. राजपुत्र तिचे सांत्वन करीत होता. हातपाय धुवून दोघे त्या घरात आली. राजपुत्राने तिला खाण्याचा थोडा आग्रह केला. तिने दोन फळे खाल्ली. नंतर राजपुत्राने तिला सारी हकीगत सांगितली, 'मी सकाळी मरून पडेन, परंतु रात्री जागा होईन. काही काळजी करू नकोस. शेवटी चांगले होईल. 'असे म्हणाला.

खरा मित्र

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
आवडती नावडती 1 आवडती नावडती 2 आवडती नावडती 3 आवडती नावडती 4 आवडती नावडती 5 आवडती नावडती 6 तीन मडकी 1 तीन मडकी 2 तीन मडकी 3 तीन मडकी 4 तीन मडकी 5 तीन मडकी 6 तीन मडकी 7 न्याय देणारा गुराखी 1 न्याय देणारा गुराखी 2 न्याय देणारा गुराखी 3 न्याय देणारा गुराखी 4 न्याय देणारा गुराखी 5 न्याय देणारा गुराखी 6 गोसावी 1 गोसावी 2 गोसावी 3 गोसावी 4 गोसावी 5 गोसावी 6 सोन्याची साखळी 1 सोन्याची साखळी 2 सोन्याची साखळी 3 सोन्याची साखळी 4 सोन्याची साखळी 5 सोन्याची साखळी 6 सोन्याची साखळी 7 सोन्याची साखळी 8 सोन्याची साखळी 9 खरा मित्र 1 खरा मित्र 2 खरा मित्र 3 खरा मित्र 4 खरा मित्र 5 खरा मित्र 6 खरा मित्र 7 खरा मित्र 8 खरा मित्र 9 खरा मित्र 10 खरा मित्र 11 मानवजातीचें बाल्य 16